Friday, September 1, 2017

साडीचे मूल्य आणि क्षमेची गोष्ट
एका नगरात एक विणकर राहत होता. अत्यंत शांत, विनम्र आणि प्रामाणिक माणूस अशी त्याची ख्याती होती. त्याला क्रोध म्हणून कधी येत नसे, तो नेहमी हसतमुख बसलेला दिसे. एकदा काही टवाळ पोरांनी त्या विणकराची छेड काढायची ठरवली. त्याला पिसाळून सोडल्यावर तरी तो रागावतो की नाही हे त्यांना पहायचे होते.
त्या टवाळ पोरांत एक बलाढ्य धनिकाघरचा लक्ष्मीपुत्र होता. तो पुढे झाला, तिथे ठेवलेली साडी हातात घेत त्याने प्रसन्न मुद्रेतील विणकरास विचारले की, 'ही साडी केव्हढयाला द्याल ?'
विणकर उत्तरला - 'अवघे दहा रुपये !'


त्याचं उत्तर ऐकताच त्याला डिवचण्याच्या हेतूने त्या घमेंडी मुलाने त्या साडीचे दोन तुकडे केले. त्यातला एक तुकडा हातात धरला आणि पुन्हा प्रश्न केला - 'माझ्याकडे तितके पैसे नाहीत, आता त्यातले निम्मे वस्त्र माझ्या हातात आहे. याची किंमत किती ?'
अगदी शांत भावात विणकर बोलला - 'फक्त पाच रुपये !'
त्या मुलाने त्याचेही पुन्हा दोन तुकडे केले. आणि पुन्हा प्रश्न केला की, 'आता याची किंमत किती ?'
प्रसन्न वदनी विणकर म्हणाला - 'अडीच रुपये !'

तो पोरगा त्या साडीचे तुकडयावर तुकडे करत गेला आणि त्या विणकराला त्यांची किंमत विचारत गेला. विणकर देखील त्याच्या प्रत्येक प्रश्नाला न चिडता शांत चित्ताने उत्तर देत गेला.
तुकडे करून कंटाळलेला तो पोरगा अखेर म्हणाला - 'आता या साडीचे इतके तुकडे झालेत की याचा मला काही उपयोग नाही. सबब ही साडी मी घेत नाही.'
यावर विणकराने मंद स्मितहास्य केले. तो म्हणाला - 'बाळा हे तुकडे आता जसे तुझ्या कामाचे राहिले नाहीत तसेच ते माझ्या उपयोगाचे उरले नाहीत. पण असू देत. तू जाऊ शकतोस...'
त्या विणकराची ती कमालीची शांत वृत्ती, प्रसन्न चेहरा आणि क्षमाशीलता त्या मुलाच्या ध्यानात आली व तो ओशाळून गेला.
तो खिशात हात घालत म्हणाला - 'महोदय, मी आपल्या साडीचे नुकसान केलेलं आहे. या साडीची किंमत मी अदा करतो. बोला याचे काय दाम होतात ?'
विणकर म्हणाला - 'अरे भल्या माणसा, तू तर माझी साडी घेतली नाहीस... मग मी तुझे पैसे कसे काय घेऊ शकतो ?'
आता त्या मुलाचा आपल्या पैशाचा अहंभाव जागृत झाला
मुलगा म्हणाला, 'महोदय तुम्ही नुसती रक्कम सांगा... मी ताबडतोब अदा करतो.. ह्या अशा साड्यांची असून असून किती किंमत असणार आहे ? तिची जी काही किंमत असेल ती मी सहज देईन, त्याने मला फरक पडणार नाही. कारण माझ्याकडे खूप पैसे आहेत. तुम्हाला मात्र एका साडीच्या नुकसानीने फरक पडू शकतो कारण तुम्ही गरीब आहात. शिवाय तुमचे नुकसान मी केलेलं असल्याने त्याचा तोटा भरून देण्याची जबाबदारीही माझीच आहे. तितकं तरी मला कळतं बरं का !'   

