शुक्रवार, २० एप्रिल, २०१८

शायरीची ताकद..

Image result for habib jalib poetry

१९७३ मधील ही घटना आहे. पाकिस्तानात जुल्फीकार अली भुट्टो यांचे सरकार स्थापन झाले होते. आपल्या यशाचा आणि सत्तेचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी आपल्या होम टाऊनमध्ये म्हणजे लरकानामध्ये एका मेजवानीचे आयोजन केले होते. अर्थातच अत्यंत उच्चस्तरीयांकरिता निमंत्रण होते. या मेजवानीत सर्व शाही बडदास्त राखण्याचे त्यांचे आदेश होते. पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरांना विशेष आदेश दिला गेला की या प्रसंगी नृत्याची अदाकारी पेश करण्यासाठी लाहौरची प्रसिद्ध नर्तिका मुमताज हिला वर्दी देण्यात यावी. गव्हर्नर साहेबांनी याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकारी अब्दुल गनी यांच्यावर सोपवली. त्यांनी मुमताजला गळ घातली पण पाकिस्तानी मैफलीत होणारे शोषण ठाऊक असल्याने तिने कानावर हात ठेवले. पोलिस युपी बिहारचे असोत की पाकिस्तानच्या सिंध पंजाबचे असोत त्यांचा एकच खाक्या असतो तो म्हणजे दडपशाही.
 
इथेही त्याचा प्रत्यय येतो. मुमताजच्या आईलाच पोलिसांनी बंधक बनवले ! तिच्यावर चोरीचा खोटा आळ घेतला. लाहौरच्या तत्कालीन फिल्मी वर्तुळात यावर रदाळ उठले. काही लोकांनी उघडपणे मुमताजची बाजू घेतली. काहींनी स्टुडीओ बंद ठेवून निषेध व्यक्त केला. त्या काळचे एक मोठे शायर हबीब जालिब यांनी या घटनेवर एक नज्म लिहिली जिचा पुढे पाकिस्तानमध्ये एक मुहावरा झाला ! हबीब यांनी लिहिले होते की,
"कस्रे शाही से ये हुक्म सादिर हुआ
लरकाने चलो, वरना थाने चलो
अपने होंठों की खुशबू लुटाने चलो
गीत गाने चलो, वरना थाने चलो।"
(राजमहालावरून हा हुकुम आलाय की लरकान्याला या नाहीतर ठाण्यात हजर व्हा, आपल्या ओठांचा सुगंध लुटवण्यासाठी चला, गीत गाण्यासाठी चला नाहीतर ठाण्यात हजर व्हा !)

आता पाकिस्तानात भुट्टोही नाहीत आणि मुमताजही नाही पण पाक पोलिसांनी कुठे जोर जबरदस्ती केली की पाकीस्तानी जनता आणि पाक प्रसारमाध्यमात ही म्हण वापरली जाते.


कवी शायर हबीब जालिब यांनी सामाजिक चेतनेचा अंगार फुलवणारी रचना निर्मिली. त्यांच्या सकल रचनात सामाजिक व्यंगावर आसूड ओढलेले आढळतात. त्यांनी अनेकवेळा थेट आंदोलने, मोर्चे, निषेध प्रदर्शने यात भाग घेतला. विशेष बाब म्हणजे पाकिस्तानच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांनी सत्तेविरुद्ध आणि सत्तेत असलेल्या प्रत्येक तानाशाहीच्या मौनी सत्ताधिशांविरुद्ध एल्गार केला. पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तर त्यांची लेखणी अधिक टोकदार झाली होती. स्वतःच्या लेखन प्रयोजनाबद्दल त्यांनी केलेलं भाष्य खूप भावते.
"मेरे हाथ में कलम है, मेरे जेहन में उजाला
मुझे क्या दबा सकेगा, कोई जुल्मतों का पाला..."

१९६५ च्या युद्धानंतर जनरल अयुब खान तथाकथित सार्वत्रिक निवडणुकाद्वारे सत्तेत आले तेंव्हा संपूर्ण देशात त्यांनी उत्सवांचे आयोजन केले होते. इराणचे शहा त्यावेळी योगायोगाने पाकच्या दौऱ्यावर होते. फेब्रुवारी १९६५ मध्ये लाहौरमध्ये एक खास समारंभ आयोजित केला होता. त्यातही पंजाबच्याच गव्हर्नरनी त्या काळातील सौदर्यवती नर्तकी नीलू हिला पाचारण केले होते. तिनेही आधी नकार दिला. पोलिसांनी तिच्यावरच जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. ती इतकी भेदरून गेली की पोलिसांचा पिच्छा सोडवण्यासाठी ती बाथरूममध्ये गेली आणि झोपेच्या गोळ्या खाऊन तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला बेशुद्धावस्थेत इस्पितळात नेलं गेलं. यातून ती वाचली पुन्हा कधीही तिचे पावलं थिरकू शकली नाहीत.

तेंव्हाही हबीब जालिब यांच्या ह्या रचनेने लोकांच्या मनावर जादू केली होती -
"रक्स जंजीर पहनकर भी किया जाता है, 
तुझ को इनकार की जुर्रत जो हुई तो क्योंकर
साया-ए-शाह में इस तरह जिया जाता है
रक्स जंजीर पहनकर भी किया जाता है...."
(नृत्य (पायात) साखळ्या घातल्या तरी करता येतं.
तुला नकाराची जी हिंमत झाली तर का हटतेस (विचार करतेस)
राजाच्या सावलीत असंच जगता येतं
नृत्य (पायात) साखळ्या घातल्या तरी करता येतं....)

विख्यात शायर फैज अहमद यांनीही याच वाटेवरची शायरी केली होती. सत्तेला आव्हान देणाऱ्या अशा रचनांची सातत्याने निर्मिती केल्याने हबीब जालिब यांच्या कायम तुरुंग वाऱ्या होत. एखाद्या वर्षी त्यांना अटक झाली नसली की लोक त्यावर टिप्पण्या करत.

आसपासच्या घटनावर मौन राहणारा साहित्यिक हा जनमनाचा साहित्यिक नसून स्वकोषात रममाण होणारा निव्वळ शब्दप्रेमी असतो. त्याच बरोबर केवळ ठराविक एका राजवटीविरुद्ध, वा पक्षाविरुद्ध बोलणारा किंवा एकाच राजवटीचे गुणगान गाणारा, तळी उचलून धरणारा साहित्यिकही साहित्यिक न राहता एक छुपा प्रचारक ठरतो.

समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर सगळेच 

साहित्यिक बोलू शकत नसतील हे जरी गृहीत धरले तरी समाजमन हेलावून टाकणाऱ्या घटना घडत असताना सोयीस्कर मौन पत्करत स्वमग्नतेच्या भिंतीत कोंडून राहणारे साहित्यिक स्वतःची वेदना थोडीफार चागली लिहितही असतील पण त्यांना सामाजिक वेदना खऱ्या अर्थाने चितारता येणार नाही कारण त्या जाणीवा, त्या संवेदना त्यांनी जगलेल्या नसतात त्यावेळी त्यांच्या अनुभूती त्यांनीच बोथट करून ठेवलेल्या असतात.
सृजनशीलता नसेल तर सामाजिक लेखनातला प्राण आपसूक हरवतो !

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा