Sunday, May 24, 2015

मजरूह सुलतानपुरी - गाण्यातली रूह'लल्ला लोरी दुध की कटोरी' ते आजचे 'लल्ला लल्ला लोरी दारू की कटोरी' हा हिंदी चित्रपटगीतांचा प्रवास क्लेशदायक आहे.गीतकाराने हे गाणे का लिहिले असावे, दुधाऐवजी दारू हा शब्द का वापरला ? त्या जुन्या गाण्याची अशी माती का करावी ? त्याला स्वतःची प्रतिभा नाही का ? म्हणून का असे गाणे लिहावे ?मुळात याला गाणे म्हणावे का ?....

साधारणत: १९४७ ते १९७० या काळाला हिन्दी गाण्यांचा सुवर्णकाळ म्हटला जातो.. कुठूनही व केव्हाही ही गाणी कानावर पडली की, पावलं आपोआप तिथंच थबकतात आणि कान सावध होतात. इतकी वर्षे होऊन गेलीत, पण त्या गाण्यांतील माधुर्य अद्यापही तसेच आहे. त्यांच्यातील ताजेपणा तसाच टवटवीत आहे..........


शैलेन्द्र, कैफी आझमी, गुलजार, शकील बदायुनी, जावेद अख्तर, प्रदीप, मजरुह सुलतानपुरी, राजेन्द्र कृष्ण, आनंद बक्षी, भरत व्यास, साहिर लुधियानवी, हसरत जयपुरी, राजा मेहंदी अलीखान, पं. नरेंद्र शर्मा, केदार शर्मा, इंदीवर, कमर जलालाबादी, प्रेम धवन, गुलशन बावरा, योगेश या गीतकारांचा काव्यशास्त्राचा अभ्यास होता. मदन मोहन, रवि, शंकर जयकिसन, आर. डी. बर्मन, प्रदीप, सी. रामचंद्र, सुधीर फडके, वसंत देसाई, जयदेव, रोशन, नौशाद, खय्याम, चित्रगुप्त, सलील चौधरी, अनिल बिश्‍वास, लक्ष्मीकांत प्यारेलाल या संगीतकारांच्या आणि रफी, लता, आशा, मन्नाडे, मुकेश, तलत, हेमंतकुमार, सुमन कल्याणपूर या गायकांचा शास्त्रीय संगीताचा पाया पक्का होता. म्हणून या गीतकारांनी रचलेली, संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली व गायक-गायिकांनी गायलेली गाणी आजही ऐकावी वाटतात. या गाण्यांना शास्त्रीय संगीताचा आधार असल्यामुळे ती कायम नित्यनूतन वाटतात. आजच्या हिन्दी चित्रपटातील गीतांचा दर्जा खूप घसरला आहे. आजची गाणी वर्ष-सहा महिन्यात विसरली जातात. कारण आता पहिल्यासारखे अभ्यासू, परिश्रम घेणारे गीतकार, संगीतकार, गायक नाहीत. जे आज हयात आहेत त्यांनी आताच्या चित्रपट संगीतापासून निवृत्ती घेतली आहे......

स्वातंत्र्यापूर्वी आझमगढमध्ये एक तरुण हकिमीचा व्यवसाय करायचा. याला शायरीची मनापासून आवड. अडल्यानडल्या रुग्णांची सेवा करताना याची शायरी सुरूच असायची. याच्या शायरीच्या जादूने रुग्णाचा निम्मा आजार कमी व्हायचा. या शायरीच्या वेडातूनच हसरालूल हसन पुढे मजरुह सुलतानपुरी झाला. मजरुह म्हणजे जखमी किंवा घायाळ करणारा. मजरुहच्या गीतांनी रसिकांना प्रेमळ जखमा दिल्या. त्याच्या गीताच्या जादूने कर्णसेनांना घायाळ केले.

