Sunday, July 5, 2015

निरागस......एका भोळ्या भाबडया माणसाची कथा...

"बा इठ्ठला, काय केलस रे ! इठ्ठला रे !" कालिंदीने फोडलेला तो आर्त टाहो राऊ पाटलाच्या चिरेबंदी वाड्याला चिरून गेला, पांदीतल्या पारंब्यामध्ये गुरफटून गेला, पारावरच्या वड पिंपळात घुमून गेला, गावकुसातल्या पाण्याच्या आडात खोलवर घुमला अन सरते शेवटी पांडुरंगाच्या देवळाच्या शिखरात झिरपला. राऊ पाटलाच्या वस्तीवर असणारया खोपटात कालिंदीने फोडलेला टाहो दूरवर घुमला. त्या आवजाने रानातल्या पाखरांचा आवाज देखील थांबला. विहिरीतले पारवे गपगार झाले.रानातले सगळे गडी आवाजाच्या दिशेने धावले. सगळे त्या खोपटात जमा झाले. आत कालिंदी धाय मोकलून रडत होती, तिच्या मांडीवर इठूचे डोके होते. इठूचा निष्प्राण देह मातीवर अचेतन पडला होता.

इठू ! डोक्याचा भला मोठा भोपळा. बारीक केस डोईवर.मोठाले डोळे. गरुडासारखे नाक. गालफाडे सदैव आत गेलेली. बारीक दाढीचे किंचित पांढुरके खुंट वाढलेले असायचे. कानाच्या लोंबणारया लांब पाळ्या. दातांची भली मोठी पंगत सुजल्यागत असलेल्या ओठाच्या मागे लपलेली. हातापायाची हाडे मजबूत पण अंगावर मांस नव्हते. उंची अगदीच बेताची. अंगावर पिवळट मांजरपाटाचे बनियन अन काळपट अर्धी लांब चड्डी एव्हढाच पण नेहमीचा एकच वेश. गावात कुणाच्याही घरी लग्न असो व मयत तो याच कपड्यात दिसायचा. लहानगा इठू गावात कधी आला अन कसा आला कोणालाच नेमकी माहिती नव्हती. कोण म्हणायचे वरातीतले लोक त्याला सोडून गेले. कोण म्हणायचे वाट इसरून गावात आलेले पोर होता तो.तर कोण म्हणायचे वारीत जाताना मागे राहिलेला भोळा सांब होता तो ! ईटू जरा गतिमंद होता. जेंव्हापासून तो गावात होता तो राहायला पांडुरंगाच्या देवळात असायचा, म्हणून त्याचे नाव विठ्ठल ! गावकरयांचा इठू !!

तो गावात आल्यानंतर काही वर्षांनी रावसाहेब पाटलांनी, राऊनी त्याला आपल्या वस्तीत एक खोपट राहण्यासाठी दिले. चिंचेच्या दोन मोठ्या झाडांखाली असणारी त्याची चंद्रमौळी झोपडी बांधाच्या कडेला होती. त्याला लागूनच मोठे मचाण होते, कधीकधी तो त्या मचाणावर चढून मोठ्याने ओरडायचा तेव्हढेच काय ते त्याचे जोराचे ओरडणे. गावात कोणाच्याही घरी लग्नकार्य असले तर मांडव टाकण्यापासून ते वरात दारातून जाईपर्यंत इठूचा मुक्काम तेथेच असायचा. ताशा तुतारीवर लहान पोराठोरासंग नाचायचा, पंगत वाढायचा, पाली उचलायचा काय वाट्टेल ती कामे करायचा तो. लहान पोरांमध्येही खेळायचा. पण कधी रिकामटेकड्या माणसागत पारावर वा चावडीवर तो दिसला नाही. की कधी कुणाच्या कुचाळक्या त्याने केल्या नाहीत. सदैव निरागस हसू त्याच्या तोंडावर असे ! गावात कोणाच्या घरी श्राद्ध असले, पुण्यतिथी असली तर वारकरयांच्या दिंडीत सर्वांपुढे अर्थातच इठू असायचा. गळ्यात टाळ घेऊन मोठ्याने उड्या मारत पाऊल खेळणार. त्याला कोणता अभंग येत नव्हता न कोणती आरती पण तुळशीच्या मंजुळासारखी पवित्र अन शुद्ध भक्ती होती त्याची. ती सिद्ध करायची त्याला गरज नव्हती.

रोज पहाटे उठून अंघोळ करून देवळातल्या विठठल रुकमाईसाठी आडातले दोन चार घागरी पाणी आणून तो गुरवाला दयायचा तिथून त्याचा दिवस सुरु व्हायचा. नंतर त्याला पुकारणारया बऱ्याच ऐपतदारांच्या घरीदेखील तो पाणी आणून दयायचा. आडावर पाणी शेंदायला इठू आला नाही असा दिवस गावात कधी झाला नाही. आडावर पाणी शेंदताना तिथ असणारया सासूरवाशीणीना धुणे धुऊ लागायचा.त्यानाही पाणी काढून दयायचा. ही कामं करताना अगदी ओलाचिंब व्हायचा तो. पाणी शेंदून झाल्यावर कोणाच्या तर घरी न्याहारी करून स्वारी पुन्हा फिरतीवर ! अकाली विधवा होऊन गावात परत आलेल्या एखाद्या पोरीबाळीचे लेकरू काखेत घेऊन देवळात जाऊन बसायचा. सूर्यदेव डोईवर आल्यावर मात्र गडी वेळेवर राऊ पाटलाच्या घरी हजर ! त्या मोठ्या चौसोपी चिरेबंदी वाड्याला लोक राऊ पाटलांचा ईमला नाही तर राऊची गढीच म्हणायचे. दोन भल्या मोठ्या ढेलजा एका ढांगेत पार करून इठू तिथे हजर व्हायचा. पाटलीणबाई त्याला जातीनं वाढायच्या. पोटभर खाऊन तिथेच हातजोगी कामे करून तो धन्याची सेवा करायला उतावीळ असायचा. घरात आलं की त्याच्या तोंडाची टकळी चालू असे. थोडया वेळाने कराकरा वाजणारया वहाणा घातलेले राऊ घरात आल्यावर मात्र हा थेट माजघर गाठायचा अन चुपचाप भांडी घासू लागायचा.

एकदा जया इनामदाराने इठूचा चालताना धक्का लागला म्हणून त्याला भर उन्हात पाणी शेंदायला जुंपले. हा घामाघूम होऊन गेलेला, पण पाणी आणतच होता. एकामागून एक तीसेक हंडे पाणी शेंदून झाले, त्याच्या हातापायातील त्राण केंव्हाच संपले होते. कोणीतरी जाऊन राऊ पाटलाच्या कानावर ही बातमी टाकली. दारासमोर असलेल्या बैलगाडीत अडकवलेला चाबूक हाती घेऊन राऊनी थेट इनामदाराचा वाडा गाठला. मुंगीच्या पावलांनी पुढं जात असणारया इठूच्या खांदयावर असलेला पाण्याने भरलेला हंडा त्यांनी आपल्या हाताने लोटला. अर्धमेला झालेला इठू भोवळ येऊन खाली पडला. पाटलांना बघून वाड्याबाहेर उभा असलेला जया मनोमन टरकला होता. पण तोंडावर उसने अवसान आणून निलट होऊन तो तिथेच उभा होता. त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत राऊ पाटलांनी आधी इनामदाराच्या वाडयाचे दार ओढून घेतले आणि बाहेरून कडी घातली. पाटील काय करताहेत हे जयाला कळले देखील नाही. रागाने लालबुंद झालेल्या राऊनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता जयवंत इनामदाराला हातातल्या चाबकाने सोलून काढायला सुरुवात केली. तो जनावरासारखा ओरडू लागला. कोणी मध्ये पडायचे धाडस करेना. तितक्यात बाहेरून कुठल्या तरी कामावरून वाडयाकडे परतणारी कालिंदी त्या दोघांच्या भांडणात मध्ये आडवी पडली अन तिने राऊंच्या हातातला चाबूक अडवून धरला. "धन्याला एकडाव माफ करा" असे थरथर कापत ती विनवू लागली. कालिंदीच्या नावाने जया शिवीगाळ करत लोळत पडला पण त्याने पाटलांची वा इठूची माफी काही मागितली नाही. हातातला चाबूक तेथेच टाकून राऊ परतले. राऊ गेल्याबरोबर जयाने उठून कालिंदीच्या एक मुस्काटात लगावली अन 'तुझी हिंमत कशी झाली मध्ये पडायची' असं काहीसं पुटपुटत त्याने वाडयाचे दार उघडले. भोवताली जमा झालेल्या बघ्यांनी पाय काढता घेतला. इनामदाराच्या वाडयात त्या दिवसापासून सुडाची आग धुमसत राहिली पण राऊ पाटलाच्या सर्वशक्तिमान व्यक्तीमत्वापुढे त्यांचे कधीच काही चालले नाही. मात्र त्या दिवसापासूनचे पाटील अन इनामदार घराण्याचे वैर आजतागायत शाबूत आहे. कालिंदी म्हणजे इनामदारांची घरातली हरकामी होती. चाळीशी गाठलेली एक प्रौढ स्त्री. त्या दिवशी तिला जया इनामदाराने घरातून हाकलून दिले तशी ती तडक पाटलांच्या घरी कामाला रुजू झाली. तिच्या रूपाने इठूला जणू बहिणच मिळाली.

गावातली चंद्रावळ नार गुजा देखील इठूशी काहीना काही काम काढून बोलायची तेंव्हा गावातली टवाळ पोरे त्याला चिडवायची पण तो कधी चिडत नसायचा कुणीही सांगितलेलं कसलंही पडेल ते काम तो करायचा. कोणाची पोत्याची चवड रचून दयायचा तर कोणाच्या खळ्यात रातभर जागायचा. कोणाची जनावरे हाकायचा, दारे धरायचा, छप्पर शाकारून द्यायचा, पेरणीत पाभर धरायचा तर कधी कोणाच्या शेतात नांगर धरायचा. पण दिस मावळायला राऊच्या वस्तीत यायचाच. तिथल्या म्हातारया झालेल्या काशी गायीला पाणी दयायचा, हिरवा गार चारा दयायचा. खुळ्यागत तिच्या शेजारी बसून रहायचा. आभाळात चांदण्या आल्या की कालिंदीने दिलेली भाकरी खाऊन झोपी जायचा.......

"काल थोडी कणकण आली म्हणत होता. आज सकाळी देवळात पाणी देऊन थेट खोपटात आला बघा. काय सुदिक खाल्ले नाही हो माझ्या भावाने. तिकडं गोठयात काशी सकाळ पास्न उभी हाय ती बसली दिकून न्हाय. तिचे म्हातारीचे पाय भरून आले असतील हो ! तिच्या मुळेच माझ्या मनात संशोव आला अन आत येऊन बघते तर काय ? इठ्ठला काय केलं रे हे ?" कालिंदी रडत रडत सांगत होती अन ते दृश्य बघून सर्वांचे डोळे पाणावले होते,

इठूच्या खोपटात होते तरी काय ? पांडुरंगाचा फोटो असलेलं बऱ्याच वर्षांपूर्वीचे जुने कॅलेंडर होते. एक किंचित कळकटून गेलेले जर्मनचे ताट. कडेला कपचे उडालेली एक जर्मनची वाटी. एक लख्ख पितळी तांब्या. एका कोपरयात दोन विटांची चूल. पण ती बहुतेक बऱ्याच दिवसापासून कधी पेटवलेलीच नव्हती. एका कडंला एकावर एक रचून ठेवलेली वाकळ अन गोधडी. घासलेटची धुळ खात पडलेली चिमणी अन दुसऱ्या कोपरयात कडी कोयंडा नसलेली एक जुनाट गंज खाल्लेली पत्र्याची पेटी होती.

यथावकाश सगळेजण तिथे गोळा झाले. सर्वाना मोठी हळहळ वाटली. शेवटी त्याच्या अंत्यविधीची तयारी करण्यात आली, शेतातच त्याच्या देहाला अग्नी देण्यात आला. त्यासाठी सारा गाव लोटला होता. राऊ पाटलांनी स्वतःच्या हाताने जेंव्हा त्याच्या चितेस अग्नी दिला तेंव्हा वस्तीवरल्या तुलसीवृंदावनातल्या नाजूक मंजुळा अबोल झाल्या होत्या. पाखरे हिरमुसून गेली होती. गावातल्या देवळातले पांडुरंग रुक्माई देखील निशब्द झाले होते. जिथे इठू सूरपारंब्या खेळायचा त्या पारंब्या चिडीचूप झाल्या होत्या, मयतीला आलेल्या टाळकरयांचे टाळ मृदंग ताल हरवून गेले होते. सगळ्या आसमंतात खिन्नता दाटून आली होती. जेंव्हा त्याच्या अस्थी चंद्रभागेत सोडल्या तेंव्हा तिचा जीव देखील गहिवरून गेला अन तिच्या नदीपात्रातल्या पाण्यावर सरसरून काटा आला......

असेच काही दिवस गेले. तळ्यात मान घालून बसलेल्या औदुंबरासारख्या एका उदास संध्याकाळी राऊ पाटील त्यांच्या वस्तीतल्या खोपटाकडे नकळत चालत आले. आतले दृश्य इठू गेलेल्या दिवशी जसे होते, आताही तसेच होते. भोळ्या भाबड्या निराधार इठूच्या आठवणींनी त्यांचे मन भरून आले. उदास चेहऱ्याने त्या खोपटाला न्याहाळताना पाटलांचे लक्ष्य सहज त्या पत्र्याच्या पेटीकडे गेले. पेटीला बघून त्यांचे कुतूहल चाळवले. ते जवळ गेले अन कापरया हातांनी त्यांनी पेटी उघडली. आत दोन मिठाईचे अगदी जुने बॉक्स होते.त्यांनी दोन्ही बॉक्स बाहेर काढले अन उघडले. बॉक्स उघडता क्षणी त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या अन लहान मुलागत तो एव्हढा मोठा पाटील ओक्साबोक्शी रडू लागला.

त्यातल्या एका बॉक्समध्ये गावातल्या अनेक बायकांनी गेल्या कित्येक वर्षात इठूला बांधलेल्या रंगीबेरंगी राख्या त्याने अगदी निरागसपणे कापडात गुंडाळून ठेवल्या होत्या तर दुसऱ्या बॉक्समध्ये दोन भोवरे, रंग उडालेली एक लाकडी बैल जोडी, हात मोडलेली एक तुटकी बाहुली होती अन ज्या चाबकाने त्यांनी इनामदाराला बडवले त्या चाबकाची जाडजूड लांबसडक चामडी वादी देखील त्यात होती !

पाटलांच्या रडण्याने सारे कावरे बावरे झाले. गोठ्यातली काशी तर दावे तोडून त्या खोपटात पळत आली अन पाटलांचे गाल चाटू लागली. इठूच्या पेटीतले त्या अनमोल वस्तू बघून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले.

इठू गेला त्या ठिकाणच्या खोपटाच्या जागी पाटलांनी आता एक छान समाधी बांधली आहे. जेंव्हापासून रानात इठूची समाधी बांधली आहे तिथले पीक कधी करपले नाही की तिथं नापिकी म्हणून ती कसली नजरेस पडली नाही. केंव्हाही बघितलं तरी अख्खं शिवार हिरवंकंच दिसतं. राऊ त्या हिरव्यागार रानातल्या वस्तीवर कधीही आले की या समाधीशेजारी काही घटका का होईना बसून जातात. त्या शिवाय त्यांना चैन पडत नाही. इथे बसले की त्यांना त्यांच्या अपघातात अकाली गेलेल्या मुलाची अन इठूची सय दाटून येई. अन ते दोघे त्यांच्या दोन्ही डोळ्यातून कोमट अश्रुंवाटे आपल्या पित्याच्या गालावर ओघळत असत. काहीशा उदास मनाने दिस बुडून जाईपर्यंत तिथे बसून राऊ त्या दोघांनाही अनुभवत असत…….

- समीर गायकवाड.