Friday, July 31, 2015

मोहम्मद रफी भुतलावरचा शापित गंधर्व .....


सलीम-जावेद या लेखकद्वयीतील सलीम म्हणतात की, रफी देवाच्या आवाजात गाऊ शकणारा सूफी होता. दुसरा रफी होणे शक्य नाही. कारण देव ‘डुप्लीकेट’ तयार करत नसतो...

"मोहम्मद रफी यांचे प्रत्येक गाणे म्हणजे सोन्याचा तुकडा. त्यांच्यासारखा बुलंद आवाज झाला नाही, होणार नाही. ज्या गायकासोबत आयुष्यातील दुसरे गाणे गायले त्याच्या नावाचा पुरस्कार वयाच्या ८२व्या वर्षी मिळतोय. खूप छान वाटतेय", असे भावोद्गार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी त्यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना काढले होते .....

'गोड गळ्याच्या मोहम्मद रफींना कडू कारली फारच आवडायची; पण कारल्यातील कडवटपणा त्यांच्या स्वभावात कधीही आला नाही,' ही संगीतकार ओ.पी. नय्यर यांची आठवण आपल्याला 'आठवणी मोहम्मद रफींच्या' या श्रीधर कुलकर्णींनी लिहिलेल्या पुस्तकात वाचावयास मिळते. शांत, सोज्वळ, अबोल, घरंदाजपणा, श्रोत्यांविषयी व चाहत्यांविषयी असलेला प्रेमभाव व सलोखा, मदत करण्याची वृत्ती, राहणीमानातील साधेपणा अशा गायनाव्यतिरिक्तही विविध पैलूंचे दर्शन या पुस्तकातील आठवणीद्वारे घडते….

रफींच्या आवाजाचा मराठी गाण्यासाठी सुयोग्य वापर केला असे एकमेव संगीतकार म्हणजे श्रीकांत ठाकरे. त्या सगळ्याच गाण्यांची याद येणे अपरिहार्यच.‘शोधीसी मानवा’चे रेकॉर्डिंग झाल्यावर रफींनी हे गाणे गाजणार असे म्हटले. ‘कशावरून?’ असं विचारता रफींचे उत्तर मार्मिक आहे- ‘माझे मालकंस रागातील प्रत्येक भजन हिट झाले आहे.’ उदा. ‘मन तडपत हरि दर्शन को आज’ किंवा ‘मत भूल अरे इन्सान’ . नायकाचा मूर्तिमंत चेहरा चक्षूसमोर उभा करण्याची ताकद रफींच्या आवाजात होती. विविध कलाकारांना आवाज देताना आपल्या आवाजाच्या खास छटा, वेगळेपण रफींनी जोपासले व त्यामुळे त्यांची अनेक गीते अजरामर झाली.….
आवाज की दुनिया मध्ये बोलताना वसंत देसाई रफींबद्दल बोलताना म्हणाले होते,' रफ़ी साहब कोई सामान्य इंसान नही थे...वह तो एक शापित गंधर्व था जो किसी मामूली सी ग़लती का पश्चाताप करने इस मृत्युलोक में आ गया." त्यांनी रूपकातून वर्णन केले खरे पण ते अगदी तंतोतंत खरे होते...

एखाद्या गाण्याची चाल सुंदर वाटली, आवडली तर प्रसंगी नाममात्र (म्हणजे अवघा रुपया) मानधन घेऊनही रफींनी गाणी म्हटली आहेत हे विशेष. ‘लेने को इन्कार नही, देणे को तैयार नही, इस दुनिया मे कौन हे ऐसा, जिसे पैसे से प्यार नही’ सारखे गीत जरी रफींच्या आवाजाने नर्म भेदक ठरवले असले तरी वास्तव जीवनात रफींना पैशाचा हव्यास नव्हता. रॉयल्टीची बिदागी रफीएवढी कुणालाच मिळाली नसेल. त्यामुळे रफी आर्थिकदृष्ट्या पूर्ण समाधानी होते. एक देव माणूस म्हणून रफींची चित्रपटसृष्टीमध्ये प्रतिमा निर्माण झाली होती.

रफीचा जन्म पंजाबच्या कोटला सुलतानसिंग या अमृतसर नजीकच एका छोटय़ा खेडय़ातला. जन्मतारीख २४ डिसेंबर १९२४ . दहा वर्षाचा असताना एका फकिराच्या पाठीमागे त्याचे गाणे ऐकत तो चालत जाई. तो गात असलेली ‘खेंदादे दीन चार’ ही गझल त्याची आवडती गझल होती. त्या फकिरालाही लहान रफीचे कुतूहल वाटे व त्याला तो तोंडभरून आशीर्वाद देई. घरातल्या सगळ्यांना रफीच्या गायनवेडाची माहिती असूनही धार्मिक कारणामुळे त्याला विरोध असे. मोठय़ा भावाच्या केशकर्तनायलात ती कला शिकण्यासाठी भाऊ घेऊन जात असे. पण तेथेही जे काही मिळेल त्यावर ताल धरत रफी गाणे गाई. तेव्हा भावाने त्याला संगीत शिक्षणासाठी मदत करायचे ठरवून बरकत अली खाँ यांच्याकडे पाठवले. पुढे रफीने छोटे गुलामअली खाँ, जीवनलाल मुट्टो, जवाहरलाल मुट्टो, फिरोज निझामी, बडे गुलाम अली खाँ यच्याकडून संगीताचे धडे घेतले.
कुंदनलाल सहगल यांच्या एका कार्यक्रमात विजेने दगा दिला आणि १३व्या वर्षी रफीचे भाग्य उजळले. ध्वनिक्षेपकाशिवाय आपल दमदार आवाजात गायलेल्या एका पंजाबी गीताला सहगलनीसुद्धा दाद दिली. ते म्हणाले, ‘बेटा, एके दिवशी तू मोठा गायक होशील!’ लाहोर रेडिओवर मिळालेल्या आणखी एका संधीने रफीचा पार्श्वगायक होण्याचा मार्ग मोकळा झाला. संगीतकार शामसुंदरने रेडिओवरचे त्याचे गाणे ऐकून पंजाबी चित्रपट ‘गुलबलोच’साठी त्याला पाचारण केले. त्यातले ‘सोनिये नी, हीरीये नी तेरी याद वे सताये' ऐकून निर्माता नसीर खानने रफीस मुंबईला बोलाविले.

१९४२ मध्ये लाहोर सोडताना स्टेशनवरती रफीचे वडील म्हणाले, ‘यश मिळालं नाही तर परत येऊ नकोस, रफी नावाचा मला एक मुलगा होता हेही मी विसरेन!’ खरे म्हणजे त्याने जाऊ नये असेच वडिलांना वाटत होते. पण रफीने यश मिळविले. अतिशय कष्ट करून. सहगल, खान मस्ताना, पंकज मलिक, जी. एस. दुरानी यांच्या गायनशैलीला छेद देऊन तीन सप्तकाल लीलया फिरणारी आपली वेगळी शैली विकसित करून चाहत्यांच्या हृदयाचा तो सम्राट बनला. सुरुवातीला ट्रामसाठी, लोकलसाठी त्याकडे रुपयाही नसायचा, एखाद्या स्टुडिओत दुसर्‍या दिवशी बोलविले तर घरी न जाता उपाशी पोटी जवळच्याच रेल्वे स्टेशनवर झोपायचा आणि सकाळी उठून स्टुडिओत हजर व्हायचा. नौशादच्या वडिलांनी-वहिद अलींनी त्याच्या नावाने एक पत्र नौशादला दिले. नौशाद समोर त्याने पत्राबरोबर एक गझलही सादर केली आणि ‘पहले आप’मध्ये त्याला संधी मिळाली. कोरसमध्ये, काही ओळी गाण्याची. दोघांनाही कल्पना नसेल की ही साझेदारी भारतीय चित्रपट संगीतात क्रांती करेल म्हणून. शहजहानमध्ये रफीने सहगलबरोबर ‘मेरे सपनो की रानी रुही रुही’ गायले व पुन्हा एकदा त्या स्वरसम्राटाने या राजपुत्राला स्तुतीने न्हाऊन टाकले. ‘जुगनू’ (१९४७) मधल्या नूरजहाँबरोबरच ‘यहाँ बदला वफा का.’ या गीताने धमाल केली आणि रफी भारतात सर्वदूर पोहोचले. ‘बाबुल की दुवो लेती जा’ या गाण्याला केंद्र सरकारने गौरविले. योगायोग असा की रेकॉर्डिगच्या वेळी रफींची मुलगी- परवीनचे लग्न झाले. आपल्या 39 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली.

अल्लाहवरती रफींची अतिशय श्रद्धा होती. एकदा त्यांची सून त्यांना म्हणाली, ‘अब्बा, तुमच्यासारखे कुणीच गात नाही.’ रफींचे वाक्य होते, ‘बेटी, तसे म्हणू नकोस. अल्लाहला प्रौढी मिरवणं आवडत नाही.’ एक माणूस म्हणून ते अतिशय थोर होते.

रफींनी त्यांच्या आयुष्यात २६ हजारांपेक्षा अधिक गाणी गायिली आहेत.भक्ती, भाव, शृंगार, प्रेम, शास्त्रीय गीते, भजन, कव्वाली, गझल असे विविध प्रकार रफींनी आपल्या मधुर आवाजाने बहारदार केले. गुलाम हैदरपासून राजेश रोशनपर्यंत सर्वच संगीतकारांबरोबर रफी हे मनसोक्त गायिले तसेच हुस्नलाल, भगत राम, शंकर-जयकिशन, नौशाद, नाशाद, सी. रामचंद्र, सी. अर्जुन, उषा खन्ना, ओ. पी. नय्यर, वसंत देसाई, एस. डी. बर्मन, आर. डी. बर्मन, खय्याम, मदन मोहन इत्यादी प्रत्येक संगीतकाराचा ढंग, वादन शैली याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय रफींनी कधीही गाणी म्हटली नाहीत. प्रत्येक गाण्याची वारंवार तयारी घेण्याकडे त्यांचे विशेष लक्ष असे. प्रत्येक गाणे एखाद्या विद्याथ्र्यासारखे ते शिकत असत. गीत शास्त्रीय असो की भक्तिगीत, भजन असो वा कव्वाली, गझल, करुण रसाने ओतप्रोत भरलेले विरह गीत असो की अल्लड छेडछाड, मदभरे गीत असो रफींनी आपल्या लयबद्ध, खुमासदार, लाजवाब आवाजाने चार चाँद लावले.

लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत दिग्दर्शनातील ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटातील ‘नफरत की दुनिया को छोडकर’ या गाण्यासाठी अगोदर किशोरकुमार यांना घेण्यात आले होेते. पण चार-पाच रिहर्सल होऊनही हे गाणे त्यांना जमेना तेव्हा त्यांनीच या गाण्यासाठी रफीला बोलावण्याचे सांगितले. तेव्हा किशोरकुमार यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत रफीच्या घरी जाऊन त्यांना सर्व परिस्थिती सांगितली तेव्हा रफींनी गाडीतच हार्मोनियम घेऊन या गीताची रिहर्सल केली व हे गीत ताबडतोब ध्वनिमुद्रित केले. इतकी अचाट, जबरदस्त ताकद असलेला हा प्रतिभावंत कलाकार होता. फिल्म इंडस्ट्रीतील कुठलेही, कितीही अवघड गीत जर कुणालाच जमले नाही तर शेवटी रफी ‘मै कोशीश करता हूँ’ म्हणत व त्या गीताला न्याय देत. मध्यंतरी गीतांच्या रॉयल्टीसंदर्भात रफी व लता मंगेशकर यांच्यात वाद निर्माण झाल्याने त्यांची एकत्र रेकॉर्डिंग बंद होती. त्या वेळी संगीतकारांनी लताजींची नाराजी पत्करून रफींना बरोबर घेऊन रेकॉर्डिंग केली. यावरून रफींची लोकप्रियता लक्षात येते.

असंख्य गीतांतील काही ठळक अनमोल गीतांचा येथे उल्लेख करणे योग्य होईल. इन्साफ का मंदिर है ये (अमर), मन तडपत हरी दर्शन (बैजू बावरा), जो गुजर रही है (मेरे हुजूर), आजा तुझको पुकारे मेरे (नीलकमल), नाचे मन मोरा मगन, मधुबन में राधिका नाचे रे, राधिके तुने बन्सुरी बजाई (बेटीबेटे), परदा है परदा (अमर अकबर अँथनी), रमैया वत्तावैया (श्री ४२०), आये बहार बनके लुभाकर, फलक से तोडकर,. कोई नजराना लेके आया (आन मिलो सजना), गम उठाने के लिए मै तो जिये (मेरे हुजूर), दिल के झरोके मे तुझको बिठाकर (ब्रह्मचारी), रोशन तुम्हीसे दुनिया (पारसमणी), क्या से क्या हो गया, मेरा मन तेरा (गाईड), छू लेने दो नाजूक ओठोंको ( काजल), मेहरबा लिखूं(संगम), रंग और नूर की बारात (गजल), एहसान मेरे दिलपे तुम्हारा (गबन), तेरी आँखो के सिवा (चिराग), गर तुम भुला न दोगे (यकीन), परदेसियों से ना आँखियां(जब जब फूल खिले), भरी दुनिया में आखिर (दो बदन), कर चले हम फिदा (हकीकत), ओ दूर के मुसाफिर (उडनखटोला), हम तुमसे जुदा होके (एक सपेरा एक लुटेरा), ऐ फुलों की रानी बहारों की (आरजू), आजा पंछी अकेला है, दिल का भँवर करे (तेरे घरके सामने), खोया खोया चाँद (काला बाजार), ये दुनिया ये महफील (हीर रांझा), जाने बहार हुस्न तेरा (प्यार किया तो डरना क्या), आने से उसके (जीने की राह), गुलाबी आँखे (द ट्रेन), मै कही कवी न बन (प्यार ही प्यार), कलियों ने घुँघट (दिलने फिर याद किया), हो आज मौसम (लोफर), छलकाये जाम( मेरे हमदम मेरे दोस्त), ओ मेरी महेबूबा (धरमवीर), नफरत की लाठी तोडो (देशप्रेमी), दोनोंने किया था प्यार मगर (महुआ), इत्यादी त्यांची अमर गाणी आजही रसिक मनाच्या कप्प्यात साठवून आहेत.

असं ऐकिवात आहे की गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला शम्मी स्वतः स्टुडिओत रफीजींना भेटून सांगत असे की ह्या गाण्यावर मी असे हावभाव करणार आहे किंवा इथे थोडा अंगविक्षेप आहे, वगैरे !! फक्त शम्मीच असं नव्हे, पण त्याकाळच्या अनेक अभिनेत्यांना रफीजींचा आवाज चपखल बसला. मग ते सुनील दत्तचं 'आपके पेहलू में आकर रो दिये...' असो.. किंवा विश्वजित चं 'पुकारता चला हूं मैं' असो... जॉनी वॉकरचं 'सर जो तेरा चकराये असो... किंवा गुरूदत्तचं 'चौदहवी का चाँद हो..' असो किंवा 'उधर तुम हंसी हो' असो... प्रत्येकासाठी एक विशिष्ट गायनपद्धती. इतकच नव्हे तर 'दोस्ती' चित्रपटासाठी त्यांनी सुधीरकुमार या नवोदित कलाकारासाठी ३ ते ४ गाणी गायली. तिही त्याच्याच लकबीत. त्यापैकी 'चाहूंगा मैं तुझे... ' या गीताला फिल्मफेअर मिळाले. बाकीची सर्व गाणी उदा. 'जानेवालो जरा मूडके देखो इधर', 'मेरा तो जो भी कदम है',' कोई जब राह ना पाये' आणि 'राही मनवा दु:ख की चिंता.' ही गाणी सुद्धा प्रचंड गाजली.या सर्व अविट गाण्यांसाठी त्यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ २० वर्षांनी त्यांना 'बेस्ट सिंगर ऑफ द मिलेनियम' हे पारितोषिक देण्यात आलं.

रफींना त्यांच्या आयुष्यात विविध मान -सन्मान मिळाले. १९६४ साली राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ हा किताब देण्यात आला. १९६० साली ‘चौदवी का चाँद’ , १९६१ साली ‘तेरी प्यारी प्यारी सुरत को’ (ससुराल), १९६४ साली ‘चाहुंगा मै तुझे सांझ सवेरे’ (दोस्ती), १९६६ साली ‘क्या हुआ तेरा वादा’ (हम किसीसे कम नही) या गीताला फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड मिळाले तर १९६४ च्या ‘चाहुंगा मै तुझे’ या गीतासाठी ‘सर्वोत्कृष्ट गायक’ अ‍ॅवॉर्ड राष्ट्रपतींकडून मिळाले. अशा या महान कलाकाराचा मृत्यू आजच्याच तारखेला म्हणजे ३१ जुलै १९८० रोजी हृदयविकाराने झाला. उदास माहौल आणि हजारोंच्या गर्दीत दुपारी बाराच्या ठोक्याला जनाजा उचलला गेला. कबरीत माती लोटताना गर्दीने जो हंबरडा फोडला त्याचा प्रतिध्वनी आजही थरकाप उडवतो.
रफींच्या मृत्यूनंतर गीतकार हसरत-जयपुरी म्हणतात, ‘वो सूरके आफताब थे, ऊनके जैसा कौन है? वो लयके महताब थे, ऊनके जैसा कौन है ? ये और बात है की करे कोई भी नकल वो रफी थे ऊन जैसा कौन है ’….

दूर निगाहों से आँसू बहाता है कोई
कैसे ना जाऊ मैं, मुझ को बुलाता है कोई
या टूटे दिल को जोड़ दो, या सारे बंधन तोड़ दो
ऐ परबत रस्ता दे मुझे, ऐ काँटों दामन छोड़ दो
ये दुनिया, ये महफिल मेरे काम की नही ……

आजही हे दर्दभरे गाणे ऐकताना डोळे भरून येतात अन रफींच्या जादुई आवाजाचे मळभ अंतरंगात दाटून येतात….

- समीर गायकवाड.