Saturday, June 30, 2018

'निर्भयां'ची भयाण रांग किती लांबत जाणार ?...


तिचा दोष इतकाच तिच्या न उमललेल्या देहात स्त्रीत्वाच्या अमीट खुणा आहेत..
ती फक्त सात वर्षांची कोवळी बालिका आहे...
तिच्या आईचे रडून रडून बेहाल झाले आहेत, ती अधून मधून डोळे उघडते आणि आईकडे एकटक बघत राहते, मग आईचे डोळे भळाभळा वाहू लागतात.
चारेक दिवसापूर्वी तिच्या चेहऱ्यावर अनेक जागी चावे घेतल्याने जखमा झाल्या आहेत. तिला इस्पितळात दाखल केले गेले तेंव्हा तिचे रेक्टम (गुद्दद्वार) पूर्णपणे फाटलेले होते, तिचे गुप्तांगही पूर्णतः रक्तबंबाळ होते.
तिच्या नाकावर खोल जखमा झाल्याने श्वास घेण्यासाठी नळी लावावी लागली.चेहऱ्यावरच्या जखमांसाठी ल्यूकोप्लास्टी करावी लागली.
चिमुरडीवर उपचार करणारे डॉक्टर सांगतात की, तिला अतिशय गंभीर जखमा झाल्या आहेत.
तिच्या जननेंद्रियांना इन्फेक्शनपासून संक्रमित होण्यापासून वाचवण्यासाठी आणि रेक्टममधून मोशन पास व्हावी यासाठी त्या चिमुरडीचे पोट काही अंशी फाडून, आतले आतडे कापून बाहेरून मार्ग (कोलेस्टोमी) निर्मिला गेलाय.
तिला इतका रक्तस्त्राव झालाय की रक्त चढवावे लागलेय.
आता तिला थोडे-थोडे पाणी पाजण्याची परवानगी आहे. एवढीशी ती पोर अजूनही धक्क्यात आहे, तिला यातून बाहेर पडायला बराच काळ जाऊ द्यावा लागेल.
तिला दाखल केलेला वॉर्ड काचेच्या भिंतींनी दोन भागांत विभागण्यात आला आहे. तिला आता 'पीडिता' या गोंडस नावाने संबोधले जातेय.
तिची अब्रू लुटून झाल्यावर पुढच्या दुर्घटना टाळण्यासाठी तिच्याजवळ शस्त्रसज्ज पोलिसही तैनात आहेत. वॉर्डात आणि वॉर्डाबाहेर ते पहारा देत आहेत.

तिच्यावर बलात्कार झाला तो दिवस मंगळवारचा होता, तिला इंदूरच्या एमवाय रुग्णालयात दाखल केले गेले तेंव्हा ड्युटीवरील डॉक्टर देखील स्तब्ध झाले होते. तिची प्रकृती आता स्थिर आहे पण तिला जबर मानसिक धक्का बसला आहे. ती एवढी घाबरून गेली आहे की, डॉक्टर किंना नर्सने स्पर्श केला तर ती भेदरते.
प्रत्येकवेळी ती फक्त आईलाच बिलगुन असते. वारंवार ती फक्त हेच म्हणतेय की, 'आई मला वाचव किंवा मला मारून टाक.'
डॉक्टरांच्या अहवालानुसार तिच्या जखमा भरण्यास दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ लागणार आहे. तिच्या संपूर्ण शरिरावर आता पट्ट्या बांधलेल्या आहेत.

तिच्या कुटुंबाला अतिमहत्वाच्या व्यक्ती वगळता कुणाला भेटू दिले जात नाहीये. तिचे आईवडील आपल्या लाडक्या लेकीची पूर्ण शुद्धीवर येण्याची वाट बघताहेत. तिला दाखल केले तेंव्हा रात्रीपासून सकाळपर्यंत पलंगावर एक कुशी बदलून ती थिजल्यासारखी पडून होती. अजूनही तिची स्थिती फारशी बदललेली नाही.