आझमगडहून सुलतानपूर या गावात आल्यानंतर या हसनचे शायरीचे वेड टोकाला पोहोचले होते. हा पठ्ठ्या मुशायरे गाजवायचा. त्याच्या शेरोशायरीवर प्रेक्षक फिदा असायचे. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक ए. आर. कारदार यांनी एका मुशायर्‍यात हसन यांची शायरी ऐकली. त्या वेळी ते ‘शहाजहान’ चित्रपटाच्या निर्मितीत होते. त्यांनी हसन ऊर्फ मजरुह सुलतानपुरीला गीतलेखन करण्याची ऑफर दिली. मजरुह यांनी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. मजरुहने लेखणी उचलली आणि कागदावर शब्द उमटवले... ‘गम दिये मुस्तकिल, कितना नाजूक है दिल... ये न जाना... हाये हाये ये जालिम जमाना.’ ‘शहाजहान’चे संगीतकार नौशाद यांनी वाहवा केली. नौशाद यांनी त्या खुशीतच चाल बांधली. पुढे कुंदनलाल सैगल यांच्या दर्दभर्‍या आवाजाने मजरुह यांच्या शब्दाला आगळे गहिरेपण दिले. मजरुह यांच्या या पहिल्या गीतरूपी रेशमी बाणाने रसिकांना घायाळ केले. हे कमी की काय, म्हणून मजरुहने पुढील गाण्यांची सुरुवात केली, ‘जब दिल ही टूट गया, हम जी कर क्या करे...’ तिच्या एका नकाराने, सर्वस्व हरपल्याची भावना मजरुह यांनी अशी व्यक्त केली. सैगलच्या आवाजातला या शब्दांतला दर्द काळीज पिळवटणारा ठरला. मजरुह यांच्या घायाळ करणार्‍या कारकीर्दीचा प्रारंभच असा धडाक्यात झाला. साध्या, सोप्या परंतु काळजाला भिडणार्‍या शब्दांची सुरेख गुंफण ही मजरुह यांच्या लेखणीची वैशिष्ट्ये. पर्शियन शब्दांचा समर्पक वापर त्यांनी चपखलपणे केला. याच वैशिष्ट्यांमुळे चार पिढ्या त्यांच्या गीतांच्या चाहत्या बनल्या. मजरुह यांच्या ‘शायराना’ स्वभावामुळे जवळपास सर्वच संगीतकारांबरोबर त्यांचे सुरेल नाते जमले. ‘शहाजहान’मध्ये काळीज चिरणारे वर्णन करणारी त्यांची लेखणी ‘आरपार’च्या वेळी मात्र प्रेमळ आणि हळवी झाली. तो आणि ती यांच्या नजरेच्या भाषेला, ‘कभी आर कभी पार लागा तीर ए नजर...’ असा रेशमी बाणाचा उपमात्मक आविष्कार झाल्यानंतर ‘बाबूजी धीरे चलना...’मधून प्रेमात कशी जपून पावले टाकायची, याची एवढी मधाळ जाणीव मजरुहच देऊ जाणे. मग ओपींचे ठेकेदार संगीत आणि मजरुह यांचे शब्द यांची कानसेनांना भुरळ पाडणारी जुगलबंदी सुरू झाली. ‘सीआयडी’मध्ये याचा प्रत्यय आला. ‘लेके पहला पहला प्यार...’ अशी प्रेमाची ग्वाही असो, ‘कहीं पे निगाहे कहीं पे निशाना...’मधली सूचकता असो, ‘आँखों ही आँखों में इशारा हो गया...’मधला जीवन जगण्याचा मार्ग असो; मजरुह यांच्या गीतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यानंतर लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या ‘दोस्ती’ला मजरुह यांच्या गीतांनी जो अर्थ प्राप्त झाला, त्याला तोडच नव्हती. ‘चाहूंगा मैं तुझे साँज सबेरे’, ‘मेरी दोस्ती मेरा प्यार...’, ‘राही मनवा दुख की चिंता...’ या गाण्यांनी इतिहास रचला. त्यानंतर मजरुहची जोडी जमली ती चतुरस्र आरडी बर्मनबरोबर. ‘ओ मेरे सोना...’, ‘आजा आजा मैं हूँ प्यार तेरा...’(तीसरी मंजिल), ‘पिया तू अब तो आजा...’, ‘चढती जवानी...’, ‘कितना प्यारा वादा...’, ‘दिलबर दिल से प्यारे...’, ‘गोरिया कहां तेरा देस रे...’(कांरवा), ‘चुरा लिया है...’, ‘लेकर हम दीवाना दिल...’, ‘आपके कमरे मे...’, ‘मेरी सोनी...’(यादों की बारात), ‘क्या हुआ तेरा वादा...’, ‘बचना ए हसीनों...’, ‘चांद मेरा दिल...’, ‘ए लडका हाय अल्ला...’
(हम किसीसे कम नहीं), ‘निसुल्ताना रे...’, ‘तुम बिन जाऊं कहां...’(प्यार का मौसम),
‘होगा तुम से प्यारा कौन...’, ‘पूछो ना यार क्या हुआ...’(जमाने को दिखाना है) ही या कॉम्बिनेशनची कामगिरी.नव्या पिढीतल्या संगीतकारांबरोबरही मजरुह यांचे चांगले सूर जुळले. आनंद-मिलिंद, जतीन-ललित यांच्या संगीताने नटलेली मजरुह यांची अनेक गाणी गाजली.

मजरुह हे रसायनच वेगळे होते. अष्टपैलुत्व हे त्यांच्या लेखणीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य. चित्रपटातील सिच्युएशननुसार गीतलेखन करण्यात मजरुह यांचा हातखंडा. ‘तेरे मेरे मिलन की रैना...’(अभिमान)मधला भाव वेगळा, तर ‘जाइए आप कहां जायेंगे...’(मेरे सनम)मधला लडिवाळ गोडवा पुन:पुन्हा ऐकावासा वाटणारा. ‘रात अकेली है...’(ज्वेल थीफ)मधले आव्हान कानाला सुखावणारे, तर ‘रहे ना रहे हम...’(ममता)मधले औदासीन्य विचार करायला लावणारे. कारकीर्दीच्या प्रारंभीच्या काळात कम्युनिस्ट चळवळीत भाग घेणार्‍या मजरुह यांनी एकदा पंडित नेहरूंबद्दल अनुदारात्मक काव्य केले.

त्याबद्दल त्यांना तुरुंगवासही झाला. असा सर्व पातळ्यांवर वावरणारा आणि आपल्या लेखणीने सर्वांना घायाळ करणारा मजरुह दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारा पहिला गीतकार! कोणताही भाव असो, कोणताही रस असो; तो भाव, रस आपल्या लेखणीने समृद्ध करण्याचे कसब मजरुहकडे होते. म्हणूनच चार पिढ्यांना त्यांच्या गाण्यांनी वेड लावले, येणार्‍या अनेक पिढ्याही या मजरुह वेडासाठी तयार आहेतच की....बाकी काळ मात्र इतका वाईट आलाय की लोक आता कलाकारांनाही जात धर्माच्या वर्गीकरणाच्या चौकटीतुन बघू लागले आहेत........असो....

आज मजरूहजीची पुण्यतिथी आहे त्या निमित्ताने हे अल्प स्मरण....

No comments:

Post a Comment