Friday, June 30, 2017

कुळकथा मुस्तफा डोसाची...


मुंबईतील गुन्हेगारांची पहिली ज्ञात टोळी म्हणजे अलाहाबाद गँग. नावावरूनच त्यात कुणाचा भरणा होता हे कळते. त्यानंतर तिच्या विरोधात ठाकलेली जॉनी गँग, कानपुरी-रामपुरी गँग. रामपुरी गँगने मुंबईतील गुन्हेगारी जगताला रामपुरी चाकू हे शस्त्र बहाल केले. त्याच काळात क्रॉफर्ड मार्केटच्या शेजारी बेंगालीपुरा भागात एका सायकलच्या दुकानात मस्तान हैदर मिर्झा आपल्या अब्बाजानबरोबर राबत होता. दिवसभर राबूनही वडिलांच्या हातात आठ रूपयेच पडतात, हे तो जाणत होता. त्याचवेळी रस्त्यावरून धावणाऱ्या मोटारींचे त्याला वेध लागले. तसंच गोदीवर काम करताना कस्ट्म्स ड्यूटी चूकवून नफा कमावता येतो, हेही त्याला समजले आणि मग महिन्याच्या १५ रूपये कमाईवर थोडी मलई म्हणून सुरू केलेल्या चोरीला सुनियोजित तस्करीचे रूप आले.

त्याचवेळी व्हिक्टोरिया टर्मिनसवर हमालीचे काम करणारा वरदराजन मुनीस्वामी मुदलियार आपल्या रोजीरोटीसाठी झगडत होता. १९५२ साली मोरारजी देसाई सरकारने दारूबंदी लागू केल्यानंतर हातभट्टीवर दारू निर्माण करण्याचा व्यवसाय वरदराजनने सुरू केला आणि त्यात यशही प्राप्त केले. दक्षिणेतून आलेल्या या वरदराजनने धारावी, शीव-कोळीवाडा, अँटॉप हिल इथे आपले बस्तान बसवले. वरदराजनचा वरदाभाई होत असतानाच, मस्तानही मोठा होत होता. वरदाभाईला 'वणक्कम थलैवार' म्हणत आपल्या वाक्चातुर्याने मस्तानने कसे आपल्या बाजूला वळवून घेतले आणि नंतर आपल्या छडीच्या दहशतीमुळे कर्दनकाळ बनलेल्या करीमलाला या पठाणाला सोबत घेऊन त्रयींची ही संघटित गुन्हेगारी मुंबईवर कशी राज्य करू लागली, हा घटनाक्रम अत्यंत थक्क करणारा आहे. मस्तानच्या दरबारात एका नेकदिल हवालदाराला नेहमी प्रवेश आणि आदर मिळे, तो म्हणजे इब्राहिम कासकर!

काळाची क्रूर थट्टा म्हणजे पोलिसी खात्यात आदराचे-मानाचे स्थान असेलेल्या इब्राहिम कासकर यांच्याच घरात निपजला देशाचा शत्रू नंबर एक - दाऊद इब्राहिम कासकर! एकीकडे मस्तान-वरदाभाई-करीमलाला मुंबईच्या गुन्हेगारी राज्यावर वर्चस्व गाजवत असतानाच बाशूदादा आणि सोळा वर्षीय दाऊद इब्राहिम कासकर यांच्यात खटके उडत होते. दाऊदला स्थानिक राजकारण्याने मार्ग दाखवून यंग पार्टी सुरू करायला लावली आणि संघटितपणा काय चमत्कार दाखवू शकतो, हे दाऊदला कळून चुकले. त्यातच पांढरपेशा जगतात मस्तानचे वाढते वजन पाहून अस्वस्थ झालेल्या दाऊदने त्यालाच डिवचण्याचा चंग बांधला आणि अवघ्या एकोणिसाव्या वर्षी आपल्या साथीदारांच्या साहाय्याने पावणे पाच लाख रूपयांची चोरी केली. पुढे चोरलेली रक्कम ही मस्तानची नव्हती हे उघड झाले, पण तेव्हाच मुंबईच्या गुन्हेगारी जगतावर खऱ्या अर्थाने दाऊदचा उदय झाला. दाऊद डोंगरीमध्ये वर्चस्व सिध्द करत असताना १९७७ च्या सुमारास अरूण गवळी, बाबू रेशीम आणि रमा नाईक यांची 'बी-आर- गँग' प्रस्थापित झाली होती. याचवेळी पदवीधर मन्या सुर्वेचा दादागिरीमध्ये झालेला प्रवेश. हिंदू म्हणवल्या जाणाऱ्या गुन्हेगारांची मुस्लिम गँगस्टर्सशी होणारी भांडणे, त्यातून होणारा रक्तपात आणि आपला सरळ संबंध टाळण्यासाठी पोलिसांना पुढे करून रूढ झालेली एन्काऊंटर पद्धत... हा इतिहास पुढे सर्वांनाच माहीत आहे.

शहरात असा रक्तपाताला ऊत आला असतानाच उपनगरांमध्ये राजन नायर आणि नंतर छोटा राजन यांची 'डी कंपनी'ला साथ मिळाल्याने काट्याने काटा काढणे, सूड घेणे हे शब्द परवलीचे झाले. हे सर्व सुरू असतानाच पोलिसांना अनेक हत्या, खंडणीमध्ये दाऊदचाच हात असल्याचे पुरावे मिळाले. पोलिस सर्व तयारीनिशी मुसाफिरखान्यावर धडकलेसुध्दा. पण काही मिनिटांची हुलकावणी देऊन दाऊद निसटला, तो कायमचाच. ते साल होते १९८६. त्यानंतर दाऊद पुन्हा कधीही देशात आला नाही.

भारताबाहेर गेल्यानंतर छोटा राजन आणि इतर हस्तकांच्या साहाय्याने दाऊद खंडणीखोरी आणि हत्यांचे रक्तरंजित अध्याय लिहू लागला. मग त्या गवळी टोळीशी झालेल्या तुफान चकमकी असोत की माया डोळसला संपवण्यात थेट दुबईहून दाऊदने हलवलेली सूत्रे असोत. मात्र तोपर्यंत अंडरवर्ल्ड केवळ गुंडापर्यंत मर्यादित होतं. मुंबईकरांना त्याची पहिली झळ बसली, ती जग हादरवणाऱ्या १२ मार्च १९९३च्या बॉम्बस्फोटांवेळी. त्यानंतर भारतावर अनेक हल्ले झाले, पण मुंबईला सदोदित असुरक्षिततेच्या खाईत लोटणारा दिवस म्हणून आजही १२ मार्च हीच तारीख डोळ्यांसमोर येते. त्यानंतर मग छोटा राजन डी कंपनीतून फुटून निघाला. दाऊदच्या कट्टरपंथी इस्लामी चेहऱ्याला हिंदू डॉनच्या मुखवट्यातून प्रत्युत्तर देताना दाऊदची जागा घ्यायची हे छोटा राजनचे उद्दिष्ट होते. पण चाणाक्ष दाऊदने राजनच्याजागी छोटा शकीलला रिप्लेस केले. छोटा शकीलने राजनची जागा घेऊन बॉलिवूडमध्ये आपले स्थान मिळवण्यापासून ते रिअल इस्टेटमध्ये बिल्डर्सलाईनमध्ये दबदबा निर्माण केला. या दरम्यान अबू सालेमचा उदय आणि अस्त झाला. अश्विन नाईक टोळीशी झालेल्या वैमनस्यातून राजन देश सोडून परागंदा झाला. त्या नंतर दाऊद पाकमध्ये अत्यंत सुरक्षित आयुष्य जगला. पाकिस्तानमधील सेंट्रल बँकेला त्याने आर्थिक संकटातून वाचवले. भारत, नेपाळ, पाकिस्तान, थायलंड, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, मलेशिया, इंग्लंड, युएई, सिंगापूर, श्रीलंका, जर्मनी, फ्रान्स अनेक देशांत आधी अंमली पदार्थाच्या तस्करीचे आणि नंतर रिअल इस्टेटचं व्यापाराचे जाळे विणले. शकील थंड पडल्यावर दाऊदची सगळी सूत्रे मुस्तफा डोसा आर्थररोड कारागृहातून हलवत होता.

मुस्तफा डोसाची फाशी अंमलात येण्याची चिन्हे दिसत असताना छोटा राजनचे प्रीप्लान्ड भारतात येणं, अश्विन नाईकला किरकोळ गुन्ह्यात अडकवलं जाणं हे जेलमधील दाऊदच्या स्लीपर सेल्सना शह देईल असे वाटत असताना मुस्तफा डोसा हृदयविकाराने २८ तारखेस बुधवारी मरण पावला. त्याला मधुमेह आणि आर्टरियल ब्लॉकेजेस होती असं जेजे हॉस्पिटलच्या वतीने सांगितलं गेलंय. दाऊदचा मेव्हणा इस्माईल पारकर याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दाऊदच्या हस्तकांनी थेट जेजेतच घुसून शैलेश हळदणकरची गेम वाजवली होती. आता आपल्या माणसाची बोलती बंद व्हावी म्हणून त्यांनी किंवा पोलिसांनीच काही विशेष प्रयत्न केले होते का हे रहस्य कधी उलगडेल हे आताच सांगता येणार नाही. मात्र खाकी वर्दीतला एक हिस्सा अजूनही डी कंपनीची नमकहलाली करतो. याचे उदाहरण मुस्तफा बाबतचेच देता येईल. फेब्रुवारीत मुस्तफाला एका गुन्ह्याच्या विशेष तपासासाठी गुजरातमधील पोरबंदर येथे रेल्वेने नेले जात होते. त्या प्रवासात रात्री पत्नी शबीना खत्री हिची त्याला परिपूर्ण सोबत होईल अशी अरेंजमेंट केली गेली. फाशीचा आरोपी असलेल्या मुस्तफाला एक रोमँटीक रात्र पोलिसांच्या कृपेने अनुभवता आली. यावर्षीच्या फेब्रुवारीत याचप्रकरणी एपीआय अयाज पटेल यांना निलंबित केलं गेलं हे ही नमूद करण्याजोगं आहे. जेलमध्ये देखील मुस्तफा रंगेल आणि रग्गील वागायचा. मुस्तफा विकृत होता. तो सहआरोपी, सहकैदी यांची नक्कल करायचा. वकीलांची टवाळी करायचा. न्यायालयातही तो कधीच गभीर नसायचा. त्याला गुन्ह्याबद्दल कधीच खंत वाटली नव्हती. मुंबई बॉंम्बस्फोटाच्या खटल्यात त्याच्यावर अत्यंत गंभीर आरोप होते पण मुस्तफाचे वर्तन अत्यंत उद्धट आणि उर्मट होते. फाशीची घटका जवळ आलेला इतका घातकी माणूस असा सहजासहजी मरतो आणि मंजुळा शेट्टे सारखी कौटुंबिक कलहातील दुर्दैवी घटनेमुळे आत आलेली पण सजा संपत आलेली स्त्री मारली जाते हा नियतीचा न्याय अजब म्हणावा लागेल...

~~~~~~~~~
१८/०४/१८ 

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील फाशीची शिक्षा झालेला दाऊदचा अत्यंत विश्वासू हस्तक मुस्तफा डोसा काही दिवसापूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने मरण पावल्यावर लिहिलेली पोस्ट आठवते का ?..असो..
मुस्तफा डोसा मेल्यानंतर अवघ्या काही महिन्यात याच खटल्यातील एक महत्वाचा आरोपी ताहीर मर्चंट काही तासापूर्वी आज हृदयविकाराच्याच धक्क्याने मरण पावला आहे. डाॅन याकूब मेमनच्या सर्वात जवळचा आणि खास माणूस अशी ताहीर मर्चंटची ओळख होती. बाॅम्बस्फोट घडवून आणण्यासाठी ज्या काही बैठका दुबईत झाल्या, त्या बैठका ताहीर मर्चंटने घेतल्या होत्या. या बैठकांना अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद आणि टायगर मेमनही उपस्थित होता. ताहीरच्या मृत्यूने आता टायगर मेमन ते दाऊद यांच्यातली पुराव्याची साखळी तुटली आहे.
प्रचंड क्रूरकर्मे असलेले, डोळ्यादेखता अनेकांचे मृत्यू बघितलेले हे लोक धक्कादायक रित्या हृदयविकाराच्या धक्क्याने मरण पावत आहेत.
विशेष म्हणजे विशेष टाडा न्यायालयाने ताहीर मर्चंटला सुनावलेली फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने ४ डिसेंबरला स्थगित केली होती, शिवाय त्याच्या केसशी निगडीत सर्व कागदपत्रे टाडा न्यायालयाकडून मागवली होती, सीबीआयला १४ मार्च २०१८ पर्यंत म्हणणे सादर करायला सांगितले होते. त्यावर सीबीआयने आणखी मुदतवाढ करून घेतली होती. पण आज ताहीरला ह्रदयविंकाराचा धक्का आला आणि बरेच प्रश्न चुटकीसरशी सुटलेत.

१९९३ बॉम्बस्फोटाच्या निकालपत्रात मुख्य सूत्रधार (main conspirators) म्हणून टाडा न्यायालयाने ज्या चौघांचा उल्लेख केला होता त्यातल्या दोघांना मस्तपैकी हृदयविकाराचा धक्का येऊन ते मरण पावलेत. तिसरा फेरोझ खान हा अगदी प्युअर नमकहलाल आहे, तो कधीही गद्दारी करू शकत नाही, तर चौथा अबू सालेम हा दाऊदविरोधात कधीही तोंड उघडू शकतो मात्र जे दाऊदचे असूनही त्याच्यावर उलटू शकत होते ते आता वर गेलेत !....

आपल्याकडे फाशीची शिक्षा झालेल्यांची रांग मोठी आहे, त्यांची अंमलबजावणी कधी होईल माहिती नाही, शिवाय आपल्याकडे फाशी देऊपर्यंत लोकं कोर्टबाजी करत राहतात, त्यापेक्षा 'नकोशा' लोकांचे 'अपेक्षित' हृदयविकाराचे धक्के तपास यंत्रणांच्या पथ्यावर पडतील !

या खटल्यात गुन्हेगार सिद्ध झालेला पण 'डी'चा खुल्ला दुश्मन असलेला एकच व्यक्ती आता जिवंत आहे, तो म्हणजे अबू सालेम ! एकदा त्यालाही हृदयविकाराचा झटका येऊन गेला की 'बडे भाईजान'चे यशस्वी लँडिंग होईल.
जन्मठेप झालेले करिमुल्ला शेख, रियाज सिद्दिकी हे दाऊदच्या विरुद्ध उपयोगाचे नाहीत. ते न्युट्रॉन्स आहेत !
काही महिन्यापूर्वी छोटा शकीलने साथ सोडून दिलेल्या दाऊदचा शरणागतीपूर्व विश्वास संपादन करण्याकरिता ही हृदयविकारी पद्धत उपयुक्त ठरू शकते.

अक्कल हुशारीने अटक होऊन भारतीय कारागृहात 'सुरक्षित' लाईफ जगत असलेल्या छोटा राजनच्या तर ह्या टिप्स नसतील ना !

- समीर गायकवाड.