Tuesday, April 25, 2017

'डिस्को' व्हॅम्प....

खणखणते ड्रमबीटस, कोंगोच्या रिदमिक बॅशवर चकाकणारे रंगी बेरंगी लाईट्स. गुबगुबीत उशीतल्या कापसासारखी स्मोक मशीनमधून अखंड वाहणारी धूम्रवलये, लेसरच्या लाल हिरव्या निळ्या लाईटस. वेड्या वाकड्या वाढवलेल्या झिपऱ्याच्या अवतारात, कधीकधी तोंडं रंगवूनकाही बाही चित्रविचित्र तंग कपडे घालून नाचणाऱ्या ललना आणि अंगाला झटके देत
नाचणारी पोरे पोरी, जोडीला झिंग आणणारं संगीत अन अंग थिरकवायला लावणारी लय यांचं अजिबोगरीब कॉम्बिनेशन होतं ते. तो काळ होता डिस्कोचा, हे गारुड दोन दशके चाललं. 'डिस्को' हा त्या काळातील एक परवलीचा शब्द होता. १९७६ ते १९९६ पर्यंत डिस्कोने बॉलीवूडवर राज्य केलं. या दुनियेचा अनिभिषिक्त सम्राट होता कसलेही आवळचिवळ कपडे घालणारा, डोक्याला हेअरबँड बांधणारा, हिप्पी कटिंगची झूलपं वागवणारा आणि घामेघूम होईपर्यंत नाचणारा मिथुन ! त्याच्या 'इर्दगिर्द' फडकणारी दोन मुख्य कबुतरे म्हणजे कल्पना अय्यर प्रेमा नारायण ! त्यातही कल्पनाचं काम अधिक भडक असल्याने ती जास्त डोक्यात राहिली. पण या दोघी काही सध्यासुध्या नव्हत्या. त्या डिस्को व्हॅम्प होत्या. त्या जितक्या लवचिक, कमनीय होत्या तितक्याच नृत्यकुशल होत्या. त्यांना रिदमबिट्सची चांगली जाण होती.


१९७६ मध्ये युएसमध्ये बोनीएमचा धुमाकूळ सुरु झाला आणि त्याचे पडसाद आपल्या देशी संगीतात अगदी दिलखेचक पद्धतीने उतरत गेले. पुढे जाऊन मायकेल जॅक्सनने अख्ख्या जगातील संगीत विश्वाचा ताबा घेतला आणि डिस्कोची सद्दी संपवून पॉपचे अधिराज्य आणले. पण डिस्कोचा कैफ त्याच्या गायकीपासून ते नृत्यशैलीत झळकायचा. तेच संगीत कमी
अधिक हिंदी वर्ख लावून आपल्याकडे आणलं गेलं. यातील काही गाणी अगदी भंगार ठरली तर काही गाण्यांना छप्परफाड प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. त्यातील 'डिस्को स्टेशन', 'हरी ओम हरी', 'रंभा हो हो' पासून ते 'जिमी जिमी आजा' पर्यंत आणि 'राजा हिंदुस्थानी'तल्या 'परदेसी परदेसी' पर्यंत आपली छाप उमटवणाऱ्या कल्पना अय्यरचे आयुष्य एखाद्या सिनेमाहून अधिक रंगतदार आणि वळणावळणाचे होते ...... तिच्यावर प्रेम करणारा अमजदखान आणि तिचं अव्यक्त जीवन कधी लोकांपुढे आलेच नाही.... कल्पना अय्यरची कबुतरबाजी, तिचा मादक डान्स आणि वर कमतीला भरती म्हणजे उषा उत्थुपच्या
आवाजातली डोकं भणभणून सोडणारी गाणी. हा अनोखा मसाला तेंव्हा हिट ठरला होता. कल्पना अय्यर आणि प्रेमा नारायण या दोघी अंगात वीज संचारल्यागत नाचायच्या. एक हायटेन्शन फील द्यायची ही सगळी मंडळी. जोडीला भप्पीदाचं संगीत मेंदूला झिणझीण्या आणत असे. यातली अर्ध्याहून अधिक गाणी ढापलेली असली तरी त्याला जो हिंदी मुलामा चढवला होता तो अफलातून होता. 'वन वे टिकिट'चे 'हरी ओम हरी' केले गेले तेंव्हा इथे लवकर कुणाला पत्ता लागला नाही की, 'ही ब्याद 
कुठून आयात केली आहे?' काही वर्षापूर्वी चार्टबस्टर हिट झालेलं 'डिस्को दिवाने' हे आलिया भट्टच्या लॉंचिंगसाठी वापरलेलं गाणं मूळचं पाकिस्तानातलं. नाझिया हसनचं. त्याचं ओरिजिनल साउंड ट्रॅक ज्या दिवशी भारतात लॉंच झाले होते तेंव्हा त्याच्या एलपीज आणि कॅसेटसची एका दिवसाची सेलफिगर होती एक लाख ! हा त्याकाळी एक विक्रम समजला गेला होता. यावरून प्रेरणा घेऊन कुमार गौरवला रीलॉंच करताना राजेंद्रकुमारनी पूर्ण 'डिस्को'वर आधारित 'स्टार' काढला होता पण त्याचे तारे कधी चमकले नाहीत.