तिचे वडील या घटनेबद्दल सांगतात की, 'माझी मुलगी थोड्या वेळासाठी डोळे उघडते, परत झोपी जाते. तिने मला ओळखले. फक्त एकदाच बोलली. 'त्या' दिवशी मला १५ मिनिटे उशीर झाला होता. संध्याकाळी पाऊणेसहा वाजता शाळेत गेलो, तर मुलगी आढळली नाही.'
ती मध्यप्रदेशमधील मंदसौरच्या सरस्वती शिशुमंदिरमध्ये शिकायची, आता ती जीवन मरणाच्या उंबरठयावर उभी आहे.
तिच्यावर अत्यंत निर्घृणतेने पाशवी बलात्कार केला गेलाय, अत्यंत निर्दयी पद्धतीने आणि क्रूरतेच्या सर्व सीमा लांघत तिच्यावर अत्याचार केले गेलेत.

आरोपी तिला शाळेच्या गेटपासूनच बहाण्याने आपल्यासोबत घेऊन गेला होता. शाळेचे गेट कव्हर करण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला आहे, परंतु घटनेदरम्यान तो बंद होता. घटनेच्या वेळी सुरक्षा गार्डही पार्कमध्ये गेलेला होता.
या घटनेवर तिच्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणतात की, 'कर्मचाऱ्याने सफाईदरम्यान लाइट बंद करताना कॅमेऱ्याचे स्विचही बंद केले'. अनेकांना शाळेचे हे म्हणणे पटणारे नाही.
तिच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांचे पालक असेही सांगतात की, 'शाळा प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नराधमाचे फावले. गेटवर कॅमेरा बंद आणि चौकीदारही गायब, असे कसे होऊ शकते ?' यामागे एखादे षडयंत्रही असू शकते असा अनेकांचा कयास आहे.

या घटनेच्या निषेधार्थ मंदसौरमध्ये गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. आता जागोजागी निदर्शने केली जाताहेत.
तिला भेटायला येणारे खासदार आमदार अशाही स्थितीत तिच्या कुटुंबीयांनी त्यांचे धन्यवाद म्हणावेत असं जाहीर रित्या सांगत आहेत.

तिच्यावर अत्याचार करणारे आसिफ आणि इरफान यांना अटक झाली आहे. या घटनेबाबत परिसरात प्रचंड आक्रोश आहे. अनेक ठिकाणी आंदोलने सुरू असून आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी असे निक्षून सांगितले जात आहे. त्यापेक्षी कमी शिक्षा मान्यच नाही, अशी मागणी समोर येत आहे.
आरोपी इरफानच्या रिंगनोद या गावामधील लोकांनी तर जर इरफानला फाशी दिली गेल्यास त्याचा मृतदेहदेखिल गावात दफन करू देणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. आरोपींचा निषेध नोंदवण्यात मुस्लीम देखील सामील आहेत ही बाब बोलकी आहे.

आता यावरही राजकारण होईल, मोर्चे निघतील, कँडलमार्च निघतील, धार्मिक धृवीकरणही होईल, काही दिवसांनी दिल्लीच्या निर्भयासारखाच मंदसौरच्या निर्भयाचाही एक 'इव्हेंट' होईल.
आपणही पोस्टी लिहिताना नावे आणि गावे बदलत राहू, तद्दन कोरड्या संवेदना व्यक्त करत राहू आणि तिकडे देशभरात चेहरे बदलत लिंगपिसाट पाशवी नराधम बलात्कार करत राहतील.
तूर्तास 'निर्भयां'ची भयाण रांग किती लांबत जाणार याचे उत्तर कुणी देऊ शकत नाही आणि आपले 'हे' रुटीन होत चालले आहे की काय अशी भीती वाटावी अशी स्थिती देशात सेट झाली आहे ; यावर अत्यंत ठोस असा उपाय अजूनही आपल्या यंत्रणा, सरकारे आणि प्रशासन राबवू शकले नाहीत हे अत्यंत दुर्दैवी आहे...

मंदसौर मधील आरोपींना अत्यंत कडक आणि कठोर शिक्षा लवकरात लवकर केली जावी हीच अपेक्षा व्यक्त करणे हाच काय तो पुरुषार्थ आता उरला आहे कारण निषेधाची पिपाणी आणि धिक्काराची तुतारी केंव्हाच मोडून पडली आहे ...

- समीर गायकवाड