Sunday, July 5, 2015

गावाकडचा पाऊस ....


गावाकडे आता पाऊस सुरु झालाय...माहेरवाशिनी सारखे त्याचे डोळ्यात पाणी आणून स्वागत झालेय...
मी इकडे सोलापुरात. इथला पाऊस अगदीच अरसिक. त्याचं स्वतःच असं काही वेगळेपणच नाही. तो कधी असा मनाशी गुजगोष्टीही करत नाही, तो देखील शहरी झालाय. तोंड देखले पडून जातो, त्याच्यात उर्मी अशी नसते. तो येतो आणि पडून जातो. इकडे त्याचे मॉन्सून असे रुक्ष वर्णन होते...

गावात पाऊस आला की पांडुरंगाला दह्यादुधाचा अभिषेक होतो, घरी काही तरी गोड धोड होते. घरधनी धोतराच्या सोग्याला डोळे पुसत पुसत आभाळाकडे बघून काहीबाही पुटपुटतो, त्याचे ते पुटपुटणे एखाद्या अभंगाच्या ओवीसारखे असते.. माजघरातल्या चुलीवर पातेले चढले की बाहरेच्या पावसाचा आवाज, चुलीवरल्या पातेल्यातला रटरटणारा आवाज आणि चुलीतल्या जळणाच्या वासात मिसळलेला मृदागंधाचा वास सगळे कसे मस्तकात भिनत जातं....

गोठ्यातल्या बैलजोडीला थोडा विसावा मिळतो अन शेतगड्याना थोडी विश्रांती..सगळे कसे रमत गमत चाललेले असते..गोठयातल्या शेळ्या अंग चोरून त्याचे मुटकुळे करून बसतात. बाहेर ठेवलेल्या जळणाच्या राशीत पाकोळ्या लपून बसतात..जिथे जिथे गळती लागेलेली असते तिथे जुन्या पटकुरावर खताच्या रिकाम्या पिशव्याची चवाळे नाहीतर प्लास्टिक अंथरले जाते... मोठाल्या झाडातल्या ढोलीत पाखरे चिडीचूप होतात तर वरती फांद्यामध्ये ज्यांची घरटी असतात ते मात्र भिजल्या पंखाना अधून मधून फडकवत शांत बसून असतात...

पाऊस सुरु झाला की शाळेत जायचे अक्षरशः जीवावर यायचे. शाळेत अजिबात लक्ष नसायचे, सगळे ध्यान पावसात. दिस मावळतीला आला की गोठ्यातली वासरे त्यांच्या आईच्या गळ्यात वाजणारया घंटेच्या आवाजाकडे कानात जीव आणून उभी असत, गाई गोठ्याकडे आल्या की ही वासरे आपापल्या आईच्या कासेला तोंड लावत. या वेळेस पाऊस देखील थांबून हा ह्र्द्यंगम सोहळा बघून तृप्त होतसे...मस्त तांबूस उजेडात गाईच्या कासेला तोंड लावून ढूसण्या देत पिणारी ती वासरे, गायींच्या गळ्यातल्या वाजणाऱ्या घंटांचा आवाज.शेळ्याच्या एकसुरी आवाजाने त्याना दिलेला प्रतिसाद अन गोठ्यातल्या चुलीवर चहासाठी चढवलेले मातकट पातेले. सगळ्या रानातून सुंसुं आवाज करत वाहणारा थंड वारा अन त्यावर फिरत राहणारा पानांचा नक्षीदार दोलायमान गलका ! वर आभाळात अंग मोकळे करून घेण्यासाठी निघालेले त्रिकोणी रांगेतून गिरक्या घेत चाललेले बगळे !!

पावसाळी हवा आली आली की आठवणींचे हे असे भले मोठे मळभ गोळा होते अन डोळ्याच्या कडा कधी पाणवतात काही कळत नाही ....

- समीर गायकवाड.