त्या मुलाचं पैशाचं मिजास दाखवणारं वक्तव्य ऐकूनही विणकर शांत राहिला. काही क्षणात तो उत्तरला -  "हे बघ बाळा, तू हे नुकसान कधीच भरून देऊ शकणार नाहीस. तू नुसती कल्पना करून पहा की, एका शेतकऱ्याला मशागतीपासून ते कपाशीचं बीज रोवण्यापर्यंत कपाशी मोठी होईपर्यंत तिची काढणी होईपर्यंत किती श्रम घ्यावे लागले असतील. त्याने काढलेला कापूस व्यापाऱ्याने मेहनतीने विकला असेल. मग माझ्या शिष्येने अत्यंत कष्टपूर्वक त्यातून सुत कातले. मग मी त्याला रंग दिले, विणले, नवे रूप दिले. मग कुठे ही साडी तयार झाली. इतक्या लोकांची ही एव्हढी मोठी मेहनत आता वाया गेली आहे कारण कोणी हे वस्त्र परिधान केलं असतं, त्यातून अंग झाकलं असतं तर त्या कारागिरीचा लाभ झाला असता.  आता ते अशक्य आहे कारण तू तर त्याचे तुकडे तुकडे केले आहेत. हा तोटा तू भरून देऊ शकत नाहीस बाळा. ' विणकराच्या आवाजात क्रोध नव्हता की आक्रोशही नव्हता. दया आणि सौम्यतेने भारलेलं ते एक समुपदेशनच होतं जणू !

त्या मुलाला स्वतःची अत्यंत लाज वाटली. आपण या महात्म्याला विनाकारण त्रास दिला, त्याचे वस्त्र फाडले, अनाठायी त्याचे नुकसान केले. याचे त्याला वाईट वाटू लागले. पुढच्याच क्षणाला त्याने त्या विणकराच्या चरणांवर आपलं मस्तक टेकवलं आणि म्हणाला, 'हे महात्मा मला माफ करा. मी हे जाणीवपूर्वक केलं याची मला अधिक शरम वाटत्ये आहे. मी आपला अपराधी आहे. आपण मला दंड द्या वा क्षमा करा.'
पुढे होत विणकराने त्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाला, 'हे बघ मुला. तू दिलेले पैसे मी घेतले असते तर माझे काम भागले असते. पण त्यामुळे भविष्यात तुझ्या आयुष्याची अवस्था या साडीसारखीच झाली असती. खूप देखणं असूनही त्याचा कोणालाही तिळमात्र उपयोग झाला नसता. साडी एक वाया गेली तर मी त्याजागी दुसरे वस्त्र बनवेन. पण अहंकाराच्या दुर्गुणामुळे तुझे आयुष्य एकदा धुळीस मिळाले की ते पुन्हा नव्याने कसे उभं करणार ? तुझा पश्चात्ताप या साडीच्या किंमतीहून अधिक मौल्यवान आहे.'......

आपल्या सर्वांच्या आयुष्यात आता थोडंफार सुख आलंय, काहीशी समृद्धी आलीय, खिशात बऱ्यापैकी पैसा खूळखूळतोय, आपल्या घरीही आपण घरी पैसा अडका बाळगून आहोत. थोडंसं स्थैर्य आपल्या सर्वांच्या आयुष्यात आलेलं आहे. आपल्यातील काहींना त्याच्या '' ची बाधा ही झालीय. ही बाधा कुणाच्या कुठल्या कृतीतून कधी नी कशी झळकेल हे सांगता येत नाही. आजकाल जो तो तोऱ्यात आहे. काहींना कसली न कसली मिजास आहे, घमेंड आहे, गर्व आहे, अहंकार आहे, वृथा स्वाभिमान आहे. त्यामुळे इगोची निर्मिती मोठया प्रमाणात होते आहे. त्याला शीतल शब्दात अन कोमल स्वरात समजावून सांगेल असा तो विणकर आताच्या जगात नाहीये. तुमच्यापैकी कुणाला तो दिसला तर माझ्यासकट अनेकांच्या पत्त्यावर त्याला पाठवून द्या किंवा त्याचा पत्ता सांगा. म्हणजे त्यांना भेटून आपले पाय कशाचे आहेत हे प्रत्येकाला नक्की उमजेल. दृष्टांतातले विणकर म्हणजे संत कबीरदास होत हे वेगळे सांगणे नको...

