Saturday, June 17, 2017

आवतन माझ्या पहिल्या पुस्तकाचे - 'पाऊलवाट'चे .......४ मार्च २०१५ रोजी मी पहिली कथा लिहिली आणि अनेक वाचकांनी ती कथा वाचून आपली पसंती कळवली. अनेकांनी पुढं लिहिण्यासाठी प्रेरणा दिली. साहित्यिक वा लेखक म्हणून अंगी जो व्यासंग असावा असतो तो व्यासंग व अभिजात प्रतिभेची देणगी लाभलेल्या सृजनशील मनाने लेखणीतून उतरवलेले शब्दचित्र या दोन्हीतले माझ्याकडे काही नाही. मात्र लेखनाची आवड अन अल्पशी निरीक्षणशक्ती याच्या जोरावर एखादा नवशिक्या चित्रकार त्याला जमेल तसे पेन्सिलचे फटकारे काढून त्यात भावतील ते रंग आपल्या साध्या कुंचल्यातून भरतो व त्या कलाकृतीला 'चित्र' संबोधून आपले व्यक्त होण्याचे आत्मिक समाधान प्राप्त करून घेतो तसे काहीसे माझे झाले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मी अनुभवलेले काही क्षण, काही प्रसंग, समाजात इतरत्र पाहिलेल्या घटना अन त्याचे मनाच्या आरशात उमटलेले प्रतिबिंब याच्या बळावर हे लेखन झालेय, या लेखनामागे कोणताही हेतू वा उद्देश नाही की कोणताही प्रबोधनात्मक बाज यात नाही. जे जे भावले जसे वाटले तसे लेखणीतून मी उतरवत गेलो अन काही दिवसातच लिहिण्याचे व्यसनच जडत गेले. 'दिवसामाजी काही तरी लिहित जावे' या उक्तीचा आधार घेत मी लेखणीतून व्यक्त होत गेलो अन कालांतराने त्यातील समाधान जगण्याची प्रेरणा बनत गेले.शालेय जीवनापासून असणारी लेखनाची आवड प्रापंचिक तडजोडीत कुठे तरी निमाली होती तिला मागील वर्षभरात नवे आयाम प्राप्त होत गेले अन या 'खर्डेघाशी'ने पुन्हा उचल खाल्ली अन मी लिहिता झालो. सुरुवातीला वहीत कुठे तरी लिहून ठेवणे वा एखादया वृत्तपत्रात काही तरी लिहून पाठवणे असे लेखन सुरु होते. मात्र मागील वर्षी सोशल मिडीयावर आणि ब्लॉगद्वारे सलग लेखन सुरु केले. माझ्या या लेखन प्रवासात माझे मार्गदर्शक दैनिक संचारचे संपादक श्रीPrashant Joshi सर, मित्रवर्य सर्वश्री संतोष जगन्नाथ लहामगे, तात्या Abhyankar , देवधर समीर शशिकांत, Kaustubh Gurav , Rajesh Halkude, Lalat Mhetras आणि लेखनासाठी - प्रकाशनासाठी सतत प्रोत्साहन देणारे मेघदूत प्रकाशनचे श्री.समीर पाटील ( Samir Patil) यांचा उल्लेख न करणे कृतघ्नता होईल. यांच्याशिवाय सर्व मित्रपरिवाराने आणि कुटुंबीयांनी देखील माझ्या पाठीवर नेहमी थाप दिली, शिवाय दैनंदिन लेखन वाचून त्यादवारे मला लेखनाकडे अधिक प्रवृत्त करत जाणारे माझे सर्व रसिक वाचक यांचा देखील या लेखन प्रकटनात मोलाचा वाटा आहे. विविध विषय आणि आशय यांना या लेखनातून हात घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. तो कितपत सार्थ आहे वा सफल आहे हे मला ज्ञात नाही. पुस्तकाचे जरी रूप या लेखनाला दिले असले तरी माझ्यासाठी ही एका 'गोष्टीवेल्हाळाची बाराखडी'च आहे !

'पाऊलवाट' हे या पुस्तकातील एका लेखाचे शीर्षक आहे मात्र पुस्तकाचे शीर्षक म्हणून हेच नाव निवडण्याचे कारण यामागचा भावार्थ होय. मोठाले राज्यमार्ग वा हमरस्ते सर्वत्र दिसतात, डांबरी सडकादेखील आता खेडेगावापर्यंत पोहोचू लागल्या आहेत, त्यामुळे दळणवळण सुलभ होऊ लागले आहे. मात्र अजूनही गावोगावी पाऊलवाटा असतातच, त्यात जो मायेचा ओलावा आहे, त्यातली काळ्या मातीची आपुलकी आहे, त्यात जो आपलेपणाचा स्नेह आहे तो इतर कुठल्याही रस्त्यात वा महामार्गात आढळून येत नाही. जिथे फक्त दिशा असतात अन मार्ग संपलेले असतात तिथे वाटसरू स्वतःच एक वाट तयार करतो अन त्याच्या मागून येणारे देखील तीच वाट चोखाळतात. मग ती वाट पाऊलवाटेचे रुपडे धारण करते. माझ्या या लेखनात राजमार्गाची भव्यता नाहीये, हमरस्त्यासारखे नेटकेपणही नसेल, डांबरी सडकेप्रमाणे सरलता त्यात नसेल मात्र त्यात पाऊलवाटेचा सच्चेपणा आहे, तिच्यात आपुलकी आहे अन आपल्या मनातले भाव ओळखणारे, आपली सोबत करणारे अनुभव त्यात आहेत. माझ्या लेखनाची पाऊलवाट समृद्ध नसली तरी त्यात काटेकुटे नाहीत की दगडधोंडे नाहीत. ही वळणावळणाची लेखनवाट देखणी व्हावी म्हणून मी प्रयत्न केलेले नाहीत मात्र ती जशी आहे तशी आपल्यापुढे रेखाटण्याचा प्रयत्न नक्की केलाय.

या पुस्तकाला महाराष्ट्र टाईम्सचे वरिष्ठ पत्रकार श्री.रमेश पडवळ (Ramesh Padwal) यांनी वाचनीय प्रस्तावना दिली आहे. तर पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ दिलीप रोडे यांनी बनवले आहे.१९ जून रोजी या पुस्तकाचे प्रकाशन हुतात्मांच्या पुण्यनगरीत माझ्या कर्मभूमीत सोलापुरात हिराचंद नेमचंद वाचनालय प्रांगणातील एम्फी थियेटरच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणार आहे. कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका लवकरच देईन. त्या आधी तुम्हा सर्व रसिक वाचकांना हे मायेचे, आग्रहाचे आवतन देताना मला आनंद होतो आहे. आशा करतो की आपणा सर्वांचा आशीर्वादाचा हात माझ्या पाठीवर असेल...

- समीर गायकवाड