Friday, April 6, 2018

सुचित्रा सेन - एक रुखरुख !


ती बॉलीवूडची पहिली पारो होती !
तिने केवळ सात हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केला होता आणि तब्बल २५ सिनेमे नाकारले होते !!
बिमल रॉय यांच्या 'देवदास'मध्ये एका सीनमध्ये दिलीप कुमार या पारोला पाहून म्हणतात, ‘तुम चांद से ज्यादा सुंदर हो, उसमें दाग लगा देता हूंआणि तिच्या कपाळावर छडी मारून जखमी करतात. पारो नुसती हसते, पण तिचे डोळे सगळं सांगून जातात.

या पारोच्या वास्तव आयुष्यातही असंच झालं होतं. तिच्या चेहऱ्यावर याचा व्रण राहिला नाही पण तिच्या काळजावर मात्र जखम राहिली. जी आयुष्यभर भळभळत राहिली, पण तिने कधी त्याची वाच्यता केली नाही. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत. पण लोकांनी तोपर्यंत तिचं झुरणं हेरलं होतं. मग तिने लोकांनाच टाळलं. स्वतःला जगापासून विलग केलं, एकांतवासाच्या काळकोठडीत ती त्याच्या स्मृतीत जगू लागली. एके काळी शेकडो कॅमेऱ्यांचे फ्लॅश जिने रोज आनंदाने झेलले तिनं स्वेच्छेने अंधारला विजनवास पत्करला होता. ती जगापासून इतकी दूर झाली की ती अनेक दिवसांपासून आजारी असल्याचेही बाह्यजगाला लवकर कळले नाही. तिच्या श्वसननलिकेत जंतूसंसर्ग झाल्यामुळे कोलकात्यातील बेल व्ह्यू क्लिनिक या खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. १७ जानेवारी २०१४ च्या शुक्रवारी सकाळी तिची प्रकृती अधिकच खालावली आणि साडेआठच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने तिची सुटका झाली. मग सगळीकडे तिच्यासाठी हळहळ व्यक्त होऊ लागली.

भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक शोभेच्या बाहुल्या होऊन गेल्या तर अनेक सौंदर्यवती ठोकळया अभिनेत्र्याही होऊन गेल्या. यातील काही नुसत्याच देखण्या पऱ्या होत्या. हाताच्या बोटावर मोजण्याजोग्या अशा अभिनेत्री बॉलीवूडमध्ये आढळतात की ज्यांना अप्रतिम सौंदर्य लाभलं आणि उत्तुंग प्रतिभाशक्तीचा अभिनयही साकार करता आला. ती मात्र जबरदस्तच होती, तिच्या सशक्त अभिनयाची धास्ती पुरुष अभिनेत्यांना होती हेच तिच्या ओळखीसाठी पुरेसं ठरावं.

ती काही अगदी टिपिकल लाखात एक देखणी नव्हती पण तिचं दिसणं जादुई होतं, तिचं हसणं मधाळ होतं. तिचा खर्जातला आवाज काळजाला हात घालायचा. ती खूप सोज्वळ दिसे. तिचे डोळे विलक्षण बोलके होते. काहीही संवाद दिले नसते तरीही ती व्यक्त होऊ शकली असती. निमुळती हनुवटी, चाफेकळी नाक आणि उभट चेहरा यांच्या जोडीला रुंद कपाळ तिच्या सौंदर्याला खुलवे. तिच्या कपाळावरची केसांची महिरप तिला खूप शोभून दिसे. मधोमध भांग पाडून सैल अंबाडा बांधलेली तिची छबी माझ्या मनी कायमची कोरली गेलीय. भूमिका निवडण्याच्या बाबतीत ती फार चोखंदळ होती. ती एकमेव असेल की जिच्यात मी माझ्या आईलाही पाहिलं आणि पत्नीलाही पाहिलं !

