Sunday, July 5, 2015

हरवलेले दिवस ....


बालपणीच्या अनेक आठवणी असतातकाही सुखद तर काही दुःखदआठवणींचा हा अमोल ठेवा आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अनामिक प्रेरणा देत राहतो. त्यातही गावाकडच्या बालपणीच्या घटना मनावर तशाच कोरल्यागत गोठून राहतात. अशीच एक आठवण...
शेतातली मोठी जनावरे गायी-म्हशी चरायला घेऊन जाण्याचा वसा थोरांकडे असायचा. या कामातलहानांना हात लावू देत नसत. गुरं हुरळली तर पोरासोरांना जुमानायची नाहीत असा युक्तिवाद ठरलेलाअसे. "तुम्ही अजूक नेणतं हायसा, थोडं थोर व्हायचं मग जित्राबाला हात लावायचा." हे वाक्य ठरलेले असे. तेंव्हा गायीम्हशी जवळ तासंतास उभे राहिले तरी कंटाळा येत नसे. गोठा ही शेतातल्या आवडत्या जागांपैकी एक असायची. गायी इदूळा सकाळी अन सांजेलाच गायी गोठ्यात असत, दुपारी त्या चरायला जात. फिरून आल्या की त्या थकलेल्या असत, त्यामुळे गोठ्यात निवांत बसून रवंथ करताना त्यांच्याशेजारी बसून निरखताना खूप शांत वाटे, मोठाला जबडा सावकाश एक सुरात हलवून त्यांची रवंथ चालत असे. मध्येच शेपटी हलवत अंगावर बसलेल्या गोमाशी गोचीड दूर सारतानाची ही डोळे झाकून बसलेली सगळी गुरं पाहून काळीज हरखून जाई

गायीच्या पुढ्यात आमुण्याची पाटी ठेवून तिची धार काढतानाची दृष्ये मनाच्या पटलावर अशी कोरली गेली आहेत की त्याला शब्द नाहीत. धारा काढताना पितळी चरवीत चुळूक चूळूक आवाज करत त्या धारोष्ण धवल दुधाचा फेस वाढतच जायचा, पोरंबाळं त्यावर हलकी फुंकर मारत मग फेस निवळून खाली जाई, पुन्हा धारा सुरु राहत.... असे करत करत चरवी त्या चविष्ट धवल दुधाने गच्च भरून जायची. गाईच्या ह्या ताज्या दुधाला जो गंध अन चव असते तशा प्रकारची चव अन गंध असणारे कोणतेही पेय जगात कुठेच नसेल

ह्या गाई म्हशींच्या पासून दूर एका कोपरयात शेळ्या बांधलेल्या असत. ह्या शेळ्या फिरायला न्यायची मुभा सर्वाना असे. गायींचे जसे विविध रंग, ठिपके  असत तसे शेळ्यांचे नसायचे, शिवाय त्यांचे ओरडणेही कसेसेच बेसूर वाटायचे. गायींचे अंग मऊशार तर शेळ्या राठ केसाळ , शिवाय त्यांच्या अंगाला सदानकदा उग्र वास यायचा ! त्यामुळे थोडा वेळ जरी शेळ्याजवळ बसून आलो तरी आजूबाजूचे ओळखायचे की, "प्वार शेरडात बसून असतं जणू !'… शेळ्यांचा आणखी ताप म्हणजे त्यांच्या लेंड्या ! अलौकीक दर्पाच्या गोलाकार, हिरवट शेवाळी कोरड्या ठाक लेंड्या कधी कधी दप्तराला वा कपड्याला नकळत चिटकून आल्या की मोठी फजिती व्हायची

गायी म्हशी चरायला न्यायची परवानगी नसल्याने शेळ्यावर हौस भागवून घ्यावी लागे. मग त्यांची भावंडात वाटणी केली जाई, दोघा तिघात किंवा चौघात एक शेळी वाट्याला येई. मग ती काळी किंवा करड्या रंगाची आहे का यावरून वाद होई. काळ्या शेळ्या संख्यने जास्त, अन करड्या तपकिरी तांबूसरंगाच्या त्या मानाने खूप कमी.....
आमच्या वाट्याला जी शेळी येई, तिचे नाव सगुणा. ती काळी कुट्ट, बुटकी अन शिडशिडीत अंगाची होती पण तिच्या पायापाशी व डोक्यावर पांढरे ठिपके होते. त्यामुळे ती उठून दिसायची. स्वच्छ धुवून अंघोळ घालण्यापासून ते बाभळीच्या झाडाखाली हिरव्या शेंगा खाऊ घालण्यासाठी तिला घेऊन जाणं, संध्याकाळी विहिरीच्या काठाने फिरवून आणणं, दुसऱ्या शेळीबरोबर टक्कर लावून तिच्या शिगांची मालिश करणंगायींच्या धारा काढून झाल्यावर, जर्मनच्या ग्लासात सगुणेसह सर्व शेळ्यांची धार काढली जाई, त्यांच्या धारा काढताना गायीच्या धारा काढतानाचेच अनुकरण असे. कोणाच्या ग्लासात जास्त दुध जमा झाले हा एक वादाचा विषय असे, मग ज्याच्या ग्लासात जास्त दुध असे त्याने पाणी घातले की नाही यावर'धार'दार चर्चा होई.. दुध कितीही निघालेले असो सर्वच जण विजेते असत. शेळीच्या दुधाचा चहा कोणता आहे अन गायीम्हशीच्या दुधाचा चहा कोणता आहे हे चहा न पिता केवळ वासावरूनही ओळखता येई, कारण  शेळीच्या दुधाचा वास चहालाही येत असे !...

एका दुपारी बाभळीच्या हाळात नेलेली सगुणा नजर चुकवून चरत चरत कुठे तरी लांब निघून गेली, दुपारभर तिची शोधाशोध केली पण तिचा पत्ता काही लागला नाही. तिला शोधायच्या नादात भावंडापैकी कोणीच जेवले देखील नाही. जाम पायपीट केली पण तिचा शोध लागला नाही. मनात हजार तऱ्हेचे वाईट साईट विचार येऊ लागले. दिवस जसजसा कलायला लागला तसतशी भीती दाट होऊ लागली. नकळत डोळ्यात पाणी दाटू लागले. तिला शोधता शोधता गावाची शीव ओलांजून दूरवर गेलो तरी काही कळलं नाही. जीव कासावीस झाला, काळजात घालमेल होऊ लागली, शिवाय वस्तीवर आता आपली चामडी सोलून निघणार याचा धाक अजून वेगळाच होता. मनात आता देवाचा धावा सुरु झाला होता. पण कशाचा काही फायदा झाला नाही. शिवाय वस्तीकडचा रस्ता चुकला त्याची काळजी वाटू लागली. आडरानात कुणाला हाकाटी द्यावी हे ही सुचेनासे झाले. शेवटी अंदाजेच माघारी फिरू लागलो. अंधाराची चाहूल गडद व्हायला अन सगुणेचा आवाज कानावर पडायला एकच गाठ पडली. आवाजाच्या दिशेने धाव घेतली तर हाळाच्या पुढं असणारया आडव्या तिडव्या टेकाडावरच्या करवंदाच्या जाळीत ती गाव्हली. तिच्या गळ्यातलं दावं झुडपात गुतलं होते. बरयाच वेळेपासून ती ओरडत असावी, त्यामुळं तिचा आवाज खोल गेला होता. आमची चाहूल लागली तसा तिचा आवाज वाढला. तिच्या जवळ जाताच पुढचे पाय उचलुन ती आनंद व्यक्त करू लागली. तिचं दावं सोडवलं तशी मोकळी होऊन ती उड्या मारू लागली. तिच्या जवळ तोंड नेताच काटेरी जिभेने तिने गाल चाटले. तिच्या डोळ्यात आलेले पाणी बघून आमच्या डोळ्यानाही धारा लागल्या. एव्हाना इकडे गोठ्यावर आमची शोधाशोध चालू झाली होती. आमच्यापायी सगळी वस्तीअन शिवार पालथं घालून झालं होतं, पण सगळेजण काहीसे निश्चिंत होते कारण सगुणा तिथं नव्हती म्हणजे पोरं तिच्या मागोमाग गेली हे सर्वांनी नक्की केलेलं. पोरं रस्ता विसरतील पण सगुणाला संगं न्यायला विसरणार नाहीत हे मळ्यात सर्वाना माहिती होतं. अन जरी का पोरं रस्ता भरकटली तरी सगुणा त्यांना बरोबर वस्तीवर घेऊन येईल याची त्यांना खात्री होती. झालेही तसेच, आभाळाचं तोंड पार काळंनिळं होईपर्यंत आम्ही भावंडे सगुणेच्या मागोमाग वस्तीवर बिनबोभाट पोहोचलो. आम्हाला पाहताच  सगळ्यांच्या जीवात जीव आला

साखरझोपेत असताना आजदेखील सगुणेचे ओरडणे कधीकधी कानी पडते, ती धूसर तांबडी संध्याकाळ अन करवंदाच्या जाळीत अडकलेला तो मूका जीव. तिचे ते चाटणे अन सगळ्यांच्या डोळ्याला लागलेल्या धारा, हे सारे अजूनही जसेच्या तसे डोळ्यापुढे तरळून जाते. ते 'हरवलेले दिवस' बेचैन करून जातात. सध्याच्या कृत्रिम अन कोरड्या जीवनशैलीकडे पाहिले की त्या सुखावह काळाचे ऋण उमजते ज्याच्या आधारे आयुष्यातल्या अनेक भल्याबुरया प्रसंगाना तोंड देण्याची जगावेगळी उर्जा अजूनही मिळते .


 - समीर गायकवाड.