Monday, April 10, 2017

गाठ...कामिनीचं सौंदर्य कोणालाही घायाळ करणारं होतं, एकदम जहरी. एकदा तिच्या नजरेला नजर भिडली की गडी  खल्लास होऊन जायचा. कितीही तालेवार आसामी असली तरी तिच्यापुढे मग तो गोंडा घोळू लागायचा. तिच्या फुलांच्या ताटव्यात त्याचा भुंगा पार अर्धमेला होऊन जायचा आणि ती त्याला खेळवत रहायची. तिचा कातळलेला गोरापान आरस्पानी देह, कमनीय सुडौल बांधा, उफाडयाचं अंग अन गिर्रेबाज चाल बघून माणसं चित्त हरपून जायची. काळ्याभोर केसांची कपाळावर रूळणारी महिरप, कानापाशी आलेले केसांचे वळणदार आकडे, भरदार कपाळावर रेखेलेलं कोयरीच्या आकाराचं लालबुंद कुंकू, लांबसडक नाक, नाजूक गुलाबी जीवण्या, ओठाआडून डोकावणाऱ्या मोत्यासारख्या दातांच्या कळ्या, किंचित गोलाई असलेली निमुळती हनुवटी, वर आलेले गुबगुबीत जास्वंदी गाल अन त्याच्या मधोमध पडणारी जीवघेणी खळी, पातळ निमुळती रसरशीत कानशीले अन त्यात लटकणारे झुबे, तापलेल्या कानांच्या आधारे झुलणाऱ्या नाजूक सोनसाखळ्या, भरदार गच्च गळ्यातलं मोत्यात रूळणारं नाजूक तन्मणीचं खोड, दंडाला आवळून बांधलेले लाल काळे दोरे, लांबसडक बोटांत लाल खड्याची सोन्याची अंगठी, नाजूक कंबरेला करकचून बांधलेला कंबरपट्टा, पायातले अवखळ पैंजण, शिंदेशाही तोडे, फुलांची नक्षी असलेली जोडवी असा सगळा जामानिमा असे. कामिनीच्या डोळ्यात बारमाही काजळ कोरलेलं असायचं, ओठ कायम रंगवलेले असायचे अन अधूनमधून तिनं पान खाल्लं की मग तिचा गळा देखील लाल वाटायचा. तिचं अवघं शरीर मुसमुसलेलं होतं, तिच्या देहातला कण ना कण तटतटलेला होता. तिच्या अंगावरची गोलाई नजरंतून हटत नसे. तशात तिनं नजरेनं काही इशारे केले की नागिणीने डंख न मारता तिचं इख चढल्यागत माणूस तिच्यापुढं गपगार पडायचा. 

लातूरच्या पुढे  घोगरगावाबाहेर तिचा मुक्काम असायचा. कामिनीचा तमाशाचा फड नव्हता की ती वेश्या नव्हती की ती गाणं बजावणं करणारी बाई नव्हती. ती पुरुषांना नादाला लावणारी एक विलक्षण देखणी आणि तितकीच पाताळयंत्री चवचाल बाई होती. गावाबाहेर तिची शेती होती. वाडा होता. रग्गड स्थावर-जंगम मालमत्ता होती, पण तरीही तिचं मन समाधानी नव्हतं. कामिनी मुळची गोरटवाडीची. गरीब घरातली, पण प्रचंड हाव असणारी. तिच्या सौंदर्यावर भाळून तिच्या नात्यातल्या सुखदेव पाटलाने तिच्या बापाच्या मागं लागून तिच्याशी पाट लावला होता. बालवयात अन गरिबीत मारलेले सगळे इच्छाविकार तिने सुखदेव तिच्या सान्निध्यात आल्यावर  पुरवून घेतले. सुखदेव पाटलाच्या मजबूत वाड्यात ती आली खरं पण त्या नंतर त्याला उतरती कळा लागली. त्याला हळूहळू कळत गेलं की, 'आपल्याआधी डझनावारी माणसं हिनं बोटावर खेळवलीत, कित्येकाचे उसाचे फड झिंगवलेत अन कैकांचे संसार नासवलेत.' सुखदेव पाटील तिच्या देहाला इतका भुलला होता की तिचे चरित्र देखील त्याने नीट माहिती करून घेतले नव्हते. तिची अशी काही भुरळ पडली होती की, गड्याची बुद्धी भ्रष्ट झाली होती. कामिनीचे गुण बघून त्याच्या भावकीने त्याला वायलं काढलं, सगळे पाव्हणे रावळे त्याच्यावर थुकून गेले.

तो एकाकी पडला, त्या सरशी कामिनीच्या अंगातली धामण जागी झाली अन तिच्या देहाला वेटोळे घालण्यासाठी गावोगावचे हौशे नौशे तिचा माग काढत येऊ लागले. तिच्याकडं आलेली माणसं आधी सुखदेव पाटलाशी जुजबी बोलायचे आणि कामिनी कुठं नजरं पडते का याचा ठाव घेत रहायचे. एकदा का कामिनी दिसली की त्यांच्या तोंडातनं लाळ टपकू लागायची. ती तर या खेळात पक्की मुरलेली असल्याने तिचा नेमका पदर तर पडायचा नाहीतर ती नेमकी वाकायची तरी. मग तो माणूस पुन्हा काहीतरी निमित्त काढून तिच्यापर्यंत जायचा, हा नाद रंगू लागला की तो पुन्हा पुन्हा येत राहायचा आणि येताना हळूच एखादी चीजवस्तू तिच्यासाठी आणायचा. हळूहळू सुखदेव पाटलाच्या लक्षात सगळा प्रकार येऊ लागला होता पण तोवर फार उशीर झाला होता. कामिनीने त्याला दारूचं व्यसन जोडून दिलं होतं. त्याच्या विळख्यातून तो बाहेर पडूच शकला नाही. जेमतेम पाचसहा वर्षात त्याच्या सुखावर वरवंटा फिरला. होत्याचं नव्हतं झालं. एका पिसाळलेल्या रात्री सुखदेव पाटलाचा खेळ आटोपला. शेतातच त्याची माती करून झाली. या वक्ताला देखील त्याची भावकी मधी पडली नाही पण त्याची बायकापोरे येऊन जमिनीतला हिस्सा करून गेले. पंच मंडळींनी निकाल दिला त्याला कामिनीने अजिबात आढेवेढे घेतले नाहीत कारण तिला राहायला भक्कम जागा अन जोडीला थोडाफार जमीन जुमला हवा होता. त्यानंतरचा डाव काय खेळायचा हे तिला पक्कं ठाऊक होतं. त्यामुळे तिने वाटयाला आलेली जमीन घेऊन आपले रंग उधळायला सुरुवात केली. पंचांनी तिचं अस्तित्व मान्य केल्याने आणि ती नाहीतरी गावाबाहेर राहत असल्याने तिला कोणी आडवं लावायचा प्रश्न नव्हता. त्या दिवसापासून ती मोकाट सुटली. तिच्याकडे नित्य नव्या माणसांचा राबता सुरु झाला पण तिनं मुजोरपण कधी केलं नाही. मात्र तिनं एक पुरुष ठेवला. होय ठेवलाच !

त्याचं नाव महादू. तालमीचं भयानक वेड असलेला पण घरची परिस्थिती बेताची असल्याने मन मारणारा, रसरशीत पिळदार मजबूत अंगाचा, भक्कम हाडापेरांचा, सावळ्या रंगाचा तुकतुकीत अंगाचा, नाकीडोळी नीटस असणारा, मिशीची बारीक लव शोभून दिसणारा महादू एक आकर्षक पुरुष होता. कामिनीची इमाने इतबारे चाकरी करता तिचं तळे राखून अधून मधून त्यातले पाणी चाखणे यावरच तो प्रचंड समाधानी होता. शिवाय त्याच्या तालमीचा खुराक ती पुरवायची बदल्यात तो तिची रग जिरवायचा. आल्या गेल्यांची खबरबात काढणे, त्यांची इस्टेट किती आहे, कुठे आहे याची माहिती काढणे, त्यांची खुशमस्करी करणे हे काम तो चोख पार पाडायचा. 

सुखदेवाच्या मृत्यूनंतर तो गावातल्या आपल्या घरी कसला म्हणून गेलाच नव्हता. त्याच्या घरचे पूर्वी  त्याच्या उंडगेपणावर नाराज असत, ते आता शांत झाले होते. कुठून तरी तो एका जागी टिकून आहे आणि शिवाय खाऊन पिऊन निवांतपणाचे  काम करतो आहे याचे त्यांना अप्रूप होते. यामुळे महादू आणि कामिनीची जोड चांगली रंगली होती. सुरुवातीला काही दिवस याच्यावर गावात चर्चा झडली. पण विषय चावून चावून चोथा झाल्यावर गावकऱ्यांनी त्याकडचे लक्ष कमी केले. त्यानंतरच्या काळात कामिनीकडे येणाऱ्या परपुरुषांची खमंग रसभरीत वर्णने चर्चिली जाऊ लागली. पण हाही विषय वर्षभरात मागं पडला. तिच्याकडे बापये येतात, त्यांच्या ऐपतीनुसार ती अंगाशी चाळा करू देते, त्यांचे खिसे हलके झाले की महादू नवा गडी मैदानात आणतो मग आधीचा गडी इरस करून आणखी काही रोकड नाहीतर एखादा डाग घेऊन तिच्याकडे येई. हे असे चक्रच कामिनीच्या वाड्यात चालू झालेले होते आणि त्याचा पुरेपूर आनंद ती घेत होती. तिच्या नादाने काही माणसं अक्षरशः भिकेला लागली. त्यातल्या काही व्यक्तींचे नातलग, गाववाले येऊन कामिनीच्या घरासमोर तमाशा करत पण गंमत अशी होई की त्यातलाच एखादा मासा कामिनी गळाला लावत असे त्यामुळे सगळा मामला थंडा पडत असे. असल्याच एखाद्याचा सडासाठा मित्र भांडायला आला की महादू कधी गोडी गुलाबीने तर कधी दोन हात करून त्याला पिटाळून लावत असे. पण कधीकधी महादूला या गोष्टीचे वाईटही वाटे पण कामिनीचा लाव्हा त्याच्या देहाशी भिडताच त्याचा विवेक त्यात भस्म होऊन जाई. पण तो जोर ओसरल्यावर त्याला थोडं का होईना अपराधीपण यायचे. तसं बघायला गेलं तर महादू नशीबवानच म्हणायचा कारण गावातली आणखी एक देखणी पोर चित्रा त्याची सगळी कारस्थाने माहिती असूनही त्याच्यावरून जीव ओवाळून टाकायची पण त्याला तिची किंमत नव्हती.... 

आषाढातल्या एका पावसाळी दुपारी साकरेवडगावचा साठी गाठलेला सावकार कामिनीच्या वाड्यासमोर त्याची कमांडर जीपगाडी घेऊन आला तेंव्हा महादूने आत जाऊन कामिनीला मोठं घबाड दारात आल्याची माहिती दिली. कोंडीबा गव्हाणे, वय वर्षे साठ, डांबरागत काळाकुट्ट रंग, रापलेला चेहरा, डोईवरचे पांढरे शुभ्र छप्पर, मोठंलठ कपाळ अन त्यावरचं समांतर रेषेतल्या आठ्यांचं जाळं, जाडजुड भुवया, तांबारलेले गरगरीत डोळे, करारी नजर, कानाजवळचे मोठाले कल्ले, झुपकेबाज मिशा, किंचित उतरलेली गालफाडे, रासवट काळेकुट्ट ओठ आणि त्या आडचे दातवण लावलेले काळे पिवळे दात आणि त्यात उठून चमकून दिसणारे सोन्याचे दोन सुळेदात, हनुवटीपाशी असलेली मक्याच्या आकाराची म्हस, कानात लटकणाऱ्या बाळ्या, दणकट हातातलं सोन्याचं कडं, गळ्यातल्या काळ्या गोफात सोन्याचा मोठा बदाम, अंगात मखमली सदरा आणि गंजी केलेलं कडक धोतर, पायात कराकरा वाजणाऱ्या वजनदार ढवळपुरी चपला, खर्जातला घोगरा आवाज अन धिप्पाड उंचापुरा देह ! कोंडीबाला बघताच माणूस हप्पक खायचा. त्याचा आवाज ऐकल्यावर तर त्याच्यापुढं बोलायची कुणाची टाप होत नसे. 

