Friday, May 22, 2015

एका मुसलमानाचा स्वर्गाचा शोध ....


ए जर्नी ऑफ अ स्केप्टीकल मुस्लीम ; डेस्परेटली सीकिंग पेंराडाईज....
धर्माकडे संशयाने पाहणारया एका मुसलमानाच्या स्वर्गाचा शोध ....
मध्यंतरी ठाण्याजवळ एका तरुणाने जन्नतची सफर कुटुंबीयासोबत करायची म्हणून १४ नातलगांची गळे चिरून स्वतः आत्महत्त्या केली आणि माझ्या डोळ्यापुढे झियाउद्दिन सरदार हा पाकिस्तानी तरुण आला. धर्म कोणताही हिंदू, मुस्लिम वा ख्रिश्चन ; जिवंत माणसाला मेल्यानन्तर स्वर्ग, जन्नत अन हेवनचे गाजर दाखवून धर्माचे दलाल त्यांना पाहिजे तसे वाकवत राहतात अन माणसे त्यांना बळी पडत जातात...स्वर्ग, जन्नत वा हेवन याची देही याची डोळा पाहिलेला माणूस अजून जगाने बघितला नाही हे वैज्ञानिक सत्य आहे. तरीदेखील माणसे या मृगजळामागे धावत राहतात अन भाकड भविष्यापायी वर्तमानाचे मातेरे करून घेतात. स्वर्गाच्या या भाकडकथांची चिरफाड करायची म्हणजे धर्ममार्तंडाना दुखावणे आले. त्यातही इस्लामी धर्मभावना दुखावणे हे जास्त अवघड, पाकिस्तानातल्या तरुणाने यावर लिहिणे म्हणजे एक अग्नीदिव्यच !

ह्या लेखात मांडलेले विचार वाचताना हिंदुत्ववादयांना आनंदाच्या उकळ्या फुटतात मात्र आपल्याच धर्मातील सुधारणावादी विचार वाचताना त्यांचे पित्त खवळते. हीच बाब इतर सर्व धर्मीय कट्टरतावाद्याना लागू पडते. कारण प्रत्येक कर्मठ धर्मवेड्याना आपल्या धर्मातील सुधारणावादी हे डोकेदुखीसारखे असतात मात्र परधर्मीय सुधारणावादी त्यांना फार आवडत असतात. त्याचबरोबर कट्टर धर्मवेडयाना आपल्या धर्मातील धर्मांधल लोकांची फार क्रेझ असते त्या उलट त्याला त्याचवेळीस समोरच्या परधर्मीय व्यक्तीने त्याच्या धर्माबद्दल कट्टर वा कर्मठ असू नये असे वाटत असते ! ही यातली खरी मेख आहे..

तेंव्हा हा लेख वाचून मुस्लीमच कसे धर्मवेडे आहेत असा विनोदी विचार मनात आणण्याआधी आपले पाय कोणत्या मातीचे आहेत याचे आत्मपरीक्षण जरूर करावे ! ए जर्नी ऑफ अ स्केप्टीकल मुस्लीम ; डेस्परेटली सीकिंग पेंराडाईज....झियाउद्दीन सरदार या पाकिस्तानी तरुणाने लिहिलेल्या पुस्तकाचे हे रसग्रहण. धर्माकडे संशयाने पाहणारया एका मुसलमानाच्या स्वर्गाचा शोध .... झियाउद्दीन सरदार हा मूळ पाकिस्तानी असलेला युवक वयाच्या नवव्या वर्षी वडीलांबरोबर पाकिस्तानातुन लंडनमध्ये स्थलांतरीत झाला १९६१ साली.. लंडनमधल्या शाळेत शिकत असताना त्याच्यावर घरात इस्लामचे व बाहेर पश्चिमी सेक्युलर संस्कार झाले. त्या शाळातल्या इतर मुस्लीम युवकांप्रमाणे झिया स्वर्गाच्या शोधात निघाला. त्या शोधाची, प्रवासाची चटकदार आणि बोधप्रद हकीकत या पुस्तकात त्याने लिहिली आहे. मुस्लीम माणसाला स्वर्गाची ओढ असते. पुढारी, मुल्ला, राजकारणी लोक सांगतात की जर जिहाद केला, पुढारयानी सांगितलेल्या गोष्टी केल्या, शरियतमध्ये सांगितलेल्या गोष्टी केल्या की स्वर्ग मिळतो. त्या स्वर्गात मादक स्त्रिया आणि दारूची रेलचेल असते. जेरुसलेममध्ये ,न्युयोर्कमध्ये, अफगाणीस्तानात आणि काश्मीरमध्ये हिंसा करणारे अतिरेकी मुसलमान या स्वर्गाने भारलेले असतात.’...
 
झियाने आपल्यावर झालेल्या मुस्लीम संस्कारातून खरा स्वर्ग कसा असतो याचा शोध घ्यायला सुरुवात केली. झियांच दुसरे वेड म्हणजे उम्माचा ( मुस्लीम समाजाचा ) विकास घडवून आणण. जगभरात बहुसंख्य मुसलमान आर्थिक दुरावस्थेत राहतात. बहुतेक मुस्लीम आधुनिक जगाशी फटकून आहेत. त्यांचं मन पुरातन काळातच अडकून राहिलेले आहे. बहुसंख्य मुस्लीम समाजाच्या मनात आणि वर्तनात स्त्रीद्वेष आहे. झियाला या गोष्टी लंडनच्या सेक्युलर, लिबरल वातावरणात लक्षात आल्या, आपल्या मुस्लीम समाजातले दोष दूर करावेत, तो समाज आधुनिक करावा, त्याचं स्त्रीविषयक मत बदलावं या वेडान झियाला पछाडलं.

१९७२ सालची गोष्ट. म्हणजे झिया तेंव्हा २१ वर्षांचा होता. दोन मुस्लीम कार्यकर्ते त्याच्या लंडनच्या घराच्या दारात उभे राहिले. दोघेही पाकिस्तानातून आले होते. तबलीगया सुधारणावादी संघटनेचे ते कार्यकर्ते होते. ते इंग्लंडमधल्या मुसलमानाना सुधरायला आलेले होते. तबलीग ही संघटना आजही भारतात देखील मुसलमानांमध्ये काम करत आहे. १९२६ साली दिल्लीच्या जवळ मेवात या गावात ही संघटना मौलाना इलियास यांनी स्थापन केली. मेवात हा राजपुतांचा परिसर. राजपूत मुलातले हिंदू, मुघलांच्या राज्यात त्यातील काही मुसलमान झाले: परंतु त्यांची संस्कृती राजपूत हिंदू राहिली. धर्म मुसलमान आणि संस्कृती हिंदू. हिंदू जाती, प्रथा, नवससायास, लग्न, बारशी, मंगळसुत्र, देव, परंपरा, सांर काही हिंदू. फक्त धर्म मुस्लीम. इलियास याना ही गोष्ट खटकली. भारतीय मुसलमानांची परिस्थिती चांगली नाही, ते मागे पडतात, त्याना सत्ता मिळत नाही याचं कारण म्हणजे ते शुद्ध मुस्लीम नाहीत, असं इलियास यांचं मत होतं. त्याना शुद्ध मुसलमान केलं की ते सत्ताधारी होतील, त्यांचं भलं होईल असं त्याना वाटलं. शुद्ध मुसलमान व्हायचं म्हणजे पाच वेळा नमाज, कुराणात सांगितल्याप्रमाणे मूर्तीपूजा नाही, संगीत-कला वगैरे काही नाही. हाज्ची यात्रा, स्त्रीला दुय्यम वागवण, रमझानचा उपवास, नमाज पढताना वाकायचं कस, हात कसे धुवायचे इत्यादी बारीक-सारीक तपशील. या सगळ्या गोष्टी केल्या की झालं, असं इलियास यांनी ठरवल व ते करण्यासाठी तबलीग ही संघटना काढली. जगात मुसलमानांवर जी काही संकटे येतात, जो काही त्रास होतो, ते इस्लामचे पालन न करण्यामुळ, अशी भीती घालून मौलाना इलियास यांनी तबलीग युरोप आणि अमेरिकेतही वाढवली.

त्यातलेच दोन कार्यकर्ते इंग्लंडमधल्या मुसलमानांना शुद्ध करायला आले होते. झिया तबलीगीना घेऊन घेऊन इंग्लंडमध्ये फिरला. एका मुसलमानाने त्या कार्यकर्त्याना विचारले की, ‘अशुद्धपणा मोजण्याचे एखादे उपकरण तुमच्याकडे आहे काय ?’...तो तबलिगी दाढीवाला जाम वैतागला. दुसरया मुसलमानाने त्यांना सांगतले की आम्ही इंग्लंडमध्ये सुखी आहोत. आम्हाला आमच्या मनाप्रमाणे जगता येतेय. तबलिगची जरुरत नाही. तबलिगी परिषद, शिबिर झाली. कार्यकर्त्यांच्या सोबत फिरताना झियाला समजलं की अशा रीतीने कर्मठपणे नमाज पढून आणि कुराणचे वाचन करून चांगलं मुसलमान होता येणार नाही.

झियाने इस्लामचा नव्याने अभ्यास करायचे ठरवले. कुराण, इस्लामी परंपरा नव्याने तपासायच्या ठरवल्या. त्याने मोजक्या मित्रांच्या मदतीने अभ्यासमंडळ स्थापन केले. नियतकालिके चालवली. पुस्तके प्रकाशित केली. या खटाटोपात तो इराक, सिरीया, इराण, सौदी अरेबिया, पाकिस्तान, मलेशिया, चीन इत्यादी देशात फिरला. तिथल्या मुसलमानाना भेटला. मुस्लीम राज्यकर्ते, मुल्ला, इमाम, विद्यापीठात शिकवणारे प्राध्यापक,शिक्षक इत्यादी माणसांशी झियाने चर्चा केली. बगदादमध्ये जाऊन त्याने तिथले राज्यकर्ते, इमाम यांच्याशी शरियतबद्दल चर्चा केल्या. पाकिस्तानात मदरशात जाऊन तालिबानी मंडळींशी आणि पाकिस्तानाताल्या जमाते इस्लामीच्या लोकांशी त्याने चर्चा केली. मलेशियात त्याला अन्वर हा त्याच्यासारखाच उत्सुकता जागा असणारा आणि आधुनिक होऊ पाहणारा उपपंतप्रधान भेटला. सगळ्या भेटी, नियतकालिकातले लिखाण आणि चर्चा याचे केंद्र अर्थातच शरीयत आणि कुराण होते.
प्रवास करताना मुस्लीम समाजातले वास्तव झियाला दिसले. इराकमधली हुकुमशाही आणि क्रूर वागणूक, सौदी अरेबियातले भ्रष्टाचारी आणि स्त्रीद्वेष्टे राज्यकर्ते, पाकीतानातले आंधळे मुस्लीम राज्यकर्ते आणि अमानुष तालिबान त्याला पहायला मिळाले. गरिबी पाहायला मिळाली. विषमता पाहायला मिळाली. झियाला समजले की, ‘अल्लाने सांगतलेले कुराण, प्रेषितांचे वक्तव्य, त्यांच्या आयुष्यातल्या घटनावर आधारित हदीस आणि समाजाचे नियमन करणारा शरियत कायदा अशा तीन पुस्तकावर इस्लाम उभा आहे. शरियत हा कायदा प्रेशितांनंतरच्या काळातल्या राज्यकर्त्यांनी राज्यकारभार, समाजाचा कारभार करण्यासाठी तयार केला आहे. काळ, परिस्थिती आणि परिसर यांच्या चौकटी आणि मर्यादा यातच शरियत तयार झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर काळाच्या व स्थळाच्या मर्यादा आहेत. राज्यकर्ते आणि मुलांचे मर्यादित ज्ञान, त्यांचे स्वार्थ, त्यांची कर्तव्ये, काळाची गरज इत्यादींची चौकट शरियतवर आहे. अमानुष आणि न पटणारया शिक्षा (हात-पाय तोडणे, दगडाने ठेचून मारणे ) स्त्रीला दिलेली अमानुष-अन्याय्य वागणूक, या गोष्टी शरियतमध्ये घुसल्या. मुसलमान समाजाचे मागासपण शरियतच्या या मागासपणात आहे, ही गोष्ट अनुभवातून कळल्याचे झियाने नोंदवले आहे.

शरियत ही एक गोठलेली व्यवस्था आहे. ती व्यवस्था, कायदे काळाच्या संदर्भात सुधारल्याशिवाय मुसलमानांचे भले होणार नाही, हे झिया उदाहरणे आणि अनुभव यांच्या आधारे पटवून देतो. शरियत आणि कुराण किंवा प्रेषितांची शिकवण यांच्यात संबंध नाही असे तो म्हणतो. इस्लामच्या मुळात आहे स्वर्ग. या स्वर्गात जायचे असेल तर चांगले वर्तन करा, असे अल्ला आणि प्रेषित सांगतात. प्रेषितांच्या नंतरच्या लोकांनी स्वर्ग ही आदर्श संकल्पना विकृत केली. त्यांनी स्वर्ग हे प्रतिक त्या काळातल्या कल्पनांत, मेटाफरमध्ये गुंफलं असे झिया म्हणतो. स्वर्ग म्हणजे काय हे आठव्या शतकानंतर सत्ताधारी झालेल्या इस्लामी सुलतान व त्यांची हांजी हांजी करणारया मुल्लांनी ठरवले. त्यातूनच स्वर्गाची एक कल्पना तयार झाली. आजचे मुसलमान तोच स्वर्ग खरा असे मानतात. त्यातून स्वर्गात वाट्टेल तेव्हढी दारू मिळेल आणि मादक स्त्रियांची रेलचेल असेल सांगतले गेले. प्रेषितांच्या काळात लोक फार दारू पीत असावेत. त्यामुळे त्याना दारूपासून दूर ठेवण्यासाठी ही युक्ती काढली गेली असावी. सततच्या युद्धांमुळे पुरुष मारत, पुरुषांची संख्या कमी आणि स्त्रियांची संख्या त्या प्रमाणात जास्त. त्यामुळे कदाचित स्त्रीला गौणत्व आलेले. त्यामुळे पुरुषाला परस्त्रीपासून दूर ठेवण्यासाठ्जी स्वर्गात जायची वाट पहा असे सांगतले असावे.

झिया नास्तिक नाही, त्याचे म्हणणे आहे की, “सत्य जाणून घेण्याच्या दोन वाटा आहेत. एक सेक्युलर आणि दुसरी श्रद्धेची वाट. माणसाने या दोन्ही वाटांनी चालावे. सेक्युलरिझमची वाट म्हणजे विज्ञानाची वाट. आजवर मानवी समाजात जे जे घडले, ज्या परंपरा व चालीरीर्ती तयार झाल्या ( श्रद्धा आणि धर्माच्या बाजूने ) त्या सगळ्या अटकून देऊन चालणार नाही. परंपरा आणि धर्म टाकून दिलेल्या कम्युनिस्ट राजवटीत तरी माणसाचे कोठे भले झाले ? जुने टाकून देऊ नका. त्यातल्या वाईट गोष्टी काढून टाका आणि आधुनिक परंपराही पाळा. लोकशाही,विचार व आचारस्वातंत्र्य, आपापल्या उपासना पद्धती व संस्कृतीचे पालन करण्याचे स्वातंत्र्य. उदारमतवाद या गोष्टी महत्वाच्या आहेत. मुसलमानांनी त्यांची सांगड आपल्या धर्माशी घातली पाहिजे. इस्लामचे विज्ञान वेगळे असावे. म्हणजे असे की, फिजिक्स, केमिस्ट्री, गणित वगैरे सर्व असायलाच हवे. पण त्यांचा उपयोग विध्वंस, हिंसा यासाठी न करता गरीब मुसलमानांच्या कल्याणासाठी करावा. इस्लामी देशातल्या सरकारांनी व विद्यापीठांनी विज्ञानाचा विकास उपासमारी, गरिबी, रोगराई यांचा बंदोबस्त करण्यासाठी करावा.

'सलमान रश्दीचे सेटानिक वर्सेसहे पुस्तक वाईट आहे, खोडसाळ आहे. पण विचाराचा विरोध, प्रतिवाद विचारानेच करावा, एखादे पुस्तक पटले नाही तर उत्तरादाखल दुसरे पुस्तक लिहावे.असे झिया म्हणतो. त्यामुळे खोमेनीने रश्दीचा खून करा असा फतवा जेंव्हा काढला तेंव्हा झिया आणि त्याच्या मोजक्या मित्रांनी जाहीरपणे खोमेनीवर टीका केली. या टीकेमुळे झियाला खूप छळही सहन करावा लागला. झियासारखे मुसलमान फार थोडे निघाले. बाकी मुसलमान गप्प तरी बसले किंवा त्यांनी रश्दीच्या विरोधात मोर्चे काढले. झियाने पाकिस्तानी झिया उल हक वर सडकून टिका केली, कारण झिया उल हकनेच तालिबान पोसले. एकदा खुद्द झिया उल हकशीच सरदार झियाउद्दीनची भेट झाली तेंव्हादेखील तो आपल्या भूमिकेवर ठाम राहिला आणि झिया उल हक बाबतची मते त्याने चारचौघात मांडली.

झियाउद्दीन सरदारने आपल्या या पुस्तकात मांडलेला एक संवाद विचार करण्यासारखा आहे. एक दाढीवाला तरुण झियासमोर आला आणि त्याने झियाला विचारले, ‘तु शिया आहेस का ?'
झिया- नाही, सुन्नी आहे
तरुण – ‘शिया हा मुसलमानच नसतो.
झियाला तरुण विचारतो – ‘तु चांगला मुसलमान आहेस का ?’
झिया – ‘चांगला की कसा ते माहित नाही, पण मुसलमान आहे
तरुण – ‘तु जर मुसलमान आहेस तर दाढी का वाढवत नाहीस ?’
मुसलमान होण्यासाठी दाढी असणे आवश्यक आहे असे मालां वाटत नाही’– झिया.
तरुण – ‘सुन्ना सांगते की दाढी वाढवायला हवी, प्रेषितांनी दाढी वादाहावली होती. जो सुन्नांचे पालन करत नाही तो मुसलमानच नाही.
मग तु उंटावरून का फिरत नाहीस ? कारण प्रेषित उंटावरून फिरत असत. म्हणून उंट वापरणे सुन्ना आहे.‘– झिया.
तरुण – ‘आता तर आपल्याकडे कार आहेत, बसेस आहेत. उंट कशाला वापरायचा ?” 
झिया – “त्या काळात जर ब्लेड्स असती तर प्रेषितांनी खचितच दाढी केली असती.तरुण वरमला. त्याने मान खाली घातली.
झिया म्हणाला, “तु डोळ्यात सुरमा घातला आहेस.?”
हो हो, सुरमा घालणे सुन्ना आहे.तरुण म्हणाला.
झिया म्हणाला, “ सुरम्यात शिसे आहे. ते घातक असते. विषारी आहे ते. सुन्नातल्या सगळ्याच गोष्टी घ्यायच्या नसतात. प्रेषितांची दयाबुद्धी, त्यांची सहनशीलता, क्षमाशीलता, गरीब-वयस्कर-विकलांगाबद्दलची करुणा,प्रेम या गोष्टी म्हणजे सुन्ना. तेंव्हा त्या आपण अमलात आणायला हव्यात.
तरुण चिडून म्हणाला, “सुन्नात काय बरोबर आणि काय चूक,काय घ्यावे आणि काय नाही ते ठरवणारा तु कोण ?” 
इथे झिया आणि तरूणामधले संभाषण संपते...
बरोबर काय आणि चूक काय हे ठरवणारे धर्मपंडित कोण आणि त्यांची पार्श्वभूमी काय ? त्यांचे उत्तरदायित्व कोण ठरवणार ? शेवटी सद्सदविवेकबुद्धीचे काय ?
झियाच्या विचारांवर प्रत्येक धर्मातील कट्टरतावादी माणसाने विचार करावा...
आपला शोध आणि आपली कर्तव्ये याची योग्य वाट नक्की सापडेल..
 
- समीर गायकवाड.


(मूळ लेखनसंदर्भ - 'धर्मवादळ' - ले. श्री.निळू दामले)