Friday, April 27, 2018

‘गॉडफादर’ आणि मारियो पुझो .....


जन्माने इटालियन असलेला, रुंद हाडापेरांचा, साठी ओलांडलेला व्हिटो कॉलिऑन हा 'डॉन' आहे. दिसायला एखाद्या शेतकऱ्यासारखा ओबडधोबड, जाडजूड, बुलडॉगच्या तोंडवळ्याचा आणि घोगऱ्या आवाजाचा. व्हिटो अतिशय बुद्धिमान आणि तितकाच सतर्क. तो टेलिफोनवरच्या संभाषणात कधीच उपलब्ध होत नाही. अशा संभाषणाचे चोरटे ध्वनिमुदण होऊ शकते, ही त्याची भीती. त्याच्या बापाची इटलीमध्ये कॉलिऑन गावात निर्घृण हत्या झाली होती. कदाचित त्याचा पुत्र व्हिटो पुढेमागे सूड घेईल, म्हणून पोरसवदा व्हिटोला नेस्तनाबूत करण्यासाठी त्याचे दुष्मन सरसावले होते. त्या भीतीमुळेच व्हिटो अमेरिकेत पळून येतो.

मारिओ पुझोने आपल्या 'गॉडफादर'कादंबरीत डॉनच्या कुटुंबाची कथा विस्ताराने सांगितली आहे. त्याला तीन मुले असतात. सर्वात थोरला उंच सहा फुटी सॅटीनो तथा सनी, मधला अय्याशी रंगीला रतन कुटुंबाच्या दृष्टीने कुचकामी असणारा फ्रेडो. तर सर्वात धाकटा कुरळ्या केसांचा माईक तथा मायकेल. तो नुकताच दुसऱ्या महायुद्धात जपानी सैनिकांच्या विरोधात लढून माघारी आलेला आहे. त्याला युद्धातल्या बहाद्दुरीबद्दल गॅलेंट्री अॅवार्डही मिळाले आहे. मायकेलला आपल्या कुटुंबाचे काळे धंदे आणि कार्यपद्धती या दोन्हीबद्दल कमालीचा तिटकारा आहे. आपले आडनावही बदलून या गँगस्टर कुटुंबापासून फारकत घ्यावी, असे त्याला वाटते. एक गणिताचा साधासुधा प्राध्यापक होण्याची त्याची मध्यमवर्गीय आकांक्षा आहे. 

अमेरिकेतील अंडरवर्ल्डवर फक्त पाच बलाढ्य गँगस्टर कुटुंबांची दहशत असते. त्या सर्वांमध्ये व्हिटो कॉलिऑनने आपले स्वत:चे वेगळे स्थान आणि प्रचंड दबदबा निर्माण केला आहे. 'फ्रेंडशिप', 'यारी दोस्ती' हे त्याच्या जीवनाचे जणू प्राणसूत्र आहे. एखाद्याला एकदा दोस्त मानला की बस; त्याच्यासाठी कासेची लंगोटीसुद्धा काढून द्यायची त्याची तयारी. दारात आलेल्या याचकाची अडचण, ही डॉनची स्वत:ची अडचण. त्याला एखाद्याने 'गॉडफादर' मानले की बस; तो त्याच्या पाठीशी कड्यासारखा खडा राहतो. जी सावली एखाद्या धनिकाला, तोच गाढा स्नेह गरीबालाही.  जे असेल ते तोंडावर बोलायचं, हा व्हिटोचा निर्भीड स्वभाव.

कादंबरी आणि चित्रपटाचीही सुरुवात डॉनची कन्या कानी हिच्या विवाहाच्या पार्टीनेच होते. त्यासाठी (ऑगस्ट १९४५) लाँग बीचवर डॉन व्हिटोने भव्य स्वागतसोहळा आयोजित केला आहे. तेथील उंची मेजवानी झोडण्यासाठी डॉनचे अनेक यारदोस्त, आश्रित, चाहते एकत्र आले आहेत. त्यांच्या हातामध्ये वधूच्या भेटीदाखल आणलेले गच्च डॉलरनी फुगलेले लिफाफे असतात. आजचा दिवस कन्येच्या विवाहाचा असला, तरी डॉन बाजूच्या खाजगी खलबतखान्यातही लोकांसाठी उपलब्ध असतो. मधूनच तो मेजवानीतून उठतो आणि कार्यालयात डोकावतो. लोकांची गाऱ्हाणी ऐकतो. या मंगलदिनी तो कोणत्याही मागणीला नकार देणार नाही, याची त्याचे आश्रित आणि चाहत्यांना खात्री असते.

पुझोने लिहिलेला आणि कोपोलाने सेल्युलॉइडच्या मखरात बसवलेला व्हिटो कॉलिऑन खूप वेगळा गँगस्टर आहे. त्याच्याकडे फक्त रक्त गोठवणाऱ्या दहशतीचे मनगट नाही; तर मन आणि मेंदू असणारा तो रक्तामांसाचा एक अफलातून देह आहे. त्याच्याकडे हिंसाचाराचे भयंकर हत्यार आहे. वेळ आल्यावर त्या हत्याराचा वापर करताना तो कोणाला दयामाया दाखवत नाही. सामान्य पीडितांसाठी त्याचे हृदय उदार आहे. मात्र त्याचा मेंदू खूपच लोकविलक्षण आहे. टॉम हेगन नावाचा एक आश्रित मुलगा त्याच्याकडे वाढतो. डॉनही, त्याचा मानसपुत्र मानून सांभाळ करतो. टॉमने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र तो वकिली करत नाही. डॉन व्हिटोला कायदेशीर सल्ला देत त्याच्याकडे जीवन कंठणे हाच त्याच्या आयुष्याचा धर्म. परंतु व्हिटोचे व्यवहारचातुर्य इतर कोणापेक्षाही श्रेष्ठ. अमेरिकेतील अनेक जज्ज आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी व्हिटोच्या हजेरीपत्रकावर असतात. न्याय आणि पोलिस खात्यामध्ये असलेला त्याचा दबदबा अन्य कोणत्याही गटाकडे नसतो.

संभाषणकलेत व्हिटो उस्ताद आहे. वाटाघाटीच्या मेजावर तर तो सर्वांच्या बापाचा बाप आहे. सलग आठ-आठ तास न थकता आपले मुद्दे लावून धरत मसलतीच्या मेजावर बसलेल्या डॉनला टॉमने अनेकदा पाहिले आहे. तो कोणावर न चिडता, न संतापता, अगदी शांत स्वरात आपले मुद्दे पटवून सांगतो. प्रसंगी तो अपमानही गिळतो आणि धमक्याही सहन करतो; परंतु अंतिम यश घेऊनच तो वाटाघाटीतून उठतो. अशा ठिकाणी त्याची कोंडी करणारा, त्याला नडणारा मनुष्य नंतर दोन-तीन महिन्यांच्या अवधीतच जगातून नाहीसा होतो, हा भाग वेगळा !

आरंभीच्या स्वागतसोहळ्यात डॉनला भेटणाऱ्या भक्तांमध्ये जॉनी फाँटेन हा गायक अभिनेता असतो. आपल्या गॉडफादरला भेटण्यासाठी तो तीन हजार मैलांवरून येतो. जॉनी आरंभीच्या काळात एका जाचक करारामध्ये अडकलेला असतो. डॉन मार्फत जॉनीच्या मालकाच्या डोक्यावर सरळ पिस्तुल ठेवून त्याला धमकावले जाते; 'बऱ्या बोलाने कागदावर सही उतरवणार की, आम्ही तिथे तुझ्या मेंदूचा लगदा उतरवू?' आता जॉनीला हॉलिवुडच्या एका सिनेमात नायकाचे काम हवे असते. ते मिळत नाही, म्हणून तो आपल्या गॉडफादरला गाऱ्हाणे घालतो. डॉन त्याचे काम करण्याचे वचन त्याला देतोच; पण त्याचवेळी जॉनीने आपली प्रथम पत्नी आणि मुले सोडून एका चटकचांदणीच्या मागे का लागावे, म्हणून तो त्याची खरडपट्टी काढतो. 

डॉनला भेटणाऱ्या याचकांमध्ये अमेरिगो बोनासेरा हा एक आहे. त्याच्या लाडक्या लेकीवर तिचाच मित्र अत्याचार करतो. आणखी काही मित्रांना बोलावून तिची अब्रू लुटायचा प्रयत्न करतो. ती नकार देताच तिला बेदम मारून विकलांग केले जाते. तिला इस्पितळात दाखल केलेले असून, तिचे दात वायरने शिवलेले आहेत. न्यायालयाचा तराजू धनिकांच्या बाजूने झुकतो. ती बाळे न्यायालयातसुद्धा सुटतात. मात्र सुटका झाल्यावर त्या पोरांच्या आणि त्यांच्या पालकांच्या डोळ्यातील विजयी दर्प अमेरिगोला खूप अस्वस्थ करतो. त्यांचा समूळ काटा काढायची विनंती तो डॉनला करतो. मात्र डॉन त्याला सांगतो, 'तू जेवढ्या प्रमाणात न्याय मागतोस, तेवढ्या प्रमाणात तो मिळणार नाही. कारण ती कार्टी अजून जिवंत आहेत.' मात्र वचनाप्रमाणे डॉन वागतो. अमेरिगोच्या मुलीसारखाच तो त्या पोरांचीही हाडे मोडून त्यांना तेवढ्याच प्रमाणात विकलांग करण्याची व्यवस्था करतो.

चित्रपटाच्या सुरुवातीला टाइट क्लोजअपमध्ये अमेरिगोची छबी दिसते अन् हळूहळू चित्रपट उलगडत जातो. पुझोने ही कहाणी मानवी पातळी सोडून कल्पिताच्या उंच झोक्यावर फारशी जाऊ दिलेली नाही. त्या स्वागतसोहळ्यातल्या गमतीजमती तरी किती ? डॉनच्या मोठ्या मुलाचा, सनीचा डोळा जातो तो आपल्या बहिणीच्या मुख्य करवलीवर-लिसी मॅन्सीवर. तिथेच चारचौघींत सनीची बायको आपला नवरा कसा पट्टीचा इष्कबाज आहे, त्याने तिला किती गोड शारीरिक वेदना दिल्या, हेही सांगते. आपल्या विवाहानंतर एका वर्षाने आपला नवरा बाहेरही अशा चढाया करतो, असे आपणाला जेव्हा कळले, तेव्हा 'मी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि चर्चमध्ये जाऊन मेणबत्ती लावली,' अशी कबुली सनीची बायको देते. ती गंमत ऐकून करवली झालेल्या ल्युसीच्या 'गुप्तांगात गुदगुल्या होतात' असे लेखक लिहितो. ज्या इमारतीच्या बाहेर आपल्या बहिणीचा विवाहसोहळा सुरू आहे, त्याच इमारतीच्या आतल्या बाजूला करवलीशी प्रणय करायचा पराक्रमही सनी करतो.

हॉलिवुडच्या चित्रपटउद्योगाच्या भोवती घिरट्या घालणारे गँगस्टर आणि त्यांचे कारनामेही कादंबरीत विस्ताराने आले आहेत. जॉनी फाँटेनची व्यक्तिरेखा प्रसिद्ध अभिनेता फ्रँक सिनात्रावरून घेतल्याची कुजबूज 'गॉडफादर' कादंबरीच्या प्रकाशनाबरोबरच अमेरिकेत सुरू झाली होती. एकदा एका उपाहारगृहात कोणीतरी लेखक मारियो पुझोची अभिनेता फ्रँक सिनात्राशी ओळख करून दिली. तेव्हा फ्रँक मनातून पुझोवर एवढा चिडलेला होता की, तो सरळ त्याला मारहाण करण्यासाठी पुढे धावला होता. हे प्रकरण बीबीसी वाहिनीपर्यंत वेगळ्या मार्गाने चघळले गेले आणि शेवटी चक्क बीबीसीला  फ्रँक सिनात्राची माफी मागावी लागली होती. असो.. 

'गॉडफादर'मध्ये जॅक वॉल्झच्या नव्या महत्त्वाकांक्षी चित्रपटात काम मिळावे, म्हणून जॉनी फाँटेन त्याच्यावर दबाव आणतो. डॉन त्या कामगिरीसाठी टॉम हेगनला हॉलिवुडला पाठवतो. परंतु जॅक हा एक उस्ताद मनुष्य असतो. चित्रसृष्टीत येऊ पाहणाऱ्या अनेक कोवळ्या कळ्या त्याने कुस्करलेल्या असतात. त्याच्याकडे खार्टूम नावाचा जो घोडा असतो, त्याचीच किंमत सहा लाख डॉलर्स एवढी असते. (आजच्या भावात ही रक्कम दोन कोटी डॉलर्सपर्यंत जाऊ शकते!) खार्टूमला दाखवताना त्याच्या शिस्नाकडे जॅक बोट दाखवतो आणि टॉमला उद्दामपणे म्हणतो की, असे शस्त्र माझ्याकडे असते तर काय मजा आला असता! तो सरळ सरळ डॉन व्हिटोचा प्रस्ताव धुडकावून लावतो. जॉनीला या जन्मात ती भूमिका मिळणार नाही, असे ठामपणे सांगतो.

एके दिवशी घमेंडखोर जॅक अर्धवट झोपेतून एखादे भयंकर दु:स्वप्न पडावे, तसा आपल्या उंची बिछायतीवर धडपडून जागा होतो. त्याच्या हाताला ओले रक्त लागते. त्याच्या बिछायतीवरच, त्याच्या अत्यंत महागड्या आणि लाडक्या खार्टूम घोड्याची मुंडी तोडून कोणीतरी आणून ठेवलेली असते. आपल्या प्रासादाभोवती संरक्षकांचा खडा पहारा असूनही आपण किती दुबळे आहोत याची वॉल्झला जाणीव होते. जो आपल्या घोडयाची हत्या करू शकतो तो आपलीही हत्या करतो याची जाणीव झाल्यावर संतापाच्या भरात तो खूप ओरडतो. टॉम हेगनला फोनवरून लाखोली वाहतो; परंतु शेवटी स्वत:हूनच जॉनी फाँटेनला आपल्या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका दिल्याचेही जाहीर करतो.

हा प्रसंग चित्रपटात अगदी अंगावर येतो. प्रत्यक्ष चित्रिकरणावेळी खोटे रबरी मुंडके वापरावे असा सल्ला दिग्दर्शकाला पॅरामाऊंटने दिलेला होता; परंतु त्याच वेळी न्यू जर्सी येथील कत्तलखान्यात कटाईसाठी एक घोडा आला आहे, कुत्र्यांना टाकावयाच्या मांसासाठी तो काटला जाणार आहे, असे समजले. तेव्हा त्या घोड्याचे मुंडके चित्रिकरणासाठी बर्फात टाकून आणले गेले. तो प्रकार सेटवर इतका बीभत्स वाटला होता की, वॉल्झचे काम करणारा नट पुढे दोन-तीन आठवडे रात्रीचा जाबडून जागा व्हायचा.

