Saturday, July 11, 2015

एक बंडखोर मुस्लीम तरुणी - अयान हिरसी अलीची गाथा ....काही दिपूर्वी 'धर्म संकट मे' नावाचा सिनेमा आला होता, सिनेमा काही फारसा चालला नाही ही गोष्ट वेगळी पण या सिनेमाने जगबुडी आणि धर्मबुडी होणार असल्याच्या अविर्भावात कट्टरतावाद्यांनी गदारोळ उठवला होता पण त्याला फारशी भिक न घालता हा सिनेमा प्रदर्शित झाला . माहिती घेतल्यावर असे लक्षात आले की इंग्रजी सिनेमा द इंफिडेल' यावर तो बेतला होता. द इंफिडेल हा सिनेमा अयान हिरसी या मुस्लीम तरुणीच्या आत्मचरित्रपर कादंबरीवर आधारित होता. कुतूहल चाळवले म्हणून अयान हिरसीचे पुस्तक मिळवले. हे पुस्तक काही जणांना आनंदाच्या उकळ्या फुटेल असे आहे तर काही जणांचे रक्त पेटून उठेल असे आहे. अयान हिरसी अली ही काही निरीश्वरवादी नाही. पण तिने देव आणि धर्म या संकल्पनांची चिरफाड केली आहे. तिने इस्लामविरोधी लिहिले आहे असे एक विचारधारा म्हणते तर पुरोगामी म्हणतात की तिने इस्लामच्या कालबाह्य अन घुसडलेल्या रिवाजांवर प्रखर हल्ला केला आहे.

सोमालियात जन्मलेली (१३ नोव्हेंबर १९६९) अयान सौदीला असताना १९९२ मध्ये वडिलांनी ठरवलेले लग्न मान्य नसल्याने अन स्वतन्त्र विचारांमुळे देशातून परागंदा होऊन हॉलंडला आली, तेथे ती २००३ ते २००६ या काळात तिथली संसदसदस्य होती. २००५ च्या वर्षासाठी टाईम मासिकाने तिची जगातील सर्वात शक्तीशाली महिलामध्ये निवड केली होती पुढे तिच्या डच नागरिकत्वावरून अन खरे तर तिच्या देवावरील विचारांवरून गदारोळ झाला अन तिला हाउस ऑफ रेप्रेझेटेटीव्हच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. २०१० मध्ये ती अमेरिकेत आली, २०१३ मध्ये तिला अमेरिकेचे रीतसर नागरिकत्व मिळाले.तिच्या इस्लामविषयक परिवर्तन अन आधुनिक विचारांमुळे तिच्या नावावर शिरच्छेद करण्याचा फतवा निघाला तो अजूनही कायम आहे.पुढे अयानने इस्लामचा त्याग केला. ब्रिटीश इतिहासकार नेल फर्ग्युसनसोबत तिने विवाह केला. आयांन हिरसीबद्दल बोलताना हिंदू कट्टरवाद्यांची छाती फुगून येते पण आपल्याकडेही पुस्तके, कविता, सिनेमे यांचा भावना दुखावल्याचा आधार घेऊन गळा घोटला जातोच की. अगदी अलीकडे मोहल्ला अस्सीचे उदाहरण ताजे आहे. असो.

वयाच्या पाचव्या वर्षी आई आणि आजीने अयानची व तिच्या बहिणीची सुंता केली. काय घडले हे अयानला कळलेच नाही. कित्येक दिवस अयानने असीम वेदना सहन केल्या.

सुंता का झाली ? सुंता केली की स्त्रीची कामवासना कमी होते म्हणे, तसं मुल्लांनी सांगतलं होतं. मुल्लांनी असंही सांगतलं,की स्त्रीचे केस, तिचे ओठ, तिचे डोळे, तिची मनगटे, तळपाय पाहिले तरी पुरुषांची वासना जागृत होते. म्हणून स्त्रीने पूर्ण शरीर झाकून घेतलं पाहिजे.स्त्री ऑफिसमध्ये, कारखान्यात, शेतात कामाला गेली तर तिला वाकावे लागेल, त्या खटाटोपात तिच्या शरीराचा तिळभर भाग जरी उघडा पडला तर अनर्थ होईल म्हणून स्त्रीन बाहेर पडू नये असं तिला सुनावण्यात आलं.

जाणतेपण आल्यावर अयानला सेक्सच सुख घ्यावे वाटत होतं. ते घेण्याची तिला परवानगी नव्हती. पुरुषांनी उपभोग घ्यावा, पण स्त्रीला उपभोगाची परवानगी नाही, हे अयानला खटकले. मुलीला चांगले वळण लागावे, मुलगी खरी मुसलमान व्हावी म्हणून आईने अयानला एका मुल्लाच्या वर्गात पाठविले. मुल्लानी कुराणाचे दाखले देत सांगितले, “पत्नीने पतीला शंभर टक्के शरण गेले पाहिजे. पती सांगेल ते मुकाट्याने ऐकले पाहिजे, पतीने केंव्हाही उपभोग मागितला तरी तो दिला पाहिजे. अगदी उंटावरुण सवारी करताना सेक्सची मागणी केली तरी ती मागणी पूर्ण केली पाहिजे. ऐकले नाही तर पत्नीला बडवण्याचा अधिकार पतीला आहे.

नवरयाने बायकोचे ऐकू नये का ?’, अयानने विचारले .

नाही’, मुल्ला म्हणाले.

म्हणजे पती आणि पत्नी समान नाहीत का ?’ अयानने विचारले.

मुल्ला भडकले,”प्रश्न विचारू नकोस ! पती पत्नी समान आहेत .

कुराणात तर पानोपानी लिहिलेय की अल्ला न्यायी आहे. तसं पती पत्नी संबंधाबाबत दिसत नाही.” – अयान .

वाद झाला. मुल्ला आणखीनच भडकले. म्हणाले, “तुझ्या तोंडून सैतानच बोलतोय.

संगणाकाच्या भाषेत अयान म्हणते की कुराण महणजे रीड ओन्ली मेमरीआहे. म्हणजे एकाच बाजूने वाचायचा मजकूर आहे. नुसता वाचायचा. त्यात बदल करता येत नाही.

कुराणात लिहून ठेवले आहे की ; ‘मी तुला एक परिपूर्ण मार्ग दाखवला आहे. माझ्या पश्चात तु त्यापासून दूर जाता कामा नयेस. गेलास तर नष्ट होशील.

माणसाचे मन आणि सेक्स लाईफ याबद्दल कुराणाचा दाखला देऊन मुल्लांनी सांगतलेले मत अयानला जाचक आणि अनैसर्गिक वाटत होते. शाळेत असताना, वयात आल्यावर अयानला स्वाभाविक शरीर अनुभव घ्यायचा होता. पण परवानगी नव्हती. इंग्रजी कादंबरया,गोष्टी, सिनेमा, यातून तिने जगाच्या इतर भागात माणसे कशी जगतात ते पाहिले होते. सेक्स उपभोगुनही जगभरची माणसे नॉर्मल असतात, मग आपल्याच धर्मात सेक्सबद्दल इतकी कटकट का ? असा प्रश्न तिला पडे. घराचा व समाजाचा जाच असल्याने तिने चोरुनच सेक्सचा थरार शेवटी अनुभवलाच. दोन तीन वेळा !

लग्नामध्ये रस नसतानाही शरीरसुख अनुभवण्याचा समाजमान्य मार्ग म्हणून एकदा अयानने लग्नही केले घाईघाईने.

पहिली रात्र. कादंबरयात तिने पहिल्या रात्रीची रोमांचक वर्णने वाचली होती. तो रोमांच तिला हवा होता. महमूद हा तिचा नवरा. उंचापुरा, धडधाकट. अयानची सुंता झालेली होती. महमूदने जबरदस्त खटपट केली.महमूद अनावर होता. त्याने सर्व शक्ती पणाला लावली. अयान जबर जखमी झाली. रक्तस्त्राव झाला. असह्य वेदना. शेवटी बेशुद्ध झाली. नंतर कित्येक दिवस मलमपट्टी करत होती.

महमूद दुसऱ्या दिवशी निघून गेला. पुन्हा भेटला नाही.

अयानची मैत्रीण साहरा.

तिचीही सुंता झालेली होती.

लग्नानंतर पहिल्या रात्री नवरा सुरी घेऊन टाके उसवायला निघाला. कसबस साहराने ते होऊ दिले नाही. साहराचा नवरा त्यातल्या त्यात बारा असल्याने त्या रात्री त्याने फार मस्ती केली नाही. दुसऱ्या दिवशी तो तिला इस्पितळात घेऊन गेला.

सोमालियात यादवी होती.अजूनही आहे. अनेक जमाती सत्तेसाठी हत्त्याकांडे करत होत्या. अयानचे वडील उदारमतवादी होते, सत्ताधारी गट त्याना मारायला टपला होता. त्यामुळे वडील परदेशात, अज्ञातवासात असत. घरी पैसे नसत. स्त्रीने काम करायचे नाही अशी धर्माज्ञा. त्यामुळे आई किंवा अयानला नोकरीचाकरी करायची सोय नाही. आईने कसाबसा संसार रेटला. शिक्षणाची आबाळ. काही काळ वडील सौदीमध्ये होते, तेंव्हा अयानला तिथल्या शाळेत घातले होते.

शाळा महणजे मदरसा होता तो.अरबी,गणित आणि कुराण शिकवायचे. ऐंशी टक्के वेळ कुराणच्या अभ्यासात, पाठांतरात जात असे. अल्लाची नव्याण्णव नावे त्याना पाठ करावी लागली. स्त्रीने कसे वागावे याचे तपशीलवार धडे मदरशात दिले जात. शिंक आल्यावर काय म्हणावे, झोपताना सुरुवातीला कुठल्या कुशीवर झोपावे, झोपेतही कस वळावे, संडासात जाताना कुठला पाय प्रथम टाकावा आणि संडासात कसे बसावे वगैरे इत्थंभूत सांगितले जाई.

शिक्षक इजिप्शियन होता. तो अयानला मारत असे.

पुढे वडिलांनी अयानचे लग्न ठरवले, उस्मान मुसा या केनाडामध्ये स्थायिक झालेल्या तरुणाशी तिचा निकाह ठरवला. इस्लाममध्ये लग्नविधीत नवरी मुलगी हजर असण्याची आवश्यकता नसते. तिची संमती तिच्या वडिलांनी दिली तरी लग्न होते. तसच झाले. ना तिची परवानगी, ना अयानने उस्मानला पाहिलेले. अयानला फक्त सांगितले गेले की तुझे अमुक अमुकशी लग्न ठरवले गेले आहे.

अयानने मुसाची परीक्षा घेतली, तो बुद्धिमान नव्हता. त्याला न इंग्रजी येत होत ना सोमाली! लहान वयातच केंनडाला गेल्याने बरया परिस्थितीत होता एव्हढेच.

अयानने त्याला नकार दिला.

वडिलांनी ऐकले नाही. अयानचे लग्न झालं.

अयानजवळ केनेडियन व्हिसा नव्हता. वडिलांनी अर्ज केला. फार वेळ लागत होता. अयानचा एक चुलता जर्मनीत होता. तिथून पटकन व्हिसा मिळेल.

अयान जर्मनीत पोहोचली. तिथे तिने स्वातंत्र्य काय असते ते पाहिले. माणसे सुखात होती. स्त्रिया बुरखे घेत नव्हत्या. स्त्री-पुरुष बारमध्ये एकत्र मोकळेपणे पीत,नाचत. तलावात अंघोळ करत,पोहोत. स्त्रवर अत्त्याचार होत नव्हते.

कुराणानुसार वागणारया सोमालियात आणि सौदी अरेबियात पुरुष स्त्रियांना त्या बुरखा घालत असल्या तरी मारहाण करत होते. त्यांच्यावर अत्त्याचार करत होते. जर्मनीत स्त्रिया मोकळ्या वावरत होत्या आणि समाज रसातळाला वगैरे गेल्यासारखे वाटत नव्हते.

एके दिवशी अयान काकाच्या घरून बाहेर पडली आणि हॉलंडमध्ये पळून गेली. तिने इमिग्रेशन अधिकारयांना खोटेच सांगितले की, 'सोमालियात तिच्यावर राजकिय अन्याय होत आहे, सबब राजाश्रय मिळावा.' युरोपात राजाश्रायाचे कायदे उदार आहेत. जगाच्या कुठल्याही देशात कोणाच्या जीवाला राजकिय, मानवी कारणासाठी धोका असेल तर युरोपीय देशात आश्रय मिळतो. उत्पन्नाचे साधन देऊन माणसाला स्थिरावले जाते.

अयान निर्वासित छावणीत दाखल झाली. अयान नवरयाकडे गेलीच नाही. नवरयाकडले अन बुजुर्ग तेथे गोळा झाले. त्यांनी अयानला पटवण्याचा प्रयत्न केला. अयान म्हणाली की तिला नवरयाकडे जायचे नाही. तिचा निर्धार पाहिल्यावर बुजुर्ग तयार झाले.अयानला घटस्फोट (तलाक) मिळाला.

अयान डच भाषा शिकली. विद्यापीठातून तिने राज्यशास्त्राची पदवी घेतली. अभ्यासातून तिला आधुनिक जगण्याचा अर्थ कळला. अयानला कळले की, जगण्यासाठी धर्माची,देवाची आवश्यकता नाही. अयान राजकारणात सक्रीय झाली.

कुराण,इस्लाम,स्त्रियांचे अधिकार या विषयांवर बोलू लागली. टीव्ही आणि वर्तमानपत्रातून तिची भाषणे प्रसिद्ध होऊ लागली.

अयान डच लोकसभेची सदस्य झाली.

इस्लामशी प्रतारणा केली, कुराण विरुद्ध वागली, नवरयाचे ऐकले नाही, अशा कारणासाठी हॉलंडमध्ये स्थायिक झालेल्या सोमाली स्त्रियांचे खून होत. हे वास्तव तिथले डच सरकार व समाज मान्य करायला तयार नव्हते. अयानने आग्रह धरला. पाहणी करायला लावली, ऑक्टोबर२००४ ते २००५ या काळात दोन जिल्ह्यात ११ मुस्लीम स्त्रीयांना ठार मारण्यात आले होते. धर्मावर आधारलेल्या शाळा असता कामा नयेत, तशा शाळांना सरकारने मदत करणे बंद केले पाहिजे,असा आग्रह अयानने धरला.

डच राजकारणी वैतागले. तसे करणे म्हणजे मदरसे बंद करणे. म्हणजे मते घालवणे.

अयानच्या भूमिकेने हॉलंडमध्ये खळबळ माजवली. स्त्रीच्या प्रश्नाचे हत्त्यार वापरून तिने इस्लाम आणि एकूणच धर्म यांविरोधी मोहीम उघडली. आपण अल्लाचे बंदे नसून गुलाम आहोत, असे ती म्हणू लागली. कुराण हा अल्लाचा शब्द नसून, ते माणसानेच लिहिलेले आहे. त्यामुळे आधुनिक काळाला अनुसरून कुराणचे अर्थ लावले पाहिजेत. सातव्या शतकातील भयानक जग पुन्हा तयार करू नये, इस्लाम आधुनिक केला पाहिजे.असे ती सांगू लागली.

थियो व्हेन गॉगबरोबर अयानने सबमिशनही फिल्म केली. ही फिल्म इस्लामविरोधी आहे असे जहाल इस्लामी गटांनी जाहीर केले. अल-कैदाने तिला ठार मारण्याचा फतवा काढला. पुढे थियोचा खून झाला. अयान लोकसभा सदस्य असल्याने तिला राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या वाट्याला येणारी सुरक्षा मिळाली. पण तिथली वाढती राजकीय कोंडी अन जीवाचा धोका लक्षात घेऊन ती नंतर अमेरिकेत गेली. तिला तिथले नागरिकत्व मिळाले. अयान आजही अमेरिकेत कडेकोट बंदोबस्तात राहत्येय. तिच्या धैर्याला अन वैचारिक स्वातंत्र्याचे बंड उघडपणे, निर्भीडतेने मांडण्याच्या लढाऊ बाण्याला सलाम. तिच्या स्त्रीविषयक क्रांतिकारी भूमिकेला नमन !

दरम्यान अयानने लिहिलेल्या इंफिडेलचे बेस्ट सेलर बुक मध्ये नोंद झालीय. अयान सारख्या मुली आपल्या देशात देखील घुसमटतायत. सर्व धर्मात आपल्याकडे अयान आहेत, खरी अयान हिरसी आपल्या देशात आली असती तर तिने काय लिहिले असते ? आपल्याकडे लोकाना खरे बोलणारे अन सर्वच धार्मातले पोल खोलणारे लोक नको असतात. मग त्यांचा दाभोळकर होतो. असो. अयानने लिहिलेले हे पुस्तक एका कट्टरपंथी देशाची चिरफाड करते, पण विशेष बाब म्हणजे तुर्कस्थानसारख्या मुस्लीम देशात मात्र अयानला स्त्रियांनीच नव्हे तर पुरुष विचारवंतानी समर्थन दिले.जग सगळीकडे कुस बदलत्येय. आपण काय करतोय याचेही ज्याने त्याने परीक्षण केले पाहिजे. भावना दुखावल्याचा पोकळ भोंगा आपण किती दिवस वाजवणार आहोत याचे सिंहावलोकन आपल्या देशातील सर्वच धर्मात होणे आवश्यक आहे.

कट्टरता कोणत्याही धर्माची असो ती घातकच आहे’. असे अयानने लिहिलेले आहे ते योग्यच आहे असे इंफिडेल वाचताना वाटते हे शेवटी प्रकर्षाने नमूद करावेसे वाटते.


- समीर गायकवाड.

मूळलेखन संदर्भ - 'धर्मवादळ' - ले. निळू दामले.