तिने माकडउड्या मारत नाच केला नाही की आक्रस्ताळेपणा करत ढसाढसा रडत रडूबाईही साकारली नाही. तिच्या डोक्यावर बहुतांशी पदर असायचाच पण ती कधीही काकूबाई वाटली नाही. तिच्याकडे पाहून उन्मत्त मदालसाही कधी आठवली नाही पण तिच्यावर आसक्त व्हावं असा हळुवार शृंगारभाव तिच्या ठायी होता. ती कधी मेकअपने फारशी चोपडून घेतलेली दिसली नाही पण विना रंगरंगोटीचं ती कॅमेऱ्याला अनेकदा सामोरं गेली. क्वचित कधी तिनेही बिकिनी घातली पण तेंव्हाही ती उठवळ वाटली नाही, तिच्यात भारतीय स्त्रीचं रूपलक्षण ठासून भरलं होतं. ती 'दुर्गा'ही वाटे आणि 'अबला'ही वाटे हे तिच्या अभिनयाचे श्रेय ! तिची संवादफेक खतरनाक होती ('आंधी' याची प्रचीती येते). तिच्यातला विद्रोह खासच होता. तिच्या भूमिकात जशी ती जगायची प्रत्यक्षातही ती तशीच होती. ती सेटवर शांत बसून असे. चित्रपट अभिनेत्री आरसपानी देखणी, रसरशीत, आखीव, रेखीव आणि कमनीय बांध्याची असली तरच कलेजा खल्लास करू शकते या सिद्धांताच्या ठिकरया उडवून केवळ आणि केवळ आपल्या तरल अभिनयाने काळजात रुतून बसलेली सुचित्रा सेन काही केल्या डोक्यातून, काळजातून जात नाही...

माझ्या ज्या वयात हनुवटीला धरून आई भांग पाडायची त्या काळात हिने चित्रपटात काम करणं बंद केलं आणि आता मी पोक्ततेकडे झुकत असताना तिच्या प्रत्येक चित्रपटाचे आणि तिचेही सुप्त आकर्षण कायम आहे. ती माझ्या आधीच्या पिढीतील लोकांची हिरॉईन होती तरीही माझी वन ऑफ फेव्हरीट आहे. बाह्य जगापासून तीन दशकं स्वतःला कोंडून घेणारी सुचित्रा सेन म्हणजे काही शोभेची बाहुली नव्हती की निव्वळ नटवी नव्हती की मख्ख तोंडाची सुंदरी नव्हती की ठोकळेबाज अभिनय करणारी अप्सरा रंभा नव्हती. तिची स्वतःची स्पेस होती, ती गेल्यानंतर तिची जागा तशीच रिकामी आहे.... काय होतं हिच्यात ? खरं तर याचं उत्तर मी अजूनही शोधतोच आहे...

तिचा जन्म एप्रिल १९३१ चा. तिचं जन्मस्थळ पाबना हे ब्रिटीश काळातील बंग प्रांतातले छोटंसं गाव होतं. आता ते बांग्लादेशात आहे. मात्र तिची जडण घडण झाली ती सिटी ऑफ जॉय कोलकातामध्ये. त्यामुळेच की काय ती शहरी भूमिकांत एकदम मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेट वाटे ! रोमा दासगुप्ता हे तिचे खरं नाव. सिनेसृष्टीत मात्र ती सुचित्रा सेन या नावानेच प्रसिद्ध होती. १९५२ ते १९७८ पर्यंत सिनेक्षेत्रात ती कार्यरत होती. १९५२ मध्ये शेष कोठाईया बंगाली सिनेमातून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. तिला बंगाली सिनेमांमधील महानायिका असं आजही म्हटलं जातं आणि 'आंधी' या हिंदी सिनेमातली तिची भूमिका खूप गाजली होती. तिने केवळ सात हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केला होता आणि तब्बल २५ सिनेमे नाकारले होते. १९५५ मध्ये आलेला बिमल रॉय यांचा देवदास, १९५७ मधे ऋषीदांच्या 'मुसाफिर' आणि भारतभूषणच्या 'चंपाकली'मध्ये ती दिसली होती. या नंतर १९६० मधले राज खोसला यांचे देव आनंदसोबतचे बम्बई का बाबूआणि 'सरहद', याशिवाय १९६६ मधील असित सेन यांच्या ममतामध्ये ती झळकली होती. १९७५ मध्ये गुलजार यांच्या आंधीचित्रपटानंतर तिने बॉलीवूडला कायमचे अलविदा केलं होतं.

या आकडेवारीतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. बंगालीतून हिंदीत यायला तिला फक्त तीन वर्षे लागली. बिमल रॉय सारख्या ऑल टाईम ग्रेट दिग्दर्शकाद्वारे तिने यशाची तुफानी मुहूर्तमेढ रोवली. पण त्यानंतर तब्बल पाच वर्षात तिने फक्त चार सिनेमे केले ! असं आजकाल कुठं घडतं का ? एका यशाने हुरळून गेलेले लोक खंडीभर सिनेमे साईन करतात आणि अभिनयाच्या नावाखाली पाट्या टाकत राहतात. सुचित्रा याला अपवाद होती. १९५५ नंतर थेट पाच वर्षांनी सिनेमात आपलं दर्शन देणाऱ्या सुचित्राने त्यानंतर थेट सहा वर्षांनी आणि त्याही नंतर थेट नऊ वर्षांनी हिंदीत काम केलं. बॉलीवूडमधला खोटारडा अप्पलपोटेपणा आणि हुजरेगिरी यांना ती कटाक्षाने टाळायची. गॉसिपपासूनही ती लांब राहायची. किंबहुना तिच्या वाट्याला कुणी जाऊच नये असं तिचं वागणं असे. चित्रपट अभिनेत्रीला जे भपकेबाज जगणं किंवा जी रीच लाईफस्टाईल अभिप्रेत असते त्यापासून ती कोसो दूर होती. यामुळे तिला कधी घमेंडी म्हटलं गेलं तर कधी स्वांतसुखायचा शिक्का बसला पण तिने जगाची कदर कधीच केली नाही.

आपल्या मातृभाषेतही तिने ढीगभर भूमिका साकारल्या नाहीत, बंगालीमध्ये तिने पन्नासहून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला होता. तिचे सिनेमे इंन्व्हेंट्रीहून जास्त व्यवसाय करायचे असंही काही नव्हतं. तिचा सिनेमा हिट झाल्यावर मात्र बॉक्स ऑफिसवर त्याचेच वर्चस्व असे. एकुणात तिने फक्त ६१ सिनेमे केले. त्यातले २२ ब्लॉकबस्टर हिट ठरले. १३ सुपरहिट ठरले, ५ सिनेमांनी सरासरी व्यवसाय केला आणि जवळपास २१ सिनेमे फ्लॉप गेले. तिला एखादी भूमिका आवडली की तो सिनेमा चालेल की नाही असलं व्यवसायिक गणित घालता ती लगेच होकार देई. त्यामुळे तिच्या नावावर अनेक पडेल सिनेमे नोंदले गेले. पण तिच्या नावावर फडतूस भूमिका कधीही नोंदली गेली नाही हे तिचं वेगळेपण !

ती यशाच्या शिखरावर असताना सत्यजित रे यांनी तिला 'देवी चौधरानी' या चित्रपटातील मुख्य भुमिकेसाठी विचारलं होतं. ती शब्दाची पक्की होती, तिने तारखा दिलेले बॅनर आणि निर्माते दिग्दर्शक यथातथाच होते, ती त्यांना सहज लटकतं ठेवून रेंच्या चित्रपटाचं शुटींग सुरु करू शकली असती. पण तिने विनम्रतेने वर्षभराचा वेळ मागितला. सत्यजित रें कडे तितका वेळ होता. त्यांनी तोपर्यंत तो प्रोजेक्टच बाजूला ठेवला. दरम्यान सुचित्राने नवे चित्रपट घेणेच बंद केलं आणि सत्यजीत रेंनी देखील कमाल केली. 'देवी चौधरानी'साठी सुचित्रा नाही तर कोणी नाही असं म्हणत त्यांनी तो सिनेमा फ्लोअरवर आणलाच नाही ! इतकं तिचं गारुड होतं पण तिचे पाय मातीचेच होते, यश कधी तिच्या डोक्यात भिनलं नाही की कधी ती उश्रुंखल वागली नाही ! असं असूनही तिने कॅमेऱ्याचा हव्यास धरला नाही की प्रसिद्धीसाठीही ती भुकेली राहिली नाही.

१९७८ नंतर ती कधीही कॅमेऱ्याच्या समोर आली नाही. तब्बल ३५ वर्षे तिने स्वतःला कोंडलं. आयुष्यातली ही शेवटची दशकं तिने एका छोट्याशा फ्लॅटमध्ये व्यतीत केली. यातली काही वर्ष तिने रामकृष्ण मिशनसाठी काम केलं. अभिनय सोडल्यानंतर ती इतकी एकलकोंडी झाली होती की खासगी आयुष्य जपण्यासाठी ती चक्क दादासाहेब फाळके पुरस्कार घेण्यासाठीही गेली नव्हती. काही वर्षांपूर्वी तिच्यावर मालिका सुरू करण्यात आली होती, मात्र तिने आक्षेप घेतल्यानंतर ती बंद करण्यात आली. तिच्या हातात असते तर तिने स्वतःच्याच चित्रपटाचे प्रक्षेपणदेखील थांबवले असते. सिनेसृष्टीतील बहुमोल्य योगदानासाठी तिला पद्मश्री आणि बंग विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. देवदाससाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आंतरराष्ट्रीय चलचित्र महोत्सवात आंतरराष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री होती. १९६३ मध्ये मॉस्को चित्रपट महोत्सवात सात पाके बाँधाया सिनेमातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

