Sunday, April 26, 2015

#जाई मावशी ....चांगदेव पाटलाच्या सुनेने #बकुळाने पोराबाळांसह जीव दिल्यावर तिच्या नात्यातल्या सगळ्यांनी अपार शोक व्यक्त केला होता. गावातील लोकांनाही याचे अपार दुःख झाले होते. त्यातही बकुळा ज्यांच्या शेतात कामाला होती त्या किसुनाना पवारांना अन त्यांच्या पत्नीला जाईमावशीला याचा फार मोठा धक्का बसला होता. कित्येक दिवस हे दांपत्य त्यातून बाहेर येऊ शकले नाही. त्याला कारणदेखील तसेच होते.

कृष्णा रामहरी पवार म्हणजेच गावकरयांचे किसुनाना हे गावातले एक तालेवार प्रस्थ होते. आईवडिलांच्या अकाली निधनानंतर जीवापाड मेहनत करून त्यांनी दौलत मोठी केली होती. साठसत्तर एकर शेती, त्यातली चाळीसएक एकर बागायत. विहिरीचे मुबलक पाणी अन वरुणराजाची करणी यावर त्यांची शेती तृप्तहोती.

किसुनाना हे त्यांच्या वडिलाना ते एकमेव पुत्र. त्यांना एक बहिणही होती, तिचे लग्न झालेले होते अन ती तिच्या घरी सुखी होती. पण दुखणे किसुनानाच्या घरी होते. किसुनाना म्हणजे गोरापान देखणा माणूस. घारे डोळे अन तांबूस गोरी काया. किंचित सोनेरी झाक असणारेक रड्या रंगाचे कुरळे केस त्याना अधिकच खुलून दिसायचे. सरळ नाक अन निमुळते ओठ अन त्यावरची बारीक मिशी.यामुळे त्यांच्याकडे पाहिले की माणूस त्यांच्याकडे आपोओप आकर्षित व्हायचा. त्यांचा आवाज मात्र किनरा होता. कधी कधी त्यांचा आवाज किंचित बायकीदेखील वाटायचा, त्याना त्यांच्या आवाजाचा थोडासां कमीपणाच वाटायचा. त्यामुळे घराबाहेर पडले की किसुनाना कमीच बोलायचे. अगदी जुजबी कामापुरते. त्यामुळे गावात त्यांची ख्याती अबोल माणूस अशीच होती. त्याचा दुसरा परिणाम असा झाला की त्यांच्या कमी बोलण्याचा अर्थ काही लोक त्याना पैशाची,शेतीची मग्रुरी आहे असा काढायचे.अशा अबोल माणसाची देखणी अन बडबडी बायको म्हणजे जाई.

जाई अंगाने अगदी नीटस सुबक देखणी अशी होती. उंचीने ठेंगणी अन नाकी डोळे कोरीव अशी जाई किसुनानाच्या नात्यातलीच होती. गोड गळ्याने ती भजने म्हणायची. झाडांपासून ते पाखरांबरोबर ती बोलायची. पण माणसाशी ती कमी बोलायची कारण किसूनानाला ते आवडत नसायचे. ते स्वतः कमी बोलायचे त्यामुळे त्याना जाईने इतरांशी बोलेलेल आवडत नसायचे. या अशा तर्हेवाईक वागण्यामुळे त्यांच्याकडे कामाला असणारया परक्या माणसाची जाम पंचाईत व्ह्यायची. त्यामुळे त्यांच्याकडे माणसे टिकत नसत. त्या उलट बकुळा मात्र चांगली आठ दहावर्षे त्यांच्याकडे कामाला होती.

आणखी एक मोठे दुःख ह्या जोडप्याला होते, तेम्हणजे जाईची कूस उजवली नव्हती. लग्नाला दहाएक वर्षे होऊन देखील त्याना मुलबाळ झाले नव्हते अन त्यामुळे त्यांचे जीवन सर्व काही असून काहीही नसल्यासारखे होते. गावाबाहेर असलेल्या शेतांच्या ज्या रांगा होत्या, त्यातले सर्वात मोठे शेत त्यांचेच होते. पोटी अपत्य नाही अन दिवसेंदिवस तुसडा होत चाललेला नानांचा स्वभाव यामुळे ते गावातल्या घरात राहायचे नाहीत. त्या ऐवजी त्याना शेतात बरे वाटायचे. कामावरचे बायका-गडी अन पिक पाखरेए व्हढेच त्यांचे आयुष्य. पण जस जसे दिवस जाऊ लागले तसतसे किसुनाना अधिक चिडचिडे होऊ लागले. त्यांना कसे वागावे अन काय करावे हेच सुचत नव्हते. नाही म्हणायला ते मागच्या दोन चार वर्षात सततचा दवाखानाही करत होते. पण डॉक्टरांच्या प्रयत्नालादेखील यश आलेलं नव्हतं. गेल्या महिन्यात त्यांच्या तपासण्या केल्यावर डॉक्टरांनी त्यांच्यातच दोष आहे असे सांगितल्यापासून तर त्यांचे चित्त थारयावर नव्हते. डॉक्टरांनी सांगितलेली ही माहिती त्यांनी जाईपासून लपवून ठेवली होती. याचे त्यांना वाईट देखील वाटायचे पण तितकेच आपल्या कमीपणाचे शल्यहीहोते. विचारांच्या एका अजब गुंत्यात ते अडकत चालले होते, अन या सर्वाचा परिणाम त्यांच्या जाई बरोबरच्या सुखैनैव नात्यावर हळुवार होत होता. मेंदूत सावकाश विष भिनावे तसे त्यांचे मन जाईच्या बद्दल हळूहळू विद्वेषाने भरत चालले होते. मळ्यात कामाला आलेल्या बायकांची मुले जाईने अंगावर खेळवली की ते नंतर तिला एकांतात खूप बोलत. पण आपल्या मनमिळाऊ स्वभावाने अन गोड गळ्याने जाई सर्व बायकांमध्ये जीवाभावाची त्यांच्यातलीच एक झालेली असे. मुळची बोलक्या स्वभावाची असल्याने ती किसुनाना शेतात नसले की सर्व बाया माणसाना खाऊ पिऊ घालायची, मुलांसाठी आसुसलेली जाई त्यांचीपोरेबाळे खेळवायची. यामुळे सर्व पोरेबाळेच नव्हे तर बायका माणसे देखील तिला मावशीम्हणत. अशी ती जाईमावशी, सर्वांची काळजी घेणारी होती पण दिसागणीक हेकट होत चालेलेल्या किसुनानापुढे तिचे काहीच चालत नव्हते.

असेच आणखी काही दिवस गेले, अन एके दिवशी जाई मवशीने बरयाच दिवसापासून तिच्या मनात चालेलेला विचार आता घरधन्याच्या समोर बोलून दाखवायचे ठरवले. रोजचा स्वयंपाक आटोपून झाला,सकाळची सर्व काम बिगीने आटोपली अन दुपारच्या जेवणाच्या वेळेची जाई वाट बघत बसली. टळटळीत दुपार झाली, सगळे गडी जेवायला बसले तसे किसुनानादेखील जेवणासाठी घरात आले. घरची सुबत्ता असल्याने अन पिक पाणी व्यवस्थित असल्याने शिवाय खाणारी तोंडे अगदीच कमी त्यामुळे नानांचे घर अगदी लक्ष्मीने भरभरून दिलेले घरहोते. जनावरे भरपूर असल्याने दुध दुभते भरपूर होते. त्यांचे शेतातले घर म्हणजे एक मोठी हवेली म्हणले तरी चालेल असे टुमदार पाचखोल्यांचे चौसोपी जुन्या पद्धतीचे होते. त्या घराच्या दिवाणखाण्याबाहेर टांगलेल्या झोक्यावर बसलेले देखणे नाना बघून बघणारयाला हेवा वाटायचा.
नानानी हातपाय धुतले अन अंगातली बंडी काढून ते पाटावर बसले. ते जेवताना जाई एकाग्र होऊन त्यांच्याकडे पाहत होती.त्यांच्या तृप्तीचा ढेकर ऐकून झाल्याबरोबर ती बोलती झाली,“ जरा बोलायचे होते.”
“मग बोल की !” नेहमीप्रामाणे तुसड्या सारखे नाना उत्तरले.
“मी काय म्हणते जरा ऐकाल का ?”
“अगं तु काय बोललीस तरच मी ऐकेन ना; तु काय बोलतच नाहीस अन ऐका म्हणतेस. “
“तसं नाही जरा महत्वाचे बोल..बोलायचे हाये ” जाई अडखळत बोलली.
“काय ते लवकर सांग” नानांच्या या चिडक्या स्वरातल्या वाक्याने जाई घाबरून एका वाक्यात बोलून गेली,
“मी म्हणते की माझी काय कुस उजवेना, तुम्ही मला सवत आणा ती आपल्या घरी बाळकृष्ण घेऊन येईन !”

तिच्या या वाक्याने नाना काही वेळ गपगार झाले.त्यांना शांत झालेले बघून जाई कावरी बावरी झाली अन म्हणाली, “काही चुकले का माझे ?”
त्यांच्या दिवाणखाण्यात बऱ्याचवेळ स्तब्ध शांतता तशीच तोंडावर बोट ठेवून उभी होती. सुपारी कातरायला घेतलेला अडकित्ता हातात तसाच धरून नाना झोक्यावर पुतळ्यागत बसून होते. शेवटी काहीही न बोलता ते तेथून उठून बाहेर गेले. जाईला कळेना की आता काय बोलावे. तिची देखील मती गुंग झाली अन ती बुद्धी भ्रष्ट झाल्यागत तिथच बसून राहीली. पायरया उतरून नाना घराबाहेर गेले तरी ती तीथेच बसून होती. तिला काहीच सुचत नव्हते. आपल्या नवरयाच्या जीवाची घालमेल तिला बघवत नव्हती. आपला लग्न झाल्यावेळचा पती अन आताचा पती यातला फरक तिला कळून येत होता. आपल्या पोटी मुलबाळ नाही याचे दुःख तिला होते पण त्यामुळे आपला नवरा आपल्याशी अधिक तुसडेपणाने वागतोय अशी तिची समजूत होती. त्याचे तिला फार वाईट वाटायचे. शिवाय ह्या गोष्टीमुळे आधीच कमी बोलणारा आपला घरधनी गावात तोंड दाखवायला देखील जात नाही. त्याच्या मनात या गोष्टीची बाभळीच्या काट्यागत खुपणारी जखम आहे हे ती ओळखून होती. आपल्या नवरयाची मान आपल्यामुळे खाली चालली आहे अशी तीची भाबडी समजूत होती. या सर्व त्रांगड्यावर तिच्या प्रामणिक अन साध्या सरळ मनाने एक उपाय तिला सुचवला होता, तो म्हणजे किसुनानाने परत लग्नक रावे अन त्यातून दुसऱ्या पत्नीला जे काय मुलबाळ होईल त्यातून आपला धनी सुखी होईल.सारे दुखाचे मळभ दूर होईल या आशेने तिने हे सांगितले खरे पण ते ऐकून नानांनी काहीच प्रतिक्रिया न दिल्याने ती बुचकळ्यात पडली.

जेवण करून बाहेर पडलेल्या नानांनी थेट चिंचेची पट्टी गाठली. शेताच्या एका कोपरयात असणारी एकेमेकाच्या गळ्यात गळा घालून आकाशाशी गप्पा मारणारी जुनाट भली मोठी विसेक चिंचेची झाडे म्हणजे सावलीचे अन पाखरांचे आगर होते. तिथल्या एकदोन झाडांवर तरी मधमाशांचे पोळे बारमाही असायचे.झाडाखाली चिंचेच्या बारीक पानांचा मस्त पिस्ता रंगाचा सडा पडलेला असायचा. झाडांवरून खालीवर पळणारया बक्कळ खारूताईचा जुडगा म्हणजे तिथले खरया अर्थाने सळसळते चैतन्य होते. चिमण्याचा चिवचीवाट त्या वातावरणाला अजून जादुई करायचा. मस्त गाभूळलेल्या गोडआंबट चिंचांचे लालसर करडया रंगाचे शेकड्याने आकडे त्या झाडाना अक्षरशः लगडलेले असायचे. पाखरांनी खाल्लेल्या चिंचातून पडलेले काळेभोर चिंचुके खाली पडलेल्या पानाच्या नक्षीवर सजावट काढत. या ठिकाणी आले की कोणाही माणसाचे डोके शांत व्हायचेच. आत्ता देखील नाना त्यांच्या पुढ्यात जाईने टाकलेल्या यक्षप्रश्नाने निरुत्तर होऊन शांतपणाने विचार करायला तेथे आले होते. आपल्याब रोबर अंथरायला आणलेलं चवाळे न अंथरता ते तसेच जमिनीवर लवंडले. डोक्याखाली हाताची त्रिकोणी उशी करून उताणे झोपून एक टक आभाळाकडे पाहत मन शांत करायचा प्रयत्न करू लागले. आपल्या पोटी मुलबाळ नाही, आपण त्याचा राग जाईवर काढतो हे काही योग्य नाही हे त्यांना कळत होते पण वळत नव्हते. दोष आपल्यातच आहे. औषधोपचार करून मुल होऊ शकते पण किती वेळ लागेल काही ठाऊक नाही.पण होऊ शकते हे नक्की. आपण चिडचिड कमी व्हायच्या गोळ्या असे सांगून आपल्या ‘त्या’ गोळ्या खातो आहोत, आपला दोष दूर होण्यासाठी प्रयत्न करतो आहोत. पण अजून तरी देवाला दया आलेली नाही...काय करावे बरे? त्यांना काहीच सुचत नव्हते. आपण जर दुसरे लग्न केले नाही तर जाईला कधी न कधी खरे सत्य कळेल याची मनोमन भीती त्याना एकीकडे वाटत होती. तर दुसरीकडे आपण दुसरे लग्न केले तर गाव काय म्हणेल ही भीती देखील त्यांना वाटत होती. पण आपण गावात जास्त जातच नाही, त्यामुळे गावातल्या लोकांना काय भ्यायचे असाही विचार मनात येई. जाईशी लग्न केल्याने आपल्या आयुष्यात विशेष सुख आलेलं नाही, उलट आपण दिवसंदिवस दुःखात राहत आहोत, आपला स्वभाव चिडचिडा होत चाललाआहे. त्या ऐवजी आपण जाई म्हणते तसे दुसरे लग्न केले अन त्या बायकोच्या पायगुणाने आपले नशीब बदलले तर काय जाणो? आपले घर सुखाने भरेल. शिवाय आपण होऊन हा विषय काढलेला नाही. आपण जाईला फसवण्याचा तर प्रश्नच नाही. ती आपली बाईल आहेन पुढे देखील राहील. आपण तिला अंतर देणार नाही. पण समजा दुसरया बायकोलाही जर पोटीकाही झाले नाही तर काय करायचे असा तिसराच प्रश्न चकवा द्यायचा. विचारांच्या ह्या हातघाईत शेवटी लालसेने त्यांच्या सदसदविवेकबुद्धीवर मात केली. नाही तरी गाव पाठ वळली की नावे ठेवतच आहे तेंव्हा आपण एक मोका घेऊन का बघू नये ? यात कोणाच्या बापाचे काय जाणार आहे? आपण ही गोष्ट सर्वाना जाईच्या मार्फतच सांगायला लावायची म्हणजे आपली बाजू मजबूत ! असा धूर्त विचार करून ते तिथून उठले तोवर दिस मावळायला आला होता.

किसुनानांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या पण तो आनंद चेहऱ्यावर येऊ न देता ते घराच्या ओसरीवर येऊन बसले.एव्हढया वेळ आत विचार करत बसेलेली जाई देखील त्यांची चाहुल लागल्याने बाहेर आली. आल्याआल्या तिने नानांना पाणी दिले. जाई तुळशीला दिवा लावत असताना पाहून नानांना उगाच अपराधीअ सल्याची तीव्र भावना मनाला चाटून गेली. पण पुढच्याच क्षणी ते बोलते झाले,” मी खूप विचार केला तुझ्या बोलण्यावर. तुझं म्हणण खरं हाय. आपण काय तरी निर्णय घेतला पाहिजे. पण मी एक सांगतो, मीतुझ्या शब्दाबाहेर नाही. तुझ्या सुखात माझे सुख. खरे तर हे मला पटत नाही पण तझ्या मनाला मोडता घालू वाटत नाही. मी तयार आहे. पण तु बी माझे एक डाव माझं ऐकाया पायजे. पोरगी मी हुडकणार नाय. तु जिच्याकडे बोट दावशील तिच्यासंग मी लगीन कराया तयार हायपर ही बातमी समद्यांच्या कानावर घालायची हिम्मत माझ्यात नाही. हे काम तुलाच कराव लागल.” अगदी कावेबाजपणे नानांनी आपला डाव मांडला. एव्हढे बोलून त्यांनी आपला पडलेला चेहरा हसरा केला.आपल्या नवरयाचा उजळलेला चेहरा अन त्याचे आपल्या बद्दलचे मायेचे विचार ऐकून हरखून गेलेल्या जाईने मागचापुढचा विचार न करता पळभरदेखील वेळ न दवडता तत्काळ होकार सांगितला. तिला काय माहित होते की पुढे जाऊन आपल्या आयुष्यातली ही एक मोठी चूक ठरणार आहे.

हाहा म्हणता सगळीकडे किसुनानाच्या दुसऱ्या लग्नाची बातमी पसरली. त्यांचे होऊ घातलेले दुसरे लग्न गावात चर्चेचा विषय झाला. पारापासून ते पाणवठ्यापर्यंत लोक चवीने चर्चा करू लागले. नाना लई मोठ्ठी घोडचूक करू लागले, हा जाईवर अन्याय आहे, जाईने परत विचार करायला पाहिजे, जाईला नन्तर फारपश्चात्ताप होईल, जाईचाही यात काही तरी डाव असणार ती कोणती तरी पोरगी किसुच्यागळ्यात मारून नवरा आपल्या मुठीत ठेवणार, पैसा अडका हाय मस्ती तर येणारच अशी वाकडीपावले पडणारच असे एक ना अनेक तर्कवितर्क च्या त्याच्या समजबुद्धीप्रमाणे लावू जो तो लावू लागला. पण जाई आपल्या निर्णयापासून ढळली नाही. आपल्या नवरयाचे सुख हेच आपले सुख हे तिच्या मनात इतके ठसले होते की तिला त्यापुढे इतर सारासार विचार सुचतच नव्हते. जाईची कुस लग्नानंतर दहाबारा वर्षे झाली तरी उजवलेली नसल्याने किसुनानाची एव्हढी अफाट धनदौलत असूनही कोठून स्थळ सांगून येईना.तेंव्हा जाईनेच हात पाय मारले अन तिच्या नात्यातल्याच अंजनीला गळ घातली. ‘गरिबाघरची ती पॉर एव्हढ्या मोठ्या घरात नांदायला जाणार अन सोबतीला आपली जाई हायेच. वर लग्नाचा काय दिकून खर्च न्हाय.’ असा सरधोपट विचार करून अंजनीच्या वडिलांनी होकार कळवला. तिची आई मात्र ह्या लग्नाला मनापासून सहमत नव्हती पण एकापाठोपाठ एक अशा सहा मुली तिच्या पदरात असल्याने तिने देखील निमूटपणे होकार कळवला. अंजनीला मात्र मोठ्या घराची अन जमीन जुम्ल्याची स्वप्नेहोती, त्यापुढे दुसरी बायको हा तिच्यासाठी मोठा मुद्दा नव्हता. आई वडलांच्या घरीबसण्यापेक्षा इथे भरल्या घरात सुखाचे घास खाणे कधीही चांगले असा व्यावहारिक विचार तिच्या मनात होता त्यामुळे तिनेही काही आढेवेढे घेतले नाहीत.

एक चांगला गोरज मुहूर्त बघून किसुनाना अन अंजनीचे लग्न लागले. सगळा संमतीचा आपसातला मामला असल्याने कोणाची काही तक्रार असायचा प्रश्नच नव्हता. जाईने हसत खेळत लग्नाच्या सर्व जबाबदारया पारपाडल्या. पै-पाहुण्याना आहेर रीतसर मानपान केले, लांबून आलेल्या भावकीतल्या सर्व पाहुण्यांची जोरात सरबराई केली. पंच पक्वान्नाच्या जेवणाच्या मोठाल्या पंगतीउ ठल्या,सलग दोन दिवस गाव जेवण झाले. थाटामाटात अन धूमधडाक्यात लग्न पार पडले. मांडववारा वाहून गेला, नवरा नवरीचे बाशिंग निघाले. काही दिवसांनी हळदी उतरल्या.दारापुढचा मंडप निघाला. गावातले लोक देखील आता ह्या विषयावरची चर्चा विसरले.

घरात आलेली सवत आपली बहिणच आहे तिच्याशी एका झाडावरच्या दोन फांद्या सारखे आपले नाते आहे अशी जाईची भोळी समजूत होती. पण नियतीने काही वेगळेच लिहून ठेवले होते. श्रीमंती अन सुखाला पारखी असलेली अंजनी ही सर्व सुबत्ता बघून बावचाळून गेली. तिला वाटू लागले की किसुनानाला आपल्या कह्यात ठेवले पाहिजे अन ती त्या अंतस्थ हेतूने वागू लागली. परमेश्वराने देखील तिच्या पारड्यातझुकते माप घातले. लग्नाला काही महिने झाले तोवरच एके दिवशी तिला अंग जड वाटू लागले,अस्वस्थ वाटू लागले अन तिला झालेल्या उलट्या वांत्या किसुनानासाठी गोड बातमी घेऊन आल्या. अंजनीला दिवस गेले होते. बरयाच दिवसापासून नानांनी घेतलेल्या औषधाचा अनुकूल परिणाम झाला होता. त्यांचे बाप होण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार होते. बाळंतपणातली सर्व काळजी घेण्यासाठी जाईने तिच्या दिमतीला गावातल्या दोन पोक्त सुईणीची वर्णीलावली. तिची चोर चोळी झाली अन आठव्या महिन्यात तिचे डोहाळे जेवण घातले गेले. परतएकदा गाव जेवण झाले. सगळा गाव नवल करू लागला. जाईच्या मोठ्या मनाचे सर्वत्र अपार कौतुक होऊ लागले. या कौतुकाने अंजनीचा जीव कासावीस होतसे. माहेरच्या गरिबीमुळे तिचे बाळंतपण सासरीच झाले, श्रावणातल्या एकादशीला ती बाळंत झाली, एका गोंडस मुलीला तिने जन्म दिला.

अंजनीच्या पोटी मुलगी झाल्याचा आनंद जाईला झाला, आपला नवरा आता भरून पावला. आपल्या जन्माचे सार्थक झाले. असे तिला वाटू लागले. अंजनीला तर त्या चिमुरडीस कुठे ठेवू अन कुठे नको असे झाले होते. काही दिवस गेले अन त्या मुलीचे थाटात बारसे झाले. श्रावणात जन्मली म्हणून तिचे नाव श्रावणी. तिच्या लाडाला काही सीमा नव्हती. किसुनानाचा ती श्वास झाली होती. ह्या सर्वघडामोडीत किसुनाना अन जाईच्या जवळीकीत अंतर पडले. नेमका याचा फायदा अंजनीने घेतला.तिने नानाचे कान भरायला सुरुवात केली. आपल्या मुलीवर वान्झोटया बाईची सावली नको असे ती बोलू लागली. जाई पांढरया पायची आहे तिच्यापासून दूर रहावा असे तो त्यांच्या मनावर बिंबवू लागाली.स्वतःला मुल बाळ नव्हते तरी कोणत्याही तान्हुल्यावर मनापासून माया करणारी जाई श्रावणीवर तर जीवापाड माया करत असे. माजघरात जिथे श्रावणीचा पाळणा होता तिथून तिचा मुक्काम हलत नसे. पण एके दिवशी आक्रीत झाले, पाळणा हलवत असताना त्याची बांधणी निखळली अन त्यातून श्रावणी खाली पडली. तिच्या पडण्याने, ओरडण्याने जाईच्या काळजात धस्स झाले. तिचे दुध गरम करून आणायला गेलेल्या अंजनीला काय घडले याचा सर्व अंदाज आला. पण हीच योग्य संधी आहे याची तिने मनोमन खात्री करून मोठ्याने बोंब मारण्यास सुरुवात केली. तिने जाईवर खोटेनाटे आरोप केले. लग्नाच्या एक दोनवर्षात आपल्याला वारस देणारी बायको म्हणून किसुनाना अलीकडे तिला झुकते माप द्यायचा, तिचा कोणताच शब्द तो खाली पडू देत नसे. ह्या घटनेने त्यांनी विवेक गहाण टाकला अन अंजनीच्या सांगण्यावरून जाईची रवानगी घरालगत असणारया कोठीच्या खोलीत केली.

जाईला देखील आता हळू हळू सर्वउ मगत होते, पण ती तरी देखील आपल्या पतीच्या सुखात आपले सुख मानून समाधानाने जगत होती. असेच दिवस जात राहिले अन तीनेक वर्षांनी पुन्हा एकदा अंजनी गरोदर राहीली. या खेपेला तिला एक देखणा मुलगा झाला. किसुनानाने सारया गावात पेढे वाटले. गावाने आनंद व्यक्त केला पण जाईबद्दल सारया गावाने हळहळ केली. जिच्यामुळे हे सर्व झाले तीच अडगळीत गेली, नाना दुसऱ्या बायकोच्या पार आरी गेला त्याने हे काही चांगले केले नाही असे सारे बोलू लागले.

श्रावणी पाठोपाठ पोरगा कुलदेवामुळे जन्माला आला म्हणून त्याचे नाव भैरव ठेवले गेले. भैरव आणि श्रावणीमध्ये चारेक वर्षाचे अंतर होते. दोन्ही भावंडे फार लोभस होती, सगळ्या मळ्यातल्या माणसांच्या गळ्यातले ताईत होते ते. जाईदेखील त्याना चोरून चोरून फार जीव लावत असे. जाईने आता तिच्या दोन खोल्यांच्या जगात स्वतःला कैद करून घेतले होते. ती कसली म्हणून बाहेर पडत नसे. आपल्या हाताने आपले जेवण करून खाणे हे एकच काम तिला होते. तिचा राहिलेला सर्व वेळ देवघरातल्या पांडूरंगाच्या समोर बसण्यात जाई. भैरवाला मात्र तिचा फार लळा होता, दिवसातून एकदा का होईना तो त्याच्या आईची नजर चुकवून हळूच जाईकडे येऊन जायचा. तिच्या गोड आवाजात अंगाई गीते ऐकता ऐकता तिथे रमून जायचा. त्याची गळाभेट हाच तिचा विरंगुळा झाला होता.

बघता बघता काळ पुढे सरकला. मुले मोठी झाली. न्हाणधुण आलेली श्रावणी आता अंगापिंडाने देखील भरली होती. तिचे तारुण्य उठून दिसत होते. शिक्षणात जेमतेम प्रगती केलेल्या या मुलीचे हात आता पिवळे करायला पाहिजेत हा विचार आता किसुनानाच्या मनात घर करू लागला. किसुनाना देखील आता थोराड वाटत होता. डोक्यावरचे केस पांढरे झाले होते. चेहऱ्यावरचे तेज कमी झाले होते. आपले शरीर आता पूर्वीसारखे राहिले नाही आता पोरीचे लग्न वेळेत केले पाहिजे याची त्यांना प्रकर्षाने जाणीव होऊ लागली. तसे त्यांनी मुलीसाठी तोलामोलाचे स्थळ बघायला सुरुवात केली. देण्याघेण्याला खमका माणूस होता किसुनाना, अन एकुलता एक पोरगा अन पोरगी. त्यामुळे त्याला मुलीसाठी वजनदार स्थळ मिळायला फार वाट बघावी लागली नाही. रंजनगावच्या पाटलाच्या एकुलत्या एक तरण्याबांड पोराचे स्थळ त्यांनी पसंत केले. भक्कम हुंडा ठरवला. गावात जोरात साखरपुडा केला. त्या पुढच्या मे महिन्यात मुलीचे लग्न रंजनगावात अगदी ऐश्वर्यात साजरे झाले. त्या लग्नाला आजुबाजुच्या पंचक्रोशितले सर्व लोक आले होते.

मुलीचे लग्न झाले. बघता बघता दोनेक वर्षे निघून गेली. किसुनानाचा पोरावर फार जीव नव्हता पण पहिले अपत्य म्हणून त्याने स्वतःच्या जिवापेक्षा पोरीवर श्रावणीवर माया केली होती. तिच्या लग्नानंतर त्यांना फार एकाकी पडल्यासारखे वाटू लागले. आपण अंजनीच्या सांगण्यावरून जाईला दूर लोटले याची एक टोचणी त्यांच्या काळजात कुठे तरी सारखी सलत असे. पोरीच्या लग्नानंतर हा सल खोल झाला. ते आता अगदी अबोल झाले. पण अंजनीला यात काही खटकले नाही. कारण आता यासर्व जमीन जुम्ल्यावर अधिकार सांगायला तिच्याकडे भैरवच्या रूपाने वारस होता. अचानक मिळालेल्या सुखापुढे तिला नात्यागोत्यातला सुखाचा गर बेचव वाटत होता, तर या उलट जाईला आता उतार वयातल्या आपल्या पतीची अन तिच्या स्वतःच्या वार्धक्याची काळजी वाटत होती. सगळ्यांच्या भल्यासाठी ती रोज देवाला साकडे घालायची.

काळ कुणासाठी थांबत नाही, तो त्याच्या गतीचा स्वतः मालक आहे, तो त्याच्याच टेचात चालतो. मुलीच्या लग्नाला पाच वर्षे होऊन गेली तरी तिच्याकडून काही गोड बातमी येईना तसं किसुनांनाचे काळीज पाखरागत होत चालले. दिस वाढू लागले तसे त्याना भैरवच्या लग्नाची जुळणी सुरु करावी लागली. त्यांच्या डोक्यात होते की पोरीला एखादे पोरबाळ झाल्यावर त्याला नवरदेव मामाच्या मांडीवर बसवून मगच अंगाला हळद लावायची. पण तस काही घडताना दिसत नव्हत. भैरवचे देखील लग्न जमले, थाटात लग्न पार पडले. त्या लग्नाचा मांडव दारातच असल्याने जाईला लग्नात आपोआप सामील होता आले. तिला श्रावणीच्या लग्नात नेले नव्हते. भैरव मात्र जाईचे आशीर्वाद आपल्याला मिळत असल्याने खूप खुश दिसत होता.

भैरव अन भागीरथीचा संसार दृष्ट लागेल असा सुरेख चालला होता. त्यांच्या लग्नाच्या आधीपासून बकुळा पवारांच्याकडे कामाला होती. बकुळेला त्या घरात मायेचे स्थान त्यामुळेच होते, किसुनानाला वाटायचे आपल्या श्रावणीला पोरे होईनात तर आपण बकुळाला जपावे, मग दवाला दया येऊन आपल्या पोरीची कूस उजवेल.पण झाले वेगळेच बकुळाने जीव दिला या धक्क्याने त्यांनी अंथरून धरले. इकडे भैरवला मात्र दोन हट्टी कट्टी पोरे झाली. सणासुदीला माहेरी येणारया श्रावणीच्या तोंडावरची ख़ुशी साफ मावळली होती. ती तिच्या घराची एकुलती एक सुन होती. आता लग्नाला दहा वर्षे झाली तरी पोटी लेकरू नव्हते, तसं बघायला गेले तर तिचा नवरा समजूतदार असल्याने अजून पर्यंत तर त्यावरून काही मोठी अडचण निर्माण झालेली नव्हती पण आजूबाजूची माणसे, शेजारी पाजारी अन पाव्हणे रावळे तोंड बंद ठेवत नसतात, त्यांनी श्रावणीच्या वांझपणाबद्दल चर्चा सुरु केली होती. ‘महागाच्या दवाखान्यापेक्षा अजून एक बायको आणलेली परवडली’ हा कालचा तिच्या चुलत दिराचा तिच्या नवरयाला मारलेला टोमणा तिच्या जीवाला घायाळ करून गेला होता. रात्रीच्या जेवणानंतर तिला हे अंजनीला सांगताना किसूनानांनी ऐकले अन त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्याना एका क्षणात जाईची आठवण झाली. सारे जग आपल्यांभोवती फिरते आहे असा आभास झाला. डोक्यात कोणी तरी शेकडो घणाचे घाव घालत आहे असे भास होऊ लागले. चक्कर आल्यासारखे वाटू लागले. आपल्या पलंगाकडे जाण्याइतपत वेळ देखील त्याना मिळाला नाही.जाई जाई अशी एक मोठी किंकाळी फोडत ते जामिनावर कोसळले. मोठा आवाज झाला. सगळे जन धावत त्यांच्याजवळ पोहोचले. त्यांच्या डोक्याला मार लागला होता, डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. तोंडातून रक्ताची उलटी झाली होती. त्यांचा बनियन, सदरा रक्ताने माखला होता. जाई देखील पळत आली, त्या दृश्याने तिला तर भोवळच आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भैरवाने त्याना तातडीने शहरातल्या दवाखान्यात न्यायचा निर्णय घेतला. गावातली पहिली जीपगाडी आणलेले प्रगतीशील शेतकरी म्हणून ज्यांचा लौकिक झाला होता त्याना आज त्यांच्याच जीपगाडीत घालून दवाखान्यात हलवले गेले.

