Sunday, May 17, 2015

प्रार्थना अरुणा शानभागची....१७ मे २०१५ ...


दयाघना जागा हो .....
कधी कधी वाटते तु खोटे खोटे झोपी जात असावा...
कधी तु नुसतेच डोळे मिटून बसतोस...अरे तुला ती अरुणा शानभाग दिसत नाही का ?
का मुक्त करत नाहीस तिला ? तिच्या सुटकेसाठी कैफियत मांडणारा मी कोण असे तु म्हणशील पण तिचे असे लोळा गोळा होऊन जगणे पाहवत नाही मग मी तुझ्याचकडे येणार ना ? केईएमच्या आमच्या बहिणी म्हणतात की, 'आम्ही तिची अजून सेवा करू' म्हणून का तु तिला नेत नाहीस, पण तुझा तरी हा अट्टाहास का ? का सहन करायचे हे सगळे तिने ? कशाची शिक्षा देतोयस तु ?
आता ती व्हेव्हिलेटरवर आहे, आता तरी तु जागा हो ना !
मागे काहींनी तिच्या साठी सर्वोच्च न्यायालय गाठले होते, तिला मुक्त होऊ दया म्हणून, काही हाती लागले नाही...आता ती परत तुझे दर ठोठावत आहे, अरे इतका क्रूर नको होउस...दार उघड दार !

तिला आत घे ! तिच्या गालफाडे आत गेलेल्या चेहऱ्यावरून हात फिरव तुझ्या अंगावर काटा येईल ! तिची कहाणी ऐक, तिला बोलते कर बघ मग तुझ्या डोळ्यात पाणी येईल ! तिच्या डोळ्यात डोळे घालून बघ तुला तिने मृत्यूची केलेली दीर्घ प्रतीक्षा दिसेल ! तिच्या कोरड्या ओठातून दोन थेंब मायेचे पाणी पाज, तुला कळेल की किती काळ ती तहान भूक हरपून तशीच पडून होती ! आणि हो तिच्या गळ्यावरून मायेने हात फिरव, त्या नराधमाने तिच्या गळ्यावर साखळदंड आवळला होता ताकद लावून, त्यानेच ती अशी गलितगात्र झाली, तुला कळेल तिने किती सोसले आहे ! विस्कटलेल्या तिच्या केसांची पुन्हा वेणी बांध मग तुला लक्षात येईल आईने टाळू भरल्यानन्तर तुच हात फिरवलायस तिच्या केसातून..

तिच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीबाबत डॉक्टरांच्या पथकानं दिलेल्या अहवालावरून, तिच्या आजच्या स्थितीत सुधारणा होणं शक्य नाही हे स्वीकारायला हरकत नाही. डॉक्टर नेहमीप्रमाणे कोरडया शब्दात 'प्रकृती गभीर आहे पण स्थिर आहे' असे सांगताहेत.मग तु कशाची वाट बघत आहेस ?

अगदी प्राथमिक पातळीवरच्या का होईना, सुख-दु:खाच्या, हवे-नकोच्या संवेदना ती आधी व्यक्त करू शकत होती आता ते देखील संपले आहे . केवळ केईएम हॉस्पिटलमधील नसेर्स आणि डॉक्टर आप्ताप्रमाणे त्यांची काळजी घेत आहेत म्हणून ती जिवंत आहेत हे जसं सत्य आहे, तसंच त्या करीत असलेल्या सेवेला तिचे शरीर कृतज्ञ प्रतिसादही देत असलं पाहिजे, हेही मान्य आहे. हा प्रतिसाद केवळ जैविक प्रेरणेतून दिला जात आहे असं मानलं तरी त्यातून हे अस्तित्व संपविण्याचा अधिकार इतरांना प्राप्त होत नाही हेही मान्य आहे...पण आता पुरे झाले रे ! एव्हढे भोग असतात का रे ? दया येत नाही का रे तुला ?

तिच्या जीवनाचा स्तर हा कोणाही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणाराच आहे; किंबहुना माणूस म्हणून अपेक्षित किमान प्रतिष्ठेच्या जिण्याचा तो टोकाचा अवमानही आहे. अरुणा शानभाग ही तिची ओळख पुसून जाऊन आता केवळ जैविक प्रेरणेनं जगू पाहणारा जीव असं स्वरूप त्यानं घेतलं आहे, असाही दावा स्वत:च्या बुद्धीवर वाजवीपेक्षा अधिक भरवसा असलेले करतील. पण मला वाटते आता आटोपत घ्यायला काही हरकत नाही, ती बेशुद्ध आहे, कोमात गेलीय ...

नोव्हेंबर १९७३ मध्ये, म्हणजे तब्बल ४२ वर्षांपूर्वी सूडभावनेने पेटलेल्या सोहनलाल नावाच्या कुणा नरपशूने कुत्र्याच्या साखळीने तिचा गळा आवळून तिच्यावर पाशवी बलात्कार केला, तेव्हाच तिच्या मेंदूच्या संवेदना हरपल्या. तिची वाचा आणि दृष्टीदेखील हरवली... तंव्हा सुरू झालेली तिची ही दुर्दैवी कहाणी आज शेवटच्या वळणावर येऊन थांबली आहे. रुग्णालयातील तिच्या संवेदनाहीन अस्तित्वाचादेखील कधीकाळी तिथल्या परिचारिकांना मोठा दिलासा होता. कारण, तिच्यावरील अत्याचारामुळे रात्रंदिवस ड्यूटी बजावणाऱ्या परिचारिकांच्या सुरक्षेचा आणि हक्कांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. ती परिचारिकांच्या लढ्याचे प्रतीक बनले होती .हा सर्व आता इतिहास झालाय..माझा मुद्दा आहे की तु तिला अजून का झिझवतो आहेस ? ज्याने तिची ही दशा केली तो मात्र संसारात रमला त्याला काही का केले नाहीस ? असा कसा रे तू ?

ती आता शुद्धीवर नाही, तिच्या संवेदना हरवल्या आहेत, हे माहीत असूनदेखील याच भावनेतून तिच्यावरील मायेपोटी तिच्यावर उपचार करणाऱ्या आणि तिच्याच "बॅच'च्या परिचारिका आज बहुधा रुग्णालयाच्या सेवेत नाहीत. त्यामुळे, बेशुद्धावस्थेतही तिने परिचारिकांच्या जगाशी जुळवलेलं नातं आज संपून गेलं आहे.तेंव्हा अधिक ताणू नकोस ! .

तिच्या मायेचं, कुटुंबातलं बहुधा कुणीच तिच्याकडे फारसं फिरकत नाही. तिच्या संवेदनाहीन शरीरात केवळ "वैद्यकशास्त्रीय जिवंतपणा' आहे..मी तुला हे सांगतोय जे तुला आधीच ज्ञात आहे, मग तुला पाझर फुटत नाही का ? अरे आता तरी मोठ्या मनाने दार उघड, ती तुझ्या दारात परत एकदा येऊन उभी आहे आता तरी तिला कवेत घे, मग तुला पण कळेल ४२ वर्षे खाटेवर पडून जीवन जगण्याचे दुःख काय असते ते रे !

- समीर गायकवाड