Wednesday, October 4, 2017

अंधारातल्या स्त्रीज्योती - सीतव्वा !

 
देवदासींची अनिष्ट प्रथा आता बरीच कमी झाली असली तरी पूर्णपणे बंद झाली आहे, असं म्हणता येणार नाही. महाराष्ट्रात यासाठी काही लोक व्यक्तिशः तर काहीजण एनजीओच्या माध्यमातून काम करत आहेत. कर्नाटकात या समस्येचे मूळ असल्याने तिथं भरीव काम होणं गरजेचं होतं आणि हा विडा एका पूर्वाश्रमीच्या देवदासीनेच उचलला. सीतव्वा तिचं नाव. पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या सात वर्षाच्या सीतव्वाला सलग नऊ दिवस हळद लावली गेली, लिंबाची पाने घातलेल्या पाण्याने स्नान घातले गेलं. नवव्या दिवशी नवं लुगडं नेसवलं गेलं, हातात हिरव्याकंच बांगड्या चढवल्या गेल्या, गळ्यात लालपांढऱ्या मण्यांची माळ घातली गेली. त्यादिवशी ती फार खुष होती. तिच्या बिरादरीतल्या लोकांना जेवण दिलं गेलं. माणसांची वर्दळ दिवसभर होती, सीतव्वाला त्यादिवशी खेळायला जायचं होतं पण तिचं बालपणच त्या दिवशी कुस्करलं गेलं हे तिच्या ध्यानीमनीही नव्हतं. आपण कुठल्या तरी आनंदोत्सवात आहोत आणि त्याचे केंद्रबिंदू आहोत याचा तिला विलक्षण हर्ष झाला होता.
सीतव्वा एका गरीब कुटुंबात जन्मलेली. तिच्या वडीलांना नऊ मुली होत्या. पहिल्या तीन मुली दगावल्यानंतर त्यांनी यल्लमाला नवस बोलला की माझी एक मुलगी तुला अर्पण करेन. योगायोगाने उर्वरित सहा मुली जगल्या आणि दरम्यान आजारपणात सीतव्वाचे वडील वारले. नवरा मेलेला, घरची अत्यंत बिकट परिस्थिती आणि खाणारी तोंडे वाढलेली अशा कात्रीत सीतव्वाची आई अडकली. अखेर तिने सीतव्वाला यल्लाम्माला अर्पण करायचा अप्रिय निर्णय घेतला. सीतव्वा सातव्या इयत्तेत असताना तिला एका जोदत्तीच्या उच्चवर्णीय जमीनदारासोबत ‘झुलवा’ म्हणून ठेवलं गेलं. त्या दिवशी ती लुटली जाईपर्यंत तिला यातलं काहीच ठाऊक नव्हतं. त्या जमीनदाराला आधीच्या दोन बायका होत्या, त्याचं त्यांच्यावरही प्रेम होतं. त्याच्यापासून सीतव्वाला दोन अपत्ये झाली. सीतव्वापासून झालेल्या मुलांवरही त्याने माया केली. त्यांचे कपडेलत्ते देण्यापासून ते अन्नधान्य पुरवण्याचे काम त्याने केले पण त्याने आपले नाव त्यांना दिले नाही. सीतव्वातला चार्म संपत आला तसा तो होळकेरीला तिच्याकडे कमी प्रमाणात येऊ लागला. पण त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले नाही. या काळात सीतव्वाच्या मनात अनेक वादळे उठली आणि शांत झाली. दरम्यान कर्नाटक सरकारच्या वतीने देवदासी पुनर्वसन कार्यक्रम राबवला जाऊ लागला. यातील उपक्रमात ती हिरीरीने भाग घेई. महिलांवरचा अन्याय, शोषण आणि देवाच्या नावावर चालत असलेलली स्त्रीत्वाची लुबाडणूक यावर तिची मते पक्की होऊ लागली. १९९० च्या सुमारास बेळगावमध्ये या अभियानाने काम थांबवलं तेंव्हा आपणच अशी संस्था काढावी असे तिला वाटू लागले. विचारांना मूर्त स्वरूप देत तिने सप्टेबर १९९७ मध्ये ‘महिला अभिवृद्धी मत्तू संरक्षण संस्थे’ (MASS) ही संस्था काढली. आता ती या संस्थेची सर्वेसर्वा आहे. आजघडीला ३६२२ देवदासी या संस्थेच्या सभासद आहेत. यातली सर्व पदे देवदासींकडेच आहेत. ५११ मागास महिलांनादेखील यात सामील करून घेतले गेलेय. संस्थेकडून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमात समन्वयक ते प्रशिक्षकाच्या जबाबदाऱ्या बहुतकरून देवदासीच पार पाडतात. देवदासी महिलांना अर्थसहाय्य, विधीसहाय्य, गृहबांधणी. अपत्यांसाठी शिक्षण, तंटामुक्तीतून विवाद सोडवणे अशा विविध पातळ्यांवर ही संस्था काम करते. तिने महिला स्वावलंबन समूह (SHG) बनवून या महिलांना आपल्या पायावर उभं केलं आहे. जी सीतव्वा किशोरअवस्थेत लुटली गेली तीच आता अनेकांना आधार देऊन भावी पिढीत कुणी सीतव्वा बनू नये म्हणून प्रयत्न करते आहे. जोगती आणि जोगत्यांना या बंधनातून मुक्त करणे, जातीअंताची लढाई होईल तेंव्हा होईल पण मागास जातीतील गरीब जनतेच्या डोक्यातून अंधश्रद्धेचा नायनाट करणे हे सीतव्वाचं पुढचं टार्गेट आहे. तिची जिद्द आणि सच्चेपणा पाहू जाता ती यात यशस्वी होईल यात शंका नाही. रामायण काळातल्या सीतेहून अधिक कठोर अग्नीपरीक्षा दिलेल्या या सीतेचे सामाजिक भान अत्यंत प्रेरणादायी आणि कठोर तपश्चर्येचे ठरले आहे.  

खरे तर देवदासी हा हिंदू धर्मातील समाजरचनेवतरचा काळा डाग आहे. कितीही प्रयत्न झाले तरी अजूनही तो सकल पुसला गेलेला नाही हे सत्य आहे. पुरुषी वर्चस्वाच्या शोषक सामाजिक उतरंडीतला तळाचा फुटलेला स्त्रीदेहाचा कलश म्हणजे देवदासी. देवदासी ह्या नावालाच देवाच्या दासी असतात प्रत्यक्षात त्या भोगदासीच. देवदासींवर लिहिताना कर्नाटकातील सौंदत्तीच्या यल्लमा देवस्थानला आणि तिथल्या रिवाजांना वगळून चालत नाही. रेणूका ही द. भारतातील एक प्रमुख मातृदेवता. ही रेणुकामाता कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्र याप्रांतांतील असंख्य लोकांची उपास्य देवता व अनेक कुटुंबांची कुलदेवता आहे. तिच्या भक्तांमध्ये जातींच्या पायऱ्यातील खालच्या स्तरातील लोकांची संख्या अधिक आहे. ‘यल्लम्मा’ या कानडी शब्दाचे ‘सर्वांची माता’ व ‘सप्तमातृका’ हे दोन अर्थ होतात जे तिचे सर्जनशील मातृस्वरूप दर्शवितात. यल्लम्मा व रेणूका यांचे भावैक्य मानले जाते. गंधर्वांची जलक्रीडा पाहताना विचलित झालेल्या रेणूकेचा जमदग्नीच्या आज्ञेवरून परशुरामाने वध केला आणि तिला पुन्हा जिवंत करताना मातंगीचे (मांगिणीचे) मस्तक तिच्या धडाला व तिचे मस्तक मांगिणीच्या धडाला जोडले गेले, अशी पुराणकथा आहे. जिवंत झालेल्या दोघीं म्हणजेच एक यल्लम्मा व दुसरी मरिअम्मा. काळाच्या ओघात स्थानिक मातृदेवतेचे पुराणातील रेणुकेशी ऐक्य झाले, हे या कथेवरून सूचित होते. तिला पार्वतीचा अवतार मानण्यात आले असून लज्जागौरी, एकवीरा, जोगुळांबा, भूदेवी, मातंगी, यमाई व सांतेरी ही तिचीच रूपे होत, असेही मानतात.

रेणुका या शब्दाचा रेणूमयी पृथ्वी हा अर्थ, भूदेवीचे योनिप्रतिक असलेल्या वारुळाच्या स्वरूपात होणारी रेणुका व यल्लम्मा यांची पूजा, योनिप्रतीक असलेल्या कवड्यांचे यल्लम्माच्या पूजेतील महत्त्वाचे स्थान, अपत्यप्राप्तीसाठी वांझ स्त्रियांकडून तिला केले जाणारे नवस, ती आईबापाविना पृथ्वीतून निर्माण झाल्याची आणि तिने कोंबडी बनून घातलेल्या तीन अंड्यांतून ब्रह्मा-विष्णू-महेश यांचा जन्म झाल्याची लोककथा इ. गोष्टींवरून यल्लम्मा ही सर्जनशील आदिशक्ती असल्याचे सूचित होते. यल्लम्माच्या उपासनेत जोगतिणींना व पुरुषत्वहीन जोगत्यांना असलेले महत्त्व, पुरुष जोगत्यांनीही स्त्रीवेष धारण करण्याची प्रथा, निर्मिती केल्यानंतरही देवीचे कौमार्य भंगत नाही या श्रद्धेमुळे तिला ‘कोरी भूमिका’ (कुमारी भूमी) मानण्याची पद्धत, परशुरामाला बिनबापाचा मुलगा म्हणून हिणवले जाण्याची कथा इत्यादींवरूनही यल्लम्माच्या उपासनेत मातृतत्त्वाचे प्राधान्य व पितृतत्त्वाचे गौणत्व असल्याचे स्पष्ट होते.

कर्नाटकातील सौंदत्ती (जि. बेळगाव) हे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचं यलम्माचं ठिकाण. दर माघी, चैत्री पौर्णिमेला इथे यात्रा भरते. ‘आहेव’ पुनव (पौष पौर्णिमा) ते रांडाव पुनव (मार्गशीर्ष पौर्णिमा) या काळात तिथं कर्मकांडं चालतात. कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांतील हजारो भाविक या काळात देवीदर्शनाला यल्लम्माच्या डोंगरावर येतात. सौंदत्तीतले देवदासी, जोगतीणी आणि जोगते (स्थानिक भाषेत जोगप्पा) यांना या दरम्यान उधाण आलेलं असतं. यल्लम्माचे वैधव्य सूचित करण्यासाठी तिची मानवी प्रतिनिधी असलेल्या जोगतिणीला रांडाव पुनवेला गावाबाहेर जाऊन हातातल्या बांगडय़ा फोडायच्या व आहेव पुनवेला पुन्हा भरायच्या असा 'विधी' असतो. देवीचे मंदीर तेराव्या शतकातील आहे. देवी कडक परंतु भावभोळी असल्याचे मानले जाते. तिच्या मूर्तीची बैठक चतुर्भुज व बसलेल्या स्थितीतील असते. तिच्या डोक्यावर मुकुट, हाती वहाती डमरू, त्रिशूळ, पाश व ब्रह्मकपाल ही आयुधे असतात. सौंदत्तीच्या यात्रेत देवीला चांदीचा पाळणा वाहणे, बगाड घेणे, लिंब नेसणे इ.प्रकारे नवस फेडले जातात. चंद्रगुत्ती (जि. शिमोगा) येथेही रेणुकाम्बेची नग्न होऊन पूजा केली जायची. सौंदत्तीत ब्रिटिश अमदानीतही असे घडत असल्याचे उल्लेख मिळतात. नवसाने झालेल्या मुलामुलींना वा केसात जट झालेल्या मुलींना देवीला वाहत. वाहीलेला मुलगा जोगती व मुलगी जोगतीण बने. मुली देवदासी बनून गणिका वृत्तीने जगत. कवड्यांची माळ घालणे, देवीची मूर्ती असलेली परडी म्हणजेच ‘जग’ डोक्यावर घेणे आणि कपाळाला भंडार लावणे, ही जोगती बनण्याच्या विधीतले भाग असत.