किसुनानाना पक्षाघाताचा मोठा झटका आला होता. त्यांचे कंबरेखालील अंग अन उजवी बाजू क्षतिग्रस्त झाली होती. तोंड पूर्ण वाकडे झाले होते. देखण्या चेहरयाचे नाना आता अगदी भेसूर दिसत होते.तोंडातून सतत गळणारी लाळ अन नजरेला नजर न देणारे मलूल डोळे यामुळे त्याना बघितले की पोटात कालवायचे. काही दिवस दवाखान्यात ठेवून त्याना घरी आणले गेले. घरी आणल्यावर दिवाणखाण्यातच त्याना ठेवले गेले. त्यांची सेवा शुश्रुषा, हागणे मुतणे काढणे यासाठी जाईने कोणालाही कामाबर ठेवू दिले नाही. तिने स्वतः ती जबाबदारी आपल्याकडे ठेवली. या निमित्ताने तिचा घरात पुन्हा प्रवेश झाला. गेले कित्येक वर्षे नानांचा तिला सहवास लाभला नव्हता, आता ते लोळागोळा झाले होते अन ती एका अर्थाने परागंदा ! ज्या नवरयाने आपल्याला गेली कित्येक वर्षे कोनाड्यात ठेवले त्याची सेवा करताना तिच्या मनात केवळ केवळ आणि सेवाभाव होता. अंजनीला वाईट होते खरे पण तिला नानांच्या दुखण्यापेक्षा जाईच्या घरातल्या प्रवेशाची चिंता होती पण भैरवापुढे तिचे काही चालत नव्हते. वयाने आलेली परिपक्वता भैरवाकडे अधिकच होती, त्याला सर्व कळत होते पण आता खूप उशीर झाला होता.

खरे तर किसूनानाला त्या दिवशी मुलीच्या जागी जाई दिसली अन त्याला वाटले आपल्या मुलीला देखील परमेश्वराने तिच्या घरात कोनाड्यात लोटले तर आपल्या मुलीचे पुढे आयुष्य कसे कडेला जाणार ? जावयाने दुसरे लग्न केले तर श्रावणीचे कसे होईल ? या सर्व प्रश्नांनी त्याना हैराण केले अन त्यातच त्यांच्यावर आघात झाला. आता धरलेले अंथरून हे अखेरचे हे त्यांनी ओळखले होते. त्याना जाईशी बोलायचे होते. तिची माफी मागायची होती. दोष तिच्यात नव्हता तर आपल्यातच होता याची कबुली द्यायची होती. मन मोकळे करून तिच्या पदरात डोके खुपसून हमसून हमसून रडायचे होते, तिच्या आयुष्याचे मातेरे केल्याबद्दल ती देईल ती शिक्षा आनंदाने भोगायची होती. आपण फार मोठे पाप केले अन त्याची शिक्षा जाईला दिली, म्हणून देवाने आपल्या पोरीला देखील तेच दुःख दिले या विचाराने त्यांचे डोळे सतत पाझरत. आपल्या नवरयाला काय बोलायचे आहे अंजनीला कळत नव्हते पण जाईने मात्र काही अंदाज मनाशी बांधले होते.

अंथरुणाला खिळलेले नाना आता अगदी कृश होऊन गेले होते,अंग पिवळट पडले होते, झोपून झोपून अंगाला काही ठिकाणी बारीक पुटकुळ्या तर कुठे जखमा होऊ लागल्या होत्या.डोळे अखंड पाझरून पाझरून अगदी खोल गेले होते. सफरचंदासारखे असणारे त्यांचे गोबरे गाल जाऊन त्यांची गालफाडे आंत गेली होती. नाक वर आल्यासारखे वाटत होते. सर्व अंगाची कातडी लोंबत होती. त्यांना बोलायचे होते पण वाचा नव्हती, लिहून द्यावे इतके त्राण डाव्या हातात नव्हते. होय नाही एव्हढीच काय ते मान वा डोळे हलवणे त्यांना जमत होते. आपण जिचा तिरस्कार केला, जिला तुसडेपणाने वागवले तीच आपली सेवा करत्येय या विचाराने तर नानांचा जीव कासावीस व्हायचा.ते बोलायचा प्रयत्न करायचे, त्यांच्या डोळ्याच्या बाहुल्या सारासर इकडून तिकडे हलायच्या, जीव बेचैन व्हायचा. श्वास कंठात यायचा

असेच काही दिवस गेले अन नानाचा जावई हसतमुखाने पेढ्याचा पुडा घेऊन नानाच्या घरी आले. श्रावणी आता आई होणार आहे ही बातमी ऐकून जाई,भैरव अन अंजनीच्या आनंदाला पारावर राहिला नाही. किसुनानाना बातमी कळाली,एक हलकीशी स्मितरेषा त्यांच्या चेहऱ्यावर तरळून गेली. पण पुढच्याच क्षणी त्यांची नजर जाईकडे गेली अन पुन्हा डोळ्यातून अश्रूंचा अभिषेक सुरु झाला.