विषवृक्षाची फळे कडूच निपजणार, या न्यायाने सनीसुद्धा विद्यार्थीदशेपासून बापाच्या पावलावर पाऊल ठेवतो. व्हिटोने आपल्या गल्लीतील हप्ता गोळा करणाऱ्या फालुची नावाच्या गुंडाला गोळ्यांच्या तडाख्याने उडवलेले असते. त्या दृश्याचा छोटा सनी साक्षीदार असतो. पुढे काही आयरिश बंडखोर डॉनच्या छातीमध्ये गोळ्या झाडतात. डॉन दीर्घकाळ आजारी पडतो, तेव्हा सर्व सूत्रे सनी आपल्या हातात घेतो. विरोधी गटांच्या अनेक शुटर्सना त्याने कंठस्नान घातलेले असते. दुसऱ्या महायुद्धाचा फायदा घेऊन कॉलिऑन पितापुत्र काळा पैसा, हिंसाचार आणि दबदबा वाढवतात. सनी इतका खतरनाक असतो की, केवळ त्याच्या नावाच्या धाकाने विरोधक चळचळा कापतात.

नारकोटिक्सच्या धंद्यामध्ये मोठे अर्थार्जन असते. परंतु पोलिस आणि न्याय विभागाचा या धंद्यावर कठोर दात असतो. अशा वेळी न्यायव्यवस्थेत मित्रांचा गोतावळा निर्माण करणाऱ्या व्हिटोने इतर गँगस्टर गटांना मदत करावी; हवी तर त्यासाठी भरपूर टक्केवारी घ्यावी, असा प्रस्ताव सोलोझोसारखे गुंड व्हिटोकडे ठेवतात. मात्र नारकोटिक्समधून मिळणारी रक्कम हा पापाचा पैसा असल्याचे व्हिटो मानतो. विरोधकांचा प्रस्ताव धुडकावून लावतो. त्यामुळे एका बर्फाळ संध्याकाळी त्याचे विरोधक बाजारात त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढवतात. शरीरात अनेक गोळ्या घुसूनही व्हिटो बचावतो. त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले जाते.

कादंबरीत सोलोझोसह इतर सर्व गँगस्टर आपल्या हिंसाचाराला 'बिझनेस' संबोधतात. एकमेकाचे रक्त पितात; परंतु या नंग्या हिंसाचाराला व्यावसायिकतेचा मुलामा चढवतात. इस्पितळात मायकेल बापाच्या भेटीसाठी जातो. विरोधक आपल्या पित्यावर इस्पितळातच आणखी हल्ला चढवणार आहेत, अशी चिन्हे त्याला दिसतात. तेव्हा मायकेल मोठ्या धाडसाने त्याला दुसरीकडे हलवतो. तेथे विरोधी गटाला विकला गेलेला पोलिस अधिकारी मॅकलॅस्की येतो. तो एका रपाट्यात मायकेलचे दाढवण मोडतो आणि त्याचा चेहरा विदूप करून सोडतो.

व्हिटोवरचा निष्ठुर प्राणघातक हल्ला आणि विकली गेलेली पोलिस यंत्रणा पाहून मायकेलचे सारे आयुष्यच बदलून जाते. देवाच्या आळंदीला जायची इच्छा बाळगणारा मायकेल स्वत:च एक खतरनाक गँगस्टर बनतो. सोलोझोबरोबरच मॅकलॅस्कीची गोळी घालून हत्या करतो आणि इटालीमध्ये जाऊन पसार होतो.

व्हिटोने हिंसाचाराच्या काळोख्या लाटांत स्वत:ला अनेकदा झोकून दिलेले असते. दोन-तीनवेळा त्याच्यावर झालेले प्राणघातक हल्लेसुद्धा त्याने लीलया पचवलेले असतात. मात्र त्याच्या नकळत त्याच रौद्र हिंसाचाराच्या लाटा व्हिटोच्या दरवाजावरही येऊन आदळतात. त्याच्या कन्येच्या, कानीच्या प्रेमात पडून पुढे जावई बनलेल्या कालोर्ला त्याने आपल्या व्यवसायापासून दूर ठेवलेले असते. एखाद्याच्या घरात जेव्हा सत्ता येते, भले ती संसदीय दरवाजातून येवो वा चॉपरच्या काटेरी मार्गाने; त्या सत्तेची मधुर फळे चाखण्यासाठी मात्र सत्ताधीशांची नातलग मंडळीही आसुसलेली असतात. सत्तेत पुरेशी भागीदारी न मिळाल्याने कार्लो सापासारखा सासुरवाडीविरुद्ध डूख धरून असतो. त्यातच त्याने पत्नीचा छळ केल्याचे निमित्त होते. तेव्हा बहिणीच्या प्रेमापोटी सनी मेव्हण्याला भररस्त्यात बदडून काढतो. विरोधी गटांच्या डोळ्यात सनी प्रथमपासूनच सलत असतो. त्यात कार्लोसारख्या जावयाची त्यांना मदत मिळते. मग बाकीचे गँगस्टर एका चेकनाक्यावर सनीला एकटा गाठतात. बेछूट गोळीबार करून त्याच्या सर्वांगाची चाळण करतात. पुझोने जेवढ्या परिणामकारक शब्दांत हा प्रसंग लिहिला आहे, तेवढ्याच सार्मथ्याने कोपोलाने तो चित्रित्र केला आहे.

नागडा हिंसाचार आता डॉनच्या घरातही थैमान घालू लागतो. पुत्राचा चाळणी झालेला देह पत्नीला दाखवायचे धाडसही व्हिटोला होत नाही. थोरल्या पुत्राची हत्या, मधला फ्रेडो ऐय्याश-इष्कबाज आणि धाकटा मायकेल इटालीमध्ये परागंदा. वार्धक्यात व्हिटोला वाईट दिवस येतात. तरीही तो संकटाशी लढत राहतो.

इटालीमध्ये भूमिगत असलेला मायकेल ऑफेलिया नावाच्या मेंढपाळ कन्येच्या प्रेमात पडतो. तिच्याशी विवाहबद्धही होतो. पुझोने ही प्रणयकथा अशा धुंद आणि मधाळ शब्दांत रेखाटलेली आहे की, ती मुळातूनच वाचायला हवी. चित्रपटात हा संपूर्ण भाग येतो; परंतु शब्दांच्या पंखांनी उचललेली धुंदी पेलायला कॅमेऱ्याच्या चक्षूला किती मर्यादा येतात, हे या प्रकरणावरून जाणवते. मायकेलचे विरोधक त्याच्या गाडीमध्ये टाइमबॉम्ब ठेवतात आणि त्या स्फोटात ऑफेलिया नावाची ती अतिसुंदर ग्रामकन्याही नष्ट होते. 

मायकेलच्या मागची शुक्लकाष्ठे दूर करण्यासाठी डॉन ज्या एकेक खेळी खेळतो, त्या सर्व खेळ्या कादंबरीमध्ये खूप नेटकेपणाने अधोरेखित होतात. मायकेलने ज्या मॅकलॅक्सी नावाच्या पोलिस अधिकाऱ्याची हत्या केलेली असते, तोच कसा नालायक आणि भ्रष्ट होता, याच्या बातम्या डॉन पद्धतशीरपणे वर्तमानपत्रात छापून आणतो. त्यातच बुकीको नावाच्या एका गुन्हेगाराची केस व्हिटोकडे येते. तो तुरुंगात असून, फाशीच्या मार्गावर असतो. त्याला डॉनची मदत हवी असते. त्याने केलेला गुन्हा आणि संबंधित सर्व कागदपत्रे व्हिटो बारकाईने वाचतो. फाशीच्या फंदातून बुकीकोची सुटका होणार नाही याची त्याला खात्री पटते; तेव्हा तू असातसा मरणारच आहेस, तर आपल्या कुटुंबाचे भले करून फाशी का जात नाहीस, असा प्रस्ताव डॉन त्याच्यापुढे ठेवतो. परिणामी, बुकीको आपण सोलोझो आणि मॅकलस्की या दोघांचीही हत्या केल्याची कोर्टात कबुली देतो. पर्यायाने मायकेलचे शुद्धीकरण होऊन त्याची मायदेशी परतण्याची वाट खूपच सुखकर होते.

