Wednesday, May 20, 2015

चॉकलेट पुराण


चॉकलेट म्हटल्याबरोबर तोंडाला पाणी सुटायचा काळ बालपणीचाच. आता चॉकलेट ढीगभर खायला मिळतात पण त्यात ते आकर्षण नाही. मला आठवतेय लहानपणी रावळगाव चॉकलेट मिळायचे. दोन पैशात एक आणि पाच पैशाला पाच अस त्याचा भाव असे. माझ्या गणिताचे लहानपणापासून ते आजपर्यंत तीन तेरा नऊ अठरा झाले असल्याने चॉकेलटच्या भावाचे हे गणित मला कधी कळलेच नाही. पांढऱ्या प्लास्टीक वेष्टनात गुंडाळलेले अस्सल चॉकलेटी रंगाचे गोल गरगरीत अगदी मजबूत टणक असे ते चॉकलेट...तोंडात हळू हळू घुमवत घुमवत गालाच्या या पडद्यापासून ते त्या पडद्यापर्यंत जीभेशी मस्ती करत ते विरघळून आकाराने बारीक होत जायचे. दोघा तिघांनी एकदम चॉकलेट खाल्ले असेल तर तुझे आधी संपले की माझे आधी संपले हा वानगीदाखल संशोधनात्मक कार्यक्रम तोंडातले चॉकलेट तोंडाबाहेर काढून तपासणी काढून पूर्ण व्हायचा. आम्ही सिद्धेश्वर पेठेत राहत असताना तिथे रेणके राहत असत, त्यांची पोरे अगदी वस्ताद. ते कधीच चॉकलेट विरघळू देत नसत,मग त्याच्याकडे आशाळभूत नजरेने बघताना टुकटुक माकड कधी होऊन जायचे काही कळत नव्हते.

सिद्धेश्वर पेठेला लागून असलेल्या बेगम पेठेतून कधी काही आणायला आईने धाडले की एकदोन चॉकलेटचा खातमा ठरलेला असे. पण कधी कधी नुसतेच गाढवओझे व्हाऊन पोपटही व्हायचा. चॉकलेटचे शंभरएक ब्रान्ड तेंव्हा होते की नाही माहिती नाही, पण ही रावळगाव चॉकलेट आणि पारलेची लेमन गोळी ही मला सख्खी भावंडे वाटायची. एकमेकाला जीभ दाखवून मी कोणते चॉकलेट खाल्लेय ओळख पाहू म्हणताना फारसा प्रश्न पडत नसे, एकतर चॉकलेटी किंवा तांबूस असे हे दोनच रंगाचे पण प्रत्येकाच्या ‘तोंडओळखीचे’ तेच चॉकलेट. ज्यात चॉकलेटी रंग आहे तेच चॉकलेट असला वैज्ञानिक कोतेपणा तेंव्हा नव्हता, चपटी गोळी असो वा बारीक गोल रंगी बेरंगी सुट्या तरतरीत गहुल्यासारख्या गोळ्या असो, माझ्या लेखी ते चॉकलेटच असे. वेगेवेगळ्या फळांच्या स्वादाच्या पारले गोळ्या त्यात जास्त भाव खायच्या, त्याचे वेष्टन उघडल्यावर कोणाला कोणत्या स्वादाची गोळी मिळाली याचेही एक सत्र झडायचे, मग आपल्या आवडत्या फळाच्या अन रंगाच्या निवडीनुसार एक्सचेंज ऑफर दिली घेतली जायची. पत्र्याच्या डब्यातून विकली जाणारी चॉकलेट आत असणारया सुक्या मेव्यासाठी प्रसिद्ध, पण ती खाताना गायक गाणे म्हणताना मैफलीत माईक बंद पडल्यागत ते बेदाणे अन काजूबदाम अडथळा करून रसभंग करायचे. बाहुलीच्या आकाराची रसाळ गोळी बनवणारे हात तर मी अजूनही शोधतोय.

