बुधवार, ३० मे, २०१८

नशा आणणाऱ्या 'कैफी" गीतांचा इतिहास...



दुपारचे चार वाजले होते. फतेह हुसेन रिझवी आपले मित्र बाबू खान यांच्याशी गप्पा मारत बसले होते. फतेहचा मुलगा अतहर, बाहेरून खेळत थेट घरात आला. बाबू खान गप्पा मारून निघून गेले. फतेह रिझवींनी अतहरला हाक मारून विचारले, ‘‘ बाबू खान यांना सलाम न करता तू थेट आत कसा काय गेलास?’’ अतहरने डोके खाजवत म्हटले, ‘‘अब्बा, मी त्यांना पाहिलेच नाही.’’ अब्बा म्हणाले, ‘‘ आता असं कर, समोर जी ताडाची झाडं दिसतात ना त्या प्रत्येकाला ‘सलाम’ करून ये.’’ बिचारा लहानगा अतहर नावाप्रमाणे खूपच पवित्र आणि निरागस होता. तो गेला आणि प्रत्येकाला सलाम ठोकत बसला. ताडाची झाडं किती होती ? दीडशेपेक्षा जास्त !




तरुण कैफी 
एके काळी हिंदुस्थानात मुलांना शिस्त लावायचे असे प्रकार होते. आज आलेल्या पाहुण्यांशी बोलणे दूर, उलट टीव्ही लावून फतकल मारून बसणारी मुलं वाढली म्हणून या किश्श्याला खूप महत्त्व. सलाम करण्याची शिक्षा भोगणारा हाच अतहर पुढे भारतातील मोठा गीतकार झाला, ज्याचे नाव होते कैफी आझमी! तेच कैफी आझमी ज्यांच्या प्रत्येक गाण्याला एक अर्थ आहे, एक कथा त्यात गर्भित आहे !

हा मुलगा पुढे मोठा शायर होणार हे कळण्यासाठी फार नाही, वयाच्या अकराव्या वर्षीच त्याचे ‘पाय पाळण्यात’ दिसले. १४ जानेवारी १९१९ जन्म. (लघुपट निर्माते सुखदेव म्हणाले होते कैफी यांचा वाढदिवस १४ जानेवारीला करू म्हणून तीच जन्मतारीख धरली गेली.) आझमगड जिल्ह्यातील मिजवां येथे जन्मलेले अतहर हुसेन रिझवी हेच नंतर कैफी आझमी बनले. ते अत्यंत संवेदनशील होते. लहानपणापासूनच जो माणूस अलम दुनियेतील दु:खे संपवणा-यांच्या गटात सामील झाला, सर्वांच्या दु:खाला आपल्या गीतांमधून ज्याने शक्ती दिली आणि न्यायाच्या लढाईत ज्याची गाणी पुढच्या रांगेत असत, तो स्वत:चे दु:ख कधीही व्यक्त करीत नसे.

एकदा घरात नशिस्त (छोटी मैफल, मुशायरा) होती. मोठे बंधू जफर, अच्छन, शब्बीर सगळे मुशायर्‍यात भाग घेणार होते. अब्बांनी गझलेसाठी ओळ दिली होती..
'इतना हँसो कि आँख से आँसू निकल पडे...'
सगळे जण या ओळीवर गझल बांधण्याच्या तयारीत होते. शब्बीरभाईंना काही केल्या काही सुचेना. छोटा अतहरने गझल लिहिली. नंतर हीच गझल बेगम अख्तर यांनी गायिली होती !!


'इतना तो जिंदगी मे किसी की खलल पडे
हँसनेसे हो सुकून, न रोने से कल पडे'
(हसल्यामुळे दिलासा अन् रडल्यामुळे मनाला शांतता मिळू नये अशी जीवनात अडचण येऊ नये.)

'मुद्दत के बाद उसने जो कि लुत्फ की निगाह
जी खुश तो हो गया, मगर आँसू निकल पडे'
(खूप दिवसांनंतर तिने दयेचा कटाक्ष टाकला. मनाला आनंद झालाच; पण अश्रू आलेच.)

सर्वांना वाटले की, शब्बीरनेच अतहरला गझल लिहून दिली. त्यामुळे अतहरने पण केला, की मी एक दिवस हिंदुस्थानचा शायर होईन आणि ते खरे केले. कम्युनिस्ट पार्टीच्या

कैफी - एक काव्यमय जीवन 
‘कौमी जंग’ला अतहर निनावी कविता पाठवीत असे. सारे कम्युनिस्ट हैराण होते की, या कविता सुंदर आहेत पण कवी कोण? एका मुशायर्‍यात अली सरदार जफरींना त्या ‘निनावी’ कवितांचा धनी अतहरच असल्याचा शोध लागला. त्यांनी अतहर यांना मुंबईचे निमंत्रण दिले. अतहरने ‘ये दुनिया, ये मेहफिल मेरे काम की नही’ म्हणत गाव सोडले. कैफींना अनेक कविसंमेलनांत बोलावणे येऊ लागले.

असेच हैदराबादला गेले असताना ‘यूँही कोई मिल गया था चलते चलते ’ असे झाले. ते प्रेमात पडले. ती मुलगी म्हणजेच उदारमतवादी याह्या खान यांची कन्या शौकत (अर्थ -वैभव). कैफी आझमींचे नशीब म्हणजे त्यांना मित्र फारच चांगले मिळाले. मुंबईत इप्टाच्या दिवसांतील त्यांचे मित्र नंतर नावाजलेले कलावंत म्हणून ओळखले जाऊ लागले. इप्टामध्येच होमी भाभा, किशन चंदर, मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, बलराज साहनी, मोहन सहगल, मुल्कराज आनंद, रोमेश थापर, शैलेंद्र, प्रेम धवन, इस्मत चुगताई, ए. के. हंगल, हेमंतकुमार, अदी मर्झबान, सलिल चौधरींसारख्या कम्युनिस्टांसोबत त्यांनी काम केले. प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनचे संस्थापक सज्जाद जहीर यांच्या ड्रॉइंग रूममध्ये त्यांचे लग्न लागले होते. त्यांची सहचारिणी शौकत कैफी यांनी त्यांना पसंत करण्याचे कारण म्हणजे कैफी आझमी फार मोठे शायर होते. १९४६ मध्ये क्रांतिकारी विचारसरणीच्या शौकत यांनी

कैफी आणि शौकतजी  
आईच्या मर्जीविरुद्ध आपल्या पुरोगामी वडिलांसोबत औरंगाबादहून मुंबईला येऊन कैफी यांच्याशी लग्न केले होते. त्यांच्या निकाहच्या वेळी (२३ मे १९४७) काझीने शौकतजींना विचारले, ‘‘तुला हे लग्न कबूल आहे?’’ तिने ‘हो’ म्हटले. पण पंचाईत पुढे आली. मुलगा शिया अन् मुलगी सुन्नी पंथाचा. असे लग्न असेल, तर तिथे दोन्ही काझी आवश्यक असतात. त्याकाळी ते परिस्थितीने गरीब होते. त्यांनी कसाबसा एक काझी आणला होता. दुसर्‍या काझीला द्यायला पैसे नव्हते. तेव्हा काझीने मुलाचा धर्म विचारताच मित्राने सांगितले, ‘‘मुलगा हनफियुल (म्हणजे इमाम अबू हनाफी यांचे जे अनुयायी आहेत, त्यांच्या पंथाचा) आहे.’’ लग्न पार पडले. लग्नानंतर कैफींनी ब-याच खस्ता खाल्ल्या. गावी गेले. तेथे त्यांच्या मुलाचा जन्म झाला. त्यांचा पहिला मुलगा ‘खय्याम’ एक वर्षाचा होऊन वारला.

नंतर लखनऊमार्गे ते मुंबईला गेले. सुरुवातीलाही ते लखनऊला राहिले होते. धार्मिक शिक्षण घेण्यासाठी ते गेले होते; पण न्यायासाठी लढा सुरू केल्याने त्यांना हाकलून देण्यात आले. त्यांची मुलगी शबाना पोटात होती तेव्हा कम्युनिस्ट पक्षाने आदेश दिला की, गर्भपात करा. कैफी भूमिगत होते आणि पक्षाला मुलाबाळांच्या खर्चाची चिंता होती. शौकत कैफी आपल्या आईकडे हैदराबादला गेल्या. तेथेच मुलगी शबानाचा जन्म झाला.नंतर त्यांना परत एक मुलगा झाला त्याचे नाव अहमद ऊर्फ बाबा.


नवविवाहित कैफी - शौकत 
शौकत यांनी ‘इप्टा’त कामे करून कैफींना मजबूत साथ दिली. शौकत यांचे अभिनय गुण शबाना व बाबात उतरले. कैफींची गरिबांसाठीची धडपड शबानात उतरली. एकदा शबाना आझमी यांना त्यांच्या एका चित्रपटाच्या शोसाठी कान चित्रपट महोत्सवात जायचे होते. जाण्यापूर्वी त्यांना कळले की मुंबईत कुठेतरी झोपड्या पाडल्या जात आहेत. तेव्हा शबाना यांनी कान महोत्सवाला जाणे रद्द करून झोपड्या वाचवण्यासाठी उपोषण सुरू केले. रणरणत्या उन्हात जमिनीवर बसून उपोषण करणा-या शबानांचा रक्तदाब वाढला. सर्व नातेवाईक चिंतेत पडले. कैफी आझमी बाहेरगावी गेलेले होते. लोकांना वाटले की त्यांना सांगितले तर कदाचित या जिद्दी मुलीला ते समजावून सांगू शकतील. कैफी आझमी एक मोठे कवी होते, आपल्या मुलीवर त्यांचे आत्यंतिक प्रेम होते आणि शबानाचे सर्वात चांगले मित्र होते; पण कैफी आझमी एक कम्युनिस्टही होते. त्यांची तार आली. त्यात लिहिले होते- ‘बेस्ट ऑफ लक कॉम्रेड’.

कैफींना मिळालेले चित्रपट पडत होते. त्या दरम्यान चेतन आनंद त्यांच्याकडे ‘हकीकत’ची कथा घेऊन गेले, तेव्हा कैफींनी साफ नकार दिला. पण आनंद म्हणाले,

हिर रांझाच्या एलपीचे कव्हर   
हिर रांझाच्या एलपी रेकॉर्डवर कैफींची छबी होती ..

‘‘तुम्ही चित्रपटाला ‘अनलकी’ आहात असे सारे म्हणतात आणि मलाही यश नाही. तेव्हा असे करू या दोघे ‘अनलकी’एकत्र येऊ या.’’ हकीकतने इतिहास घडविला. तो पहिला युद्धपट होता. मग आलेल्या ‘हिर रांझा’सारख्या चित्रपटात कैफींनी सगळे संवाद पद्यात लिहिले. तो विक्रम झाला. ‘कागज के फूल’पासून बरेच चित्रपट मिळू लागले. ‘गर्म हवा’ चित्रपटाबद्दल उत्कृष्ट संवाद, कथा, पटकथा असे तिन्ही राष्ट्रीय पुरस्कार कैफींना मिळाले. तोपर्यंत झंकार, आखिरे-शब, आवारा सज्दे हे काव्यसंग्रहही प्रसिद्ध झाले होतेच. नंतर चित्रपटगीतांचा ‘मेरी आवाज सुनो’ हा संग्रहही आला.

दरम्यान शबाना चित्रपटात चमकू लागली. शबानाला काही देऊ न शकल्याचे शल्य कैफींना होते. शबानाच्या एका वाढदिवशी त्यांनी तशी कविताही लिहिली होती.
'अब और क्या तेरा बिमार बाप देगा तुझे?
बस एक दुआ कि खुदा तुझको कामयाब करे
वो टाक दे तेरे आँचल मे चाँद और तारे
तू अपने वास्ते जिस को भी इन्तेखाब करे'....
खुदाने ही दुआ ऐकली. शबानाच काय तिने ज्याला इन्तेखाब (पसंद) केले त्याच्याही (जावेद अख्तर) झोळीत देवाने तारेच तारे टाकले. जावेद साहेबांनीही आपल्या सासर्‍याबद्दल लिहिलेली - 

'अजीब मर्द था वो 
मुहब्बतों का गीत था, बगावतों का राग था,
कभी वो फूल था, कभी वो सिर्फ आग था'
ही कविता वास्तविकच होती.

शबानांच्या यशात त्यांच्या प्रगतिशील वडीलांचा फार मोठा वाटा होता. शबाना म्हणतात की, लहानपणी त्यांना राजकारणात अजिबात रस नव्हता. त्या वर्तमानपत्रही वाचत नसत. पण खरी गोष्ट अशी आहे की, त्या राजकारणातच राहत होत्या. त्यांचे बालपण मुंबईतील रेड फ्लॅग हॉलमध्ये गेले. रेड फ्लॅग हॉल हे फक्त एका इमारतीचे नाव नाही, तर गरिबांसाठी लढलेल्या डाव्यांच्या लढाईचे ते एक महत्त्वाचे केंद्र आहे. आठ खोल्या आणि

कैफीजी,शौकतजी आणि शबाना
एक बाथरूम असलेल्या या इमारतीत आठ कुटुंबे राहत होती. प्रत्येक कुटुंबासाठी एक खोली होती. ही फक्त कुटुंबे नव्हती, तर या खोल्यांमध्ये राहणा-यांनी इतिहासाची दिशा ठरवली आहे. शौकत कैफी यांनी त्या काळातील आयुष्याचे वर्णन आपल्या पुस्तकात केले आहे. त्या म्हणतात की, रेड फ्लॅग हॉल पुष्पगुच्छासारखा होता. त्यात गुजरातहून आलेले मणिबेन आणि अंबूभाई, मराठवाड्यातील सावंत आणि शशी, यूपीचे कैफी, सुलताना आपा, सरदार भाई, त्यांच्या दोन बहिणी रबाब आणि सितारा, मध्य प्रदेशातील सुधीर जोशी, शोभा भाभी आणि हैदराबादची मी. रेड फ्लॅगमध्ये सर्वांची स्वयंपाकघरे बाल्कनीत असत. तेथे एकच बाथरूम आणि एकच शौचालय असले तरी मी कधीही कुणाला बाथरूमसाठी भांडताना पाहिले नाही.

शबानांच्या जन्मानंतर शौकत यांनी पृथ्वी थिएटरमध्ये अभिनयाची नोकरी केली. पृथ्वीराज यांनी रिहर्सलच्या वेळी शबानाच्या देखरेखीसाठी एका आयाची व्यवस्था केली. शबानांचे बालपण थिएटरच्या परिवारात गेल्याने त्या निष्णात अभिनेत्री होणे तर

कैफींची एक अदा 
निश्चित होते. एकदा शौकत पृथ्वी थिएटरसोबत टूरवर जात होत्या आणि त्यांनी कैफी साहेबांना काही पैशांच्या बंदोबस्ताची विनंती केली. रेल्वे चालू झाल्यावर कैफी साहेबांनी त्यांच्या हातावर तीस रुपये ठेवले. ही त्या काळात मोठी रक्कम होती. शौकत आश्चर्यचकित होत्या की, एवढे पैसे त्यांनी कुठून आणले. टूरवरून परतल्यानंतर त्यांना कळाले की, कैफी साहेबांनी पृथ्वीराज कपूर यांच्याकडून शौकतच्या पगाराची आधीच उचल केली होती. त्या दोघांनी आर्थिक अडचणी हसत खेळत झेलल्या. शबाना अभिनीत महेश भट्ट यांच्या 'अर्थ'साठी त्यांनी गीत लिहिले होते, 'तुम इतना जो मुस्करा रहे हो क्या गम है जिसको छुपा रहे हो...'

कैफींनी भारंभार गाणी लिहीली नाहीत पण जी लिहीली ती काळजाचा ठाव घेणारी ठरली. त्यातला अर्थपूर्ण आशय रसिकांच्या मनाला अलगद स्पर्श करणारा होता. 'चलते-चलते यूँ ही कोई मिल गया था' (पाकिजा), 'वक्त ने किया क्या हसीं सितम' (कागज के फूल), 'तुम बिन जीवन कैसा जीवन'(बावर्ची), 'तुम जो मिल गए हो तो ये लगता है...'

कैफी अल्बम कव्हर  
(हंसते जख्म), 'कुछ दिल ने कहा, कुछ भी नहीं' (अनुपमा), 'इक जुर्म करके हमने चाहा था मुस्कुराना' (शमा), 'जीत ही लेंगे बाजी हम तुम' (शोला और शबनम), 'ये नयन डरे डरे' (कोहरा), 'सारा मोरा कजरा चुराया तूने'(दो दिल), 'बहारों...मेरा जीवन भी सँवारो'(आखिरी खत), 'धीरे-धीरे मचल ए दिल-ए-बेकरार' (अनुपमा), 'या दिल की सुनो दुनिया वालों' (अनुपमा), 'मिलो न तुम तो हम घबराए' (हीर-रांझा), 'ये दुनिया ये महफिल' (हीर-रांझा), 'जरा सी आहट होती है तो दिल पूछता है' (हकीकत) ही त्यांची काही लोकप्रिय चित्रपट गीते होत...

आझमी कुटुंबाला जरा बरे दिवस आले, असे वाटावे असे दिवस तेंव्हा आले होते. इतकेच नव्हे तर विसाव्या शतकातील काही उत्कृष्ट चित्रपट कैफींच्या नावाने ओळखले जातात. ‘हीर रांझा’ हा चित्रपट पूर्ण होताच त्यांना पक्षाघाताने गाठले. सर्वोत्कृष्ट युद्धपट ‘हकीकत’ हा कैफींचा चित्रपट म्हणूनही ओळखला जातो . ‘गर्म हवा’, ‘कागज के फूल’, ‘मंथन’, ‘कोहरा’, ‘सात हिंदुस्तानी’, ‘बावर्ची’, ‘पाकीजा’, ‘हंसते जख्म’, ‘अर्थ’, ‘रजिया सुलतान’, असे चित्रपट कैफींमुळे अजरामर झाले. आज दहा वर्षे झाली. जिवात जीव आहे तोवर कैफी आझमी यांच्या आठवणी येतच राहतील. कैफींना पक्षाघाताने गाठले. पण लढवय्या कैफींनी त्याही स्थितीत आपल्या जन्मगावी (मिजवाँ, आझमगढ, उत्तर प्रदेश) जाऊन गोरगरिबांचे प्रश्न धसास लावले. ज्या गावात रस्ताही नव्हता, तिथे दूरदर्शन संच आणून रोज तो बघायला कैफी सगळ्या गावाला घरी बोलवत. मिजवाँत त्यांनी संगणकाचे क्लासही सुरू केले. गावाचा कायापालट केला.

एखादा कवी काय करू शकतो याचे हे चांगले उदाहरण आहे. कैफींकडे लहानपणापासून जबरदस्त सहनशक्ती व विनोदी वृत्ती होती. अगदी आजारपणातही ती कशी जागृत होती बघा. त्यांना पक्षाघातापूर्वी घरात चक्कर आली. तेव्हा शौकतजींनी विचारले, ‘‘सगळं ठीक आहे ना?’’ कैफी म्हणाले होते, ‘‘बायकोला बघून अशीच चक्कर येते गं.’’

पेशावर, कराचीत तालिबानी लग्न करून बायकांना सोडून पळून जातात, असे वृत्त कैफींनी एकदा वाचले होते. आजार गंभीर झाला तेव्हा कैफींची हालत बघून शौकतजी भाच्याला म्हणाल्या, ‘‘अख्तर, कैफी मला सोडून चालले रे..’’ तेव्हा कैफींनी ते ऐकले होते. शुद्धीवर आले तेव्हा कैफी शौकतजींना म्हणाले, ‘‘मी काय तालिबानी आहे का तुला सोडून जायला?’’ १० मे २००२ ला कैफी सर्वांना सोडून गेले. मेरी आवाज सुनो सांगत गेले. या देशासाठी जानोतन फिदा करीत गेले. आपल्यासारखे चाहते फक्त ‘वक्तने किया क्या हंसी सितम’ म्हणत राहिले. कैफी म्हणाले होते -

तारुण्याच्या उंबरठयावरील कैफी 
'गुर्बत की ठंडी छावों में याद आयी उसकी धूप
कद्रे-वतन हुई हमे तर्के-वतन के बाद
इन्साँ की ख्वाहिशों की कोई इम्तहाँ नही
दो गज जमीन चाहिए दो गज कफन के बाद..'
(परदेशात गेल्यावर देशाची किंमत कळते. तिथल्या शीतल छायेत देशातील प्रिय उन्हाची आठवण येते. माणसाच्या इच्छांची काही सीमा नाही. त्याला दोन मीटर कफनाचा कपडा दिला तरी तो दोन फूट जागा पुरण्यासाठी मागतो.)

दोनेक दिवसांपूर्वी कैफींचा जन्मदिवस येऊन गेला तेंव्हा ही सर्व गाणी पुन्हा फेर धरून समोर उभी राहिली, आता डोक्यातून ती लवकर जाणार नाहीत आणि समजा गेलीच तर काही सुप्त इच्छा जागृत करून जातील...आपल्याही इच्छा काही कमी नाहीत. चांगली माणसं कितीही जगली तरी वाटतं, अजून काही दिवस ते हवे होते....

- समीर गायकवाड.

संदर्भ ;
अर्ज किया है - कैफी आझमी
कैफी आझमी - प्रदिप निफाडकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा