Saturday, July 11, 2015

ओमर शरीफच्या आठवणी ....


इंग्रजीचे अगदी त्रोटक ज्ञान असूनही मी 'लॉरेन्स ऑफ अरेबिया' पाहिला होता.या अप्रतिम सिनेमापासून किशोरवयात लागलेले इंग्रजी सिनेमाचे वेड अजूनही कमी झालेले नाही. आमच्या सोलापूरच्या भागवत उमा मंदिरमध्ये मी हा सिनेमा पाहिला. सिनेमा नेमक्या कोणत्या साली पाहिला ते आठवत नाही, पण आपल्या आशियायी अभिनेत्यांसारखा दिसणारा त्यातला इजिप्शियन अभिनेता ओमर शरीफ त्याच्या लकबीसह ध्यानात राहिला. पुढे त्याचाच 'मेकेनाज गोल्ड' पाहण्यात आला. आज सकाळी त्याच्या मृत्यूची बातमी ऐकली आणि वाईट वाटले..

हॉलीवूड मधील दिग्गज अभिनेत्यांसमोर टक्कर देऊन काम करायचे आणि आपला वेगळा ठसा उमटवायचा हे असाधारण काम त्याने यशस्वीरीत्या पार पाडले.
जर्मन लष्करी अधिकारयाची भूमिका असलेला त्याचा 'नाईट ऑफ जनरल', मंगोलियन सम्राटावर आधारित 'चेंगीझ खान' असो वा शे ग्युवेरा ! त्याचा स्वताःचा असा ठसा तो उमटवू शकला. बोरिस पास्तार्नेकच्या कादंबरीवर आधारित 'डॉक्टर झिवेगो' हा सिनेमा प्रेमकथेवरील ऐतिहासिक चित्रपट ठरावा. त्याच्या या सिनेमाला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला होता. ऑस्करची दहा नामांकने या सिनेमाला होती. पण त्याचे दुर्दैव असे की त्यात उत्कृष्ट अभिनेत्याच्या नामांकनाचा समावेश नव्हता..

इस्त्राईलशी संबंधित मतप्रदर्शनामुळे वादात असलेल्या बार्बरा स्ट्रेसेंड बरोबर त्याने केलेल्या 'फनी गर्ल' मुळे त्याला त्याच्या मायदेशात खूप निर्भत्सना सहन करावी लागली. १९५४ ते १९७४ असा वीस वर्ष त्याने फातेन हमामा या सहअभिनेत्रीबरोबर दांपत्य जीवन पूर्ण केले, नंतर त्याचा घटस्फोट झाला. पण त्याने पुढे कोणत्याही अभिनेत्री वा मॉडेलशी लगट वा लफडे केले नाही. पण त्याने निंदा होऊनही फनी गर्लचा सिक्वेल असणारा 'फनी लेडी' केला.
रिचर्ड हेरीस बरोबरचा 'जगरनॉट' हा थ्रिलर सिनेमा आणि ज्युली आंड्र्युस बरोबरचा 'द टामेरिंड सीड' देखील खास प्रेमकथापट होता. ओमर शरीफ भूमिकेच्या एका साचेबद्ध चौकटीत अडकला नाही हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य होते. या गुणी आणि प्रतीभावान अभिनेत्यास त्याच्या हयातीत नामांकन होऊनही ऑस्कर मिळू शकले नाही ही खरे तर खेदाची अन काहीशी अपारदर्शकतेची बाब म्हणावी लागेल...

मागील काही दिवसांपासून तो अल्झायमरने ग्रस्त होता...मला वाटते त्याच्या अल्झायमरच्या उन्मुक्त स्मृतीत ग्रेगरी पेक सोबत केलेल्या 'मेकेनाज गोल्ड' मधील अद्भुत सफरी आणि 'लॉरेन्स ऑफ अरेबिया' मधली अंथोनी क्वीन व अलेक गिनेस सोबत केलेली मध्यपूर्वेच्या आखाती वाळवंटात केलेली युद्धे फेर धरून त्याच्या मनचक्षुपुढे नाचत असतील...अन अशाच एका रम्य स्वप्नस्मृतीत असताना त्याने जगाचा निरोप घेतला असावा....
एका चतुरस्त्र अभिनेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली .....


- समीर गायकवाड.