तरीही आपल्या वडीलाच्या वयासमान कोंडीबाला बघून कामिनीच्या तोंडाला लूत भरल्या कुत्र्यागत पाणी सुटलं होतं. त्याचं कारणही तसंच होतं. कोंडीबा जवळजवळ चारपाचशे एकर जमिनीचा मालक होता तोही वारस नसलेला. त्याच्या अख्ख्या तालुक्यात त्याचा व्याजबट्टयाचा व्यवहार चाले. गहाणवटीतून तर त्याने अफाट गबाळ हाणले होते. तो त्याच्या बापाला एकटाच होता. त्याच्या लग्नाच्या बायकोबरोबर चाळीसएक वर्षे त्याने संसार केला होता. पण सतत आजारी असणारी बायको त्याला वारस देऊ शकली नाही. कोंडीबाचा तिच्यावर आधी लई माइंदळ जीव होता, त्याला भरवसा वाटायचा की तिची कूस कधी ना कधी उजवेन पण तसं घडलं नाही. तिच्या शेवटल्या पाचसहा वर्षांत तिच्याच नात्यातल्या एका गरीब अश्राप तरुण मुलीशी, चांगुणेशी त्याने लग्न केले होते. पण तिच्यापासूनही त्याला वारस लाभला नव्हता. शेवटी त्याने आपल्या पंचविशी पार झालेल्या भाच्याला अरुणला दत्तक घेतले होते. 

कोंडीबाने अरुणला दत्तक घेतले होते खरे पण त्याला माया कसली ती कधी लावली नव्हती. गरीबाघरचा अरुण आपल्या खडूस मामाच्यापुढे एक पाऊलदेखील जात नसे. खरं तर अरुणची मामी गेल्यानंतर कोंडीबा तोल गेल्यासारखा वागत होता. आपल्या पैशाच्या जोरावर त्याने अनेक स्त्रियांच्या अंगावर हात टाकला होता. आपली वासना शमवून घेत होता. आपल्या वयाचे भानही त्याला उरले नव्हते. अनेकांचे हात त्याच्या व्यवहाराखाली दबलेले असल्याने कोणी त्याच्या विरोधात जात नसे, फारतर दबक्या आवाजात चर्चा होई. अरुणला मात्र आपल्या मामाचे वागणे पटत नव्हते पण त्याचा काहीच इलाज नव्हता. 

उतारवयात आपले आंबटशौकीन नाद पुरवताना कामिनीच्या सौंदर्याची माहिती कोंडीबाच्या कानी आली होती. त्याचा पिच्छा पुरवत पुरवत तो तिच्या दाराशी येऊन थडकला होता. तिला त्याच्या दौलतीची हाव होती तर त्याला तिच्या गाभूळलेल्या देहाची ! इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर कामिनीने आपल्या देहाचा साखरपाक त्याच्या ओठी लावला आणि कोंडीबा पार हडबडून गेला. तिच्या हातावर हिऱ्याची मोरणी ठेवून गेला. त्या महिनाभरात त्याच्या धा चकरा झाल्या. शेवटच्या भेटीत त्याने प्रस्ताव ठेवला. त्यानुसार कामिनीनं त्याच्या घरी जायचं, त्याच्याशी शरीरसंबंध ठेवायचे आणि ती पोटुशी राहिली की कोंडीबा तिच्याशी लगीन लावणार. पहिली बायको जिवंत असताना केलेली दुसरी बायको चांगुणा आणि कामिनी या दोघींनाही सांभाळण्याची त्याची तयारी होती. त्या बदल्यात कामिनीला जीवाची पटराणी करायची बोली होती. अन जर समजा ती गाभण राहिली नाही तर त्याच्या एकूण इस्टेटीतला पाव हिस्सा तिच्या वाट्याला येईल. पण तो एका अटीवर दिला जाईल ती अट म्हणजे, एकदा का ती कोंडीबाच्या घरी आली की तिनं कुणाचा हात अंगाला लावून घ्यायचा नाही हे पक्कं करायचं होतं. खोटेखोटे आढेवेढे घेत कामिनीने होकार दिला पण तिनंही एक अट घातली ती म्हणजे महादू तिचा चाकर बनून तिच्यासंगट येणार ! कोंडीबाच्या घरी गेल्यावर जीवावर काही संकट आल्यास त्याला तोंड द्यायला महादूपेक्षा भारी माणूस तिला कुठं गाव्हला असता !  कामिनीच्या शरीराला हपापलेला कोंडीबा या अटीला राजी झाला. आणि दिवाळीच्या वक्ताला कामिनी अन महादू कोंडीबाच्या गढीवजा वाड्यात दाखल झाले. इकडे येण्यापूर्वी तिने घराची आणि शेताची घडी नीट राखण्यासाठी एक खास मर्जीतला कारभारी नेमला...   

वीस खणाचा दोन इमल्याचा कोंडीबाचा भलामोठा वाडा बघून कामिनीचा जीव दडपून गेला. मात्र तिनं वाड्यात पाऊल ठेवल्यापासून कोंडीबाच्या वागण्यात बदल झाला. तो तिला पाहिजे तेंव्हा, पाहिजे तसं ओरबाडू लागला. कधी माळवदावर तर कधी माजघरात तर कधी जिन्यात तर कधी सज्जाच्या मागे तर कधी तुळशीच्या समोरील मोकळ्या चौकात, पडवीत, ओसरीत तर कधी थेट न्हाणीघरात कुठेही तो घुसू लागला. त्याने लाजलज्जा पार सोडून दिली. एकदोनदा तर त्याने चांगुणेच्या देखता अतिप्रसंग केला. ती अशिलाची पोर भांबावून गेली. मोडक्या तोडक्या माहेरी गाऱ्हाणे करून काही उपयोग न होता आईबापाला त्रास होईल या जाणीवेने ती मुकाट रहायची. हे सगळं बघून अरुणची तळपायाची आग मस्तकाला जात होती. पण हात चोळत बसण्याशिवाय तो काहीही करू शकत नव्हता. व्याजाची कलमे आणायला बाहेर गेला की लोक त्याच्या गरीब स्वभावाचा फायदा घेऊन घालून पाडून बोलत तेंव्हा त्याला त्याचं दत्तकपण नकोसं होई. 

पुढे पुढे कोंडीबाने सगळं ताळतंत्र सोडलं, जणू त्याच्या अंगातलं हिंस्त्र श्वापद पूर्ण ताकदीने बाहेर पडलं होतं. तो आता तिच्यासोबत रात्रंदिवस कोंडून घेऊ लागला होता, तिच्यासोबत अंघोळ करण्यापासून ते जेवण करण्यापर्यंत त्याची जबरदस्ती होऊ लागली. कामिनीसारखी शंभरजणांकडून अंग रगडून घेतलेली बाई देखील त्याच्या रासवट रानटीपणाला वैतागून गेली होती पण कोणती आणि कशी तक्रार करणार अन तीही कोणापाशी हा सवाल तिच्यापुढे होता...

कामिनीच्या अंगचटीच्या सुखाला चटावलेला महादू तर पार घरगडी झाला होता, कामिनीशी असलेल्या त्याच्या सलगीवरून कोंडीबाला त्याच्यवर जाम संशय होता त्यामुळे तो त्याला कायम तिच्यापासून दूर राखीत असे. भरीस भर म्हणजे महादूचा खुराक इथे आल्यापासून कमी झालेला होता.  कामिनीशी केवळ नजरसुख वा क्वचित कधीतरी स्पर्शसुख एव्हढ्यावर तो समाधान मानत होता. या सर्व नात्यात खरं प्रेम कुणाचेच कुणावर नसल्याने ही सगळी नाती कचकडयासारखी झाली होती, कधी तुटतील याचा नेम नव्हता. या सगळ्याचा परिणाम असा झाला की महादू आणि अरुण यांची सलगी वाढत गेली. चांगुणा मात्र कुणाच्याच खिजगणतीत नव्हती. अरुणने गोड बोलून समजावून सांगून दुनियादारीचे हवाले देऊन तिला त्यांच्या बाजूने वळवून घेतले. चांगुणा मनापासून त्यांच्यासोबत नव्हती पण एकटं राहण्यापेक्षा कुणासोबत तरी राहिलेलं बरं म्हणून तिने होकार दिला. आता अरुण आणि महादूच्या डोक्यात वेगवेगळे किडे वळवळू लागले होते....

बघता बघता कामिनीला येऊन सात आठ महिने उलटून गेले पण तिचे पाय काही केल्या जड होत नव्हते. अहोरात्र आपण हिच्या अंगाशी झटून देखील हि गर्वार कशी राहीना हा प्रश्न कोंडीबाचा मेंदू पोखरत होता. तर इथे आल्यापासून केवळ कोंडीबामुळे अन त्याच्या अफाट इस्टेटीमुळे  कामिनीचे आपल्याशी वागणे बदलले आहे, आपण केवळ तिला नोकर म्हणून हवे आहोत हा सल महादूच्या डोक्यात सलत होता. आपल्या मामीच्या पश्चात आपल्या मामास अन आताच्या दत्तक बापास एका यकश्चित बाजारबसव्या बाईच्या इतका आहारी गेल्यामुळे आपले वय, आपला अवतार, आपली प्रतिमा ह्या सर्वांचा विसर पडला. केवळ कामिनीपायी तो वासनेचा समंध होऊन राहिला होता याची तिडीक अरुणच्या डोक्यात होती. तर आपल्या आयुष्याचं नरक झाल्याची वेदना चांगुणेला अस्वस्थ करत होती, मात्र तिला कोणाचा संताप नव्हता की रागलोभ नव्हता. आलेला दिवस मुकाट्याने जगणे इतकेच तिच्या स्वभावात होते. अरुण आणि महादूच्या चर्चा ऐकताना तिच्या काळजात चर्र होत असे. ते दोघे एकदिलाने बोलत असत पण कधीकधी ते हमरीतुमरीवर येत. त्याचे कारण असे आपसातली खुन्नस. अरुणला वाटे की कामिनीचा काटा काढावा अन महादूला वाटे की कोंडीबाचा गळा आवळावा. चांगुणा बिचारी नुसती ऐकत राही. पण तिने एक ओळखले होते की हे असंच चालू राहिलं तर लवकरच वाड्यावर काहीतरी आक्रीत घडणार. या तिघांशिवाय आताशा कोंडीबा कामिनीला दिकून हिडीस फिडीस करू लागला होता अन हा खडूस म्हातारा मेल्याशिवाय आपल्याला याच्या इस्टेटीतला पाव हिस्सा मिळत नाही अन हा काही लवकर मरणाऱ्यातला नाही याचा अंदाज कामिनीला येऊ लागला होता. एकदा तर कोंडीबा रागाच्या भरात चांगुणेपाशी कामिनीच्या जीवाबद्दल वाईट साईट बोलून गेला होता...      

चांगुणेच्या मनात हे सर्व विचार पिंगा घालू लागले की ती अस्वस्थ होऊन जाई. तिच्या मागं भक्कम कुणी नातलग नव्हते की तिच्या नवऱ्याचा तिच्यावर जीव नव्हता. खायला प्यायला मोप सगळं होतं पण जीवाला काडीचं सुख नव्हतं. ह्या दोघांनी कुणाच्या जरी जीवाचं बरंवाईट केलं तर यांच्यासंगं आपल्याला बी तुरुंगाची हवा खावी लागणार इतकं तिला नक्कीच कळत होतं. जे चालले आहे ते नक्कीच खूप वाईट आहे पण यावर काय तोडगा काढायचा हे तिला कळत नव्हते. अखेर तिने एक बराच विचार करून एक योजना डोक्यात पक्की केली. तिने कोंडीबाला रोकड चणचणीचं निमित्त सांगून लांबच्या वसुलीची कलमे आणायचं काम अरुण आणि महादूच्या गळ्यात घातलं. ते दोघे वाड्यावर दोन दिवस परतू शकणार नाहीत याची काळजी घेत तिनं बेत आखला आणि ते दोघे गेले त्या रात्री तिनं तो बेत तडीस नेला देखील.. 

अरुण आणि महादू तिसऱ्या दिवशी गंगापूरहून परतत होते तोवर त्यांच्या गावाकडचा माणूस त्यांना शोधत शोधत एक भयानक सांगावा घेऊन आला. त्याचा निरोप ऐकून त्यांच्या तोंडावरचा रंग उडाला. ते ज्या दिवशी गावाबाहेर पडले होते त्याच रात्री कामिनी, चांगुणा आणि कोंडीबा हे तिघेही मृत्यूमुखी पडले होते. तिघांच्या तोंडातनं रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या आणि उष्टे अन्न खाल्लेलं मांजरदेखील रक्ताच्या उलट्या करून मरून पडलं होतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शेतातल्या दुधवाल्या गड्यामुळे गावाला सगळा प्रकार कळला होता.ज्या खोलीत कामिनी आणि कोंडीबा एकत्र मरण पावले होते, त्या खोलीला बाहेरून कडी लावलेली होती तर त्याच खोलीच्या बाहेर चांगुणा फरशीवर मरून पडली होती. लोकांचा अंदाज होता की बहुतेक चांगुणेनेच अन्नातून विष घालून त्या दोघांना मारताना स्वतःलाही संपवले होते...

लोकांचा अंदाज बरोबरच होता. मागील काही दिवसापासून चांगुणेनं विचार करूनच हा बेत आखला होता. तिनं ढेकुण मारायचं औषध भातात, आमटीत कालवलं होतं. देवभोळी आणि गरीब चांगुणा असे काही करेल असा विचार स्वप्नातदेखील कुणी केला नसता. पण अरुण किंवा महादू यांनी खूनखराबा केला असता तर त्यांची उरलेली हयात तुरुंगात मध्ये गेली असती, आपल्यासह उरलेलं गणगोत रस्त्यावर आलं असतं, तेंव्हा आपल्या पाठीमागे कुणी नाही अन जगलं काय अन मेलं काय काही फरक पडत नाही हे तिनं ताडलं होतं. म्हणून ह्या दोघांना बाहेरगावी पाठवून आंबेमोहोर भातात विषाच्या रूपातला मृत्यू कालवून त्या जोडीला त्यांच्या खोलीत नेऊन दिला होता. त्रास झाल्यावर बाहेर येऊन बोंब ठोकू नये म्हणून त्यांच्या खोलीच्या दाराला तिनं बाहेरून कडी लावून स्वतःच्या आयुष्यातही तिनं माती कालवली होती. आणि उलट्या झाल्यावर कोंडीबा खरंच दार बडवून बडवून दारापाशी मरून पडला होता तर कामिनी बिछान्यातच मरून पडली होती. चांगुणानं तिथंच दाराबाहेर जीव सोडला होता. नात्यांच्या गुंत्यातल्या गाठी सोडवण्यापायी तिनं आयुष्याची गाठ कापली होती. दुसऱ्या सांजेला दुधवाला रतीब घेऊन आल्यावर दार उघडलं जात नाही हे ध्यानी आल्यावर त्याला शंका आली आणि सगळं गाव हादरून गेलं... 

कोंडीबाच्या मृत्यूनंतर अरुणने ज्यांची ज्यांची गहाणवटीची कागदपत्रे होती, जमिनी होत्या, चीजवस्तू होत्या, दागदागिने, दस्तऐवज जे काही होते ते परत देऊन टाकले. त्यातला एक फुटका पैसाही न घेता तो त्याच्या जन्मदात्या आईवडीलांच्या घरी रिकाम्या हाताने पण उजळ माथ्याने परतला. तर महादू त्याच्या गावातल्या घरी निघून गेला. चित्रा त्याची वाट बघतच होती पण त्याने तिला नकार दिला. उभ्या आयुष्यात तो पुन्हा कुठल्या स्त्रीच्या वाऱ्याला उभा राहिला नाही. 

कोंडीबा गव्हाण्याचा वाडा त्याच्या मृत्यूनंतर खचला होता तो १९९३ च्या भूकंपाने पूर्ण हादरून गेला. त्याचे चिरे ढासळले, माळवद कोसळले, भिंती अर्धवट पडल्या, दरवाजे उध्वस्त झाले. पुढे जाऊन वाड्यातला चौक चिलारीच्या झुडपांनी वेढून गेला. आता त्या वाड्यात कुठलं जनावर देखील पाऊल टाकत नाही. गावकऱ्यांनी कोंडीबा गेल्यावर मोकळा श्वास घेतला पण त्याच्या वाड्यात पाय टाकायची कुणाची हिंम्मत झाली नाही. ह्या वाड्याच्या भग्न अवशेषांभोवती चित्रविचित्र भास होतात असं लोक सांगतात. कुणी सांगतो की कोंडीबा अजूनही वाड्याच्या दगडधोंड्यात जित्ता हाय, तो रात्री अपरात्री रडत असतो, 'चांगुणेनं माफ केल्याबिगर जीवाची मुक्तता न्हाई' असं काहीबाही बरळत असतो असं लोक सांगतात.... 

- समीर गायकवाड.