Wednesday, April 15, 2015

सुमधुर गाण्यांची जयपुरी 'हसरत' ...


एकेकाळी रेडिओवर लागणारी गाणी आणि मॅटिनीला स्वस्तात बघायला मिळणारे राजकपूरचे चित्रपट हे मिश्रण साखर भातासारखे होते. रेडीओवर ठराविक अंतराने ठराविक वेळेत लागणारी गाणी ऐकताना काळ वेळ कशाचेही भान राहत नसे. भल्या सकाळी चहाच्या वासासून ते कुकरच्या शिटीपर्यंत वेगवेगळी गाणी कानावर पडली नाहीत तर सकाळच उदास व्हायची, दुपारची निवांतवेळ असो की ते उत्तर रात्रीच्या लख्ख चांदण्यांच्या साथीने खुल्या आसमंतातली  गाणी असोत. त्या प्रत्येक गाण्याचा एक अलग कैफ होता. आज जीवनाच्या अनेक वळणांवर हा कैफ अजूनही 'उतारा' म्हणून कामाला येतो हे वेगळे सांगायला नको.


रेडिओवर गाणे  ऐकविण्यापूर्वी निवेदकाचा खर्जातला आवाज देखील कानात हळू उतरायचा. मजरूह सुलतानपुरी, हसरत जयपुरी, नक्श लायलपुरी, शकील बदायुनी, इंदिवर,कैफी आझमी, साहीर लुधियानवी आणि गुलजार यापैकी कोणा एकाचे नाव कानी पडले नाही असा दिवस जात नसायचा. खरया अर्थाने मंतरलेले दिवस होते ते. पायलीला पासरीभर लिहिणारे आज ढीगभर आहेत पण आशयघन लिहिणारे दुर्बीण घेऊन शोधावे लागतील त्या पार्श्वभूमीवर जुन्या गाण्याचे यश, गोडवा,आशय,कर्णमाधुर्य अन गेयता अधिक समृद्ध वाटते. त्या अवीट गाण्यातली बरीचशी गाणी आजही गुणगुणली जातात. ही गाणी अजरामर आहेत अन राहतील. प्रत्येक गीतकाराची अनोखी शैली होती. काहींची संगीतकाराशी वेगळी ट्युनिंग होती.


या पैकी एक होते हसरत जयपुरी. हसरतजींच्या या गाण्यांवर नजर टाकली तर मला अजून काही वेगळे स्पष्टीकरण द्यायची गरज पडणार नाही.


छोड़ गए बालम मुझे हाय अकेला... (बरसात), हम तुम से मोहब्बत करके सनम... (आवारा), इचक दाना बीचक दाना... (श्री 420), आजा सनम मधुर चांदनी में हम... (चोरी चोरी ), जाऊं कहा बता ए दिल... (छोटी बहन), एहसान तेरा होगा मुझपर... (जंगली), तेरी प्यारी प्यारी सूरत को... (ससुराल), तुम रूठी रहो मैं मनाता रहूं... (आस का पंछी), इब्तिदाए इश्क में हम सारी रात जागे... (हरियाली और रास्ता) बहारों फूल बरसाओ मेरा महबूब आया है... (सूरज), दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई... (तीसरी कसम), कौन है जो सपनों में आया... (झुक गया आसमान), रूख से जरा नकाब उठाओ मेरे हुजूर... (मेरे हुजूर), पर्दे में रहने दो पर्दा ना उठाओ... (शिकार) जाने कहां गए वो दिन... (मेरा नाम जोकर), जिंदगी एक सफर है सुहाना... (अंदाज), आजा रे अब मेरा दिल पुकारा (आह) इचक दाना बिचक दाना... (श्री 420), आंसू भरी है ये जीवन की राहें (परवरिश), वो चांद खिला वो तारे... (अनाड़ी), जाऊं कहां बता ऐ दिल... (छोटी बहन), हाले दिन हमारा जाने ना... (श्रीमान सत्यवादी), ओ मेहबूबा ओ मेहबूबा... (संगम),  दीवाना मुझको लोग कहें... (दीवाना), जाने कहां गए वो दिन... (मेरा नाम जोकर)दिल एक मंदिर है (दिल एक मंदिर), रात और दिन दीया जले (रात और दिन), तेरे घर के सामने इक घर बनाऊंगा (तेरे घर के सामने), ऐन इवनिंग इन पेरिस (ऐन इवनिंग इन पेरिस), गुमनाम है कोई बदनाम है कोई (गुमनाम), दो जासूस करें महसूस (दो जासूस) अशी एकापेक्षा एक सरस गाणी त्यांना हिंदी चित्रपट सृष्टीला देऊन रसिक श्रोत्यांच्या हृदयात स्वतःचे स्थान त्यांनी निर्माण केले.


