Sunday, July 5, 2015

'सैरभैर' पाऊस..

खरेतर आभाळात पावसाचे ढगच नव्हते, पण एखादयाला बडवून काढायसाठी वांड पोरांनी शिट्टया मारून सगळी टवाळ पोरांची टोळी गोळा करावी तसे एकामागून एक कुठूनतरी ढग गोळा होत गेले अन हेहे म्हणता आभाळ काळंभोर झालं अन त्याने असं रान बडवायला सुरुवात केली की कुणाच्या बापाला वर तोंड करून बघायची टाप नव्हती. अर्ध्या रात्रभर येड लागल्यागत पाऊस पडतच होता. वेदनेने व्याकुळ झालेला एखादा वृद्ध संतापाच्या अग्नीत भडकून उठावा तसा हा पाऊस बरसला होता. माहेरवाशिनीने म्हायेरच्या बंद दारावर धडका देत उभं ऱ्हावं तसा पाऊस मधूनच मोठाल्या सरींच्या धडका देत होता. त्याच्या जोडीला बेभान वारा फणा काढलेल्या नागासारखा ताल धरून होता. वेड्यावाकड्या धारात बरसणारा हा पाऊस म्हणजे जणू कासरा सोडून कुणीकडेही धावत सुटलेलं वासरुच  होतं! रपरप आवाज करत धोधो पडलेला पाऊस मातीवर डोकं बडवून घेत होता. कचाकच वीजा लखलखत होत्या, कानठळया बसतील असा आवाज करत मधुनच मातीत लोळण घेत होत्या. देवाघरचं जातं एकमेकावर रगडावं तसं ढग एकमेकाच्या छाताडावर रगडून आवाज काढत होते. खूप दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आता चांगला भीजपाऊस पडेल अन पाण्याची ददात मिटेल या गुताडयात सगळ्यांची डोकी अडकली होती पण झालं भलतंच ! या पावसाचे मन मोकळे व्हायला चांगले तीन चार तास  लागले. मध्यानराती नंतर एकदाचा पाऊस थांबला अन आकाश देखील मोकळे झाले, वर्गातल्या मास्तरांसमोर पोरांनी हाताची घडी घालून चिडीचूप बसावं तसा वारा देखील निमूटपणे शांत झाला. असं वाटत होतं की पाऊस फक्त मातीसाठीच भेटायला आला होता,  मातीच्या कणाकणात अन झाडाच्या पानापानात आपले गाऱ्हाणे ओलेत्या डोळ्याने सांगून पाऊस मात्र निमूटपणे निघून गेला. पावसाने नेमकं काय हितगुज केलं असावं, त्याचे मनसुबे काय असावेत याचे अंदाज घेत मी नुस्ताच लोळत पडलो होतो ....


रात्री बराच वेळ झोप आली नाही. रात्रीच्या पावसाचे रंग कळायला सकाळ व्हावी लागली. पुर्वेला सूर्यनारायणाने आभाळ लाल रंगात रंगीवलं अन आपली ग्वाही देण्यास सुरुवात केली त्यासरशी मी घराबाहेर पडलो. घराच्या  अंगणातल्या गुलमोहोरातले बुलबुल पक्षाचे घरटे खाली पडले होते. खिडकीच्या कोनाड्यात असलेले कबुतराचे घरटेदेखील कोसळले होते. एक छोटेसे पांढरे अंडे फुटलेल्या बलकासह केविलवाणे होऊन फरशीवर पडून होते. त्याच्या घरट्याच्या सर्व काड्या विस्कटल्या होत्या. पुढच्या दारावर असलेले घरटे मात्र शाबूत होते पण कबुतराची मादी मात्र ओलीचिंब झाली तरी तेथेच बसून होती. घरासमोरील रिकाम्या प्लॉटमध्ये असणारया चिलारीच्या झुडूपाआड रानटी गवतातून मात्र कण्हण्या कुथण्याच्या आवाजाने मात्र मन हेलावले. कुत्रीची ढीगभर पिले जी काही दिवसांपुर्वीच जन्मली होती ती ओलीचिंब होऊन अक्षरशः एकमेकाच्या अंगात घुसून आईच्या दुधाची स्वप्ने पाहत गाढ झोपली होती. रात्री पावसाच्या घोंघावणारया आवाजात पिल्लांचा आवाज येणं शक्यच नव्हतं तरीदेखील मनाला अपराधी वाटले. पिल्लांजवळच्या लाली कुत्रीचा मात्र थांगपत्ता नव्हता. तिथून पुढे वळणावरच्या पळसापर्यंतच चालत गेलो, चालता चालता गावाकडे फोन करून पावसाने ताटात काय वाढून ठेवले हे विचारण्याची हिंमत झाली नाही. शेवटी अर्ध्यातच माघारी फिरून आता ताबडतोब गावाकडे निघावे असा विचार करून मागे फिरलो.


गाडी घेऊन गावाकडे निघालो. डेचक्यातल्या ताकात रवी घुसळावी तसे डोक्यात एकाच वेळी अनेक विचार घोळले जात होते. विचारांचे गाठोडे घेऊनच अर्ध्या तासात गावात पोहोचलो. हमरस्त्याच्या वाटेने जिथंपर्यंत नजर जाईल तिथवर पावसाने सगळं बुकलून काढलेलं साफ दिसत होतं, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या चारीत ओढयासारखं पाणी गोळा झालं होतं. बघावं तिकडं पाणी अन चिखल झाला होता.डांबरी सडक मात्र चकाचक धुवून निघाली होती. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या टायरचे चिखलाचे ठसे अधून मधून नजरं पडत होते. बघता बघता गाव आलं देखील. गावाच्या शिवेजवळ असणारया मारुतीच्या देवळाजवळच गाडी लावली. देवळातला नेहमीचा परिचयाचा उदबत्तीचा वास काही आला नाही . तेथूनच पायी चालत निघालो कारण सर्वत्र घोटाभर चिखलाची पाणतळी झाली होती. गावात आत शिरताच पाराजवळ काही म्हातारी माणसे उतरत्या चेहऱ्याने उभी दिसली. तर चावडीजवळ काही माणसे उभी होती. आतून रडण्याचा आवाज येत होता, बहुतेक करून कुणाचं तरी घर पडलं असावं अन त्याच्या घरातले सामान सुमान चावडीत आणलेले होते. ते दृश्य बघून कसे तरीच वाटले अन गावातल्या घरात जाण्याचे टाळून मागच्या चोरशिवेने शेताकडे रवाना झालो.


नागमोडी वळण पूर्ण करून बाहेर पडताच ओढ्याला पाण्याचा आवाज आला आणि धस्स झाले. म्हणजे सोलापुरात जो पाऊस तास दीड तास पडला तो इथे जास्त वेळ पडला असणार. थोडे पुढे गेल्यानंतर पीरसाहेबांचा दर्गा आला. तेथे देखील बरीच माणसे उभी दिसली, थोडा रडण्याचा आवाज आला. आत जाण्याची हिम्मत झाली नाही. तसेच चालत राहिलो. वाटेने समोरून येणारया गावकऱ्याने सांगितले की रहमतचचा रात्रीच गेले. काळजाचा आणखी एक ठोका चुकला. या माणसाच्या घरात आम्ही खेळलो वाढलो, त्याच्या हाताचे दोन घास खाल्ले होते. गावात दोन पाच घरे मुस्लिमांची असली तरी दर्गा बराच मोठा होता अन दरसाली उरुसाला अख्खा गाव तेथे गोळा होत असे अन शिवाय अशा दुर्घटनेत कबरीवर फुले लोटायला सर्व जाती धर्माची माणसे जमा होत असत. आधी शेताकडे जाऊन माघारी फिरताना दर्ग्यापाशी येऊन थांबावं असा विचार करून मी लोकांच्या नजरेस नजर न देता भामटयासारखा पुढे निघून आलो...


पावले जड झाली होती तरीही तसाच झपाझपा ढांगा टाकत पुढे चालत राहिलो. वाटंनं पायाशी माती चिखलओली  होऊन रडत होती, पावलाभोवती रुंजी घालत होती. वाटेतल्या डाळींबाच्या बागा माना तुकवून कशाबशा उभ्या होत्या. त्यांच्या बुंध्याशी लाल बुंद मोत्यांचा जणू सडाच पडला होता. ज्वारीची ताटे केस विस्कटलेल्या पोरांगत पडून होती. हंगाम संपून शिल्लक राहिलेली द्राक्षे तर फार नाजूक, जणू पहिल्यांदाच शाळेत चाललेल्या कोवळ्या, गोड, गोजिऱ्या पोरांचा घोळकाच ! द्राक्षांचे मणीसुद्धा अश्रूमग्न होऊन मातीवर लोळत पडले होते. घराबाहेर काढलेल्या हिरमुसल्या पोरीगत काही द्राक्षवेली लोखंडी सांगाड्यासहीत उपसून निघून लोंबत होत्या. छोट्या रोपट्यांनी तर मातीतच आपल्या माना खुपसल्या होत्या. उताराच्या माळांवर गुढगाभर पाणी साचले होते तर दूर दूर पर्यंत पाखरांचा आवाज येत नव्हता. जित्राबांचे ओरडणेदेखील कानावर येत नव्हते. त्यामुळे आणखी बेचैन होऊन मी पुढे जाऊ लागलो.


पुढच्या वळणावर विजनातले छोटेखानी नागोबाचे मंदिर आहे तिथल्या आतला गाभारयाचा ओशट वास नाकातून रांगत रांगत थेट मेंदूपर्यंत पोहोचला. आत गाभारयात नागदेवतेची शिळा आणि शिवलिंग होते. त्यावर पावसाने झिरप लागलेल्या थेंबांचा अभिषेक चालू होता. माझे हात कधी जोडले गेले काही कळालेच नाही. नेहमी तेथे थोडा वेळ बसण्याचा शिरस्ता मोडून मी निघालो, आता शेताची ओढ लागली होती. मन भरून आले होते अन पावले अजूनच जड होत चालली होती.


एव्हाना वळण संपून सरळधोपट रस्ता लागला. वातावरण अजुनही कुंद होते. पावसाने सारे काही ओरबाडून नेले होते. सुर्यनारायण शिरवळीचा खेळ खेळत ढगाआडून चिडवत होता. गार वारा अंगाला झोंबत होता. मार्चमध्ये हे सर्व अनुभवास येतेय यावर विश्वास बसत नव्हता. अखेर एकदाचे शिवार डोळ्याच्या टप्प्यात आले. कडब्याची शिस्तीत रचून ठेवलेली उंच पिवळसर गंज दिसली अन नकळत डोळ्याच्या पापण्या ओल्या झाल्या. झपाझपा ढांगा टाकत मी शेतापुढे आलो. पडवीतल्या आजी आजोबांच्या समाधीसमोर कधी अन कसा येऊन उभा राहिलो काही कळालेच नाही. त्यांच्या समाधीला प्रदक्षिणा घातली. समाधीशेजारी असणारा जुनाट सोनचाफा पानगळ होऊनही अंगावर फुले घेऊन उभा होता. पण फुले मात्र रडवेली झाली होती. तेथून जवळच असणारया गोठ्याकडे पाय आपोआप वळले.


मला पाहताच चंद्रा गायीजवळ उभ्या असलेल्या पोरसवदा हरीने जोरात टाहो फोडला अन तो गायीला बिलगून हमसून हमसून रडू लागला. माझ्या पायातली ताकद आता संपली होती, थिजल्यागत मी तेथेच उभा राहिलो. चंद्रा गायीच्या पुढ्यात असलेला चारा अन अमुण्याची पाटी तशीच होती. गायीने चारयाला तोंडदेखील लावले नव्हते. सर्वच जनावरे तशीच उभी होती. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. लहानगी मथुरा सांगत होती,"बापू,रात्री विजा फार चमकत होत्या. मोठ्ठाले आवाज येत होते आमी समदे जण रातसारी जित्राबापाशीच उभे आहोत. समदी जनावरे घाबरली होती पर कोणालाबी काय झाले नाही. बा अन आज्जा लई रडले बघा बापू".


हरीचा आवाज ऐकून गोपाळनाना तरातरा खोपटाच्याबाहेर आले. सत्तरीतले गोपाळनाना म्हणजे हरीचे आजोबा. 'गप हो पोरा असं रडू नये. धीर राहू दे बाबा.' असे म्हणत म्हणत ते माझ्याकडे बघून स्वतःच्या पाणावलेल्या डोळ्याना आवरू लागले तसा माझा संयम सुटला अन मोठ्याने हंबरडा फोडून चंद्रा गायीच्या वशिंडाला धरून मी मोठ्याने रडू लागलो. माझे रडणे सुरु राहू देऊन गोपाळनाना पुटपुटू लागले "त्यो तरी काय करणार ?  एक तर दुष्काळ पडंल न्हाई तर ह्यो असा ऊरफाटा पाऊस पडंल .. त्यो कुणाची दया माया करणार न्हाई, समद्यास्नि झोडपून काढील ..माणसं ईतभर जमिनीपायी एकमेकाचा जीव घेऊ लागलेत. बापड्याना आय भण समजना झालीय. पोरं मायबापावर शिरजोर व्हायाला लागलीत. न माती कळना ना माय कळना. नुस्ता पैका गिणायलेत.... म्हणून तर इठूबा देखील गुमान बसलाय. पोरानू असं होतच राहणार.… आपण वकुबात राहाया पायजे… "


काल रात्री पावसाने मातीच्या कणाकणात अन झाडाच्या पानापानात ओलेत्या डोळ्याने हमसून हमसून काय सांगितले होते याचा मला झटकन उलगडा झाला तेव्हढ्यात गायीच्या डोळ्याला लागलेल्या गरम अश्रूंच्या धारेने मातीत आपले मुके दुःख मिसळायला सुरुवात केली तसे मी आणखी मोठ्याने रडत रडत गायीला बिलगून राहिलो.……


- समीर गायकवाड.