- समीर गायकवाड.  


_____________________________________________

क्षमेची गोष्ट...
एका गावात एक मोठा व्यापारी होता. त्याला चार मुले होती. त्याची चारही मुले दररोज बुद्धांसमोर तीन-चार तास बसत होती. व्यापाऱ्याला प्रश्‍न पडला. मुले बुद्धांसमोर बसण्यापेक्षा दुकानात बसली तर जास्त नफा होईल, व्यापाऱ्याने विचार केला. एकेदिवशी व्यापारी मुलांच्या मागे गेला. मुले बुद्ध बसलेल्या ठिकाणी आली. बुद्ध डोळे मिटून शांतपणे बसून होते. त्यांच्यासमोर काही लोकही बसले होते. मुलेही त्यांच्यासमोर डोळे मिटून शांतपणे बसले. "त्यांनी डोळे मिटलेले आहेत आणि माझी मुलेही त्यांच्यासमोर डोळे मिटून बसलेली आहेत', हे पाहून व्यापारी संतापला. व्यापाऱ्याने बुद्धांना दूषणे देण्यास प्रारंभ केला. जोराजोरात वाईट बोलू लागला. तरीही सारे जण शांत होते. बुद्ध किंवा समोर बसलेले मुले काहीच प्रतिसाद देत नसल्याचे पाहत व्यापारी बुद्ध बसलेल्या ठिकाणाजवळ रागाने थुंकला आणि निघून गेला. बुद्ध, व्यापाऱ्याची मुले किंवा समोर बसलेल्यांपैकी कोणीही यावरदेखील काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे व्यापारी निघून गेला.


त्या रात्री व्यापाऱ्याला झोप लागली नाही. आपण एवढी दूषणे दिली. एवढे वाईट बोललो. त्यांच्याजवळ थुंकलो. तरीही त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. इतर वेळी आपण कोणालाही एक शब्दही वाईट बोललो, तर लोक चिडतात. पण बुद्ध, त्यांचे अनुयायी मात्र शांत होते. कदाचित आपणच चुकीचे काम केले असेल. आपणच चुकलो आहोत, असा विचार व्यापारी करू लागला. त्याला रात्रभर झोप लागली नाही.

दुसऱ्या दिवशी उठून तो बुद्धांकडे गेला. बुद्धांना नमस्कार करून तो क्षमा मागू लागला. "मी जे केले आहे. त्याचा मला पश्‍चाताप होत आहे. कृपया मला माफ करा', व्यापारी विनंती करू लागला. मात्र बुद्धांनी अनपेक्षित उत्तर दिले, "मी तुला माफ करू शकत नाही!' त्यामुळे व्यापारी आणखी त्रस्त झाला. तो म्हणाला, "पण आपण मला का माफ करू शकत नाहीत?' त्यावर बुद्धांनी उत्तर दिले, "ज्याने काल दूषणे देण्याचे, थुंकण्याचे कृत्य केले तो तू नाहीस. माझा द्वेष करणारा काल रात्रीच निघून गेला आहे. आता माझ्यासमोर जो माणूस क्षमायाचना करत आहे त्याने काहीही चूक केलेली नाही. जर तू काहीही चूक केली नसेल तर मी कशासाठी क्षमा करावी?'

हे ऐकून त्या व्यापाऱ्याने बुद्धांचे पाय धरले....

केलेल्या गुन्ह्यांची, कळत नकळत झालेल्या चुकांची क्षमा जरुर मागावी पण त्यासाठीचा पश्चात्ताप अंतःकरणापासूनचा असला पाहिजे. उगाच क्षमा मागायचा दिवस आहे म्हणून हात जोडणाऱ्या स्मायली टाकून आपल्या वर्तनात व अंतःकरणात कोणतेही क्षमाभाव न आणता क्षमायाचना करणे हाही एक गुन्हाच आहे. 

कोणत्याही काळी कळत नकळत माझ्याकडून दुखावल्या गेलेल्या सर्वांचा मी अंतःकरणापासून क्षमाप्रार्थी आहे... मनात किंतु न ठेवता उदार मनाने मला क्षमा करा ...

- समीर गायकवाड.
_____________________________________