इक्बाल हुसैन हे त्यांचे मुळचे नाव. जयपूर हे त्यांचे गाव. तरुण वयातल्या शेरो शायरीने त्याना घरी स्वस्थ बसू दिले नाही. नोकरीच्या शोधात ते मुंबईला आले. पोट भरण्यासाठी त्यांनी बस कंडक्टरची नोकरी स्वीकारली. ११ रुपयावर सुरु केलेली ही नोकरी सुरु ठेवत त्यांनी विविध मुशायरे अन संमेलनामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. एका मुशायरयात त्यांची भेट पृथ्वीराजकपुर बरोबर झाली अन त्यांनी हसरतजींना राज कपूरला भेटायचा सल्ला दिला.

 
राजकपूर तेंव्हा बरसात या चित्रपटावर काम करत होते. त्यासाठी ते नव्या प्रतिभाशाली गीतकाराच्या शोधात होते. नेमकी त्याच काळात हसरत जयपुरींची त्यांची भेट झाली. रॉयल ऑपेरा हाउस मध्ये राजनी त्याना भेटायला बोलावले. तेथे त्यांनी हसरतना आपल्या बरसातसाठी गाणी लिहायची विनंती केली.यात आणखी एक योगायोग असा आहे की याच बरसात पासून संगीतकार शंकर जयकिशन यांनी त्यांच्या स्वर्गीय संगीताची सफर सुरु केली होती. हा त्यांचा देखील पहिला चित्रपट होता.  

आरकेच्या सांगण्यावरून शंकर जयकिशन यांनी हसरत जयपुरीना एक धून ऐकवली आणि त्यावर गाणे लिहायला सांगितले. अंबुआ का पेड है वहीं मुंडेर है, आजा मेरे बालमा काहे की देर है अशी लो फ्रिक्वेन्सीच्या चालीतली ती धून होती. ती ऐकल्याबरोबर हसरतनी लगेच गाणे लिहून दिले - "जिया बेकरार है छाई बहार है, आजा मेरे बालमा तेरा इंतजार है।"या गाण्याने पुढे इतिहास घडवला.


हसरत जयपुरी, शंकर जयकिशन आणि राजकपूर या त्रयींच्या गाण्यांनी रचलेला पुढचा सुवर्ण इतिहास माहित नाही असा रसिक संगीत श्रोता विरळाच. हसरतच्या प्रत्येक गाण्याविषयी लिहिता येईल असा काळ  त्याच्याशी जोडला गेला आहे.

अनेक नायक अन नायिका त्यांच्या या गाण्याच्या माध्यमातून स्टार झाले. रसिकांनीही हसरत जयपुरींना भरभरून प्रेम दिले. त्यांची अनेक गाणी सुपरड्युपर हिट झाली.

हसरतजींना दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले, त्यांनी दोन हजाराच्या आसपास गाणी लिहिली. अंतःकरणापासूनच्या भावना अन निर्भेळ प्रेमाचे सच्चेपण याचे मनाला भिडणारे प्रकटन  ज्या अविस्मरणीय गेयतेत त्यांनी गाण्यात मांडलेय त्याला सलाम !


तुझे मै चॉंद कहता था...

मगर उसमे भी दाग है...
तुझे सूरज मै कहता था ...
मगर उसमे भी आग है...
तुझे इतना ही कहता हू...
के मुझको, तुमसे प्यार है, तुमसे प्यार है, तुमसे प्यार है...

अशी सुमधुर गाणी लिहिणारया हसरत जयपुरींचा आज जन्मदिन आहे.

त्यांना त्रिवार सलाम !!

- समीर गायकवाड.