तिच्या भूमिकाही तिच्यासारख्याच अनोख्या असायच्या. विख्यात बंगाली साहित्यिक आशुतोष मुखर्जी यांच्या 'नर्स मित्र' या लघुकथेवर प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक असित सेन (कॉमेडियन असितसेन नव्हेत) यांनी १९५९ मध्ये प्रतिभाशाली अभिनेत्री सुचित्रा सेन हीला लीड रोलमध्ये घेऊन 'दीप ज्वले जाये' हा बंगाली चित्रपट बनवला होता. याचा हिंदीतला रिमेक त्यांनी वहिदा रेहमानला घेऊन केला गेला. या भूमिकेने सुचित्राला खूप मानसिक त्रास झाला होता हे विशेष ! एका नर्सच्या जीवनावर आधारित कथा यात होती. ती मानसिक रुग्णांना स्नेह देऊन आणि सेवा करून निरोगी बनवते. मात्र तंदुरुस्त झाल्यावर ते लोक उपचाराचे प्रक्रियेचे प्रेम विसरून जातात. शेवटी प्रेमाच्या या प्रयोगशाळेत रोज तेच काम केल्यामुळे एक दिवस नर्स खुद्द त्याच रोगाने ग्रस्त होते. सुचित्रा सेनने अत्यंत विलक्षण अभिनय केला होता. याच प्रकारे ममताआणि त्याचे बंगाली मूल सात पाके बाधामध्ये सुचित्रा सेनने आई आणि मुलीची दुहेरी भूमिका केली होती. आईच्या पात्राला तिचा नवराच इतर पुरुषांना विकतो आणि ती तवायफहोते. मात्र ती मुलीला त्या वातावरणापासून वेगळे ठेवते आणि उच्च शिक्षण देते. मात्र तिचा नवरा मुलीलादेखील कोठय़ावर नेऊ पाहतो. त्यामुळे ती नवर्याचा खून करते. असं यातलं कथानक होतं.

सोळा वर्षाच्या सुकुमार वयात रोमाचं लग्न झालेलं. तिचे वडील करुणामोय दासगुप्ता हे एक पारंपरिक मूल्य जपणारे शिक्षक होते. आपल्या मुलीचे लग्न त्यांनी मोठ्या थाटामाटात आदिनाथ सेन ह्या धनाढ्य उद्योगपतीसोबत करून दिले होते. लग्नानंतर रोमा दासगुप्ताची सुचित्रा सेन झाली. लग्नाच्या चार वर्षांनंतर तिला आपल्या निर्णयक्षमतेतील गप्प बसण्याच्या सोशिक वृत्तीवर वाईट वाटू लागले. यावर तिने बराच विचार केला आणि पारंपारिक उंबरठा ओलांडण्याचे ठरवले ! रडत बसण्यापेक्षा तिने काही तरी वेगळे करून दाखवायचे ठरवले आणि तिच्या अभिनयाचा प्रवास सुरू झाला. यात तिच्या पतीने तिला खूप साथ दिली. या दांपत्यास एक कन्यारत्नही प्राप्त झाले मात्र कालांतराने तिच्या रुपेरी पडद्यामुळेच त्यांच्यात एक अदृश्य भिंत उभी राहिली. पण त्यांनी एकमेकला त्यागले नाही. अखेर १९७० मध्ये तिचे पती आदिनाथ निवर्तले. या दरम्यान तिच्या मनात प्रेमाची स्नेहाची आणि आस्थेची निसर्गसुलभ ओढ निर्माण झाली. पण त्याला तिने कधी मूर्त स्वरूप दिले नाही त्यामुळे याचे खमंग गॉसिप स्वरूप चर्वण कधीही होऊ शकले नाही.

सुचित्राची भूमिकांची निवड जशी वेगळ्या वाटेवरची होती तशीच निवड तिच्या मनातील जोडीदाराचीही होती. दिसायला एकदम सोबर आणि सामान्य व्यक्तीमत्वाचा ठाशीव भारतीय कॉमन पुरुषांचा तोंडवळा असणाऱ्या बंगाली अभिनेता उत्तमकुमारवर तिने जीव लावला. उत्तम कुमारसोबत तिने अनेक सिनेमांत प्रमूख भुमिका केल्या. मात्र आपल्यामुळे त्याचे व्यक्तिगत वैवाहिक जीवन उध्वस्त होऊ नये याची पुरती खबरदारी तिने घेतली होती. विशेष बाब म्हणजे उत्तमकुमारचे लग्नही सुचित्राच्या लग्नानंतर एक वर्षाने म्हणजे १९४८ मध्ये झाले होते. त्याची पहिली पत्नी गौरी हिला १९६३ मध्ये त्याने घटस्फोट दिला तेंव्हा सुचित्राच्या मनात वादळ उठले होते पण तिचे पती हयात होते. अखेर उत्तमकुमारने दुसरे लग्न केलं. सुचित्राची मैत्रीण असलेली बंगाली अभिनेत्री सुप्रिया देवी ही त्याची दुसरी पत्नी होती. सुप्रियादेखील एक प्रतिभाशाली अभिनेत्री होती. तिलाही पद्मश्री, बंगभूषण पदव्यांनी गौरवलं गेलं. तिला फिल्मफेअरसह विदेशी पुरस्कारही मिळाले होते. पण हे लग्न म्हणजे उत्तमकुमारने स्वतःवर उगवलेला सूड होता. कारण सुप्रियाचं व्यक्तिमत्व सुचित्राच्या विरुद्ध टोकाचे होते ! यातून जे व्हायचे तेच झाले. त्यानेही स्वतःचं दुःख कुणापुढे मांडलं नाही. अखेर १९८० साली हृदयविकाराच्या धक्क्याने ही कोंडी फोडली. उत्तमकुमारचं अकस्मात निधन झालं आणि सुचित्राने स्वतःला कोंडून घेतलं !

या सगळ्याचा तिच्या मुलीवर मूनमून सेनवर मात्र आत्यंतिक परिणाम झाला. ती आपल्या आईच्या विरुद्ध टोकाचं असणारं भयंकर विस्फोटक आणि वादग्रस्त करिअर जगली. स्वतःला असुरक्षित आणि अधुरं समजत राहिल्याने तिचं करिअर कधीच ठोस स्वरूप घेऊ शकलं नाही. पण तिचं आईवर असणारं प्रेम तसूभरही कमी झालं नाही. डिसेंबरमध्ये सुचित्राचं आजारपण जगापुढे आलं तेंव्हा तिच्या सर्व इच्छा आणि मनीषा जाणणारी मूनमून सेन ही एकटीच होती ! १४ जानेवारी २०१४ ला सुचित्राने अखेरचा श्वास घेतला.

आजही मागे वळून पाहताना सुचित्रा सेनच्या आयुष्याकडे पाहताना तिचा संयम आणि तिच्या निष्ठा यांचा हेवा वाटतो. आजकालच्या बेगडी प्रेमाच्या दुनियेत असं स्वतःला मर्यादेत आखून घेतलेलं जाज्वल्य जीवन नजरेस पडत नाही. सगळी चकाचौंध मागे टाकून एकट्याने राहणं ही देखील तपस्याच होती. कदाचित या काळात नियतीनं घातलेलं कोडं सोडवण्याचा प्रयत्न तिने करून पाहिला असावा पण त्यातही अपयश आल्याने तिने रामकृष्ण मिशनचा देखील निरोप घेतला होता. नेमकं काय घडलं असतं तर सुचित्रा, उत्तम कुमार, गौरी, सुप्रिया आणि आदिनाथ यांच्या जीवनात सुलभता आली असती याचे उत्तर मलाही गवसले नाही. नियतीच्या या अनाकलनीय खेळीमुळे एका प्रतिभाशाली अभिनेत्रीने विजनवास स्वीकारला ही खंत मात्र सोलून काढते...

सुचित्रा तुझी ही रुखरुख सदैव माझी सोबत करेल ...

"कहाँ से चले कहाँ के लिये
ये खबर नहीं थी मगर
कोइ भी सिरा जहाँ जा मिला
वहीं तुम मिलोगे
के हम तक तुम्हारी दुआ रही थी ......"

आयुष्यातील अनेक वळणावर तिचे सिनेमे पाहण्यात आले आणि तिची आखीव रेखीव इमेज हृदयात ठाशीव होत गेली.... तिला मी कधी लाइव्ह पाहिलं नाही पण तिच्या स्मृतीसाठी एक दुआ मनात नेहमी येत राहील हे खरे ....

- समीर गायकवाड.

(खुलासा - १९३६ मधला के.एल.सैगल अभिनित 'देवदास' हा जरी पहिला देवदास असला तरी स्वातंत्र्योत्तर भारतातील बॉलीवूडचे प्रतिनिधित्व करताना दिलीपकुमार अभिनित 'देवदास' हा पहिला गृहीत धरून त्या अर्थाने सुचित्रा सेन या पहिल्या पारो होत्या असे विधान प्रारंभी केले आहे. गैरसमज नसावा)