Thursday, May 18, 2017

रीमा लागू - पैलू पडायचे राहून गेलेला हिरा ....


रीमा लागू, भक्ती बर्वे आणि लालन सारंग या तिघीजणी सारख्या देहबोलीच्या आणि चेहरेपट्टीत काहीसे साम्य असणारया गुणी अभिनेत्री होत. भक्तीचं अकाली जाणं जसं हुरहूर लावून गेलं तसं आताचं रीमाचं अकस्मात जाणं चुटपूट लावून गेलं. या दोघींच्या तुलनेने लालन सारंग वयाने मोठ्या आणि कलेचा जास्त अवकाश लाभलेल्या.
रीमाने साकारलेल्या चित्रपटातील भूमिकाइतक्याच तिच्या नाट्यभूमिका उत्कृष्ट
होत्या. किंबहुना पडद्यापेक्षा ती रंगभूमीवर जास्त निखरली. 'घर तिघांचं हवं', 'झाले मोकळे आकाश', 'तो एक क्षण', 'पुरुष', 'बुलंद', 'सविता दामोदर परांजपे', 'विठो रखुमाय' यातल्या तिच्या भूमिका सरस आणि लक्षणीय ठरल्या. तसेच तिचे 'अशा या दोघी' हे नाटक एके काळी प्रचंड गाजले होते. पुरुषी अहंकारासमोर स्त्रीची होणारी कुचंबना या नाटकात मांडण्यात आली होती. या नाटकाचे लेखन गंगाराम गवाणकर यांनी केले होते. यात सुलभा देशपांडे, रीमा आणि लालन सारंग यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. लालन सारंग आणि भक्तीला अनेक उत्तम भूमिका मिळाल्या त्याचं त्यांनी सोनं केलं. पण रीमा या बाबतीत कमनशिबी
ठरली. याचं कारण ती कुठल्याही एका चौकटीत रुळली नाही. एका विशिष्ट लूक किंवा पठडीतल्या भूमिकांना तिला बांधून ठेवता आलं नाही. त्यामुळे 'खास एखाद्या अभिनेत्रीसाठी निर्मिलेली भूमिका' म्हणून जो प्रकार असतो तो तिच्या वाट्यास आला नाही. मिळेल ती भूमिका ती समरसून साकारत गेली. मला वाटते तिची बॉडी लँग्वेज, तिचं दिसणं आणि तिचा विलक्षण बोलका चेहरा यांनी तिचा घात केला. चित्रपटसृष्टीतही तिनं चार दशके काढली पण स्मिताच्या वाट्याला जशा विविधरंगी भूमिका आल्या तशा रीमाच्या वाट्याला कधीच आल्या नाहीत. काही अभिनेते, अभिनेत्री त्यांच्या पोस्टराईज्ड चेहऱ्याचे बळी ठरतात, रीमा त्यापैकीच एक. उदाहारण द्यायचे झाले तर ऋषी कपूर हा कधीही भिकारी, हमाल, पोस्टमन, मेकेनिक अशा भूमिकांत सूट होऊ शकत नाही कारण त्याचं दिसणं त्या भूमिकांशी प्रतारणा करतं. तो समृद्ध, श्रीमंत, हेकेखोर, गर्विष्ठ, अहंकारीच वाटतो. तसेच रीमाचे झाले. तिच्या चेहरयाने तिच्या भूमिका ठरवल्या. त्यावर मर्यादा आणल्या.

गोल हसऱ्या चेहऱ्याची, गोऱ्या रंगाची, घाऱ्या डोळ्यांची, काहीशा स्थूल देहयष्टीची रीमा पक्की मराठमोळा तोंडवळा असणारी अभिनेत्री होती. ठसठशीत कुंकू, चापून चोपून बांधलेले केस, त्यात भरलेला सिंदूर, भरजरी साड्यापासून ते आधुनिक जीन्सच्या वेशातही ती शोभून दिसत असे. किंचित मान तुकवून बोलण्याची आणि हेमामालिनी सारखे काहीसे अनुनासिक उच्चार करताना श्वासाचे पॉज जाणवून देण्याची संवादशैली अनोखी होती. हिंदी मराठी चित्रपट, दूरचित्रवाहिन्यावरील मालिका, मराठी रंगमंच अशी तीनही माध्यमे रीमाने यशस्वी रित्या हाताळली. सिरीयलचा छोटा पडदा असो वा सिनेमाचा रुपेरी पडदा वा रंगभूमीच्या रंगच्छटा असोत, तिने आपला ठसा जरूर उमटवला.
हिंदी चित्रपटसृष्टीत दुर्गा खोटेची 'आईं' कमालीची गरीब, अशक्त, सोशिक वाटली. तर त्यानंतरच्या पिढीचे आईपण साकारताना निरुपारॉय एकदमच रडक्या बेअरिंगची, हतबल, गलितगात्र अशा टाईपची आई वाटली. तर तिसऱ्या पिढीतील नायकांची सलमान - शाहरुख यांची आई साकारणारी रीमा लागू मात्र ग्लॅमरस आणि हसत खेळत स्वभावाची आई वाटली. तिने साकारलेली रुपेरी पडद्यावरची ही सुपरमॉम
होती. जी कमालीची भाव खाऊन गेली. अनेक बिनीच्या नायकांची ती हवीहवीशी वाटणारी पडद्यावरची आई झाली. रीमाने हिंदीत खूप कामं केली असली तरी तिचं 'मराठीपण' लगेच ध्यानी यायचं, जसं सुरेश वाडकरांनी अनेक हिंदी गाणी गायलीत पण ती ऐकताना लक्षात येते की गाणारा माणूस हिंदीभाषिक नसून मराठी आहे. तसं रीमाचं झालं. पण ते कधी खटकलं नाही, उलट त्यामुळे तिच्या बोलण्यात गोडवा आला.

रीमाचे डोळे अत्यंत बोलके होते. तिच्या आवाजातले चढउतारदेखील परफेक्ट असत. तिच्या भूमिकांत
करारीपणा असला की त्यात ती जास्त खुलून दिसे. 'रडूबाई' आणि 'काकूबाई' छाप भूमिकापेक्षा कठोर आणि व्यवहारी भूमिकांत ती जास्त शोभून दिसली. 'हम साथ साथ है' मधला तिचा स्टान्स भारी होता, त्या भूमिकेला अनेक पदर होते. चित्रपटाच्या केंद्रस्थानी असणारी ती भूमिका होती त्याचे रीमाने सोने केले. 'मैने प्यार किया', 'हम आपके है कौन', 'साजन' -सलमान, 'कुछ कुछ होता है', 'कल हो न हो' -शाहरुख,'वास्तव', 'हथ्यार' - संजय दत्त, 'वंश'- सुदेश बेरी, 'आशिकी' - राहुल रॉय, 'दिलवाले' -अजय देवगण, 'जिस देश में गंगा रहता है' -गोविंदा अशा अनेक आघाडीच्या नायकांची ती 'आई' झाली होती. यातील 'मैने प्यार किया', 'वास्तव', आणि 'हम आपके..' 'आशिकी'साठी रीमाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. ऐंशीच्या दशकातल्या अनेक नवतरुणांनी 'आमची आई रीमासारखी असावी' अशी मते जाहीरपणे मांडली होती. तिच्या देखण्या व्यक्तिमत्वाला उठून दिसणारया गर्भश्रीमंत भूमिकांत तिच्या कामाला अधिकच झळाळी आली होती. अरुणा राजेच्या 'रीहाई' मध्ये तिने एक
पाऊल पुढे टाकून नसीरसोबत बोल्ड सीन दिले होते तेंव्हाही ती कुठे ऑड वाटली नाही हे विशेष. खरे तर रीमाची हिंदीतील सुरुवात 'कलियुग'- श्याम बेनेगल आणि आक्रोश - गोविंद निहलानी, आणि 'नासूर' - आकाश चोप्रा ; या दर्जेदार चित्रपटातील छोट्या भूमिकांतून झाली होती. पण समांतर सिनेमाच्या प्रवाहात ती स्वतःला टिकवून ठेवू शकली नाही. तिचा लीड रोल असलेला एनएफडीसी निर्मित 'रुई का बोझ' हा सिनेमा क्लासिक मुव्ही होता पण तिकीटबारीपासून ते मिडीयानेही त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी त्याचे नामोल्लेखही कुठे आढळत नाहीत.
असे जरी असले तरी मला तिच्या मराठी चित्रपटातील भूमिका जास्त उजव्या वाटतात. 'सिंहासन'मधली
अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे (डॉ.श्रीराम लागू) यांची अव्यक्त झालेली सून एकाच वेळेस खूप भारदस्तही वाटत होती आणि प्रचंड उठवळही वाटत होती. या भूमिकेला संवाद कमी होते, जे काही करायचे होते ते डोळे आणि देहबोलीतून व्यक्त करायचे होते. रीमाला या भूमिकेचा सूर खूप मस्त गवसला होता. नवऱ्याकडे दुर्लक्ष करणारी आणि सासऱ्याच्या भोवती
गोंडा घोळणारी तिची ही भूमिका चिरस्मरणीय अशीच आहे.... रीमाच्या मातोश्री मंदाकिनी भडभडे या मराठी नाट्य -चित्रपट सृष्टीतल्या गतपिढीतील नामवंत कलाकार होत. त्यांच्या पोटी २५ फेब्रुवारी १९५८ ला रीमाचा जन्म झाला. तिचे पूर्वाश्रमीचे नाव नयन भडभडे, पुण्यातील हुजूरपागा शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच तिच्या
अभिनयाची नोंद घेतली गेली. मराठी रंगभूमीचा वारसा आईंकडून आलेला असल्याने कुठे अडले नाही. हिरवा चुडा, ‘हा माझा मार्ग एकलाअशा चित्रपटांतून बेबी नयननावाने बालकलाकार म्हणून रीमाने चित्रपट सृष्टीत सुरवात केली त्यातून तिच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. नाट्य अभिनेते विवेक लागू यांच्याशी लग्न झाल्यानंतर ती नयन भडभडेची रीमा लागू झाली. मात्र तिचा संसार
दीर्घकाळ टिकू शकला नाही. पुढे जाऊन ते स्वतंत्र राहू लागले. रीमाला एक मुलगीही आहे. रीमाने श्रावणसरीया मालिकेच्या दोन कथांचे दिग्दर्शन केले होते. रीमाने अनुमतीया पुरस्कारप्राप्त चित्रपटात अतिशय महत्त्वाची भूमिका केली होती. गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटातली तिची भूमिका अनेक चित्रपटमहोत्सवांत नावाजली गेली आहे. तसेच तू तू मैं मैंमधली खाष्ट आणि खोडपत्री सासूची रीमाची भूमिका खूप गाजली होती. नर्मविनोदी, स्वच्छ, साधी सरळ अशी ही टीव्ही मालिका सर्वांच्याच पसंतीस उतरली होती. त्या मालिकेनंतर तिने 'श्रीमान श्रीमती' या हिंदी आणि तुझं माझं जमेनाया मराठी मालिकेमधून छान काम केले होते.

मात्र राहून राहून तिच्याबद्दल एक खंत वाटते की अगदी मन उचंबळून यावं किंवा अन्तःकरणात भरून यावं अशी कुठली भूमिका तिच्या वाट्याला कधी आली नाही. तिचे फुटेज नेहमी 'असिस्टेड टोन'मधले का
राहिले असावे याचे नेमके उत्तर मिळत नाही. ती कशातही कमी नसूनही खास रीमा लागूचा टच असणारी भूमिका कधी पाहायला मिळाली नाही. दोनेक दशकापूर्वी ज्योती चांदेकरची मुख्य भुमिका असलेले 'आमदार सौभाग्यवती' हे नाटक आले होते. ते नाटक पाहताना रीमाची हटकून आठवण झाली होती. ज्योतीने नाटके कमी करूनही ती या नाटकामुळे लक्षात राहिली तसे रीमाने नाटके चित्रपट मोठ्या संख्येत करूनही खास तिची म्हणून गणली जावी अशी भूमिका नजरेस पडत नाही ही बाब हुरहूर लावते. म्हणूनच रीमाचे वर्णन करताना 'पैलू पडायचे राहून गेलेला एक अप्रतिम हिरा' असेच मी म्हणेन..

फिल्म इंडस्ट्रीसारख्या गटारगंगेत राहून गॉसिपिंग वा ग्रूपीझमच्या घाणीत रीमा कधी अडकली नाही, किंबहुना तिने ते कटाक्षाने टाळले. आपल्या भूमिका आणि आपलं आयुष्य यांची तिने गल्लत होऊ दिली नाही. तिचं वैयक्तिक आयुष्य देखील तिने एका मर्यादेपर्यंतच लोकांना खुलं केलं. लोकांना तरी अशा चवचाल चौकशा हव्यातच कशाला असा माझा प्रश्न आहे. असो...रीमाच्या जाण्याने 'तिची पोकळी भरून निघणार नाही..' वगैरे असले शब्द काहीजण वापरतील पण प्रत्यक्षात तसे काही घडत नसते. मी असं म्हणेन की मराठी नाट्य, चित्रपट, हिंदी - मराठी टीव्ही
सिरियल्स आणि बॉलीवूडचा मोठा पडदा या सर्व क्षेत्रात एका मराठी स्त्रीने झेंडा फडकवावा ही काही साधी बाब नव्हती ती रीमाने करून दाखवली होती. आताच्या स्पर्धेच्या युगात भुमिकेप्रमाणे स्वतःला मोल्ड करत सर्व माध्यमात यशस्वी होऊन दाखवण्यासाठी रीमाचे नाव निघत राहील याची मात्र मला खात्री वाटते. एका गुणी अभिनेत्रीच्या अकस्मात एक्झिटचे वाईट वाटणे साहजिक आहे पण RIPचे फुकटचे मेसेजेस आणि रडव्या कोरड्या स्मायलीज टाकण्याऐवजी तिच्या आयुष्यातून काही शिकता आले तर ते जास्त योग्य ठरेल...

अलविदा रीमा ...

- समीर गायकवाड.