चॉकलेट खाणे ही तेंव्हा चैनच समजली जायची, ‘काय पोरे सदा न कदा चॉकलेट मागतात वाहिनीने लाडावून ठेवलेले दिसतात’ असा कोणी उद्धार केला की चॉकेलटऐवजी त्याच्याच अंगाला कडकडून चावा घ्यावा वाटत असे. घरात कोणी पाहुणे आले तर येताना चॉकलेट घेऊन आल्यावर वाटायचे की आपल्याकडे पाहुण्याना देवाचा दर्जा देताना विचार करूनच दिलाय हेच खरे. तर काही बेरकी मंडळी घरात आल्या आल्या म्हणायची,’वाहिनी मुद्दामच पोराना चॉकलेट आणले नाहीत, उगाच आपली डॉक्टरची खिसाभरती ! नाही तर काय, त्यापेक्षा चणे फुटाणे आणलेत ! अगदी मस्त आहेत’! कुठे ती चॉकलेटस अन कुठे हे चणे फुटाणे असे मनातल्या मनात म्हणताना कुठे तो इंद्राचा चॉकलेटी ऐरावत आणि कुठे ही शामभट्टाची फुटाणी घोडी ! असा एक तुलनात्मक विचार तरळून जायचा. अशा अनाहूत पाहुण्याने दाताच्या डॉक्टरचा विषय काढला की आमचा आपोआप उद्धार होत असे, कारण एखाद दुसरे चॉकलेट खाऊन का होईना दाताच्या मुळाशी चॉकलेटी रंगाचे थर आलेले असत. एखाद्या वेळेस ‘इकडे ये बघू’ म्हणून बत्तीशी तपासण्याचा भयानक संतापजनक कार्यक्रम व्हायचा ! केंव्हा एकदा ही ब्याद घराबाहेर जाते असे वाटायचे. कारण दाताचे डॉक्टर आणि त्यांची अनामिक भीती !!

बालपणी देवदेवतांच्या कहाण्या ऐकताना कधी यमदूताचा उल्लेख आला की मला बरयाचदा गोष्ट सांगणारयाच्या मागे यमदूत बसल्याचा भास होत असे म्हणून मी गोष्ट ऐकताना सांगणारयाच्या समोर न बसता त्याच्या बाजूला बसत असे. हे यमदूत आणि दाताचे डॉक्टर मला कितीतरी वर्षे एकसमान वाटायचे. माझ्या वडिलांचे असे एक डॉक्टर चांगले मित्र होते. डॉक्टर पानियाडी. आजही चौपाडात त्यांचा दाताचा दवाखाना आहे, त्यांच्या दवाखान्यात जायचे म्हटले तरी मला रेड्यावर बसून येणारे हातात मोठाले दोरखंड घेतलेले लालबुंद डोळ्यांचे आडमाप अंगाचे यमदूत आठवायचे ! त्यांच्या दवाखान्यात बाहेर दीनवाणे चेहरे करून बसलेले ते दंतरुग्ण पाहून माझे डोळे भरून यायचे अन पोटात गोळा यायचा ! आतून येणारा माणूस तोंडात कापसाचा भला मोठा बोळा घालून बाहेर आला तर दातखिळी काय असते त्याचा अनुभव यायचा. आमचा नंबर आल्यावर आता गेल्यावर ते त्या भल्या मोठ्या सरकत्या अन तरंगत्या खुर्चीत बसवायचे अन वडिलांशी त्यांचा त्याचवेळेस संवाद सुरु असायचा. मी तोंड वासून बसलेला अन त्यांचे पाहणे सुरु असायचे पण तोंडाला बांधलेला मास्क न उतरवता ते बोलत राहत. काही सोपस्कार झाले की सुटका व्हायची. ते सांगायचे विशेष काही नाही. हे असे प्रत्येक रुग्णाला गुंतवून ठेवण्यासाठी ते काहीतरी बोलत राहत हे मी नंतर देखील अनुभवले होते. दाताच्या डॉक्टरांच्या या रुग्ण विषयक वेळकाढू कथाकथनातूनच दंतकथा शब्द अस्तित्वात आला असणार ही माझी तेंव्हापासून धारणा आहे.पण पानियाडी डॉक्टर अगदी हसमुख माणूस, कुठला त्रास नाही की वेदना नाही. अन गुण हमखास असायचा. तरीदेखील भीती वाटायची, कधी कधी चॉकलेट खाताना त्यांचा चेहरा डोळ्या पुढे तरळला तरी त्यांच्या क्लिनिकमधले वेगवेगळ्या आकाराचे सुरे आणि चिमटे- कात्र्या चॉकलेटमध्ये खुपसल्यागत वाटायचे.

