Sunday, July 2, 2017

बॉलीवूडचे 'काळेगोरे' 'रंगा'यन ...मूकपटाचा जमाना गेला ते दशक होते एकोणीसशे चाळीसचे. या दशकात अधिकतर चित्रपट मायथॉलॉजिकल कंटेन्टचे होते. त्यामुळे प्रेमकथा वगैरेना फारसा स्कोप त्यात नव्हता. पन्नासच्या दशकात मात्र प्रेमकथांचे वारे वाहू लागले, मात्र त्यात आदर्शवाद होता. तरीही सौंदर्यदृष्टी तीच होती, पूर्वापार चालत आलेली गौरवर्णाच्या आकर्षणाची ! १९५० मध्ये अशोक कुमार नलिनी जयवंत या त्याकाळच्या सुपरहिट जोडीचा 'समाधी' चित्रपट आला होता. बॉक्स ऑफिसवर याने तुफान कल्ला केला होता. सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेलं आणि अमीरबाई कर्नाटकी व लता मंगेशकरांच्या आवाजातले 'गोरे गोरे ओ बांके छोरे, कभी मेरी गली आया करो..' हे गाणं खूप गाजलं. ते अजूनही ऑर्केस्ट्रात वाजवले जाते हे विशेष. यातल्या आपल्या प्रियकराचा उल्लेख 'गोरे गोरे बांके छोरे' आपल्या कुणाला कधीच खटकला नाही ! हे आज लिहिण्यामागचे कारण वेगळे आहे...

माणसांच्या गोऱ्या काळ्या रंगाबद्दल तुमची मते काय आहेत हे तुम्हाला नक्कीच माहिती असेल पण रंगाबद्दल बॉलीवूडचीही काही रंजक मते आहेत. आजच्या 'सामना'त प्रसिद्ध झालेला हा काळागोराच पण रोचक आलेख..

नुकतेच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने जाहीर केलेय की देशभरातील सर्व भाषांत रंगवर्धनाचा वा रंगछटावर्धनाचा दावा करणाऱ्या उत्पादनाच्या सर्व प्रकारच्या जाहिरातींवर बंदी घालण्यासाठी एका अभ्यास गटाची नियुक्ती केली जाऊन त्या अंतर्गत तीन महिन्यात निर्णय घेतला जाईल. खरे तर रंग हा त्वचेत असणाऱ्या लेयर्समधील मेलॅनिन या घटकामुळे निश्चित असतो. दिसणं हे दुय्यम असून कर्तृत्व महत्वाचे आहे. सौंदर्य हे बाह्यांग झाले अंतरंग महत्वाचा. तरीही मानवी मनाला बाह्य सौंदर्याची सातत्याने भुरळ पडत राहते. त्यापायी तो नानाविध क्लृप्त्या लढवत राहतो. वाट्टेल ते उपाय करत राहतो. अफाट पैसा तो यावर उधळत राहतो, तितका पैसा पोटासाठी व ज्ञानार्जनासाठी वापरला गेला तरी अनेक आश्चर्यकारक बदल

संबंधिताच्या जीवनात घडू शकतात. केवळ सामान्य माणसेच या वेडात गुंतलेले असतात असे नव्हे. मायकेल जॅक्सनसारख्या प्रतिभावंत कलावंताला आपल्या कृष्णवर्णाचा तिटकारा वाटतो आणि श्वेतवर्णाच्या मोहापायी तो स्वतःचे आयुष्य नरकात लोटून देतो हे सारे अनाकलनीय वाटत असले तरी त्यामागे कारणीभूत आहे ती वरवर गोरं दिसण्याची भयानक आणि विकृत लालसा. चित्रपटसृष्टी हे तर मायावी जग, ईथे तर याचे इफेक्ट आणि साईडइफेक्ट दोन्ही दिसतात. जास्तीत जास्त देखणं दिसण्याचा जीवघेणा संघर्ष ईथे अविरत सुरु असतो. रिअल लाईफमधल्या गोऱ्या रंगाच्या आकर्षणाचे प्रतिबिंब बॉलीवूडच्या रील लाईफमध्येही उमटलेले आहे. हिंदी चित्रपटातील गीतांचा प्रवास याचा साक्षीदार आहे. रंगाचे हे गायन उत्कटही आहे आणि रंजकही आहे. त्याचाच हा धांडोळा.

एकोणीसशे त्रेसष्टला नूतन आणि धर्मेंद्रच्या 'बंदिनी'मध्ये 'मोरा गोरा अंग लई ले, मोहे शाम रंग दई दे' हे अवीट गोडीचे गाणं होतं. 'बंदिनी' हा बिमल रॉयच्या मास्टरपीसपैकी एक मनाला जातो. सामाजिक भाष्य करणाऱ्या या चित्रपटात आयडियल रोमँटीसिझम होता. गुलजारसारख्या कसलेल्या गीतकाराने देखील गोऱ्या रंगाचे केलेलं आकलन खूप देखणं आहे. यात नायिका सांगते की, 'माझा गोरा रंग काढून घे आणि मला शामरंग बहाल कर, जेणेकरून मी या अंधारात ओळखू येणार नाही.' किती सुंदर मांडणी होती या गाण्याची ! या गीतात सावळ्या रंगाची वेगळी छटा पाहायला मिळते. हे गीत पडद्यावर नूतनने खूप छान साकारले होते.

या नंतर पुढचे दशक आले. आता कृष्णधवल सिनेमांची सद्दी संपली होती, नवे नायक, नायिका आल्या. नवे संगीतकार गीतकार आले आणि पाहता पाहता रुपेरी पडदा इस्टमनकलर झाला अन त्यावर नानाविध रंग उसळून आले. यातला प्रेमरंग अधिक गहिरा होता. या दशकापासून तर सौदर्यप्रसाधनाला जास्त महत्व आले. कारण फिल्मी आदर्शवाद आता संपुष्टात आला होता आणि त्या जागी काल्पनिक, उथळ मनोरंजक व काहीशा बाजारू कथांनी पडदा व्यापला. सत्तरच्या दशकात राजेशखन्नाचा बोलबाला होता. अपऱ्या नाकाच्या गोबऱ्या गालाच्या मुमताजसोबत त्याची जोडी जास्त जमली होती. १९७४ मध्ये तिच्यासोबतच्या 'रोटी' चित्रपटात किशोर लताच्या आवाजातले 'गोरे रंग पे ना इतना गुमान न कर..' युगुलगीत खूप गाजले होते. यातला नायक तिला टोमणे मारतो की, 'गोरा रंग हा काही दिवसाचाच असून तो कधी न कधी ढळणारच आहे, तेंव्हा त्यावर मिजास करू नकोस !' एलपीनी संगीत दिलेल्या गाण्याला मुमताज राजेशच्या जोडीने मस्त न्याय दिला होता. गोऱ्या रंगाची भलावण आणि निर्भत्सना या दोन्ही अंगाने हे गाणं सजलं होतं. १९७२ मधल्या राजेन्द्रकुमारच्या चित्रपटाचेच नाव 'गोरा और काला' होता पण त्यात रंगावर आधारित गाणी नव्हती. जुळ्या भावापैकी एक भाऊ गोरा आणि एक काळा असतो असे साधेसोपे कथानक त्यात होते.

दरम्यानच्या काळात एकोणीसशे पासष्टमध्ये आलेल्या मनोजकुमारच्या सस्पेन्सथ्रिलर 'गुमनाम'मध्ये मेहमूदने प्रचंड धुमाकूळ घालत 'हमे काले है तो क्या हुवा ?' गाताना गोऱ्या रंगाची पिसे काढली होती ! हैदराबादी स्टाईलमधला हा 'काळ्या रंगाचा जश्न' पब्लिकला इतका आवडला की तिथून पुढे मेहमूदसाठी सॉंग सिच्युएशन तयार ठेवली जाऊ लागली. यातलं काळ्या वर्णाचं साभिनय सादरीकरण वर्मावर बोट ठेवणारं होतं हे ही महत्वाचे होतं. रफींच्या एका वेगळ्या शैलीचा या गीताने इंडस्ट्रीला परिचय झाला हे ही विशेष ! त्या नंतर देव आनंदच्या 'ये गुलिस्ता हमारा'(१९७२) मधे 'गोरी गोरी गांव की गोरी रे.. ' हे तरल गीत होते. १९७८ मधल्या राजकपूरच्या सत्यम शिवं सुंदरम मध्ये पद्मिनी कोल्हापुरेवर चित्रित केलेलं एक भजन होतं - "यशोमती मैयासे बोले नंदलाला, राधा क्यों गोरी, मै क्युं काला ? " या गीतातील कृष्णाच्या प्रश्नावरचे यशोदेचे उत्तर खूप अर्थपूर्ण होते. रंगांचा खरा अर्थ कसा लावावा याचा देखणा दृष्टीकोन या गाण्यात होता.

राजेशखन्नानंतरचे दशक होते अँग्रीयंगमॅन अमिताभचे होते. त्याने इंडस्ट्रीचा चेहरामोहरा बदलताना ट्रेंडही बदलला. १९८२ मधल्या 'देशप्रेमी'त हेमा अमिताभवर चित्रित केलेल्या एका गीताचे बोल होते - "गोरे नही हम काले सही... हमसा एक नही.." अर्थात हे गीत चित्रपटातील गोऱ्या इंग्रजांना फाट्यावर मारण्यासाठी प्रस्तुत केलेलं होतं. चित्रपट चालला आणि गाणंही गाजलं होतं. लक्ष्मीकांत कुडलकर (संगीतकार एलपीमधला एल) हा स्वतःचाच ऑफबीट आवाज या गीतासाठी एलपीनी निवडला होता, जोडीला होत्या आशाताई ! '

'आम्ही काळे असलो म्हणून काय झालं ?' असा रोखठोक सवाल यात होता जो खूप भाव खाऊन गेला. याआधीच्या वर्षात 'लावारिस'मध्ये स्वतःच्या आवाजात गाताना अमिताभने 'मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है..?' गाताना गोऱ्या आणि काळ्या रंगाच्या पत्नीचे आगळे वेगळे गुण गायले होते. रंगांचा हा अंदाजही भाव खाऊन गेला होता.

अमिताभच्याच 'गिरफ्तार'(१९८५) मध्ये दाक्षिणात्त्य अभिनेत्री माधवीवर चित्रित केलेलं एक गाणं होतं - 'धूप में निकला ना करो रूप की राणी, गोरा रंग काला न पड जाये.. ' कुठल्याही सनस्क्रीन लोशनवाल्या कंपनीस थीमलाईन म्हणून वापरण्याजोगं हे गाणं होतं, यातले गिटार ट्यूनचे तुकडे अप्रतिम होते. गोऱ्या रंगाची किती ती काळजी ! त्याचे कौतुक ते किती, हे या गाण्यात झळकते ! १९९० मध्ये आलेल्या 'आज का अर्जुन'मध्ये 'गोरी हैं कलाईयां' हे मधुर गीत होतं. त्या ड्यूएटमध्ये अमिताभचे उत्तर होते 'गोरी हो कलाई चाहे काली हो कलाई.. ' त्यातला जयाप्रदाचा ठेका अजूनही अनेकांच्या आठवणीत असेल. हे गाणे देखील खूप गाजले होते. 'आखरी रास्ता'मधलं 'गोरी का साजन, साजन कि गोरी' हे श्रीदेवी अमिताभवरचे गाणे याच पंक्तीतले होते.

या पुढच्या दशकात १९९४ मध्ये अक्षयकुमारच्या 'सुहाग'मधले 'गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा..' हे गीत नव्या नायिकेची जुन्याच पद्धतीने ओळख करून देतं. गोविंदा करिष्माकपूर जोडीच्या धुमाकुळात आलेल्या 'खुद्दार'मधील 'गोरे गोरे गाल मेरे मै क्या करू'ने अलिशा चिनॉयला तोंड लपवण्याची पाळी आलेली कोण विसरेल बरे ? मागच्या वर्षी आलेला सिद्धार्थकपूर कतरिना जोडीच्या 'बार बार देखो' मधलं एव्हरग्रीन 'काला चस्मा जचदाए गोरे मुखडे पे..' हे या श्रेणीतलं ताजं उदाहरण ठरावं.

गोऱ्या काळ्या रंगावर बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटात अनेक गीत संवादातून विविध भावना व्यक्त झाल्या आहेत. पण १९८२ च्या 'डिस्को डान्सर'मधील 'गोरोंकी ना कालोंकी, दुनिया हैं दिलवालोंकी...' या गाण्याने जे भाव व्यक्त केलेत त्याला तोड नाही. 'बाह्य रंग हा वरवरचा दिखावा आहे काळजातला रंगच खरा !' हे या गाण्याने खुलवून सांगितलेय. रंगाचे कौतुक करताना पंकज उधासने गायलेल्या 'चांदी जैसा रंग हैं तेरा, सोने जैसे बाल, एक तुही धनवान हैं गोरी, बाकी सब कंगाल...' याचा उल्लेख केला नाही तर लेखन अधुरे होईल. कोणाला कोणत्या रंगाचे आकर्षण असावे याची सक्ती करता येणार नाही पण रंगामुळे आपले व्यक्तिमत्व खुजे होते वा श्रेष्ठ ठरते हा समज मात्र नक्कीच चुकीचा आहे हे खरे. हिंदी चित्रपटसृष्टी जरी रंगामागे धावणारी असली तरी तिचे रीललाईफ मात्र रंगांच्या सीमा ओलांडून सत्य समोर मांडते हा वरवर वाटणारा विरोधाभास असला तरी तेच अंतिम सत्य आहे...

- समीर गायकवाड.