म्युझिक रिलेटेड स्टोरीथीम, त्यावर बेतलेली पाचसहा गाणी, डिस्कोचा धूमधडाका ठरलेला असे. व्हिलनच्या जोडीला या दोन बया 
ग्लासातून लालपिवळे पाणी नाचवत मोठाल्या गॉगल मधून डोकावत असंत तेंव्हा कधी कधी नायिकेपेक्षा किलर लुक्स त्या देऊन जायच्या. या दोघींच्या बरोबरीने लीना दासगुप्तानेही असे रोल केले पण तिला अंगप्रदर्शनच जास्ती वाट्यास आले. यांच्या डोळ्यात जहर भरलेलं असायचं अन अंगांग मुसमुसलेलं, शिवाय कपडेही इतके त्रोटक असत की नजर हटण्याचा सवाल नसे. कधी व्हिलनची सिगार पेटवत तर कधी स्वतः सिगारेट पीत उंची सॅंडल घालून या दोघी चालत असत तेंव्हा कैकांचे कलिजे खलास झालेले असत. यांची कारस्थाने देखील अगदी पाताळयंत्री असत. कधी कधी ह्या दोघी नायिकेशी चार हात करत तो प्रसंग बघवत नसे. कारण मरतुकडया नायिकेकडून या मार कशा खातात असा प्रश्न पडे. यांच्या जोडीला कधी करण राजदान, राजकिरण तर कधी पंकज पराशर असे मख्ख शेंबडे नट वाट्याला यायचे. तेंव्हा नाकापेक्षा मोती जड या म्हणीचा अर्थ नीट कळाला. व्हॅम्प कशाशी खातात हे शशिकला, हेलन, बिंदू, अरुणा इराणी नंतर या दोघींनी जाणवून दिलं !

कल्पना अय्यर आणि प्रेमा या दोघींचे जन्मसाल एकच १९५५ ! त्यातही प्रेमाच्या तोंडावर जरा गोडवा होता त्यामुळे तिला
'उमराव जान' सारख्या सिनेमात चांगली भूमिका मिळाली. शर्मिला टागोरच्या 'अमानुष'धली तिची धन्नो आजही लक्षात आहे. तिला क्वचित चरित्र अभेनित्रीचं, बहिणीचं वा सहायक नायिकेचं कामही तिला मिळालं पण कल्पना अय्यर जाम ढांसू होती. ती एकदम जहांबाज बाई वाटायची आणि फटाकडीही वाटायची. आपल्या मराठीतल्या वन वूमन इंडस्ट्री असलेल्या सुषमा शिरोमणीने तिला लावणीत घेण्यासाठी आटापिटा केला होता पण रेखाच्या डेटस मिळाल्या आणि कल्पनाची संधी हुकली. लालबुंद नऊवारीत रेखाने ‘कुठे कुठे जायाचे हनिमूनला’
अगदी ढंगात सादर केले होते. त्या काळात कल्पना अगदी जाळ वाटायची. तिची एक स्वतंत्र स्टाईल होती. भडक लिपस्टीक, मोठाले गॉगल्स, आवळून बांधलेल्या केशरचना, मोठ्या इअरिंग्ज, स्टोन नेकलेसेस, हातातली चकाकणारी ब्रेसलेटस आणि कधी सिगारेट तर कधी सिगार तर कधी मदिराक्षीचा नजाकतदार ग्लास असा तिचा जामानिमा असे. उषा उत्थुपला जसं बंद्या रुपयाच्या आकाराचं मोठं कुंकू शोभून दिसे तसं कल्पनालाही ते शोभून दिसे. प्रेमा कल्पनासारखी फॅशन दिवा नव्हती पण तिच्याकडे तिच्याकडे नेत्रपल्लवीपासून ते ओठ चावण्यापर्यंतच्या दिलकश अदा होत्या. ती साध्या कपड्यातही खुलून दिसायची. या दोघींना विशेष भूमिका मिळाल्या नसल्याने अभिनयकौशल्य दाखवण्याची संधी काही त्यांना मिळाली नाही. आणि तसाही अभिनयाच्या बाबतीत त्यांचा एकंदर आनंदच होता.

प्रेमा १९७१ ची मिस इंडिया वर्ल्ड होती तर कल्पना १९७८ ची मिस इंडिया होती. या दोघीही मॉडेलींगमधून बॉलीवूडमध्ये
आल्या होत्या. यांची दोस्ती भारीच होती. प्रेमाने १९९९ मध्ये शेवटचा सिनेमा केला तर कल्पनानेही १९९९ च्या 'हम साथ साथ है' मधल्या छोट्याशा भूमिकेनंतर नाट्यमय रीतीने दुबईला प्रस्थान केले. प्रेमाचा बेन्जामिन गिलानीशी वाङ्निश्चय झाला होता पण लग्न होऊ शकले नाही तर कल्पना दुबईलाच स्थिरस्थावर झाली. तिनेही लग्न केले नाही. आता तिथे तिचा रेस्तरॉ आहे. ती बॉलीवूडचे नाव काढणाऱ्यास भेटत नाही. तिला कशाची इतकी तिडीक भरलीय यावर नंतर कधी तरी लिहीन. तर प्रेमा बॉलीवूडच्या अलिखित नियमानुसार उपयुक्तता संपुष्टात आल्यावर 'गुमनामी'च्या
गल्लीत एकांतवासात आहे. तिचं वास्तव्य बंगालमधील हुगळीजवळ असल्याचे बोलले जाते. या दोघींना ते सोनेरी दिवस आठवत असतील का नाही हे माहिती नाही. या दोघींनी जास्त करून व्हॅम्पच्या भूमिका साकारल्या आणि आता त्यांनी सत्तरी पार केली असली तरी त्या नखरेल 'डिस्को व्हॅम्प'  होत्या त्यामुळेच जर कधी रिकाम्या वेळात डिस्को ट्यून ऑन केल्या की या दोघीच डोळ्यापुढे झिलमिलत राहतात आणि त्या सोनेरी इतिहासात घेऊन जातात .... 

- समीर गायकवाड.