सिद्धेश्वर पेठेतल्या घराशेजारी राजा काळजेचे घर होते. घर कसले ते, तो एक टोलेजंग बंगला होता, एखाद्या गल्लीत इतका सुबक अन देखणा बंगला मी आजही पाहिलेला नाही. त्याच्या घरी गेलो की काकू हातावर हमखास चॉकलेट ठेवणार. समोरच्या चाळीत राहणारया अरुण पाटलाच्या घरी गेल्यावर मात्र शेंगागुळाचे अप्रतिम मिश्रण असणारया कर्नाटकी घाटणीच्या वड्या हातावर पडायच्या. गल्लीच्या कोपऱ्यावर रहीम मंझीलमध्ये आमचा मित्र नितीन नारखेडेचे घर होते, त्याच्या घरी एकदोनदा करंजीचे सारण खाल्ल्याचे आठवते, तर बंडे आणि अलकुंटे कुटुंबीयांच्या घरी लिमलेट ! या सर्व ‘हातावरच्या’ गोड आठवणीनी मैत्रीच्या धाग्याला आजही एक वेगळया गोडीत गुंफून ठेवले आहे. आम्ही ज्या गवळ्याच्या वाड्यात राह्यचो तिथे वरच्या मजल्यावर एक बिरहाड होते, वाघचवरे त्यांचे आडनाव. त्यांच्या घरात फडताळात पितळी डब्यात चॉकलेट भरलेली असायची. मी कधी वरती खेळत खेळत गेलो तर त्या काकू काम लावायच्या, जरा वाण्याच्या दुकानातून जिन्नस घेऊन यायला सांगायच्या. ते काम झाले की हातावर चॉकलेट ठरलेले. फक्त तेंव्हाच ते हातावर चॉकेलट येई एरवी नाही. एकदा आईला हे किस्से कळाल्यावर तिने त्या काकुंशी जाम हुज्जत घातली होती अन माझ्या अंगाचे धिरडे केल्याचे मला अजूनही स्मरते. चॉकलेटपायी घरगडी होणार का असा कुळोद्धारक प्रश्न तिने मला केला होता ते आजही स्मरते !

माझ्या काकांचे कस्तुरबा मंडईनजीक किराणा मालाचे दुकान होते, अजूनही ते दुकान आहे. आता तिथे काका नाहीत पण भावंडे असतात. चुकून कधी कधी किराणा माल आणायला वडिलांबरोबर जायची संधी मिळाली तर गगनात आनंद काय असतो याची प्रचीती त्या वेळी यायची ! वेगवेगळ्या रंगाच्या अन आकाराच्या सुंदर चमकदार रंगीबेरंगी चॉकलेटच्या बरण्या समोर भोवताली ठेवून त्याच्या बाजूला बसलेले भाऊकाका किंवा नानाकाका मला देव वाटायचे. दुकानात गेल्यावर वडील त्यांच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असत, त्यावेळी दुकानात कामाला असणारे प्रभू आणि म्हंता हे गडी किराणा माल काढून होईपर्यंत काकांच्या मागे असणारया गादीवर बसायला सांगत. आम्ही ह्याच क्षणाची आतुरतेने वाट बघत असू, कारण तिथे बसले की भाऊकाका किंवा नानाकाका जे कोणी असत ते त्या बरण्यात हात घालून मुठीत येतील तितकी चॉकलेटस द्यायचे ! चॉकलेटने खिसा भरलेला असायचा तेंव्हा जो आनंद व्हायचा त्याची कशाशीही तुलना होत नाही अगदी नोटाने गच्च भरलेले पाकीट आज खिशात असले तरी त्या आनंदाच्या पुढे ते हलकेच वाटते. अशीच किराणा दुकाने आमच्या गावी देखील होती आणि आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी हे आमचे गाव. या छोटेखानी गावात आमच्या आजोबांपासूनचे किराणा दुकान आहे. त्या दुकानात काही अशी चॉकलेट गोळ्या मिळत की जी मी अजून परत कुठे पाहिली वा खाल्ली नाहीत. वेगवेगळ्या प्राण्यांच्या आकाराची चवदार फळांच्या स्वादाची ही चॉकलेट- गोळ्या ज्या बरणीत ठेवलेली असायची त्याचे झाकण उघडले तरी अंगात तरतरी यायची. हे चॉकलेट खातांना त्याचा जो रस तोंडात तयार व्हायचा त्यापुढे इंद्राचा अन देवदेवतांचा सोमरस देखील फिक्का वाटायचा...


