Sunday, July 5, 2015

पंचमदांच्या आठवणी ....


पंचमला स्वतंत्र संगीतकार म्हणून पहिली संधी निर्माता, अभिनेता मेहमूद यांनी दिली. चित्रपट होता "छोटे नवाब.आपल्या अंगी असलेल्या सर्व क्षमतांची सिद्धता आरडींनी या एकाच चित्रपटात वेगवेगळ्या अशा आठ गाण्यांच्या पॅकेजमध्ये दाखवून दिली. मुंबई ते तळोजा या प्रवासात स्टेअरिंगवर बोटे वाजवता वाजवता कंपोज केलेलं "घर आजा घिर आये बदरा सावरीया..हे लतादिदींचं रागदरबारीतलं गाणं म्हणजे पहिलीच निर्मिती आणि तीही मास्टरपीस असं विशेषण मिळवून गेली. हे गाणे ऐकून कुणालाही वाटणारही नाही, की हा कुणी नवा संगीतकार आहे म्हणून; कारण अमर्याद प्रयोगशीलता, नैसर्गिक आवाजांचा समावेश आणि र्हिदम सेक्‍शनमध्ये तालवाद्यांचा भरपूर पण सुसूत्र वापर यामुळे आरडींच्या रचना नित्य नवीन राहिल्या.
x


पंचममध्ये एक खोडकर पोरगं सतत असायचं. तो त्याला विविध प्रयोग करण्यापासून कधी दूर ठेवत नव्हता. तबल्यावर हातोडी घासून एक विचित्र साऊंड क्रिएट करून पंचमदांनी तो एका विनोदी गाण्यात वापरला. अर्थात, हा प्रयोग होता आपला लाडका दोस्त मेहमूद याच्यासाठी आणि त्यानेच गायलेल्या गाण्यासाठी. मेहमूदबरोबर खास दक्षिण भारतीय आवाजातले हेल देत हे गाणं गायलंय आपल्या आशाताईंनी. मुत्तूकुडी कव्वाडी हडा.. (दो फूल) हे ते गाजलेलं गाणं.

पंचमदांनी इंडस्ट्रीला बरीच वाद्यं दिली.. जसं स्पॅनिश गिटार, मादल, फ्लेंजर इत्यादी. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा आणून वापरायचं आणि इतर संगीतकारांनी त्याचा वापर आपापल्या संगीतात नंतर करायचा असा पायंडाच त्या काळी पडून गेला होता. बेस गिटार हे असंच त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं वाद्य. भारतात बेस गिटारचा वापर असलेलं पहिलं गाणं पंचमदांनी बनवलं. ऐंशीच्या दशकात तरुण पिढीला धुंदावून सोडलेलं ते गाणं होतं, "गुलाबी आँखें जो तेरी देखी‘ (दि ट्रेन).
नेपाळी "मादलहे असंच पंचमप्रिय वाद्य. ते प्रथम वापरलं त्यांनी आपल्या वडिलांच्या संगीत संयोजनाखाली म्हणजे "ज्वेलथीफमधल्या "होटों पे ऐसी बातया गाण्यात. या गाण्याचं संपूर्ण ऑर्केस्ट्रेशन पंचमचं. मादल काही काळ उपलब्ध झालं नव्हतं म्हणून या गाण्याचं रेकॉर्डिंगसुद्धा पंचमनं स्थगित केलं होतं.

याच मादलचा भरपूर वापर पंचमदांनी पुढं आपल्या बऱ्याच गाण्यांत केला. "अजनबीचित्रपटातल्या "हम दोनों दो प्रेमीच्या रेकॉर्डिंगच्या दरम्यान इंडस्ट्रीमधल्या वादकांचा संप होता; पण गाणं रेकॉर्ड करण्याची खुमखुमी आरडींना गप्प बसू देईना. त्यांनी मग आपले प्रमुख चार सहायक घेऊन गाणं पूर्ण केलं. नीट ऐकलं तर आपल्या लक्षात येईल, की या गाण्यात ऑर्केस्ट्रेशन नाहीच मुळी. स्वतःच्या संग्रहात रेकॉर्ड करून ठेवलेला रेल्वे इंजिनचा इफेक्‍ट, मादलचा सलग ताल, बासरी, शिटी आणि इंटरल्यूड म्युझिक म्हणून त्या चौघांचा कोरस, भूपेंद्रचा आलाप, आणि किशोर-लताचा मेन व्हॉईस.. बस्‌ गाणं पूर्ण. मादल किती सुरेख वाजू शकतो, याची ही एक देखणी प्रचिती होती.
आरडी हा संगीताचा खराखुरा जादुगार होता ....


- समीर गायकवाड.