मायकेल अमेरिकेत परतताना विरोधक दगाफटका करतील याची कल्पना व्हिटोला असते. म्हणूनच तो अमेरिकेतील सर्व गँगस्टर मंडळींची एक गुप्त परिषद बोलावतो. अनेकदा हिंदी सिनेमात, अगदी 'फॅमिली'पर्यंत या प्रसंगाची भ्रष्ट नक्कल करायचे प्रयत्न झालेले आहेत. वास्तवत: ही परिषद म्हणजे 'चोरांचे संमेलन' नव्हे तर चोरावरच्या मोरांचेच संमेलन असते. 'आपण सर्वांनी (गँगस्टरनी) उद्योजकांसारखं धूर्त, कावेबाज बनायला हवं. हत्यारांचा दुष्ट जमाना केव्हाच लोप पावला आहे. अनेक छोट्या चोऱ्यामाऱ्या आणि उचलेगिऱ्या करणारी नवीन पोरे आपल्या उद्योगाची प्रतिष्ठा घालवत आहेत,' अशी चर्चाही तेथे घडते. माझा मुलगा परत येताना त्याची बोट बुडाली, काही घातपात झाला, अपघात घडला तर ती विरोधकांनी घडवून आणलेली हत्याच असेल आणि असा प्रकार मी सहन करणार नाही, असा सज्जड दम व्हिटो कॉलिऑनी बैठकीमध्ये सर्वांना देतो. कादंबरीत हा प्रसंग जवळपास २४ पानांमध्ये विस्ताराने मांडला आहे. मात्र कोपोलाने हा प्रसंग चित्रपटात नेमक्या आणि निर्णायक शब्दांत व काही मिनिटांच्या अवकाशात आटोपला आहे.

विरोधकांनी घडवून आणलेल्या सनीच्या हत्येत आपल्या मेव्हण्याचा मोठा सहभाग असल्याचा मायकेल शोध लावतो. तो आपल्या बहिणीच्याच नवजात अर्भकाचा गॉडफादर बनतो. कादंबरीपेक्षा कोपोलाने चित्रपटाची अखेर खूपच गतिमान आणि वेधक केली आहे. मायकेल आपला मेहुणा कालोर् याची दोरीने गळा आवळून भयंकर हत्या घडवून आणतो. ब्रॅझिनी, टॅगालीया अशा विरोधकांना एकापाठोपाठ एक करून कंठस्नान घालतो. एका बाजूला मायकेल आपल्या गॉडसनला बापतिस्मा देतोय. त्या पवित्र, मंगलमय विधीच्या पार्श्वभूमीवरच दुसरीकडे एका पाठोपाठ एक होणाऱ्या हिंस्त्र हत्यांची क्षणचित्रे- माँटाजेस अक्षरश: अंगावर शहारे आणतात.

एका गँगस्टरची ही लोकविलक्षण कथा म्हणजे तद्दन, गल्लाभरू चित्रपटासाठी आयते रसायनच होते; परंतु फ्रान्सिस फोर्ड कोपोला नावाच्या प्रतिभावंताच्या हाती हे सोने लागले आणि त्याने आपल्या कसबी हाताने त्यातून एक अमूल्य, अक्षय असा चित्रहार बनवला. त्यावेळी पॅरामाऊंटची आथिर्क स्थिती बेताची होती. कमीत कमी पैशात त्यांना 'गॉडफादर' बनवून हवा होता. बऱ्याच नाणावलेल्या दिग्दर्शकांनी पॅरामाऊंटची ऑफर नाकारली होती. कोपोलाकडेसुद्धा पहिल्यांदा जेव्हा 'गॉडफादर'चा प्रस्ताव गेला, तेव्हा त्याने कादंबरीची आरंभीची फक्त पन्नास पाने वाचली. तेवढ्या मजकुरात त्याला काही ग्रेट वगैरे वाटले नाही आणि त्यानेही 'गॉडफादर'ला नकार दिला. तारुण्याच्या उंबरठ्यावरील कोपोलाला, तेव्हा आपल्या हातून काहीतरी अभिजात घडावे, असे आतून सारखे वाटत होते. दरम्यान, कादंबरी सर्वत्र गाजत राहिली. तेव्हा खुद्द कोपोलाही आर्थिक विवंचनेत होता. आश्चर्य म्हणजे पॅरामाऊंटचा एक निर्माता रूडी याने पुन्हा एकदा कोपोलापुढे प्रस्ताव ठेवला. थोडक्यात, पॅरामाऊंट आणि कोपोलाची अवस्था 'रामभाऊंना मिळेना बायको आणि पारूबाईंना भेटेना पती' अशीच विचित्र होऊन गेली होती.

कोपोलाने पुन्हा एकदा कादंबरी बारकाईने वाचली. तेव्हा त्याला तिच्या पोटातील नेमक्या वर्माचा शोध लागला. ही कहाणी फक्त कोणा एका प्रबळ गँगस्टरची नव्हती; तर ती एका कुटुंबाची, त्या कुटुंबाच्या सत्तातृष्णेची आणि त्यांच्या वारसाहक्काची होती. कादंबरीतला फाफटपसारा कमी केला, तर त्यातून एक सुंदर चित्रपट बनू शकतो, असे फ्रान्सिसला वाटले आणि फुलासोबत सहजगत्या सुगंध वहात राहावा तितक्याच सहजतेने सारे काही घडले. कोपोलाच्या परीसस्पर्शाने एक अभिजात चित्रकृती जन्माला आली.

'गॉडफादर'चा योगच असा की आपल्या अवघ्या बत्तीशी-तेहतीशीत या चित्रपटाने कोपोलाला जगातील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांच्या पंक्तीत नेऊन बसवले. कोण होता हा कोपोला? 'गॉडफादर'च्या आधी चित्रसृष्टीत त्याचे योगदान किती होते? त्याने फक्त तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. त्यांना बेताचेच यश मिळाले होते. पुझोप्रमाणेच कोपोलासुद्धा इटालियन अमेरिकन कुटुंबामध्ये जन्मला होता. त्याचा जन्म ७ एप्रिल १९३९ला डेट्रॉईट येथे झाला. त्याचे वडील कामिर्न हे रेडिओवरील कार्यक्रमांचे व्यवस्थापन पहायचे. ते स्वत: संगीत दिग्दर्शक होते. फिरत्या संगीत कंपन्यांबरोबर त्यांची भटकंती सुरू असायची. जेव्हा फ्रान्सिस नऊ वर्षांचा होता, तेव्हा त्याला पोलिओ झाला. त्यामुळे त्याला वर्षभर स्वत:ला खोलीत बंद करून रहावे लागले.

त्या जुलमी डोसानेच जणू फ्रान्सिसच्या आयुष्याला नवसंजीवनी दिली. त्या वर्षभरात त्याने टी.व्ही.वरचे अनेक कार्यक्रम आणि चित्रपट पाहिले. दहाव्या वषीर् त्याने आठ मि. मी.चा कॅमेरा घेऊन एक चित्रपट बनवला होता. Serjei Eisenstein या महान रशियन दिग्दर्शकाचे चित्रपट पाहून तो खूपच प्रभावित झाला. ऐन तारुण्यात त्याने पटकथालेखनाचेही धडे गिरवले. 'रिफ्लेक्शन्स इन अ गोल्डन आय' या चित्रपटाची त्याने पटकथा लिहिली होती; परंतु श्रेयनामावलीत त्याच्या नावाची दखल नव्हती. आपले शब्द मार्लन ब्रॅण्डो या अभिनेत्याच्या मुखातून उच्चारले गेले, याचाच त्याला केवढा आनंद झाला होता. पुढे अवघ्या दहा वर्षांतच ब्रॅण्डोबरोबर 'गॉडफादर' बनवून आपण इतिहास घडवणार आहोत, हे त्याला तेव्हा कसे ठाऊक असणार? शेक्सपिअरचे 'ज्युलियस सिझर' नावाचे नाटक त्याला खूप आवडायचे. बॅण्डोने ऐन तारुण्यातील अँटीनिओ ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा रजतपटावर साकारली होती. 'ज्युलियस सिझर'च्या मृत्यूनंतर रोममधील संसदेच्या पायऱ्यांवर उभा राहून अँटीनिओ जे भाषण करतो, ते वक्तृत्वकलेचा अत्युच्च नमुना मानले जाते. शेक्सपीअरचे ते शब्द ब्रॅण्डोच्या मुखातून ऐकताना अंगावर रोमांच न उभे राहतील, तर नवलच. याच ब्रॅण्डोच्या जादूचे बीज कोपोलाच्या अंतर्मनात रूजले असावे. म्हणून त्याने व्हिटो कॉलिऑनीच्या भूमिकेत ब्रॅण्डोच हवा, असा आग्रह धरला होता.

दिलेल्या बजेटमध्ये झटपट सिनेमा बनवून देणारा निर्माता हवा, म्हणून पॅरामाऊंटने अल रूडीची 'गॉडफादर'साठी निवड केली. रूडीने एक उत्साही धडपडता इटालियन तरुण म्हणून कोपोलाला निवडले. कोपोलाने सहपटकथालेखन केलेला 'पॅटन' नावाचा सिनेमा नुकताच पडद्यावर झळकला होता. ही पुण्याई त्याच्या मदतीला आली; एकदा काम हाती घेतल्यावर कोपोलाने 'गॉडफादर' कादंबरी जणू रोमारोमात भिनवून घेतली होती. रूडीसोबत झालेल्या दुसऱ्या बैठकीत त्याने एखाद्या नाट्यप्रयोगासारखे त्याचे सादरीकरण केले. मला सिनेमा कसा हवा, हे तो बैठकीमध्ये येरझाऱ्या मारता मारता संचालक मंडळाला सांगत होता. रूडीला त्या बैठकीतच जाणवले की कोपोला नवखा असला तरी कच्चा नाही. स्टुडिओचालकांच्या दादागिरीला पुरून उरणारा दिग्दर्शक आहे. पॅरामाऊंटने सप्टेंबर १९७०मध्ये 'गॉडफादर'चा दिग्दर्शक म्हणून फ्रान्सिस फोर्ड कोपोलाचे नाव जाहीर करून टाकले.

कोपोला स्वत: पटकथालेखक होता, तरी त्याच्यापुढे 'गॉडफादर' हे एक मोठे आव्हान होते. माफियांचे काळेकुट्ट जग, शहारे आणणारा त्यांचा हिंसाचार मांडण्यासाठी मारियो पुझोने ४४६ पाने खर्ची घातली होती. मात्र या हिंसाचाराचे टोकदार रूप अवघ्या काही मिनिटांच्या अवकाशात पडद्यावर साकारणे गरजेचे होते. माफियांची दहशत, पाठीत घुसवले जाणारे गद्दारीचे खंजीर, सावलीसोबत प्रवास करणारी भीती, रक्त गोठवणारा संशय... एखाद्या धारदार करवतीच्या टोकाला स्पर्श करावा, अशी ही अजब दुनिया. ती नेमकेपणाने मांडण्यासाठी कोपोलाने पुझोच्या मदतीने कादंबरीची खूप काटछाट केली. अवघी १५० पानांची संहिता बनवली.

कादंबरीकाराला चित्रपटासारखे अडीच-तीन तासांचे कोणतेच बंधन नसते. यथेच्छ पसरण्याची त्याची प्रवृत्ती! त्यामुळेच मूळ लेखक उत्तम पटकथा लिहू शकत नाही. त्यामुळे त्याला ही जबाबदारी द्यायचीच नाही, असा हॉलिवुडचा संकेत होता. त्यामुळेच पुझोकडे जेव्हा प्रथम पटकथेचे काम दिले गेले, तेव्हा अल रूडीवर टीका झाली; परंतु त्याने 'जो लेखक जगातल्या लक्षावधी वाचकांना मोहित करतो, त्याच्या जाणिवांमध्ये मोठी जादू असली पाहिजे,' अशा शब्दांत पुझोचे समर्थन केले.

पटकथालेखनात कोपोला आणि पुझोचे उत्तम मैत्र जुळून आले होते. दोघेही जन्माने इटालियन अमेरिकन. त्यामुळे इटालीच्या चालीरीती, आहार, उपचार याची दोघांनाही उत्तम जाण होती. मात्र 'गॉडफादर'मुळे इटालियन वंशाच्या अमेरिकेतील मंडळींची बदनामी होईल, या भीतीने अनेक अमेरिकावासी इटालियन लोक खवळले. त्यांच्या नागरी संघटनांनी चित्रपटाच्या विरोधात अनेक शहरांत आंदोलने सुरू केली. परंतु या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून पुझो आणि कोपोला अंडरवर्ल्डच्या दुनियेतील माणसांचा शोध घेण्यामध्ये गर्क राहिले.

चित्ररसिकांना अपरिचित असणाऱ्या नव्या चेहऱ्यांनाच आपण वाव देणार, असे पॅरामाऊंटने जाहीर केले होते. त्यामुळे नव्या स्ट्रगलर मंडळींची हजारोंनी छायाचित्रे रोज कंपनीकडे येत होती. मात्र डॉन व्हिटोची प्रमुख व्यक्तिरेखा कोण करणार, हा अमेरिकेत सर्वत्र औत्सुक्याचा विषय होता. डॅनी थॉमसनपासून अनेक ज्येष्ठ अभिनेते त्यासाठी एका पायावर तयार होते. व्हिटो क्रूर, हिंसाचारी गँगस्टरांचा सरताज आहे; त्याचवेळी तो एखाद्या भाबड्या शेतकऱ्यासारखा विनम्र आहे. दिसतोही तसाच. कुटुंबाची काळजी वाहणारा, साठी पार केलेला एक कुटुंबवत्सल बुजुर्ग. त्याचे चित्रपटात वावरणे फक्त चाळीस टक्के होते; परंतु उरलेल्या साठ टक्के भागात त्याचा दरारा आणि दहशत टिकून राहणे आवश्यक होते. त्यामुळेच या भूमिकेसाठी फक्त उत्तम अभिनेत्याची नव्हे, तर स्वत:भोवती स्वत:च्या प्रतिमेचा आणि प्रभेचा पिसारा उभारलेल्या एका महान अभिनेत्याची आवश्यकता होती. त्या दृष्टीने कोपोलाच्या डोळ्यासमोर ब्रॅण्डोशिवाय अन्य कोणीही उभे राहू शकत नव्हते.

पुझोने स्वत:हूनच एका मित्राकरवी कादंबरीची प्रत ब्रॅण्डोकडे प्रथम पाठवून दिली होती. तेव्हा ब्रॅण्डोचा प्रतिसाद अगदीच थंड होता. मात्र त्याच्या एका सहकाऱ्याने ब्रॅण्डोला सांगितले, ' कृपया कादंबरी वाचा. चालून आलेली सोन्यासारखी संधी सोडू नका.' पुझोही ब्रॅण्डोला आपल्यापरीने अनेकदा लिहीत होता. ही भूमिका साकारण्यासाठी आपणच कसे एकमेवाद्वितीय आहात, हे पटवून सांगत होता.

याआधी 'ऑन द वॉटरफ्रंट', 'स्ट्रीटकार नेम्ड डिझायर' असे ब्रॅण्डोचे अनेक चित्रपट जगभर गाजले होते. मात्र साठच्या दशकामध्ये मार्लन ब्रॅण्डो अपकीतीर्चाही धनी बनला होता. एखाद्या डॉनसारखे त्याचेही खाजगी आयुष्य अनेक रहस्यमय प्रसंगांनी, दंत आणि गूढकथांनी भरून गेले होते. विशेषत: स्त्रियांविषयीचे त्याचे आकर्षण, काहीजणींनी त्याच्यासाठी केलेल्या आत्महत्या, अमाप यशातून निर्माण झालेली बेफिकिरी, या त्याच्याविषयीच्या गोष्टी भीतीदायकच होत्या. सेटवर उशिरा येणे, दिग्दर्शकाशी वादंग असे जे काही मोठ्या अभिनेत्याचे होते, ते त्याचेही झाले होते. त्यामुळेच पॅरामाऊंटच्या अध्यक्षपदी असलेल्या स्टॅन्ले जॅफेने सहकाऱ्यांना खडसावले, 'मार्लन ब्रॅण्डो नावाच्या इसमाला 'गॉडफादर'मध्ये रोल देण्याची तर बातच सोडा; पण त्या बेभरवशी इसमाच्या नावाची चर्चाही मी माझ्या स्टुडिओत सहन करणार नाही.'

कोपोलाला मात्र व्हिटोच्या भूमिकेत ब्रॅण्डोशिवाय दुसरे कोणीही दिसत नव्हते. तेव्हा स्टॅन्लेने ब्रॅण्डोला घेण्यासाठी काही जाचक अटी घातल्या. ब्रॅण्डोने जास्त मानधनाची अपेक्षा करू नये. उशिरा आल्यास नुकसानभरपाई द्यावी आणि त्याने स्क्रीन टेस्ट द्यावी. एखाद्या नव्या नटाप्रमाणे ब्रॅण्डोला स्क्रिन टेस्ट द्यायला भाग पाडणे, हा त्याचा अपमानच होता; परंतु एव्हाना व्हिटोच्या भूमिकेतील विराटपणाची चाहूल खुद्द ब्रॅण्डोलाही लागली होती. जेव्हा कोपोला त्याच्याकडे व्हीडिओ कॅमेरा घेऊन गेला, तेव्हा ब्रॅण्डो किमिनोमध्ये होता. त्याने केस पाठीमागे बांधले होते. गालफडामध्ये टिश्यू पेपरचे बोळे घालून आपण बुलडॉगी तोंडवळ्याचे कसे दिसतो, हे ब्रॅण्डोने दाखवून दिले. सत्तेचाळीस वर्षांचा ब्रॅण्डो मेकअपमुळे पासष्टीचा दिसू लागला.

'गॉडफादर'च्या यशानंतर सुपरस्टारपदावर पोचलेल्या अल पचिनोची कहाणीही आरंभी तितकीच गुंतागुंतीची होती. कोपोला त्याच्या चेहऱ्यामध्ये एका स्वप्नाळू मध्यमवगीर्य प्रवृत्तीच्या तरुणापासून ते गँगस्टरपर्यंतचे परिवर्तन केलेल्या मायकेलला पहात होता. मात्र पॅरामाऊंटमधील बहुतांशी सर्वांना पचिनोचा थोबडाच पसंत नव्हता. प्रत्यक्ष चित्रिकरणावेळी 'हा काही नट आहे? याला घेऊन चित्रपट काही डुबवायचा आहे?' असे बोचरे बोल त्याच्या कानावर पडायचे. त्याआधी पचिनो उत्तम बेक मिळण्यासाठी पंधरा-सोळा वर्षे झगडत होता. अभिनयाच्या हव्यासापायी त्याने हायस्कूलमध्येच शिक्षणाला राम राम ठोकला होता. न्यूयॉर्कमध्ये मित्रांच्या कॉटवर झोपून आपले गरीब गांजेकस जिणे तो जगत होता. त्याची पुन: पुन्हा टेस्ट घेतली जात होती. आपल्या हातून ही भूमिका जाणार, म्हणून तोही मनातून खचत चालला होता. मात्र जेव्हा संकलनमेजावर चित्रिकरणाचे फुटेज एकत्रित आले, तेव्हा वारे उलट्या दिशेने वाहू लागले. एका संचालकाच्या पत्नीने दिग्दर्शकाला स्पष्ट शब्दात बजावले, 'फ्रान्सिस! पचिनो सोडून तू मायकेलच्या भूमिकेसाठी अन्य कोणा नटाचा विचारही करू नकोस; कारण केवळ नजरेच्या धारेने एखाद्याला नग्न करायचे सार्मथ्य फक्त या पचिनोमध्येच आहे!!'

आरंभी चित्रपटाचे बजेट दोन ते चार मिलियनच्या दरम्यान होते. मात्र प्रत्यक्ष चित्रिकरण सुरू व्हायच्या आधी ते सहा मिलियन डॉलरवर जाऊन पोचले. शूटिंगचा खर्च प्रतिदिनी चाळीस हजार डॉलर व प्रतिताशी पाच हजार डॉलरचा होता. मेकअपमन डिक स्मिथ याने ब्रॅण्डोसाठी विशेष परिश्रम घेतले होते. ब्रॅण्डोला मेकअपसाठी रोज दीड तास द्यावा लागे. मांसल रंगाचे अॅक्रॅलिकचे गोळे ब्रॅण्डोच्या तोंडावर दोन्ही बाजूला ठेवले जात. त्याची विशिष्ट प्रकारे दातांशी जोड केली जाई. ब्रॅण्डोला मोठे खोटे पोट बांधले जाई. दोन्ही खांद्यांभोवती गोलाकार पॅडस् बांधले जात. त्यामुळे त्याची मान तोकडी दिसे. त्याच्या बुटामध्ये वजने ठेवली जात; जेणेकरून त्याची चाल पासष्टीतल्या इसमासारखी धिमी होई.

कोपोलाने गॉडफादरची वर्षभर जय्यत तयारी केली. वेळापत्रकापेक्षा पाच महिने उशिराने चित्रिकरणास प्रारंभ झाला. मॅनहटन, लास वेगास, लाँग बीच, सिसिली आणि नू जर्सी येथे चित्रिकरण झाले. ढगळ कपडे घालून ३२ वर्षांचा कोपोला सेटवर सर्वात आधी जाई. तेथून सर्वात उशिरा परतणारी व्यक्तीही तोच असे. जिवापाड कष्ट घेणाऱ्या कोपोलाचे नष्टचर्य काही संपत नव्हते. सुरुवातीला ब्रॅण्डोचे इस्पितळात जाण्या-येण्याचे, तसेच इतर पासिंग शॉट घेतले. 

'गॉडफादर'मुळे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या मारियो पुझो हा जन्माने इटालियन होता. हेल्स किचन नावाच्या न्यूयॉर्कमधील विभागात, एका निर्वासित कुटुंबात लहानाचा मोठा झाला. त्याच्या आईला आपला मुलगा लोहमार्गावरचा क्लार्क व्हावा आणि त्याने चार पैसे कमवावेत असे वाटे. परंतु वयाच्या सोळाव्या वर्षी मारियोने 'मी लेखक होणार, मी लेखक होणार' अशी पोपटपंची सुरू केली. तेव्हा पोर वाया जाणार, असे समजून आई घाबरून गेली. पुढे दुसऱ्या महायुद्धात पूर्व आशियात मारियोने सेवाचाकरी केली. तेव्हा तो अमेरिकन एअरफोर्समध्ये होता. त्यानंतर काही काळ त्याने जर्मनी हवाईदलामध्येसुद्धा काढला.  त्या नंतर जवळपास वीस वर्षे न्यू यॉर्कमध्ये व देशविदेशात अमेरिकेच्या सरकारी कार्यालयांचा प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहिले. १९६३ पासून त्याने मुक्त पत्रकारिता व पूर्ण वेळ लेखन करण्याचा निर्णय घेतला. 'स्टॅग' आणि 'मेल' ही पुरूषांची नियतकालिके त्याचप्रमाणे 'रेड बुक', 'हॉलिडे', 'बुक वर्ल्ड' या नियतकालिकांमध्ये त्याने विविध लेख, पुस्तक परीक्षणे, कथा लिहिल्या. 

१९५५मध्ये मारिओ पुझोची 'डार्क अॅरिना' ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. त्यानंतर एक दशकाच्या अंतराने १९६५ मध्ये त्याची दुसरी कादंबरी 'दी फॉर्च्युनेट पिलग्रिम' प्रकाशित झाली. त्यात एका इटालियन श्रमिक महिलेचा अमेरिकी मूल्यांशी संघर्ष पुझोने चित्रित केला होता. थोडीफार कुमारवाङ्मयातही मुशाफिरी झाली. मात्र वयाची पंचेचाळिशी ओलांडली, तरी साहित्यप्रांतात घवघवीत यश वाट्याला न आल्याचे शल्य त्याला आतून बोचतच होते. पण याचवेळी त्याच्या डोक्यावर वीस हजार डॉलरचे कर्ज झाले होते. त्यासाठी मित्रांची, नातेवाईकांची आणि इतरांची तोंडे चुकवणे व बँकेच्या नोटिसांना तोंड देणे या साऱ्या प्रकारामुळे तो जेरीस आला होता.

पुझोच्या पहिल्या दोन्ही कादंबंर्‍यांकडे वाचकांनी पाठ फिरवली असली, तरी जाणकारांनी व समीक्षकांनी पुझोचे कौतुक केले होते. १९६६ मध्ये पुझोने 'दी रनअवे समर ऑफ डेव्हिड शॉ' ही मुलांसाठीची कादंबरी हातावेगळी केली, तरीही यश आणि किर्ती अद्याप त्याला हुलकावण्याच देत होते. अखेर,आपल्या हातून टॉलस्टाय वा डोस्टोव्हस्कीसारखं अभिजात असं काही लिहून झाले नाही तरी चालेल; मात्र व्यवहारी जगाला तोंड देण्यासाठी चार पैसे मिळवून देणारे लेखन घडावे, असे त्याला वाटू लागले. पुझोच्या मनात आता व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरेल, अशी कादंबरी लिहिण्याचे विचार घोळू लागले. गुन्हेगारी विश्वाशी पत्रकारितेमुळे त्याचा संपर्क होताच. त्यात बातम्या गोळा करताना कळलेल्या माफिया जगताच्या पार्श्वभूमीवरच आपली कथावस्तू रचण्याचे त्याने ठरवले आणि त्या दृष्टीने संशोधनास सुरूवातही केली. त्याच्या 'फॉरच्युनेट पिलग्रिम'मध्ये एका गँगस्टरची व्यक्तिरेखा होती. त्याच बलस्थानाकडे काही मित्रांनी त्याचे लक्ष वेधले. त्या गँगस्टरलाच मध्यवर्ती भूमिकेत ठेवून त्याने वेगळे काही लिहावे, असे सुचवले. मग मारियोने 'माफिया' नावाची कादंबरी लिहायला घेतली. एका इटालियन माफियाने अमेरिकेत निर्माण केलेले अंडरवर्ल्ड तो झपाटून लिहीत होता. इटलीतून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, त्यांच्या लहानपणापासून ऐकलेल्या कर्मकहाण्या, वृत्तपत्रीय लेख, संशोधन इत्यादी साधनांचा वापर करत तो लिहीतच राहिला. त्याच्या झपाटलेल्या लेखनप्रवासात कादंबरीचे नाव 'माफिया'वरून 'गॉडफादर' कधी बनले, हे त्याचे त्याला कळले नाही. १९६९ मध्ये 'गॉडफादर' प्रकाशित झाली आणि पुझोचे नाव बेस्टसेलर लिस्टमध्ये झळकले.

'गॉडफादर' कादंबरीचा जन्म चक्क एका स्पर्धेनिमित्त झाला आहे, हे फारच थोडा लोकांना माहित आहे. १९६४-६५च्या सुमारास पुझो मॅगेझीन मॅनेजमेंट कंपनीत पत्रकार म्हणून काम करीत असे. या कंपनीची अनेक मासिके होती, ज्यात प्रामुख्याने गुन्हेगारी कथा प्रसिद्ध होत. एक दिवस पुझोला सीगेल या त्याच्या मित्राने इटलीतील माफियाविषयीचा दस्तऐवज दिला व त्यावरून काही कथा विकसित करता आली, तर पहा असे सुचविले. इटलीतील एका कुटुंबाची माफिया जगतात असलेली सत्ता त्या दस्तऐवजात वर्णिली होती. मूळ अतिशय रूक्ष असलेले तपशील मारियोने आपली प्रतिभा ओतून, त्याला मानवी भावनांचा ओलावा देऊन फुलविले व एक दीर्घकथा लिहिली. वाचकांनी त्याचे भरभरून स्वागत केले, मारियोच्या लेखनाची मागणी त्यामुळे वाढली.


याच सुमारास जो लेविन या चित्रपट निर्मात्याने आपल्या आगामी चित्रपटाच्या कथेसाठी एक २३ हजार अमेरिकन डॉलर्सचे पारितोषिक असलेली कथा स्पर्धा जाहीर केली. मात्र, त्याच्याकडे आलेली एकही कथा त्याला त्या लायकीची वाटेना. याच सुमारास पुझोचे नाव गाजू लागले असल्याने लेविनसाठी स्पर्धेचे काम पाहणार्‍या साउल ब्राउन याने मारियो जर कथा लिहिणार असेल, तर आपण स्पर्धेची मुदत एक वर्षांपर्यंत वाढविण्यास तयार आहोत, असे सुचविले. हा निरोप मारियोच्या मैत्रिणीने सीगेल मार्फत त्याच्या पर्यंत पोहोचवला. मारियोही त्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करू लागला. त्याने गॉडफादरचा संक्षिप्त आराखडा ५००० शब्दांत लिहून काढला आणि ब्राउनकडे पाठविला. तो आराखडा वाचूनच ब्राउन इतका प्रभावित झाला, की त्याने तातडीने पुझोला बोलावून घेतले आणि कादंबरीचे हक्क आपण घेत आहोत, असे सांगून त्याला ऍडव्हान्स मानधनही दिले. अशा प्रकारे एक 'गॉडफादर' जन्माला आला होता.

पुझोने 'डॉन कॉर्लिऑन'ची व्यक्तिरेखा त्याचा मित्र ज्युल्स सीगेल याचे वडील जिमी सीगेल यांच्यावरून चितारली असा प्रवाद आहे आणि स्वतः सीगेलनेही पुझोच्या मृत्यूनंतर त्याला श्रद्धांजली वाहणार्‍या लेखात तसा उल्लेख केला असला, तरी स्वतः पुझो मात्र या व्यक्तिरेखेचं मूळ आपल्या आईत असल्याचं सांगत असे. पुझोच्या 'गॉडफादर'वर दिग्दर्शक फ्रान्सिस फोर्ड कपोला याने चित्रपट काढण्याचे ठरवले, तेव्हा अमेरिकेतील इटालियन दबावगटाने त्यावर निर्बंध आणण्यासाठी निदर्शने केली, अखेर चित्रपटात माफिया हा शब्द वापरणार नाही, असा शब्द कपोलाने दिल्यावर ही निदर्शने थांबविण्यात आली. १९७२ मध्ये 'गॉडफादर' प्रदर्शित झाल्यानंतरचा इतिहास सर्वज्ञात आहे. कपोलाच्या या चित्रपटात मायकल कार्लिओनच्या भूमिकेनंतर पचिनो हा अभिनेता जगप्रसिद्ध झाला. कपोलाने त्यामानाने नवख्या असलेल्या पचिनोला मायकल कार्लिओनचे काम करण्याची संधी देऊन अनेकांची नाराजी ओढवली होती. पचिनोला या चित्रपटातील त्याच्या अभिनयाबद्दल अकॅडेमी पुरस्कारांमध्ये "सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता" गटात नामांकन मिळाले .१९७४ मध्ये त्याने "द गॉडफादर भाग २ मध्ये मायकल कार्लिओनचे पात्र पुन्हा एकदा साकारले. हा चित्रपटही अतिशय यशस्वी ठरला होता. समीक्षकांनी त्याच्या कामाचे अतिशय कौतुक केले होते. 

'गॉडफादर'च्या गडद विश्वात पुझोने प्रेम, गुन्हेगारी, नातेसंबंध, मूल्यांचा संघर्ष अशा अनेकविध छटा मिसळल्या. पुझोने गुन्हेगारी विश्वातील अनेक व्यक्तीचा आधार कादंबरीतील व्यक्तीरेखा रंगविण्यासाठी घेतला. 'गॉडफादर' या एका चित्रपटाने मानदंड तरी किती निर्माण करावेत? मूळ 'गॉडफादर' आणि त्याच शृंखलेत तयार झालेले पुढचे दोन्ही गॉडफादर या मालिकेने आजवर सुमारे साडेतीन बिलियन डॉलरचा धंदा केला. या चित्रपटाच्या यशाने 'गॉन विथ द विंड' आणि 'साऊंड ऑफ म्युझिक'च्या उत्पन्नाचे उच्चांक मोडून व्यावसायिक यश मिळवले. पण त्याचवेळी 'सिटिझन केन' व 'कॅसाब्लँका'सारख्या अभिजात चित्रहारांच्या प्रभावळीमध्येसुद्धा तो जाऊन बसला. मार्लन ब्रँडो या महाअभिनेत्याचे सन २००४मध्ये निधन झाले. त्याच्याजवळ 'गॉडफादर'च्या चित्रिकरणावेळी त्याने हाताळलेली एक प्रत होती. तिच्यावर जागोजागी अनेक खुणा केल्या होत्या. नोंदी लिहिल्या होत्या. ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेल्या त्या हस्तलिखित प्रतीचा लिलाव सन २००५मध्ये पुकारला गेला, तेव्हा ती तब्बल तीन लाख बारा हजार आठशे डॉलरला विकली गेली. अशी घसघशीत रक्कम याआधी कोणत्याही हस्तलिखिताच्या वाट्याला आली नव्हती. 'गॉडफादर'पूर्वी ब्रँडोचे नाव उच्चारले की, जगभरातील रसिकांच्या डोळ्यांसमोर उभा राही एक उमदा प्रणयवीर अथवा एक तडाखेबंद बंडखोर. पण 'गॉडफादर 'मध्ये या अभिनयवीराने व्हिटो कॉलिऑन नावाचा गँगस्टर वठवला. त्याला न भूतो न भविष्यती असे यश मिळाले. त्यामुळेच ब्रँडोने जगाचा निरोप घेतला, तेव्हा व्हिटोची बुलडॉगी धाटणीची चर्या हीच त्याची चिरंतन प्रतिमा बनून गेली.

रजतपटांच्या झगझगत्या विश्वात कुंडल्या मांडणाऱ्या भविष्यकारांची संख्या कधी कमी नव्हती. मात्र 'गॉडफादर'ची चित्तरकथा सुरू झाली, तेव्हा त्याची पत्रिका कोणाला मांडता येणे शक्य नव्हते. अनेक संकटांचे अडथळे पार करत 'गॉडफादर' पूर्ण झाला. पण या चित्रपटाची निर्मितीच झाली नसती, तर जागतिक सिनेसृष्टीचे खूप मोठे नुकसान झाले असते. कदाचित फ्रान्सिस फोर्ड कोपोला नावाचा आजचा महान दिग्दर्शक जन्मलाही नसता. अल पचिनो नावाचा आजचा सुपरस्टार एक दुय्यम दर्जाचा नट म्हणून लोप पावला असता. कदाचित आज निर्माण झालेले गॉर्डन विलीज नावाचे सिनेमॅटोग्राफीचे स्कूलसुद्धा जन्माला आले नसते.  एखाद्या अभिजात कादंबरीवरून अनेकांनी अनेकदा यशस्वी, लोकप्रिय चित्रपट तयार केल्याची अनेक उदाहरणे देता येतील. परंतु लोकप्रिय कादंबरीवरून अभिजात चित्रकृतीची साखळी जन्म पावल्याची उदाहरणे अपवादात्मकच आहेत.

'गॉडफादर'ची नक्कल करायचे उपद्व्यापही सिनेजगतात सुरू असतातच. गेल्या वर्षी रामगोपाल वर्मांनी 'सरकार' नावाचा तद्दन गल्लाभरू चित्रपट तयार केला. त्यामध्ये मूळ गॉडफादरमधील अनेक व्यक्तिरेखांना देशी साज चढविण्याचा प्रयत्न झाला. मात्र वर्मांची ही करणी म्हणजे अमृताच्या दोन थेंबांत ग्लासभर ताक ओतून विकण्याचाच आचरटपणा होता. ‘गॉडफादर’सारखीच मारिओ पुझोची लास्ट डॉन ही कादंबरी होती. यातील कथानकाशी साधर्म्य असलेला ‘तक्षक’ हा चित्रपट गोविंद निहलानी सारख्या दिग्गज दिग्दर्शकाने हाती घेतला तेंव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र हा सिनेमा तिकीट बारीवर कमाल दाखवू शकला नाही.  

'गॉडफादर' म्हणजे डॉन व्हिटो कॉलिऑन (आपल्याकडे बहुतेक जण 'कार्लियानी' असा चुकीचा उच्चार करतात.) या अमेरिकेन अंडरवर्ल्डवर राज्य करणाऱ्या एका गँगस्टरची कहाणी. व्हिटोने माफिया साम्राज्यावरील पकड घट्ट राहावी, यासाठी केलेल्या अनेक धडपडी आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे, त्याच्या हर्षखेदांचे मानवी पातळीवरील चित्रण म्हणजे 'गॉडफादर'. यामध्ये अंडरवर्ल्डमधील सत्तासंघर्ष, भ्रष्टाचार, सुनियोजित हिंसाचार, आत्मवंचना, घातपात अशा नानाविध छटा रेखाटल्या. याआधी जागतिक साहित्य व सिनेमात गुन्हेगारी व हिंसाचाराचे दर्शन घडलेच नव्हते, असे नाही. मात्र 'गॉडफादर'मध्ये या अंधाऱ्या विश्वाचा सुजलेला, विदूप मानवी चेहरा जेवढ्या परिणामकारकरीत्या उतरला आहे, तसा तो याआधी ना कागदावर उतरला होता, ना पडद्यावर.

९६८मध्ये मारियो पुझो आपल्या कुटुंबीयांसमवेत युरोपच्या दौऱ्यावर गेला, तेव्हा आपल्या कादंबरीची उत्तम उतरलेली पहिली शंभर पाने त्याने आपल्या लिटररी एजंटकडे दिली होती. तो युरोप प्रवासातून परतला, तेव्हा त्याच्या सद्भाग्याने त्याला गोड धक्का दिला होता! त्याच्या कादंबरीची शंभर पाने वाचूनच एका प्रकाशन संस्थेने त्याला चार लाख दहा हजार डॉलरचे आगाऊ मानधन देऊ केले. ही भलीमोठी रक्कम कादंबरीच्या फक्त पेपरबॅक आवृत्तीसाठी होती. त्यापूर्वी जगात कोणी एखाद्या लेखकाला एवढा मोठा आगाऊ मेहनताना, तोही पेपरबॅकसाठी देऊ केल्याचे ऐकिवातही नव्हते. पुझोची कादंबरी जगभरातील वाचकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. ती सतत सदुसष्ट आठवडे न्यूयॉर्क टाइम्सच्या विक्रमी खप असलेल्या ग्रंथयादीत अग्रक्रमाने झळकत होती.

आजचा दिवस हा मारियो पुझोचा स्मृतीदिन, १९९९ साली आजच्या दिवशी त्याचे निधन झाले त्यानिमित्ताने केलेलं हे स्मृतीरंजन ....

- समीर गायकवाड. 

(लेखातील माहिती जालावरून साभार )