Thursday, December 28, 2017

कुलभूषण जाधव प्रकरण - मुत्सद्देगिरीची कसोटी.


 कुलभूषण जाधव प्रकरणात सध्या तरी मुत्सद्देगिरीत पाकने आपल्याला मात दिल्याचे चित्र दिसत्येय. जाधव पकडले गेल्यानंतर त्यांचा भारतीय लष्कराशी / प्रशासनाशी संबंध असल्याचे आपल्याकडून आधी नाकारले गेले. नंतर ते सेवानिवृत्त लष्करी अधिकारी असल्याचा दावा भारत सरकारने केला पण  पाकिस्ताननं जेव्हा त्यांची सेवानिवृत्ती पुस्तिका मागितली तेव्हा सरकारनं त्यावर मौन बाळगलं. त्यांची सेवानिवृत्ती पुस्तिका दाखवण्यात आली असती तर जाधव यांची केस मजबूत झाली असती. जाधव यांच्याकडून बनावट पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. 'जाधव यांनी पाक अधिकारयांनी पढवलेले जबाब दिले आहेत' या आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ आपल्याकडे पुरावे नाहीत परंतु जाधव यांनी आपण भारतीय लष्करासाठी काम करतो याची कबुली दिली तेंव्हा भारताला दोन पावले मागे हटावे लागले.

मुंबई हल्ल्यातील गुन्हेगार कसाब हा अतिरेकी होता आणि जाधव हे आपल्यालेखी एक भारतीय व्यक्ती आहेत याचा हा फटका बसतो आहे. वास्तवात पाकनुसार जाधव हे भारतीय लष्कराकडून वा गुप्तहेर खात्याकडून बलुचिस्तानात हेरगिरी करायला आले होते. पाकला मिळालेले हे मोठे सावज आहे, याला ते हत्यारासारखे न वापरता अंतरराष्ट्रीय मंचावर भारताची नाचक्की करण्यासाठी आणि स्वतःची उध्वस्त झालेली मानवतावादी छबी नव्या वर्खात पुढे आणण्यासाठी वापरत आहेत. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा दोन वर्षं जाधव यांच्यावर लक्ष ठेऊन होती. संधी मिळताच त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे भारतानं बलूचिस्तानमध्ये अशी एक व्यक्ती पाठवली होती, याची जगाला आणि भारताला सतत आठवण करून देण्याची आयती संधी पाकिस्तानला  मिळाली आहे.... 

पकिस्तानमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कुलभूषण जाधव यांची सोमवारी इस्लामाबादमध्ये आई आणि पत्नीशी भेट घडवली त्याआधी पाकने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली होती तेंव्हा आपली बाजू मजबूत होती. पण जाधव यांच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी देऊन पाकने आपल्याला जाळ्यात अडकवले हे मान्य करावे लागेल. जाधव यांच्या फाशीची अंमलबजावणी त्वरित करून पाकिस्तानच्या हातात काहीच पडणार नाही. उलट त्यांना जास्तीत जास्त काळ जिवंत ठेवणे पाकच्या राजकीय हिताचे आहे आणि हे त्यांनी चांगले ओळखले आहे. जाधव हे काही कसाबसारखे दहशतवादी नाहीत. त्यामुळे तिथे त्यांच्याविरुद्ध आक्रोश नाही मात्र संताप जरूर आहे. पाक जनता आणि मिडीया त्यांना 'कातील' संबोधते. पाकिस्तानमधल्या दहशतवादी प्रकरणांमध्ये त्यांचा सहभाग होता आणि ते भारतीय गुप्तचर यंत्रणा 'रॉ'साठी काम करतात, हे त्यांनी मान्य केल्याचा पाकिस्तानचा दावा आहे.

जगात एखादा गुप्तचर पकडला गेला आणि त्याला आदराची, सन्मानाची वर्तणूक दिल्याचे कुठे पाहण्यात नाही आणि त्याने स्वतः होऊन गुन्हा स्वीकार केल्याचेही आढळत नाही. गुन्हा कबूल केल्यावर त्याला चांगली वर्तणूक दिल्याचे दिसत नाही. पाकने मात्र या प्रकरणी वरकरणी का होईना तसा देखावा उभा करण्यात यश मिळवले आहे. आपण कितीही आदळआपट केली तरी सध्याच्या चित्रानुसार जाधव हे पाकमध्ये पकडले गेलेले भारतीय गुप्तहेर आहेत, ते भारतीय लष्कराचे मुलकी अधिकारी आहेत, त्यांचे कुटुंबीय पाकमध्ये विनातक्रार भेटून गेलेत, शिवाय या बद्दल स्वतः जाधव यांनी यावर पाकचे आभार मानले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांनीही इस्लामाबादेत असताना शुकराना मानलाय. भलेही आपण याला देखावा म्हणू पण पाकने तो उभा तरी केला ना !

भेट घेण्याची इच्छा व्यक्त करताना जेव्हा जाधव यांच्या पत्नीनं सांगितलं होतं की, 'त्या एकट्या पाकिस्तानला जाऊ इच्छित नाहीत' तेव्हा अधिकाऱ्यांनी विचारपूर्वक त्यांच्यासोबत आणखी एका महिलेला म्हणजेच कुलभूषण यांच्या आईलाही पाकिस्तानात येण्याची परवानगी दिली. सन्मानपूर्वक या दोघींना पाकिस्तानात आणण्यात आलं आणि भेट घडवून आणली गेली. तिथे गेल्यावर मात्र पाकने जाधव यांच्या पत्नीचे बूट काढून घेतले आणि आता त्यात हेरगिरीची उपकरणे असल्याचा दावा केलाय. (आपल्या लेखी पुन्हा एकदा कांगावा). सुरक्षेच्या  कारणावरून त्यांचे कपडे बदलले गेले ; त्यांचे मंगळसूत्र काढण्याच्यामागेही पाकने हेच कारण दिले. शिवाय जाधव यांच्या कुटुंबीयांनी आपल्यावर झालेल्या अपमानाचा उल्लेख पाकमध्ये असताना का केला नाही हा पाकने उपस्थित केलेला प्रश्नही निरुत्तर राहतो. आपल्या धोरणानुसार आपण पत्रकारांसमोर जाण्याचे टाळल्यामुळे कदाचित असे झाले असावे. पण पाक मिडीयाने यातही संधी साधत आपले तोंडसुख घेतले. इथे परवेज मुशरफ यांनी भारतात दिलेल्या लाईव्ह मुलाखतीची आठवण करून द्यावीशी वाटते. वाजपेयी पंतप्रधान असताना मैत्रीपर्वाच्या नव्या मोहिमे अंतर्गत मुशरफ भारत भेटीवर आले होते. भेटीच्या अखेरच्या दिवशी त्यांनी मुलाखत दिली पण त्यांच्या वाहिन्यांच्या लोकांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे देत भारतात येऊन भारताचीच निंदा नालस्ती केली आणि भारतीय पत्रकारांची वेळ आली तेंव्हा ते कॅमेरयापुढून निघून गेले. नंतर आपल्याला कळले की ही त्यांची नियोजित चाल होती. असे काही करता आले असते पण आपल्याकडून त्याचा विचार झाला नसावा. दरम्यान जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घडवून आणताना पाकिस्तानातल्या भारतीय उच्चायुक्तांना जाधव यांना भेटण्याची परवानगी पाकिस्ताननं दिली नाही. त्यावर जाधव त्या श्रेणीत मोडत नाहीत. तसंच ते काही राजकिय व्यक्ती नाहीत, असं स्पष्टीकरण पाकिस्ताननं दिलं. असं असलं तरी या भेटीच्या आधी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं होतं की, पाकिस्तान त्यांना ती सुविधाही भविष्यात उपलब्ध करून देऊ शकेल. जाधव यांच्या प्रकरणात पाकिस्तान आत्मविश्वासाने आणि विचाराने पावले टाकत आपला मानवतावादी चेहरा जगापुढे आणण्याचा योजनाबद्ध प्रकार करतानाच त्यांच्या पत्नीच्या पादत्राणाच्या निमित्ताने आपल्याला डबल जिओपार्डीत गुंतवत आहे. आजवर अनेक छोटेमोठे मासे दोन्ही देशांनी गळाला लावले होते पण कुलभूषण जाधव यांच्या निमित्ताने पाकला मोठा मासा हाती लागलाय आणि त्या माशाचा गळ करून ते आपल्याला काही अंशी का होईना खेळवत आहेत असे सध्याचे चित्र आहे.

आपण एकीकडे केवळ कांगावा करण्यात गुंतलो असताना पाक मात्र आंतरराष्ट्रीय पटलावर या भेटीला फाशी वा न्यायालयीन प्रक्रीयेपासून अलग करत मानवतावादाशी सांगड घालत आहे, हे समोर मांडताना जाधव यांच्या न्यायालयीन सुनावणी दरम्यान त्यांना 'राईट टू डिफेंड'ची सोय दिली होती याची खुबीने जाणीव करून दिली जातेय. आधी नातं नाकारून नंतर मौन स्वीकारून पुढे जाऊन थेट नातलगांची भेट घडवून आणताना आपल्याला
पाकिस्तानचे मनसुबे कळले नाहीत का याचे उत्तर काळच देईल. पाकिस्तानचा आजवरचा स्वभाव पाहता तो गोड बोलणारा दगाबाज देश आहे याचा विसर आपल्याला पुन्हा पुन्हा का पडतो याचे चिंतन होणे आवश्यक आहे. जाधव यांच्याबाबत सरकार एकाच दृष्टिकोनावर का ठाम राहू शकले नाही ही कदाचित गोपनीयतेची बाब असू शकते पण त्यांच्या नातलगांच्या भेटीने आपण विनाकारण बॅकफूटवर जाताना पाकला क्रीझ बहाल केली आहे, ज्याचा तो चतुराईने फायदा घेत आहे.  या सर्वाचा परिणाम म्हणून दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबधांमध्ये बिघाड येणं सध्या तरी शक्य नाही. आपल्याबाजूने तसे संकेत जरी दिले तरी आपण आणखी मागे येऊ शकतो. पाकच्या विदेश मंत्रालयाने काल आणखी मल्लीनाथी करताना 'हे एक द्विपक्षीय देवाण-घेवाणीचं प्रकरण होऊ शकेल काय याचा अभ्यास केला जाईल' असे म्हणून आपल्याच हद्दीत एक पिल्लू सोडून दिलेय . कारण यापूर्वी अशा सुटकेच्या घटना दोन्ही बाजूने घडल्या आहेत. कुलभूषण जाधव यांना भारतात परत घेतले तर पाकचे आरोप अर्धवट स्वरुपात का होईना मान्य होतील अन राजनैतिक चर्चेत ती कायम टांगती तलवार राहील. कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना भारताने समुपदेशन करून पाकमध्ये जाऊन त्यांची भेट घेण्याच्या निर्णयापासून त्यांना वळवले असते तर कदाचित चित्र वेगळे राहिले असते.

याच मुद्द्याला अनुसरून सरबजीतच्या भगिनी दलबीर कौर यांनी काल एक प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणतात, 'पाक सरकारने सरबजीतची भेट घेण्याची परवानगी देऊन, जसे जगापुढे नाटक केले होते. तसेच नाटक कुलभूषण जाधव यांच्याबाबतीत होत आहे. आम्ही सरबजीतची भेट घेण्यासाठी गेलो होतो. तशी परिस्थिती कुलभूषण यांच्याबाबतीत होती, असे वाटते. फरक एवढाच होता की, आम्ही सरबजीतची भेट एका कारागृहात घेतली, तर कुलभूषण यांच्या आई व पत्नीने परराष्ट्र मंत्रालयात त्यांची भेट घेतली. केवळ कुलभूषण यांना कोठे ठेवण्यात आले आहे. हे कळू नये, यासाठीच असे करण्यात आले होते.' सरबजीतच्या वेळी आलेल्या अनुभवावरून त्याच्या बहिणीला जे कळू शकते ते आपल्या गुप्तहेर खात्यास किंवा विदेश मंत्रालयास कळत नसावे असे वाटत नाही. मात्र या संपूर्ण घडामोडीत आपण राजकीय मुत्सद्देगिरीत कमी पडलो हे मान्य करावे लागेल. परिणामी पाकला आंतरराष्ट्रीय पटलावर एक मोठी संधी देत आपण मात्र बॅकफूटवर गेलो. येत्या काळात आपल्या मुत्सद्देगिरीची कसोटी राहील हे या निमित्ताने अधोरेखित झालेय.                                                  
- समीर गायकवाड.

(सूचना - पोस्टवर व्यक्तीद्वेषाच्या आणि जात - धर्म द्वेषाच्या कॉमेंटस करू नयेत)