फार पूर्वी नाही पण वीसेक वर्षांपूर्वी दर वर्षी अक्षरशः शेकडो मुलींना या यात्रेत देवीला सोडलं जायचं. कोवळ्या मुलींना नग्न करून त्यांना लिंबाचा पाला नेसवला जायचा आणि भल्या पहाटे डोक्यावर घागर घेवून तिने देवीचा डोंगर चढायचा. मग तिथंच तिचं विधीपूर्वक लग्न लागायचं. लग्न कसलं, हा म्होतूर लागलेला असायचा. गळ्यात देवीच्या नावाने लाल-पांढऱ्या मण्यांचं मंगळसूत्र बांधलं जायचं. एकदा का तिचं लग्न झालं की अन्य पुरुषाशी तिनं लग्न करायचं नाही, जोगवा मागून खायचं, देवीची सेवा करायची अशी बंधने असत. हे एवढ्यावरच थांबत नसे, काही दशकांपूर्वी तर या मुलींच्या कौमार्याचा लिलाव व्हायचा ! जो जास्तीत जास्त बोली लावेल त्याला तिचा कौमार्यभंग करायचा अधिकार मिळायचा. नंतर हेच तिचं प्राक्तन व्हायचं. बघता बघता ती शय्यासोबतीपुरती उरायची. कधी गावातच राहून तर कधी मुंबईच्या कुंटणखान्यात रवानगी होऊन तिचं प्रारब्ध रोज नागवलं जाई. महिला संघटना आणि अंधश्रद्धा निर्मुलनाच्या न्यायालयीन लढ्यातून ही प्रथा वरवर तर थांबली आहे. पण छुप्या पद्धतीने अजूनही अशा घटना घडत असतात. कधी त्या उजेडात येतात तर कधी येत नाहीत.

ब्रिटिशांनी देवीला मुली सोडणे, तिला देवदासी बनवणे हा गुन्हा आहे, असा कायदा १९३४ साली केला होता. मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतर धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली या कुप्रथांना पुन्हा चांगले दिवस आले होते. मागील दशकात महाराष्ट्र व कर्नाटक सरकारने देवदासी प्रतिबंधक कायदा केला. त्यामुळे उघडपणे डोंगरावर किंवा सार्वजनिक ठिकाणी मुली किंवा मुलगे सोडले जात नाहीत, परंतु अजूनही चोरून पुजारयाच्या घरी किंवा इतर ठिकाणी मुली सोडल्या जातात. हे प्रमाण आता खूप कमी झालं आहे. मुलगी सोडतानाचा विधी हा पूर्वी विवाह सोहळ्यासारखा असे. या विधीत नवऱ्या मुलाऐवजी मुलीच्या शेजारी तांब्या पूजत. त्यावर ठेवलेला नारळ हे शंकराचं प्रतीक मानलं जातं. यावेळी पाच जोगतिणींची ओटी भरली जाई. हा सर्व खर्च मुलीच्या आई-वडिलांना करावा लागे. या लहान मुलीला नवं कोरं लुगडं नेसवलं जाई व लाल-पांढ-या मण्यांचं ‘दर्शन’ तिच्या गळ्यात बांधलं जाई. लग्न लागल्यावर ती नवजोगतीण तिथल्याच पाच जोगतिणींसह आजूबाजूच्या पाच घरी जाऊन जोगवा मागे. त्या रात्री या जोगतिणी यल्लम्माची भक्तीपर गाणी म्हणत.

हा विधी आटोपल्यावर ही मंडळी आपल्या गावी परत येत. इथे आल्यावर ज्याच्या घरातील मुलगी सोडली असेल, त्यांना आपल्या जातभाईंना जेवण द्यावं लागे. नंतर इतर जोगतिणींबरोबर हातात परडी घेऊन त्या लहान मुलीला जवळच्या पाच गावांतून जोगवा मागायला फिरवतात. कारण त्या गावांतील त्यांच्या भाऊबंदांना कळावं की, त्या मुलीला देवीला सोडली आहे व लग्नासाठी तिला त्यांच्याकडून मागणे येऊ नये असा आडाखा यामागे असे. लहान वय असल्यामुळे ती मुलगी कशीबशी साडी सावरत हे सगळं करत असे. आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय, याची तिला कल्पनाही नसे. साधारणपणे लहान वयातच या मुलींना सोडलं जायचं. कधी कधी तर अगदी बाल्यावस्थेत, पाळण्यात असतानाही सोडलं जायचं. सोडल्या जाणा-या मुली, बहुतांश करून मागासवर्गातील जातींतल्या असत. या जातीत आधीच सार्वजनिक जीवनातलं मागासलेपण असे, त्यात अंधश्रद्धा, गरिबी यांची भर पडे. त्यातून हे लोक मुली व मुले सोडायला राजी होत. अजूनही या मंडळीचा देवीवरचा अंधविश्वास इतका पराकोटीचा होता की साध्या-साध्या गोष्टी जरी आयुष्यात घडल्या तर त्या देवीच्या कोपामुळेच घडल्या, अशी समजूत एखाद्या म्हाता-या जोगतिणीने करून दिली तरी ते मुली सोडायला तयार होत. याच्या जोडीने काही गोष्टी तर पूर्वापार चालत आल्यात. डोक्यात जट आली की देवीचं बोलावणं आलं. मग त्यावर काही उपाय नाही, अशी समजूत बाळगून आयुष्यभर ती जट सांभाळत जगणं, हे त्यांच्या नशिबी येई. काही जणी लांब जट ठेवण्यासाठी पिशवी शिवून त्यात ती ठेवत. अलीकडे निपाणी, गडहिंग्लज इत्यादी भागांत काही डॉक्टर व स्त्री संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या स्त्रियांच्या जटा सोडवून त्यांचे केस पूर्ववत केले आहेत.

देवीला मुलं-मुली सोडण्याची कसलीही कारणं पुरेशी असत. घरात कुणी आजारी असलं, गोठय़ात बैल मेला, अंगावर खरूज उठली व ती लवकर बरी झाली नाही, तरीही त्या मुलीला किंवा मुलाला देवीला सोडल्याची अनेक उदाहरणं आहेत. एक तर गरिबीमुळे या लोकांना दवाखाना करणं परवडत नसे वा डॉक्टरपेक्षा यांचा भक्तावर जास्त विश्वास असे. केवळ भंडारा लावून रोग बरा होतो, ही समजूत. वंशाला कुलदीपक असावा ही पूर्वापार चालत आलेला खुळचटपणा अनेक सुशिक्षितांमध्ये आजही आढळून येतो. सर्वार्थाने मागासलेल्या घटकांत तर अशा अंधश्रद्धांचा कहर असे. अनेक मुली जन्मास घातल्यावरही आपल्याला मुलगा व्हावा ही इच्छा असे. त्यासाठी पहिल्या मुलीला यल्लम्माला सोडली जायचे. एवढं करूनही कधी कधी मुलगा होत नसे. एकदा सोडलेली मुलगी लग्नसंसार करू शकत नाही. तिला देवदासी म्हणूनच जगावं लागतं. केवळ अंधश्रद्धेतून हे आलेलं नाही तर यामागे आर्थिक कारणंही जबाबदार आहेत. एखाद्या जोगतिणीला जर तिला कुणापासून मूल झालं नाही तर ती आपल्या नात्यातली किंवा कुणाची तरी मुलगी दत्तक घेई व लहानपणीच तिला देवीला सोडून आपल्या म्हातारपणाच्या उदरनिर्वाहाची तजवीज करे. असेही प्रकार घडत ! आपल्या गळ्यात बांधलेलं यल्लम्माचं ‘दर्शन’ दुस-या कुणाच्यातरी गळ्यात आपण मरण्याआधी बांधले नाही तर देवीचा कोप होतो. सुखाने मरण येत नाही. आपल्या मुलीच्या, नातीच्या वा नात्यातल्या कुणाच्याही मुलीच्या गळ्यात एकदा हे बांधलं की, आपण यातून सुटलो अशी काहींची धारणा असते. वरवर ही अंधश्रद्धा असली तरी तिची खरी कारणे आर्थिकही आहेत. ही मुलगी मोठी झाल्यावर जोगवा मागून किंवा वेश्याव्यवसाय करून म्हातारपणी आपल्याला बघेल, याची ती सोय असे.

वयात आलेल्या अशा तरुण मुली गावागावातून जोगवा मागत इतर जोगतिणींबरोबर फिरत असत, तेव्हा त्यांच्यावर गावातील श्रीमंत जमीनदार किंवा दुकानदारांची नजर असे. ताफ्यातल्या प्रमुख बाईला पैशाची लालूच दाखवून ती बाई त्या मुलीला फूस लावून त्याच्याबरोबर तिचा ‘झुलवा’ किंवा त्याची ‘रखेली’ म्हणून ठेवण्यात यशस्वी होई. झुलवा लावणे म्हणजे एकाच माणसासोबत लग्नाच्या बाईसारखं राहणं. हा विधीही थोडाफार लग्नासारखा असतो. झुलवा लावलेला पुरुष तिला शेतात घर करून देतो किंवा तिच्या घरी येत असतो. त्याच्यापासून तिला मुलं झाली तर तो त्यांनाही पोसतो. हा उच्चवर्गीय असल्यामुळे अशा बाईला (जोगतिणीला) सहसा आपल्या घरी ठेवत नाही. बहुधा त्याचं पहिलं लग्न झालेलं असतं. हा झुलवा फार दिवस टिकतोच असं नाही. तो पुरुष जर मरण पावला किंवा काही काळाने त्याने मदत द्यायची थांबवली, तर त्या बाईला वेश्याव्यवसायाशिवाय पर्याय उरत नाही. झुलवा न लावताही काही वेळा अशा मुलीला एखाद्या प्रतिष्ठित माणसाकडून दिवस गेले तर तो सरळ हात झटकून मोकळा होतो व ‘‘हे मूल माझं कशावरून?,’’ असा सवाल निराधार मुलीला विचारतो. काही वेळा केवळ भंडा-याची शपथ घेऊन, ‘‘मी तुला आयुष्यभर, काही कमी पडून देणार नाही,’’ असं सांगून काम झाल्यावर तिला वा-यावर सोडून दिलं जातं. या अशिक्षित मुलींचा यल्लम्मा व तिच्या भंडा-यावर विश्वास असतो, याचा गैरफायदा असे लोक घेतात. या जोगतिणी दरवर्षी सौंदत्तीला यल्लम्माच्या जत्रेला जात असतात. जत्रेच्या वेळी देवीला नवस केलेल्या भक्तांना लिंब नेसवतात. लिंब नेसणं म्हणजे संपूर्ण अंगाला कडुनिंबाच्या डहाळ्या बांधणं. सौंदत्ती डोंगराच्या पायथ्याशी जोगल गावी सत्यम्माचं देऊळ आहे व तिथे एक पाण्याचं कुंड आहे. या अस्वच्छ कुंडात भाविक अंघोळ करतात. काही नवस बोललेले (यात स्त्रियाही असतात) संपूर्ण अंगभर लिंब नेसून दोन-तीन किलोमीटर अनवाणी पायाने उन्हातून चालत डोंगरावर जातात. काही लोळण घेत नमस्कार घालत जाताना दिसतात. हे पाहिल्यावर अंधश्रद्धा कुठल्या थरापर्यंत जाऊन पोहोचली आहे, हे प्रकर्षानं जाणवतं.

परिसरातल्या लग्नप्रसंगात खेडय़ापाडय़ातून जोगतिणींना पहिला मान असतो. आपल्या ताफ्यासह तोरण घेऊन वाजतगाजत जोगतीण येते. एकीच्या हातात चौंडकं, दुसरीच्या हातात तुणतुणं, तिसरीकडे मंजिरी अशी वाद्यं असतात. वयस्कर जोगतिणीच्या हातात भंडा-याची पिशवी असते. लग्नघराच्या चौकटीला तोरण बांधते. या जोगतिणीला साडी-चोळी व बिदागी घरमालक देतो. यल्लम्माला मुलेही सोडली जातात. मुले सोडण्याचे प्रमाण तुलनेत कमी आहे. कारण ‘धंद्या’च्या दृष्टीने मुलींचा जास्त उपयोग होतो. कधीकधी मुलींनाही शहरात जाऊन धंदा करावा, असं वाटतं. काही जणी शहरात पळून जातात. शिवाय दलालांची नजर अशा मुलींवर असतेच. गावात जोगवा मागून किंवा वेश्याव्यवसाय करूनही पोट भरणं अशक्य असतं. त्यामुळे त्यांचा ओढा शहराकडे असणं स्वाभाविक आहे. काही दलाल हे जत्रेच्या वेळी येऊन मुलगी हेरून ठेवतात. तिच्या पालकांना अनेक प्रलोभनं दाखवून तिला आपल्या ताब्यात घेतात. मुलीचे आई-वडील हे गरीब व मागासलेले असल्यामुळे नाईलाजानं व हिच्यामुळे दोन घास आपल्याला खाता येतील, या विचाराने हा सौदा करायला तयार होतात. अशा मुली मुंबई, मद्रास, पुणे, कोलकाता, बंगलोर अशा शहरातून वेश्याव्यवसायात ढकलल्या जातात. अंधश्रद्धा व गरिबीमुळे देवीच्या नावावर मुलींचा असा बळी दिला जातो. आजही महाराष्ट्राच्या सर्व भागात देवदासी आणि जोगते आढळतात. या सर्व प्रथा पूर्णतः बंद होतील तो दिवस सुदिन म्हणावा लागेल. त्या साठी सीतव्वा सारख्या धाडसी लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतानाच मदतीचा हातही पुढे करणे गरजेचे आहे कारण समाजाला अंधारातून उजेडाकडे नेताना स्वतः जळणाऱ्या त्या खऱ्या स्त्रीज्योती आहेत...

- समीर गायकवाड.