Saturday, April 29, 2017

बॉलीवूडचे मरणोपरांत भोग ....


विनोदखन्नाच्या मृत्यूनंतर ऋषीकपूरने बॉलीवूडवर त्रागा व्यक्त केलाय. असे का घडले याच्या उत्तरासाठी थोडं मागे जावे लागेल. याची अनेक कारणे आहेत. विनोदच्या अंत्यविधीसाठी वरळी स्मशानभूमीत आलेल्या सिनेअभिनेत्यांना पाहून 'बघ्यां'चे जे चित्कार उमटत होते ते क्लेशदायक होते यात शंका नाही पण त्याहून अधिक नीलटपणा फोटोजर्नेलिस्ट नामक संधीसाधूंनी सुरु ठेवला होता. अगदी भुक्कड अभिनेता मग तो माकडचाळे करणारा चंकी पांडे असो वा जिच्या करियरमध्ये कधी दिवा लागला नाही ती दिया मिर्झा असो यांचे फोटो काढण्यासाठी या लोकांनी भान सोडले होते. विनोदची प्रथम पत्नी गीतांजली हिचे फोटो काढताना तर काही छायाचित्रकार पडता पडता वाचले.

आता जे कानावर येतंय ते त्याहून वाईट आहे. काही प्रसिद्ध मिडीयाहाऊसमधील सिनेपत्रकार विनोदखन्नांची संपत्ती कुठे कुठे आहे, किती आहे, कुणाच्या नावावर आहे, त्यांचे मृत्यूपत्र आहे का आणि संपत्तीवरून विनोदखन्नांच्या कुटुंबियात वाद आहेत का याची माहिती घेण्यासाठी जीवाची बाजी लावत आहेत. आपल्या वाहिनीला ही ब्रेकिंग न्यूज आधी लागावी, आपल्या वर्तमानपत्रातून ही 'काडी' आधी 'लागावी' यासाठी काहींचा जीवाचा आटापिटा चालला आहे.

काही वर्षापूर्वी सिनेपत्रकारांनी राजेशखन्नाच्या मृत्यूनंतर असेच उद्योग आरंभले होते. काहींनी आपला 'स्क्रीन' तळपावा म्हणून थेट अनिता आडवाणीला हाताशी धरले होते. एका 'झी'ट आणणाऱ्या वाहिनीच्या पत्रकारांनी तिच्या कोर्टबाजीची सोय करून दिली होती. डिम्पल वेळीच सावध झाली आणि तिने न्यायालयाबाहेर अनिता आडवाणीशी आपले संपत्तीविषयक वाद मिटवून घेतले होते. पण तोवर काहींनी राजेशखन्नाच्या व्यक्तिगत आयुष्याचा कानाकोपरा खाजवून बघितला होता.

साधनाच्या मृत्यूनंतरही असेच दृश्य पाहायला मिळाले होते. तिने सौंदर्याला किती आणि कसे जपले होते. तिचा चेहरा किती भयाण झाला होता. दस्तूरखुद्द विनोदचीही आजारी असतानाची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसिद्धीस देताना खरे तर पत्रकारिताच एक्स्पोज झाली होती. पण लोकांनाही यात 'विकृत आनंद' मिळतो त्यामुळे मागणी तसा पुरवठा असे हे गणित आहे.

ओम पुरींच्या निधनानंतर त्यांना किती प्रकारच्या 'बाजी' अवगत होत्या हे सिद्ध करण्याची घाई त्यांच्या मृत्युच्या दिवसापासूनच अनेकांना लागून राहिली होती. ओम पुरींनी कारमध्ये अखेरच्या रात्री किती मद्यप्राशन केले, त्याचा brand कुठला होता, ते रात्री खरेच एकटे होते का की त्यांच्यासोबतची व्यक्ती काही लपवालपवी करत होती, त्या रात्री त्यांच्या मुलाशी संवाद त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता का आणि मुलाने त्यांना प्रतिसाद का दिला नाही असे एक ना अनेक उकिरडे या लोकांनी हुंगण्याचा प्रयत्न केला.

एखाद्या सिनेकलाकाराचा अपघात झाला तरी तिथल्या गर्दीचे आणि पत्रकारांचे वागणे चेकाळलेल्या स्वरूपाचे होते. हेमामालिनीचा अपघात हे याचे बोलके उदाहरण आहे. काही दिवसापूर्वी विमानतळावरतीच एका चाहता (?) सेल्फी घ्यायचे निमित्त करून तो विद्या बालनच्या अंगचटीस गेला होता. असे प्रकार वारंवार घडू लागतात तेंव्हा संयम हरवलेले कलाकार समोरच्या माणसावर हात उगारतात. (मी काही उर्मट, माजोरडया कलाकारांची बाजू घेत नाहीये, याची नोंद असावी) यामुळे नेमके कोणाचे किती चुकते आहे याचा खरा अन्वयार्थ लागत नाही.

एखादया अभिनेत्याचे निधन होते, तेंव्हा तिथे कसे वागायला हवे याचेही धडे लोकांना आणि पत्रकारांना द्यावे लागतील का ? इंडस्ट्रीतील लोकांना खाजगी आयुष्य नावची बाब आहे की नाही ? ते सेलिब्रिटी आहेत म्हणून त्यांच्या जीवनातील अनेक घटना, प्रसंग यांच्याविषयी अनेकांना कुतूहल असतं, फालतूचे आकर्षण असते, निलाजरा चौकसखोरपणा असतो आणि बिनडोक जिज्ञासाही असते. मानवी स्वभावानुसार हे काही काळ ठीक समजूयात पण त्यांच्या मृत्यूपश्चातदेखील त्यांचे धिंडवडे काढत बसणे अयोग्य आहे. निधनानंतर काही काळानंतर त्या कलावंताच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी काही लेखन करणं निराळे आणि त्याच्या चितेचे निखारे अजून विझलेले नसताना त्यांच्या 'घरात काही जळते आहे का' याचा वास घेत फिरणं हे सर्वस्वी अनाठायी आणि निंदनीय आहे.

प्रिन्सेस डायना जशी पापारात्झींच्या ससेमिरा चुकवण्यापायी अपघाती मृत्यूने गेली त्याहून वाईट अवस्था सिनेकलावंतांच्या मरणोपरांत उत्तरार्धाची झाली आहे. अशा दुःखद प्रसंगी इंडस्ट्रीतील लोकं पांढरे कपडे परिधान करून आणि बहुत करून डोळ्याला गॉगल चढवून इस्त्री केलेल्या चेहऱ्याने तिथे येतात तेंव्हा त्यांचा खरे तर उबग यावा असे वागणे असते आणि काही लोक मात्र त्यांची एक झलक मिळावी म्हणून तडफडत असतात.

पण बॉलीवूडमधले हे भावनाहीन, शुष्क, निव्वळ ढोंगबाजीचे अंत्यसंस्कार टाळण्यासाठीच देवआनंद वा राजकुमारसारखे कलावंत आपले अंतिम संस्कार कोणालाही न कळवता सिक्रेट राखून करतात. जे आयुष्यभर प्रसिद्धीचा हव्यास धरून असतात त्यांना मृत्यूसन्मुख असताना कॅमेरापर्सन नकोसे वाटतातते मात्र काही केल्या अगदी मेल्यानंतरही पिच्छा सोडत नाहीत. आणि जे कलावंत अखरेच्या काळात विजनवासात गेलेले असतात त्यांना वाटत असते की आपल्या अखेरच्या काळाची तरी दखल घेतली जावी. तिथे मात्र कोणी पोहचत नाही. मात्र तो कलावंत मृत्यूमुखी पडल्यावर त्याचे थोरवी गायला सुरुवात होते. हा कसला दैवदुर्विलास म्हणायचा ?

एखादी परवीन बाबी विजनवासात कधी मरून जाते कळत नाही, एखादी साधना आपला विद्ध झालेला चेहरा लपवत फिरते, एखादी विमी अत्यंत हलाखीचे असे बेवारसाचे जीणं जगून किड्या मुंगीसारखी मरते, एखादी सुचित्रासेन आयुष्याचा उकिरडा होऊ नये म्हणून तीन दशके स्वतःला कोंडून घेते, एखादा राजकुमार गुपचूप अंत्यक्रिया करण्याची इच्छा ठेवून मरतो तर देवआनंदसारखा सदाबहार नायकही 'मेल्यानंतर माझे शव मायदेशी नेऊ नका' म्हणून सांगतो. आजघडीला अशी अनेक नावे सांगता येतील की ज्यांच्या वाट्याला अशी दुःखे आली. प्रसिद्धीच्या अतिहव्यासापोटी हे आपल्या 'बेबी-बंप'चा देखील इश्यू बनवतात आणि एका वळणावर अंधारया खोलीत लपून जगावे अशी इच्छा धरून राहतात. कसे शक्य आहे हे ? स्वतःच्या जीवनाचे नको तेव्हढे एक्स्पोजर देत गेल्याने यांच्याच आयुष्यातील व्यक्तीस्वातंत्र्य धुळीस मिळते, लोक सतत त्यात डोकावत राहतात आणि मेल्यानंतरही भोग सरत नाहीत.           

विनोदखन्नाच्या अंत्यविधीस इंडस्ट्रीतील खूप कमी लोक सहभागी झाले म्हणून ऋषीकपूरने थयथयाट केलाय, त्याच्याशी मी असहमत आहे. का यावे इतर लोकांनी ? अंत्यविधीसारख्या गंभीर प्रसंगी चेकाळलेल्या बघ्यांना आपली झलक द्यायला यावे की अशा प्रसंगीही बाईट द्यायला यावे ? की काळया गॉगलआड आपला दगडी चेहरा लपवून फिरणाऱ्यांच्या जत्रेतील एक भाग व्हायला यावे ? याची नेमकी आणि नेटकी उत्तरे कदाचित ऋषीकडेही नसतील. भावहीन अंत्यविधी, मरणाचे इव्हेंटायझेशन अन तत्पश्चात उकरला जाणारा उकिरडा हा या सिनेसृष्टीला लागलेला स्वनिर्मित शाप आहे असे वाटू लागलेय. असो..

मरणोपरांत समृद्ध उत्तरार्ध बॉलीवूडमध्ये खूप कमी लोकांच्या वाट्याला आला आहे हेच खरे...


- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment