Wednesday, May 31, 2017

प्रेक्षकांशी 'बाँड' केलेला अभिनेता - रॉजर मूर


चित्रपटात काम करणारी स्टार मंडळीही हाडामासाची माणसंच असतात, एके दिवशी ते ही आपली साथ सोडून आपल्या अनंताच्या प्रवासाला निघून जातात. मग चाहते मंडळी आपला शोक प्रकट करतात, त्यांचे स्नेहीजन जुन्या आठवणींना उजाळा देतात तर आप्तेष्ट लोक दुःखात बुडून जातात. पण सामान्य माणूस या सर्वांपासून अलिप्त असतो. रसिक मात्र दीर्घ काळ हळहळ व्यक्त करतो. आपल्या भाषेचा, प्रांताचा, देशाचा माणूस असला तर हे दुःख उमजू शकते. कोण कुठला सातासमुद्रापाडचा एका विशिष्ट पठडीतील भूमिका करणारा वृद्धत्वाला टेकलेला एक अभिनेता एक्झिट घेतो अन अख्खं जग सुस्कारे सोडते. असं सहसा होत नाही. पण कालपरवा रॉजर मूरच्या बाबतीत असं घडलं. कारण बाँडपटाच्या या बेताज बादशहाचा लोकांशी असणारा 'बाँड'च तितका घट्ट होता. 

आजही बाँडपट पहिले जातात, त्यातली मेन थीम आजही तशीच आहे. टायटल्सदेखील तशीच आहेत. बाँडपटात सुरुवातीला रुपेरी पडद्यावर कॅमेर्‍याच्या शटरच्या कप्प्यांचे रेखाटन समोर यायचे, त्यातल्या गोलाकार लेन्सच्या कप्प्यातून बाँडची सावली पुढे जायची. जोडीला साउंड ट्रॅकवर बाँडची चिरपरिचित सिग्नेचर ट्यून चढत्या टोनमध्ये घुमायची. इकडे तिकडे बघत जाणारी ती सावली अचानक प्रेक्षकांच्या दिशेने वळायची आणि सफाईदारपणे बॉंड हातातले रिव्हॉल्व्हर चालवायचा. पडद्यावरील त्या गोलातून रक्त ओघळू लागायचे. मग पडद्यावर टायटल चमकायचे.. पुढचे दोन तास बाँड आणि त्याच्या सुंदरींनी पब्लिकचा ताबा घेतलेला असे. अगदी काही महिन्यापूर्वीच बाँडपट 'क्वांटम ऑफ सोलेस' 'स्कायफॉल'वरही व्हॉटसएपवर धमाल मेसेजेस फिरत होते म्हणजे आजची टेक्नोसॅव्ही पिढी देखील बाँडपट एन्जॉय करतेय. हा सिलसिला सुरु आहे १९६२ पासून. बाँडपटाचे अनेक कंगोरे आहेत पण रॉजर मूर त्यातला केंद्रबिंदू ठरावा इतका सरस होता...

१८८० साली पहिल्या मुव्ही कॅमेर्‍याचा शोध लागल्यापासून आजवर लाखो चित्रपट निर्मिले गेलेत. जीवनातील हरेक भावना, विषय, आशय, घटना, इतिहास, विज्ञान,आस्था अशा विविध प्रांतातले चित्रपट तयार झाले प्रत्येकाचे वेगळे गारुड झाले. पण एका यकश्चित पुस्तकातून रेखाटलेले जेम्स बाँडचे काल्पनिक पात्र गेली पाच दशके लोकांच्या मनावर मोहिनी घालण्यात यशस्वी झालेय. बाँड म्हटलं की काही गोष्टी आपसूक डोळ्यापुढे तरळतात, जगभरातील प्रेक्षणीय व निसर्गरम्य स्थळं, बाँडची स्पेशल एजंट क्यू आणि त्या॑च्या सहकारयांनी बनवलेली एकाहून एक सरस गॅजेट्स, तोंडात बोटं घालायला लावणारी त्याची अॅस्टन मार्टिन कार, थंड डोक्याचा बाँड आणि त्याच्या भोवतीचा अल्पवस्त्रातील लावण्यवतींचा गराडा ! बाँडचा जन्मदाता लेखक इयान फ्लेमिंगलाही हे पात्र इतकं अजरामर ठरेल असं कधीच वाटलं नव्हतं. फ्लेमिंग एक जाणकार पक्षी निरिक्षक होता व 'जेम्स बाँड' हे नावही त्याने एका तत्कालीन विख्यात अमेरिकन पक्षी निरीक्षकापासून प्रेरित होऊन घेतलं होतं. 'द न्युयॉर्कर'ला १९६२ साली दिलेल्या एका मुलाखतीत फ्लेमिंगने म्हटलं होतं की, "१९५३ साली जेव्हा मी पहिली कथा लिहीली, तेव्हा मला बाँड हा स्लो ,स्टेडी, आणि रटाळ जीवन जगणारा ०० एजंट म्हणून हवा होता आणि म्हणूनच मी त्याचं नाव जेम्स बाँड ठेवलं, कारण हे मी माझ्या आयुष्यात ऐकलेलं सगळ्यात स्लो नाव होतं. जन्मदात्याने विचार एक केला आणि घडलं भलतंच. जगातला सर्वात तल्लख बुद्धीचा, साहसी, चपळ, पराक्रमी, हजरजबाबी, आणि काही प्रमाणात स्त्री लंपट कथानायक जेम्सबाँडच्या रूपाने मिळाला.

इयान फ्लेमिंग सुरुवातीला बाँडच्या भुमिकेसाठी शॉन कॉनरीच्या निवडीवर नाखूश होते पण शॉनचा सिक्रेटएजंट चित्रपट डॉ. नोच्या यशानंतर त्यांनी आपला दृष्टीकोन बदलून बाँडच्या मूळ पात्रासही शॉनचा मुलामा चढवला. खुद्द शॉन कॉनरीनेही असा विचार कधी केला नसेल की, आपण जेम्स बाँड म्हणून ओळखले जाऊ. नायकाच्या भूमिकेससाठी टॅलंट हंट आयोजले होते. त्याद्वारे ग्रेगरी पेकला बाँडच्या भूमिकेसाठी निवडले गेले. पण त्याचे काम चांगले झाले नाही म्हणून हा रोल शॉन कॉनरीकडे गेला. आधी तर शॉनच या सिक्रेटएजंटच्या भूमिकेसाठी अनुत्सुक होता पण नंतर मात्र ते राजी झाला. चित्रपटाचे प्रोडय़ुसर क्युबी ब्रोकोलीच्या पत्नीने डाना ब्रोकोलीने शॉनला ग्रीन सिग्नल दिला. शॉनला वुमेन फॅन फ़ॉलोइंग जास्ती असेल असा तिचा अंदाज होता. डॉ. नोच्या यशानंतर फ्लेमिंगनीही आपलं मत बदलत बाँडच्या पात्राला कॉनरीशी मिळतेजुळते बनवले. हे रुपडे काहीसे स्कॉटिश अन काही स्विस होतं. बाँडच्या पहिल्या चित्रपटाच्या सुपरडुपर कामगिरीने बॉंडपटाची मालिका बनवण्याचे धाडस त्यांनी केले.

शॉन कॉनरीने 'डॉ. नो' नंतर फ्रॉम रशिया विथ लव्ह’, ‘गोल्डफिंगर’, ‘थंडरबॉलआणि यू ओन्ली लिव्ह ट्वाइसया चित्रपटांतून तुफान कल्ला केला होता. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. तोवर एजंट बाँड महिलावर्गातच नव्हे तर सर्व प्रेक्षकवर्गात तुफान लोकप्रिय झाला होता. यानंतर अचानक कॉनरीने बाँडच्या भूमिका बंद करण्याचा निर्णय जाहीर केला त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओरिजिनचा अभिनेता जॉर्ज लाझेंबी हा नव्या बाँडच्या रुपाने समोर आला. बाँड साकारण्यासाठीचे सकल गुण त्याच्या अंगी होते. १९६९ मध्ये ऑन हर मॅजेस्टीज् सिक्रेट सर्व्हिसया चित्रपटाच्या यशामुळे जॉर्जचे दिग्दर्शकाशी खटकले. त्यामुळे बाँडपटापासून तो बाजूला झाला. पुन्हा नव्याने बाँडचा शोध सुरू झाला, मात्र अखेरीस शॉननेच पुन्हा एकदा बाँड साकारला. १९७१ मध्ये डायमंडस् आर फॉरएव्हरमध्ये त्याने बाँडची लास्ट इनिंग खेळली. तोवर 'डबल ओ सेव्हन'ची नशा त्याने लोकांत भिनवली होती. एम, मिस मनीपेनी, क्यू या इतर पात्रांची लोकांशी घसट झाली !

या नंतर आला तो रॉजर मूर. सोनेरी केसांचा, निळ्या डोळ्यांचा, बेरकी चेहरयाचा, शिडशिडीत बांध्याचा, चपळ अंगाचा, तल्लख बुद्धीचा, मधूनच कमालीचा लफडेबाज वाटणारा, आपल्या अस्मानी मोहिमा तडीस नेणारा, आतल्या गाठीचा रॉजर मूर अनेकांना शॉन कॉनरीपेक्षा उजवा वाटायचा. त्याचे ते निमिषार्धात पिस्तुल काढून रोखणं अन हलकेच पोरींचे थवे उडवणे जाम भारी वाटायचे. कधी मिष्कीलपणे हसत तर कधी नजर चुकवत चुकवत गालफाडे आत घेत 'माय नेम इज बाँड, जेम्स बाँड' असं म्हणत हस्तांदोलन करणारा आणि त्याच वेळी उडत्या पाखरांची पिसं मोजणारा हा माणूस अवलिया वाटायचा. आपलं ड्रिंक्स देखील तो विशिष्ट लकबीत ऑर्डर करायचा, "व्होडका मार्टिनी, शेकन, बट नॉट स्टर्ड !" असा हा धडाकेबाज बाँड. त्याने सर्वात जास्त म्हणजे सात चित्रपटांमध्ये जेम्स बाँडची भूमिका केली. १९७३ मध्ये जेव्हा त्याने पहिला चित्रपट केला तेव्हा त्याचे वय ४६ वर्षे होते आणि १९८५ मध्ये वयाच्या ५८ व्या वर्षी त्याने शेवटचा बाँड साकारला. त्याच्या सर्व कथानायकात काही मजेदार वैशिष्ट्ये होती. शॉन कॉनरी जसा जुना होत गेला तसा बाँडपटाचा प्रेक्षक विस्तारत गेला, त्याच्या आवडीनिवडी बदलत गेल्या. 'प्लेबॉय' इमेजचा हलक्या फुलक्या मूडमधला, मादक चेहऱ्याचा आणि लफडी कुलंगडी करत करत शत्रूचा बीमोड करणारा स्पाय एजंट लोकांना हवा होता तो रॉजर मूरने दिला. यामुळेच ऍकॅडमी ऍवार्डसच्या पोलमध्ये २००४ साली सर्वश्रेष्ठ बाँड साकारणारा कलाकार म्हणून त्याची निवड झाली शिवाय २००८ च्या अन्य एका पोलमध्येही त्यानेच सर्वाधिक म्हणजे ६२ टक्के मते घेतली होती.

१९७३च्या लिव्ह अँड लेट डायया चित्रपटासाठी रॉजरने आपले केस कापले होते. वेट लॉस केले होते. त्यानंतर त्याने द मॅन विथ द गोल्डन गन’, ‘द स्पाय हू लव्ह्ड मी’, ‘मूनरेकर’, ‘फॉर युवर आइज ओन्ली’, ‘ऑक्टोपसी’, आणि अ व्ह्यू टू किलया चित्रपटांमध्ये काम केले. इतके असूनही स्वतः रॉजरने 'माय वर्ड इज माय बाँड' या आत्मचरित्रात आपल्या अभिनयावर तृप्त नसल्याचे म्हटलेय. जेम्स बाँडच्या भूमिकेसाठी आपल्याला फर्स्ट फेवर कधीच मिळाला नव्हता असे त्यात नमूद केलेय. कॉनरीच्या भूमिका निवृत्तीनंतर रॉजरने या भूमिकेसाठी आपले मनसुबे जाहिर केले होते. त्याला ही भूमिका मिळाली आणि त्याचे त्याने सोने केले. रॉजरने साकारलेल्या भूमिकांचे वैशिष्ट्ये म्हणजे खटकेबाज संवाद, मिश्कील आणि तडफदार दोन्हीही संवाद तो लीलया स्टाईलमध्ये बोलायचा. त्याची उजव्या बाजूला किंचित झुकून वेगाने चालत जाण्याची ढब, मादक हसीनांच्या गराडयात असूनही भेदक नजरेने आपले लक्ष्य हेरायची ससाण्यासारखी देहबोली, त्याचे विशिष्ट लकबीतले सिगारेट फुंकणे, मधूनच डोळे मिचकावणे, हाणामारी करताना कोट्या करणे, त्याचा देखणेपणा, त्याची तडफ, त्याचे सहज वावरणे सगळे गजब होते. रॉजर मूरने जेंव्हा नायकाच्या भूमिकेस काहीशी मिश्कील छटा दिली आणि आपल्या बॉलीवूडच्या नायकांनी देखील कॉमेडीचे रंग आपल्याच भूमिकेस चढवले. प्रसंगी कठोर होणारा अन सौंदर्यवती ललनेस निर्दयी होत यमसदनास धाडणारा मूरचा बाँड सर्वांना हवाहवासा वाटायचा. डोळे विस्फारून, कान टवकारून, खुर्चीचे हॅण्डल गच्च धरून पब्लिक मती गुंग झाल्यागत बघत राही. भारतीय प्रेक्षक तर त्याची 'ऑक्टोपसी'मधली कबीर बेदीसोबतची जुगलबंदी कधीच विसरणार नाहीत. वयाची साठी गाठूनही त्याने अ व्ह्यू टू अ किलकेला होता तेंव्हा त्याचा चार्म जाऊनही लोकांनी तिकीटबारीवर रांगा लावल्या होत्या. ही त्याची जादू होती पण यानंतर त्याने स्वतःला आवरते घेतले. कारण लोकांची अपेक्षा असायची की बाँड नेहमीच सदाबहार तरुण, गिर्रेबाज पाखरं उडवणारा आणि धाडसी तडफदार असावा !

रॉजर मूरनंतर टीमोथी डाल्टन, पिअर्स ब्रॉस्नन ते अलिकडच्या डॅनियल क्रेग या सगळ्यांनी रुपेरी पडद्यावर साकारलेल्या बाँडला लोकांनी प्रेम दिले. काळमानानुसार व इतर तगड्या पात्रांसमोर आजकालचे बाँडपट गल्ला जमविण्यात पूर्वीइतके तुफान यशस्वी होत नसले तरीही नव्या बाँडपटाची उत्कंठा सर्वांना लागून असते. रॉजरला सर्वोत्कृष्ट बाँड घोषित केल्यानंतरही त्याने डॅनियल क्रेगची आजवरचा सर्वोत्तम बाँड म्हणून स्तुती करणं त्याच्या मनाचा उमदेपणा आणि सच्चेपणा दाखवून देतं. बाँड सीरिजचा २३वा चित्रपट स्कायफॉलयेऊन गेल्यानंतर पुढील आघाडीवर सध्या तरी सामसुम दिसत असतानाच रॉजर मूरच्या निधनाची बातमी आली आणि सर्वत्र हळहळ व्यक्त झाली. आताच्या बलदंड आणि काहीशा एकसुरी नायकांच्या जमान्यात रॉजरचे वेगळेपण लगेच नजरेत भरते. शेकडो माणसात वावरत आपली हेराची ओळख एक्स्पोज करूनही आपली हेरगिरी पार पाडणारा माणूस हेर कसा काय असू शकतो याचे त्याने उत्तर दिले होते. १९८० च्या सी वुल्वजया गोव्यात चित्रीकरण झालेल्या चित्रपटामुळे रॉजर गोव्यातल्या लोकमानसात चांगलाच रुजला होता.१९४९ ते २०११ अशा ६२ वर्षांच्या कालखंडात रॉजर मूरने ६३ चित्रपट आणि टीव्ही मालिकांतून काम केले. दॅट लकी टच (१९७५), वाईल्ड गीज (१९७८), कर्स आॅफ दी पिंक पँथर (१९८३), दी नेकेड फेस (१९८४), दी एनिमी (२००१) हे त्याचे काही गाजलेले चित्रपट. २०११ साली प्रदर्शित झालेला अ प्रिन्सेस फॉर क्रिसमसहा त्याचा शेवटचा चित्रपट. १९९१ मध्ये युनीसेफने त्याला आपला सदिच्छा राजदूत म्हणून नियुक्त केले होते.

सुप्रसिद्ध अभिनेत्री आॅड्री हेपबर्न ही मूरची खास मैत्रीण. तिच्याच आग्रहावरून मूर युनीसेफशी जोडला होता. अनेक सौंदर्यवती मदनिका मूरच्या आयुष्यात आल्या. त्याचे पहिले लग्न १८व्या वर्षी डुर्न व्हॅनस्टेन या अभिनेत्रीशी झाले. त्यानंतर डॉरोथी स्वायर या आपल्यापेक्षा वयाने १३ वर्षांनी मोठ्या असलेल्या वेल्श गायिकेशी त्याने लग्न केले. अभिनेत्री लुईझा मॅटिओला ही त्याची तिसरी पत्नी. १९९३ साली मूरने किकी (क्रिस्टिना) थोलस्ट्रप या स्विडीश महिलेशी लग्न केले. त्याच्या या चौथ्या पत्नीचे मागच्या वर्षी जुलैमध्ये निधन झाले. रॉजरला तीन अपत्ये आहेत.१४ ऑक्टोबर १९२७ ला स्टॉकवेल, लंडनचा त्याचा जन्म. त्याचे वडील पोलिसांत होते तर त्याच्या आईचा लिलियनचा जन्म ब्रिटीशकालीन कोलकात्त्यातला. १९४५ला 'सीझर आणि क्लिओपात्रा'त रॉजरने एक्स्ट्राचे काम केले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस ब्रिटीश रॉयल आर्मी सर्व्हिसमध्ये तो सेकंड लेफ्टनंटपदापर्यंत पोहोचला होता. हॉलीवूडच्या सुरुवातीच्या काळात त्याने एमजीएमसोबत सात वर्षाचा करार करून काही सिनेमे केले, मात्र ते विशेष धंदा करू शकले नाहीत. तरीही रॉजर लाईमलाईटमध्ये आला. पुढे वॉर्नर ब्रदर्सने त्याला साईन केले. १९७८ मध्ये 'टॅक्स एक्झाईल' होत त्याने मायभूमी सोडून स्वित्झरलँडला आसरा घेतला. त्याच वेळी त्याने मोनॅको आणि फ्रांन्समधेही घर केले होते.

रॉजर मूर त्याच्या भूमिकाप्रमाणेच रिअल लाईफमध्येही लढवय्या होता. १९९३ मध्ये त्याच्या प्रोस्टेट कॅन्सरचे निदान झाले, त्याची सर्जरी झाली. त्यातून तो सावरला असे वाटत असतानाच २००३ मध्ये ब्रॉडवेवर स्टेजवर असतानाच तो कोसळला. यावेळी त्याच्या हृदयाने घात केला होता. त्याला पेसमेकर बसवले गेले. २०१२ मध्ये त्वचेच्या कॅन्सरचे निदान झाले तरी तो लढत होता. २०१३ मध्ये त्याच्या मधुमेहाचे निदान झाले आणि त्याच्या आवडत्या मद्यपानावर बंदी आली. दरम्यान १४ जून २००३ ला त्याला सर किताब देणारा हॉनर ब्रिटिश साम्राज्याकडून बहाल करण्यात आला होता. बाँडपटांना पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्याने लिहिलेले 'बाँड ऑन बाँड' हे पुस्तक खूप गाजले. २३ मे ला, त्याच्या निधनाआधी दोन आठवडयापूर्वी त्याने आणखी एक आत्मकथन लिहून दिल्याचे त्याच्या प्रकाशकांनी बुधवारी सांगितलेय. या पुस्तकात त्याने अनेक सत्य उघडकीस आणताना आपण बॉंडपटासाठी किती मिसफिट होतो व काही अंशी अपात्र होतो हे सांगतानाच बाँडपटातील किश्श्यांपासून ते हॉलीवूडमधील रंजक गोष्टींचा त्याच्या शैलीत उहापोह केला आहे असे बोलले जातेय.

रॉजर मूर आता हयात नसला तरी त्याने प्रेक्षकांशी केलेला 'बाँड' कधीही तुटणार नाही हे कोणताही सिनेरसिक छातीठोकपणे सांगेल.
सर रॉजर मूर यांची हीच तर खरी कमाई !!


- समीर गायकवाड.