Friday, May 19, 2017

''आंखो आंखो में' - आशा पारेख - देव आनंदचं एक अविस्मरणीय गीत..

काही दिवसापूर्वी गतकाळातील दिग्गज अभिनेत्री आशा पारेखचे 'द हिट गर्ल' हे आत्मचरित्र अत्यंत जोशात प्रसिद्ध झाले. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी यावेळी हजेरी लावली होती. याप्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना आशाजींनी खुमासदार उत्तरे दिली. एका पत्रकाराने त्यांना विचारले की, 'या समयी आणखी कोणता कलाकार सोबतीला हवा होता असे तुम्हाला वाटते ?' यावर क्षणाचाही विलंब न लावता त्या उत्तरल्या होत्या की, 'अर्थातच देव साबअपने देव आनंदजी !'...

आशाजींनी आपल्या रिअल लाईफमध्ये कुणावरती खरं प्रेम केलं याचा खुलासा या पुस्तकात जसा केला आहे तसाच तो ह्या पत्रकार परिषदेतही केला. प्रेमाविषयी त्या म्हणाल्या की, 'नासिर साहेब या एकमेव पुरुषावर मी प्रेम केलं. त्यामुळे आत्मचरित्रात त्यांचा उल्लेख महत्त्वाचा होता. माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींचा आत्मचरित्रात उल्लेख टाळला असता तर आत्मचरित्राला काही अर्थच उरला नसता.' आशा पारेखनी १९५९ मध्ये नासिर यांच्या दिल देके देखोया चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याशिवाय तिने कारवाआणि तिसरी मंजिलया चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत काम केले. या काळात निर्माते नासिर हुसैन आणि आशा पारेख यांच्या प्रेम प्रकरणाच्या चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे या महत्वाच्या क्षणी प्रेमाच्या आठवणींना उजाळा देऊन आशाजी थांबल्या नाहीत. तर त्यांनी नासिर यांच्यासोबत लग्न न करण्याचे कारण देखील सांगितले.

हाच धागा घेऊन त्या पुढे म्हणाल्या की, ‘एखाद्याचा संसार उदध्वस्त करणे माझ्या स्वभावात नाही. नासिर यांनी त्यांच्या कुटुंबियांना वाऱ्यावर सोडावे, असे मला कधीच वाटले नाही. त्यामुळेच मी त्यांच्यासोबत लग्नाचा विचार केला नाही.हे सांगत असताना आशा यांनी नासिर यांच्या कुटुंबियांसोबतचे संबंध अजूनही सलोख्याचे असल्याचेही सांगितले. विशेष म्हणजे आशाजींचा बॉलिवूड प्रवास उलगडणाऱ्या आत्मचरित्राच्या प्रकाशनावेळी नासिर यांची मुलगी नुसरत आणि त्यांची नात उपस्थित होत्या. नासिर यांच्या कुटूंबातील सदस्य आत्मचरित्राच्या प्रकाशनाला आल्यामुळे वातावरण खूप आनंददायी वाटत होते, असेही त्या म्हणाल्या. 

हे सगळं सांगण्यामागचे कारण म्हणजे आशा पारेखचा स्वभाव या पिढीतील वाचकांना कळावा. आशा पारेख जितकी देखणी, लोभस आणि सोज्वळ होती तितकेच तिचे विचार आणि वर्तन उदात्त, विनयशील होते. सौम्य स्वभावप्रकृतीच्या आशाची कुणा एका हिरोशी सेंटीमेंटल होण्याइतकी केमिस्ट्री जमली नाही. तिच्या सुपरहिट चित्रपटांची यादी करायची झाली तर देव आनंद सोबतच्या 'जब प्यार किसीसे होता है'ची वर्णी अग्रस्थानी लागते. 

अखेरपर्यंत अविवाहित राहिलेल्या आशा पारेखने देव आनंदसोबत उण्यापुरया चार चित्रपटात काम केलं. यापैकीच एक म्हणजे १९६९चा 'महल' हा चित्रपट. यापूर्वीही १९४९मध्ये अशोककुमार आणि मधुबालेचा 'महल' येऊन गेला होता. कमाल अमरोही आणि बॉम्बे टॉकीज सारखी मोठी नावं त्याच्याशी निगडीत होती. त्यात एका तथाकथित पछाडलेल्या स्त्रीची आणि गूढ वलयाच्या एका भयांकीत वास्तूच्या मुळाशी जाणारया जिद्दी वकीलाची हॉररच्या अंगाने जाणारी कथा होती. तर देव- आशाच्या 'महल'मध्ये एक सस्पेन्स मेलोड्रामा होता. एका धनिकाकडे ड्रायव्हरचे काम करणारा एक तरुण बहिणीच्या लग्नासाठी नको ते नाटक करून बसतो. आणि त्यापायी स्वतःचे प्रेम गमावून बसतो. त्या नाटकात खोल रुतत जातो असे कथानक ह्या 'महल'मध्ये होते. हा एक टिपिकल मिड टाईम बॉलीवूड कॉसच्युम मुव्ही होता. देवआनंदने अगदी सहजगत्या यातील भूमिका निभावली होती. 'सीआयडी', 'बात एक रात की', 'असली नकली', 'ज्वेल थिफ' मध्ये अशाच समकक्षी भूमिका याआधी देवने रंगवल्या होत्या. तर रडक्या आणि नटव्या बहिणीच्या भूमिकांचा शिक्का बसलेल्या फरीदा जलालने यात चक्क सिडयुसिव्ह रोल साकारला होता. फार काही सांगण्याजोगं या चित्रपटात नव्हतं. मात्र एक अत्यंत अर्थपूर्ण आणि श्रवणीय गाणं यात होतं ते म्हणजे, 'आंखो आंखो में हम तुम हो गये दिवाने...'  

विशेष म्हणजे 'महल' रिलीज झाला तेंव्हा हे गाणं फारसं गाजलं नव्हतं. रेडीओ सिलोन आणि विविधभारतीने याच्या लोकप्रिय होण्यात मोठा वाटा उचलला होता. दार्जीलिंगमध्ये हे गाणं शूट केले गेलंय. लाल ओव्हरकोट घातलेली आशा पारेख आणि स्वेटर मफलरच्या परिचित वेशातला देव आनंद. त्यांच्या जोडीला दिवस उजाडतानाची प्रकाशकळा. भोवतालची धुक्याची तलम चादर भेदत सगळीकडे नुकतेच कुठे झुंजूमुंजू होत असतं अन या धुंद हवेत हे प्रेमी युगुल 'आपलं प्रेम कसं साकारत गेलं' याची शब्दानुभुती जागवत असतं. हे गाणं आजच्या पिढीने बघितले तर खचितच ते स्लो वाटेल. त्यात कुठला हॉट तडका नाही की अंगाला कुठले लटके झटके नाहीत की मोठ्या वाद्यमेळाचा कर्णकर्क्कश्य आवाज नाहीत. एका स्टेडी टोनमधला हा पद्य संवाद आहे. मात्र ते निव्वळ संभाषणही नाही. त्यात एक गेयता आहे. त्याला एक मधुर लय आहे. विशेषतः आशा भोसलेंच्या आवाजातील खालच्या पट्टीतले कडवे ओठावर सतत घोळत राहते. 

पडद्यावरील दृश्यात नायक नायिका संयमित गतीने जवळ येतात, एकमेकास हळुवार स्पर्श करतात. ते आपसात अंगचटीला जात नाहीत की विनाकारण भावोत्कट वा गूढ मुद्राभिनयही करत नाहीत. नाही म्हणायला अधूनमधून देव आनंदनी त्याच्या स्टाईलमध्ये मानेला दिलेले दोनचार झटके आणि दोनेकवेळा ढिल्या अंगाने हात लटकवत केलेला नृत्याभिनय हेच काय ते ध्यानात राहते. संपूर्ण गाण्यात दोघांच्या अंगावर एकच पोशाख आहे, त्यात काडीमात्र बदल नाही. एका लयबद्ध पद्धतीने हे दोघे गात राहतात. यात प्रेक्षणीय असं काही नाही मात्र श्रवणीयता नक्की आहे.           

आशा किशोरने गायलेल्या या गीताला खूप आकर्षक चाल नाही, डोळे दिपवणारे नयनरम्य चित्रीकरण नाही, मन भरून यावे असे उत्कट नृत्याविष्कार नाहीत, अत्यंत नादमय असं संगीतही नाही. तरीही एकदा हे गाणे ऐकले की पुन्हा ते ऐकावेसे वाटते असे का होते ? याचे उत्तर यातल्या शब्दरचनेत आहे. दोन प्रेमी जीवांचा उत्कट भावबंध त्यात रेखाटला आहे. दोन जीवांत प्रेम कसं साकारतं, सुरुवातीला नेत्रपल्लवी वाटणारा हा खेळ नंतर शब्दांच्या जाळ्यात कसा ओढत जातो हे मस्त सांगितलंय. बासरीचे खूप सुंदर म्युझिकपीस प्रत्येक कडव्यात आहेत. 
आँखो आँखों में हम तुम हो गए दीवाने
बातों बातों में देखा, बन गये अफ़साने
याद करो ये सबने कहा था
दिल जो दिया तो, ये हाल होगा चैन ना आयेगा,
नींद ना आयेगी किसी आँखो में.. ‘
आशा पारेखने 'महल'मध्ये पडद्यावर हे गाणं गायले खरं पण वास्तविक जीवनात ती स्वतःला यापासून वाचवू शकली नाही. आंखो आंखोमें अशी तिची प्रेमकथा राहिली पण ती ओठावर येऊ शकली नाही की तिला कुठला आकार प्राप्त होऊ शकला नाही. आपलं हृदय गमावून बसलेल्या या गुणी अभेनेत्रीचं हे शांत, शीतल गाणं तिच्यासारखंच कालसापेक्ष प्रसिद्ध अन कमनशिबी ठरलं हा विलक्षण योगायोग नव्हे का ?

- समीर गायकवाड. 

आंखो आंखोमेंची यु ट्यूब लिंक ....