गावातल्या दुकानात बसणारे बाबाकाका हे कडक स्वभावाचे चुलते. ते चॉकलेट देताना म्हणायचे, ‘बेताने खा रे नाहीतर दात पाडून घेशील अन तेही गिळून टाकशील ! चांगलंचुंगलं खावं हे असलं काय कामाचं ?’ असे म्हणून ते कधी सुका मेवा वा फरसाण देत. मग अजून बहार यायची. गावाकडे माझ्या आजोबांचा शब्द प्रमाण असायचा,आता आजोबा नाहीत पण माझे एक चुलते सदाशिव काका आज त्यांच्या स्थानी आहेत. त्यांनी खायला दिलेली चॉकलेटस, त्यातही मलाई वा पानाच्या स्वादाची अस्सल चव अजूनही जिभेवर रेंगाळून आहे.
चॉकलेट जरी आवडत असले तरी शाळेत असताना खडूपेटीतला चॉकलेटी रंगाचा खडू मात्र फारसा पचनी पडत नसे. मी एकदा चित्रकलेच्या तासाला पतंग उडवणारी मुले हे चित्र काढून त्यातील मुलांचे हातपाय गडद चॉकलेटी रंगाने रंगवली होती.तेंव्हा आमचे चित्रकला शिक्षक बिलगुंदी खूप हसले होते, ‘पोरे आफ्रिकेतली का रे ?’ असा खोचक प्रश्न त्यांनी विचारला होता, कारण त्या पोरांच्या डोक्यावरचे केस काही नीट जमले नव्हते ते देखील चॉकलेटी कुरळे रंगवले होते. इतर लाल, पिवळ्या, नारिंगी, निळ्या, हिरव्या रंगापुढे खडूपेटीतला हा चॉकलेटी रंग अगदी जेमतेम वाटायचा......

कालपरवा निवर्तलेल्या एका अभिनेत्याला चॉकलेटहिरो असे संबोधले जायचे, पुर्वी तो शब्द ऐकताना कसेसेच वाटायचे. “कोणी चॉकलेटचा हिरो असू शकतो का ? काहीतरीच काय ! चॉकलेट हा शब्द सदाबहार या शब्दाऐवजी योग्य वाटत नसे. चिरतरुण सदाबहार या शब्दाचे पर्याय शोधताना माझी गाडी वसंत ऋतुशी हमखास येत असे. सदाबहार वसंतासारखा हिरो असे का म्हणत नाहीत, असा प्रश्न पडे. उगाच चॉकलेटचा उल्ल्ख करून अनेक बालमनाशी का खेळा ?” पण वसंत म्हटले की बेगमपेठेत असणारया वाण्याच्या दुकानात कामाला असणारा वसंत हटकून डोळ्यापुढे यायचा, वेळ मिळेल तेंव्हा सदानकदा नाकात बोटे फिरवत उभा असणारा विस्कटलेल्या केसाचा न मळक्या कपड्यातला हा इसम जर कधी माझ्या गावाकडच्या बाबाकाकांच्या तावडीत सापडला असता तर आधी वारकाकडून त्याला अगदी जाम भादरून काढला असता, काळ्या दगडाने अगदी खरडून खरडून त्याला अंघोळ घातली असती अन स्वच्छ कपड्यात उभा करून त्याला कामाला जुंपला असता. आम्ही कधी जर चॉकलेटचा खूप हट्ट केला तर हे शिस्तप्रिय काका गावाकडच्या दुकानात फडताळाच्यामागे काळ्याकुट्ट अंधारात फळीवर बसवायचे, तेंव्हा मंडालेच्या तुरुंगात गेलेले टिळक अन अंदमानात गेलेले सावरकर हटकून डोळ्यापुढून तरळून जात.असो.
चॉकलेटविषयक अजून सांगताना हे मी आवर्जून नमूद करतो की लग्नसमारंभात एखादया स्त्रीने तिने नेसलेल्या साडी वा पैठणी जे काही असेल त्यावरुन अगदी नखरेल पद्धतीने हात फिरवत मला जर विचारले की, ‘भाऊजी कशी वाटली ही माझी चॉकलेटी साडी ?’ तर मी डोळे आणि कान बंद करून घेताना माझी जीभदेखील गपगुमानपणे तोंडात मागे वळवून ठेवती !
चॉकलेट फ्लेवरचा ड्यूओस्प्रे देखील बाजारात जोरात चालतो यावरून चॉकलेट महात्म्य अजून गडद होते.


पार्क चौकातल्या डेंनिश बेकरीत केक,पेस्ट्री आणि कुकीजवर असणारा चॉकलेटचा मस्त वास अख्खा चौकभरून आसमंतात असतो, त्या बेकरीसमोरून गेले की तो वास पंचेंद्रिय जागृत करतो. असाच खमंग चॉकलेट पफ आणि बिस्कीटचा वास बॉम्बे बेकरीजवळ येतो. खाण्यात जेव्हढी मजा आहे त्यापेक्षा जास्त मजा कधी कधी या दरवळणारया वासात येते. सात रस्त्याच्या कृष्णा आईस्क्रीममध्ये आईस्क्रीमवर मस्त ओतलेले काळसर चॉकलेट ते आईस्क्रीम खाऊन झाले तरी जीभ चाटायला भाग पाडते. चार पुतळ्याजवळच्या हातगाड्यावरदेखील अप्रतिम चॉकलेट आईसक्रीम भेटते. आमच्या कुंभार वेशीत अलौकिक चवीचा चॉकलेटी चहा मिळतो, दिवसभर ताजे तरतरीत ठेवतो हा चहा अन त्याची अप्रतिम चव खूप वेळ जिभेवर रेंगाळत राहते...

मला हलवाई गल्लीत फारसा जाण्याचा प्रंसग येत नाही, पण मागच्या वेळेला गेल्यावर हलवाई काका सांगत होते की ‘चॉकलेटमुळे विक्रीवर थोडा फरक जाणवल्यापासून आम्ही चॉकलेटबर्फी बनवू लागलो आहोत. पण लोक मिठाईला नाके मुरडतात अन दोन दोनशे रुपयांची चॉकलेटस खातात. त्याच्याने पोट बिघडते, दात खराब होतात, आमची मिठाई एक नंबर मालातली असते. मी स्वतः समोर उभा राहून करून घेतो. जो चवीने खाणार त्याला हलवाई गल्लीत मिठाई चवीनेच मिळणार.‘ त्यांची चॉकलेट बर्फी छान वाटली.

आजकाल 'कॅडबरी', 'अमूल' 'नेसले', 'फिएरो' वगरे किती तरी देशी-विदेशी चॉकलेटचे ब्रॅण्ड आज अस्तित्वात आहेत नि अनेक जण त्यांच्या तरफदारीत मग्न असतात. पण हल्ली घे कुठलंही चॉकलेट नि दे कुणालाही असंही नसतं. सध्या एक प्रकारचे जणू अलिखित 'चॉकलेट एटिकेट'ही अस्तित्वात आलेत. त्यामुळं सहसा कॅडबरी सेलिब्रेशन्ससारखं चॉकलेट फेस्टिव्हल्स नि कॉर्पोरेट फंक्शन्ससाठी, सिल्क, बोर्नव्हिले, टेम्प्टेशन्स फ्रेण्ड्ससाठी किंवा खास फ्रेण्ड्ससाठी नि चॉकेलट बुकेज-बॉक्सेस नातलग किंवा 'जीएफ'-'बीएफ'साठी अशी चॉकलेट दिली जातात. अनेक नानाविध कारणांसाठी लोक चॉकेलट खातात, प्रपोज, अॅठनिव्हर्सरी, हनिमून, परीक्षेसाठी बेस्ट लक तर कधी घवघवीत यश ! प्रत्येकाचे चॉकेलट मोमेंट वेगेवेगळे ! 'कुछ मिठा हो जाये' म्हणत खात राहणारे अनेक चॉकेलटवेडे आपल्याला सभोवताली दिसतात. तर काही चक्क घरी चॉकेलट बनवतात अन गिफ्ट म्हणून आपल्या प्रियजनाना देतात. लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांच्या आवडीची ही चॉकेलटस मोठेपणी कितीही खाल्ली तरी शाळेत असताना वर्गातल्या मित्राचा वाढदिवस साजरा करताना त्याने वाटलेले चॉकेलटस, प्रवासात खाणासाठी घेतेलेल्या लिमलेटच्या गोळ्या अन जाणत्या माणसांनी हातावर ठेवलेली दोन पाच पैशाची अवीट गोडीची चॉकेलटस मला जास्त भावतात...

आज माझी मुले मोठी झालीत, मी माझ्या बालपणी स्वप्नात पाहिलेला ‘असावा सुंदर चॉकेलटचा बंगला’ मी त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवलाय पण त्याच्या पुढच्या पिढीत तो चॉकेलटचा बंगला जाणार आहे का नाही हा विचार कधीकधी माझ्या स्मृतीच्या कुपीत बंदिस्त असणारया रावळगाव चॉकेलटची चव बिघडवण्याचा प्रयत्न करतो....

- समीर गायकवाड.