Sunday, July 1, 2018

'संजू'चे किटाळ...


संजयदत्तच्या जीवनावर आधारित रणबीर कपूर अभिनित 'संजू' हा चित्रपट रिलीज झालाय. अनेकार्थाने वादग्रस्त आणि अनेक वाईट गोष्टींनी ग्रासलेल्या व्यक्तीला हिरॉईक रोल मॉडेल बनवण्यात बॉलीवूडचा हातखंडा आहे. याचीही आवड असणारे तो आवर्जून पाहताहेत, ज्यांना तो आवडू शकतो ते चवीने पाहतील तर काहीजण काय दाखवलंय बघून तरी येऊन या भावनेने पाहतील, राजकुमार हिरानीने काय दाखवले आहे हे पाहण्यासाठी मी 'संजू' पाहिला. मला 'संजू'वरही भाष्य करायचे नाही आणि रणबीरवरही नाही.

१९७४ मध्ये सुनील दत्त यांचा 'प्राण जाये पर वचन न जाये' नावाचा चित्रपट आला होता. त्यात सुनील दत्त यांच्या तोंडी एक संवाद आहे - "अपने कसूर की सजा से किसी बेकसूर को बचाने के लिये मैं मौत से भी टक्कर ले लुंगा !". या चित्रपटाच्या नावावरूनच कथेचे सूत्र लक्षात येतं. यातला राजा ठाकूर(सुनील दत्त) हा एक नामी डाकू असतो. पण त्याची जगण्याची आणि लुटमार करण्याची काही तत्वे असतात. गरिबांना मदत करणारा आणि धनिकांना वठणीवर आणणारा राजा ठाकूर पंचक्रोशीतील गावात खूप लोकप्रिय असतो. त्याला लोक देवता मानत असतात. एके दिवशी एका माजोरडया आणि अत्याचारी मुखियाला धडा शिकवताना योगायोगाने जानीया(रेखा) या कोठेवाल्या नर्तिकेशी त्याची भेट होते. पाहताच क्षणी तो तिच्याकडे आकृष्ट होतो पण तिथून मुकाट निघून जातो. नंतर यथावकाश तो आपल्या प्रेमाची कबुली देतो. जानीया ही खरे तर सेठ धनराज (इफ्तिकार) यांची मुलगी असते जिचं बालपणीचं नाव शीतल असतं. धनराजच्याच विश्वासू मित्रांनी तिचे अपहरण करून तिला कोठेवालीस विकलेलं असतं. कालांतराने जानीया हीच शीतल असल्याचे सेठ धनराजला कळते, पण वेश्या असलेल्या मुलीकडे त्याने भेटायला जाऊ नये असे जगमोहन(मदनपुरी) आणि धरमदास(जीवन) सांगतात. मात्र धनराज ऐकत नाही. एका घटनेत धनराज आणि राजा ठाकूर यांची चकमक होते. राजा ठाकूरलाही जानीयाचे सत्य कळते आणि तो धनराजला शब्द देतो की तो तिला घेऊन येईन. पण त्यातून जानीयाच संकटात सापडते. राजाशी वैर असलेल्या डाकूंची टोळी तिचे अपहरण करते. तिला सोडवून आणण्याचे वचन दिलेले असल्याने राजाला त्याचा इलाखा सोडावा लागतो आणि त्या डाकूंच्या मागावर अपरिचित भागात जावे लागते. राजा त्या बिहडी भागात जातो, जीवावर खेळतो पण आपले शब्द पूरे करतो. 'प्राण जाये पर....' ची कथा अशी साधी सरळ होती.

सुनील दत्त यांना जवळून ओळखणारे इंडस्ट्रीतले लोक त्यांच्याबद्दल जे सांगायचे ते या कथेतील राजा ठाकूरच्या पात्राशी मिळते जुळते होते. सुनीलदत्त यांची सुरुवातीची संघर्षमय पार्श्वभूमी आणि यश मिळाल्यानंतरही टिकून राहिलेले साधेपण, त्यांनी अनेकांना केलेली मदत, आर्थिक बाबतीत कधीही न केलेली ओढाताण, सहनायिकांशी असलेले मैत्रीपूर्ण प्रांजळ संबंध या बाबी या त्यांच्या स्वभावाची ओळख होण्यास पुरेशा होत्या. 'आपल्या शब्दाला जागणारा सज्जन सालस माणूस' म्हणून त्यांना इंडस्ट्री ओळखायची. तर नर्गिस ही एक प्रतिभाशाली अभिनेत्री, असामान्य स्त्री तर होतीच पण एक भावनाप्रधान स्त्री ही होती. एक कुटुंबवत्सल आई असल्यानेच तिने लग्नानंतर करिअरवर पाणी सोडले होते. 'मदर इंडिया'च्या सेटवर घडलेल्या विस्मयकारक घटनेच्या ओघात आणि भावनेच्या भरात जरी तिने सुनीलदत्तशी लग्न केले असले तरी त्यांचे दांपत्यजीवन खूप चांगले होते. त्यांच्या नात्यात प्रेमाचा मधुर ओलावा होता. तिला कॅन्सर झाल्यानंतर एखाद्या सामान्य माणसाला जसा धक्का बसतो तसा सुनील दत्त यांना धक्का बसला होता. त्यांच्यातल्या प्रेमळ पतीचे दर्शन त्यातून झाले होते. नर्गिसच्या मृत्यूनंतर 'रॉकी' रिलीज झाला आणि त्या नंतर सुनील दत्त जीवापाड प्रेम केलेल्या दिवंगत पत्नीच्या दुःखद स्मृती आणि डोळ्यादेखत वाहवत चाललेला मुलगा याच्या कात्रीत अडकले. त्यातून नेमकी निवड त्यांना करता आली नाही. प्रियाने वडीलांचे दुःख समजून घेतले पण संजयने काय केले हे सर्वश्रुत आहे. या नंतर सुनील दत्त्त यांनी आधी नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल उभं केलं आणि नंतर सक्रीय समाजकारणात भाग घेतला. सिनेमावरचे लक्ष कमी करून ते राजकारणातही गेले पण त्यांनी स्वतःचे रुपांतर राजकारण्यात होऊ दिले नाही. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजयदत्त साठी त्यांनी बाळासाहेबांचे पाय धरण्यात कमीपणा मानला नाही तेंव्हा त्यांच्यातला हतबल झालेला बाप जगापुढे आला होता.

'आपला पोरगा नादान आहे' असेही ते भावनेच्या भरात बोलून गेले होते पण त्याच्या क्लीन चीटसाठी त्यांनी कुणाला दोषी धरले नव्हते. राजकुमार हिरानीने इथेच चूक केलीय. नायकाच्या अनेक चुका आणि अनेक वाईट सवयी सॉफ्ट कॉर्नरमधून दाखवल्या आहेत. मात्र त्याच्यावर आलेलं लांच्छन दूर करताना अप्रत्यक्षपणे परिस्थितीवर खापर फोडण्याचा प्रयत्न केलाय. हिरानींनी त्यांच्या जिवलग मित्राचे उदात्तीकरण करण्याच्या नादात जे प्रकटन केले आहे ते कुठेतरी सुनीलदत्त आणि नर्गिस यांच्यावर नकळत अन्याय करून जाते. 'प्राण जाये पर वचन न जाये' मधले सुनील दत्त यांचे ते वाक्य म्हणूनच पुन्हा एकदा उद्धृत करावे वाटते - "अपने कसूर की सजा से किसी बेकसूर को बचाने के लिये मैं मौत से भी टक्कर ले लुंगा !" इथे हिरानी आणि मंडळींनी कसूरवार व्यक्तीस बेकसूर सिद्ध करण्यासाठी केलेली वातावरण निर्मिती नेमकी विरुद्ध अर्थाची आहे. बॉक्स ऑफिसची गणिते जुळवता येतील, खोट्याला खरे म्हणता येईल, अपराधी माणसास निरपराध म्हणता येईल पण हे सर्व करण्यासाठी त्याच्या माथ्यावरचे किटाळ हटवण्यासाठी कुणाचा तरी माथा शोधावा लागतो तो माथा हिरानी यांनी चुकीचा निवडलाय. चित्रपटाच्या प्रारंभीच 'संजू'च्या कथेत अर्धे सत्य आणि अर्धे असत्य आहे अशी मल्लीनाथी यामुळेच केली असावी. सुनील दत्त आणि नर्गिस हयात असते तर या चित्रपटाबद्दल त्यांच्या भूमिका कशा असल्या असत्या याचे अंदाज त्यामुळेच बांधता येत नाहीत.

काही दिवसापूर्वी आलेल्या 'हसीना पारकर'मध्ये हसीनाच्या तोंडी एक वाक्य आहे, ती दाऊदशी फोनवर बोलताना म्हणते की, "मेरे जिंदगी के हर कदम पे आपके पैरोंके निशान मिलते हैं, उसके बदौलत काफी चीजे जिंदगी ने दी और कुछ अनचाही बाते भी दी !" ..... थोडक्यात आपल्या वाईटपणाचे खापर ती दाऊदवर फोडते....यातल्याच एका प्रसंगात कोवळ्या तरुण दाऊदकडून पहिला गुन्हा घडताच त्याचे वडील इब्राहीम कासकर त्याला कंबरेच्या चामडी पट्ट्याने गुरासारखे मारतात असे दृश्य दाखवले आहे. पुढे याचा संदर्भ वापरताना हसीना सांगते की, दाऊद देखील कायद्याचा सन्मान करायचा पण त्या दिवशी खाल्लेला मार त्याला बदलून गेला. वडील आणि पोलीस यांच्याबद्दलचा द्वेष दाऊदच्या मनात कसा तयार झाला याचे ते लटके स्पष्टीकरण होते. पण वास्तवातली हसीना आणि वास्तवातला दाऊद नेमके कसे अपराध जगताकडे वळले यावर चित्रपट प्रकाश टाकत नाही. कारण बॉलीवूडमध्ये ती हिम्मतच नाही. 'संजू'चेही तेच झालेय. हसीनाने जे स्पष्टीकरण दाऊदसाठी आणि स्वतःसाठी दिलेले आहे तेच हिरानींनी आपल्या मित्राची प्रतिमा उदात्त करण्यासाठी अप्रत्यक्षरित्या दिलेलं आहे. चित्रपट पाहताना भावनिक होऊन जाणाऱ्या भारतीय प्रेक्षकांना ही मखलाशी लगेच उमगणार नाही हे त्यांना पक्के ठाऊक असावे...

- समीर गायकवाड

(एक्स्ट्रा - 'प्राण जाये पर वचन न जाये' मधली बिंदूने साकारलेली लिली रेखाच्या जानीयापेक्षा अधिक कातिल आणि अधिक मदमस्त होती)

No comments:

Post a Comment