Sunday, September 10, 2017

फेडेड - ( Faded ) द सॉंग ...


"व्हेअर आर यु नाऊ ? आय एम फेडेड ....सो लॉस्ट.. "

का कुणास ठाऊक पण ही पोस्ट लिहिताना मला मन्मथ म्हैसकर आठवतोय, चैतन्य फडके आठवतोय...
निराशेचे रंग किती आणि कसे असतात ठाऊक आहेत का तुम्हाला ? शोधाच्या अंती येणारं नैराश्य कसं असतं माहिती आहे का तुम्हाला ? ... तुम्ही घेतलाय का कधी कुणाचा असा जीवघेणा शोध ? परत येणाऱ्या माणसाचा शोध...जीव कासावीस करणारा काळजाचे पाणी पाणी करणारा, हाकांचे प्रतिध्वनी काळजात घुमवणारा शोध... पडक्या इमारतीत चिणलेल्या आठवणींच्या साठवाचा शोध.. मळकट हवेत थिजलेल्या श्वासांचे उस्मरलेले जग शोधलंय का कधी ? ... गगनचुंबी इमारतींचा एकाकीपणा, ओस पडलेल्या गल्ल्यातल्या स्मशानशांततेचा शोध... भग्न अवशेषांतली आपल्या माणसाची छबी कधी दिसलीय का तुम्हाला ?.... एका अठरा वर्षाच्या मुलानं त्याच्या हळव्या काळजात जाणवलेली आर्त कालवाकालव अशी साकारली आहे की त्याची भाषा कळत नसली तरी डोळे ओले व्हावेत...
मेघांच्या आर्त प्रतिक्षेत जळून गेलेली किनखापी कुसुंबी झाडे, हलक्या वाऱ्याच्या लहरीवर आपला जीव ओवाळून टाकणारी वाळून शुष्क झालेली गवतांची पिवळी चॉकलेटी कुरणे, कुठल्याही समृद्धीच्या खाणाखुणा नसणारी चौकटी नसलेली दारे खिडक्या, ढगांचे मळभ नसलेले तरीही चोहीकडून गच्च दाटून आलेलं पोटात पाय दुमडून बसलेलं एकाकी आभाळ, पायाखाली येणारी कण ना कण विलग झालेली निसरडी माती, अबोल बनून राहिलेल्या डोंगर टेकड्या, आपल्या माणसाच्या अस्तित्वाची चिन्हे देहावर गोंदवून आपले अचेतन रूप टिकवून असलले जिने, पायऱ्या, पडवी, ओसरी, माळ, क्षितीजाचा विस्तीर्ण पट काळजात वितळवून सांजेचं रक्त माथ्यावर लेणारे माना खाली घालून उभे असणारे संधीकाळचे क्षण, निर्मनुष्य शहरातील आपल्या व्यक्तीचे तुटक तुटक अस्तित्व दाखवून देणारा चकवा चाहुलीचा भूलभुलैया, प्रतीक्षेच्या उंच मनोऱ्यावरून जाणवणारी एकटेपणाची काटेरी जाणीव, अंधाराच्या गुहेत घेतलेला शोधाचा मागोवा,संथ झाडांची चित्रे गोठवत चाललेली निळी काळी सरोवरे, बेवारस उभ्या असलेल्या रेल्वे वॅगन्सच्या तळाशी रुळांवर पडून असलेला पाला पाचोळा उडवत आपल्या व्यक्तीचा शोध घेताना पालथे घातलेले रस्ते सारं काही जिवंत केलंय... आपला माणूस समुद्राच्या तळाशी आहे का मनात दडलेल्या सैतानी सावल्यात त्याच अस्तित्व आहे हा सवाल करणाऱ्या अतिसंवेदनाशील माणसांचं जगणं खरंच खूप विस्कटलेलं असतं पण ते जगाला दिसूनच येत नाहीत... सारं काही हाताशी असूनही कशाचा तरी शोध घेताना येणारं जाणवणारं हे नैराश्य हरल्याची, हरवल्याची जाणीव करून देतं आणि आयुष्यातील आनंद फिकट होऊ लागतो... शोध इतका वाईट असतो का ? गेलेली व्यक्ती कधीच परत येत नाही पण तिच्या आठवणी नेहमीच काळीज कुरतडणाऱ्या असतात...

डिसेंबर २०१५ ला रिलीज झालेलं टीन एजर अॅलन वॉकरचं 'फेडेड' (faded) हे गाणं जगभरातील सव्वा अब्ज लोकांनी नुसत्या यु ट्यूबवर पाहिलंय... काय वाटलं असेल लोकांना ? प्रत्येकाचे अनुभव वेगळेच असतील पण गाणं पाहून कुणी आनंदाच्या मूडमध्ये नक्कीच परावर्तीत झाला नसेल ...अॅलन वॉकर वयाच्या चौदा वर्षापासून म्युझिक कंपोझ करतो. नॉर्वेमधील बर्जन शहरातील आपल्या पालकांच्या खोलीतच त्याची म्युझिक रूम सामावली आहे हे विशेष ! जस्टीन बिबर हे पाश्चात्य संगीताचा एक धृव असलं तर त्याचा दुसरा ध्रुव अॅलन वॉकरच्या रूपाने परफेक्ट समोर आला आहे... त्याची शैली अविश्वसनिय आणि अभूतपूर्व आहे, त्याची मांडणी काळजाचा ठाव घेणारी आहे.. २०१४ च्या 'फेड'(fade) ह्या इंस्ट्रुमेंटल व्हर्जनचे फेडेड हे कंडेन्सड व्होकल व्हर्जन आहे... 'फेडेड' पाहताना मन्मथ म्हैसकर का आठवतो त्याचे उत्तर गाण्याच्या शेवटच्या क्लिपमध्ये आहे.. जेंव्हा शोध घेणाऱ्या मुलाच्या हातातला फोटो कॅमेऱ्यापुढे येतो, ज्यात असते एक देखणे घर ज्याच्या आजूबाजूला देवदारची झाडे असतात. पण समोर असते ती निर्मनुष्य घराची फेडेड फ्रेम ज्यात तो हरवून जातो ...

इंग्रजी गाण्यांवर क्वचित पोस्ट लिहावीशी वाटते.. पण हे गाणं ऐकल्यापासून डोक्यात रुतून बसले होते ... निराशासुद्धा जीवनाचा एक भाग आहे त्यापासून पळून जाऊन कसे चालेल... तिचा शोध घेताना स्वतःचा खरा शोध लागतो इतके उमजले तरी पोस्ट कारणी लागेल ..

- समीर गायकवाड.

( पोस्टवर कॉमेंट करण्याआधी गाणं जरूर पहा, इंग्रजी गाण्यांची आवड नसली तरी पहा एक वेगळा अनुभव म्हणून पहा...)

'फेडेड'ची लिंक -
https://youtu.be/60ItHLz5WEA

lyrics of faded -
You were the shadow to my light
Did you feel us
Another start
You fade away
Afraid our aim is out of sight
Wanna see us
Alive

Where are you now
Where are you now
Where are you now
Was it all in my fantasy
Where are you now
Were you only imaginary
Where are you now

Atlantis
Under the sea
Under the sea
Where are you now
Another dream
The monsters running wild inside of me

I'm faded
I'm faded
So lost
I'm faded
I'm faded
So lost
I'm faded

These shallow waters, never met
What I needed
I'm letting go
A deeper dive
Eternal silence of the sea
I'm breathing
Alive

Where are you now
Where are you now

Under the bright
But faded lights
You set my heart on fire
Where are you now
Where are you now

Where are you now
Atlantis
Under the sea
Under the sea
Where are you now
Another dream
The monsters running wild inside of me
I'm faded
I'm faded
So lost
I'm faded
I'm faded
So lost
I'm faded
........................

Written by Gunnar Greve, Alan Walker, Anders Froen, Jesper Borgen •
Copyright © Warner/Chappell Music, Inc, Sony/ATV Music Publishing LLC

https://www.youtube.com/watch?v=60ItHLz5WEA