त्यांची घालमेल, बेचैनी काय सांगतेय हे जाईने नजरेनेच ओळखले, जावईबापू बरोबर बाकीचे सर्व जण घराबाहेर गेल्यावर ती त्यांच्या जवळ येऊन बसली, त्यांचे डोळे पुसले. लाळ साफ केली. मायेने त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवून ती त्यांच्याकडे पाहु लागली. कसले दुःख करून घेताय? आता तुम्ही आजोबा होणार ना ? आपली श्रावणी आई होणार अन मी आज्जी होणार’. बोलता बोलता तिचे देखील डोळे पाणावले. त्यांच्या विरळ झालेल्या निस्तेज केसातून हात फिरवत ती बोलू लागली,” कशाला जीवाला लावून घेताय? का दुःख करताय ? मला माहिती आहे तुम्हाला काय सांगायचे आहे ते ! मलाही आज तुम्हाला काही सांगायचे आहे,शाळेत जाणारे श्रावणी आणि भैरव जेंव्हा इंग्रजी शिकू लागले तेंव्हा मी पण थोडे फार इंग्रजी शिकले. श्रावणीच्या लग्नात जेंव्हा घर साफ सफाईला काढले,घराची रंग रंगोटी केली तंव्हा घरातला कागदी रद्दी केर कचरा मी राहते त्या कोठीच्या खोलीपाशी आणून टाकला होता. त्यातच एक कागदाची घडी कापडात गुंडाळून ठेवलेली होती. ते तुमचे दवाखान्यातले कागद होते. मला त्यात लिहिलेले सर्व काही कळाले नाही पण त्यातला अर्थ उमजला. काही वेळ वाईट वाटले पण मी तुम्हाला दोष देत नाही. तुम्ही स्वतःला दोषी मानू नका. मी तुमच्यावर परमेश्वराइतकी श्रद्धा ठेंवलीय. जे काही झाले ते देवाच्या मर्जीनेच झाले. अंजनी मला बहिणीसारखी आहे, भैरव अन श्रावणीला माझ्या कुशीतून जन्म दिला नाही म्हणून काय झाले ? त्यांच्यात तुमचेच रक्त आहे. ती माझीच पोरे आहेत. मला सुद्धा लेकरे होऊ शकली असती पण देवालाच ते मंजूर नव्हते त्याला तुम्ही तरी काय करणार? माझी काहीही तक्रार नाही. तुम्ही जीवाला घोर करू नकासा’ असे म्हणून जाई धाय मोकलून रडू लागली.

आपल्याला जे सांगायचे होते ते जाईला माहिती होते तरी तिने कधी आपल्याला ते जाणवू दिले नाही.आपण फार मोठे पापी आहोत ती खूप मोठ्या मनाची आहे आपण तिला खुप छळलेय. या अशा एक ना अनेक भावनांनी त्यांचे मन उचंबळून आले.

एव्हाना जाईचे हे बोलणे भैरव आणि अंजनी दारात उभे राहून ऐकत होते. ते देखील आत आले. भैरवने तर मावशी म्हणून जो टाहो फोडला ते ऐकून अंजनीच्या दगडी हृदयालाही पाझर फुटला. दोघेही जाईच्या गळ्यात पडून रडू लागले, त्या सरशी नानांना हायसे वाटले. इतके दिवस अंतःकरणात दाबून ठेवलेल्या सर्व गोष्टी देवाने खरया करून दाखवल्याने त्यांच्या डोळ्यात अनामिक चमक आली. त्यांनी त्यांच्या डाव्या हातात होते नव्हते ते सर्व अवसान आणले आणि आपल्या शेजारी बसून रडणारया जाईच्या डोक्यावर आपला हात ठेवला जणू काही त्यांनी तिच्या मस्तकी हात ठेवून ईश्वराकडे काही मागणे मागितले, क्षमा याचना केली.

जाईच्या डोक्यावर हात ठेवल्याच्या पुढच्याच क्षणी त्यांच्या शरीराने एक मोठा झटका दिला, कंठातून ज्ज्ज्जज असा एकच आवाज आला अन त्यांचे शरीर अचेतन होऊन गेले. त्यांचे प्राण गेले होते, शेवटी त्यांच्या आयुष्याच्या अन कर्माच्या ओझ्यातून जाईनेच मुक्त केले होते.

जाई त्या कृष्णाची खरी मीरा होती अन ते सारे शेत,शिवार,घर व घरातली माणसं तिच्या साठी गोकुळ होते.

आता ते सर्वजण एकत्र राहतात. चिंचेच्या पट्टीतल्या थंडगार शांत सावलीत आता नानांची संगमरवरी समाधी आहे. त्या समाधीवर सगळे कुटुंब रोज एकत्र फुले वाहते तर श्रावणीला चिमुकली मुलगी झालीय. तिचे नाव जाई ठेवण्यात आलेय. रोज संध्याकाळी श्रावणी तिला घास भरवत असताना आपले पाणावलेले डोळे पदराने पुसत लाडक्या जाईमावशीची गोष्ट सांगत असते...

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment