Saturday, April 1, 2017

कथा सुरेखा पुणेकरांची ...
जीवावर उदार होऊन उसनवारी करून किडूक मिडूक विकून एखाद्या स्त्रीने धाडस केलं आणि सुरुवातीच्या पहिल्याच घासाला दात पडतील असा खडा लागला तर तिची अवस्था अत्यंत बिकट होते. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकरांच्या सुरुवातीच्या हलाखीच्या दिवसाच्या आठवणींची कथा ...


एक काळ होता जेंव्हा तमाशाचा फड बैलगाडीतून गावोगाव फिरत राहायचा आणि आपल्या कौशल्याच्या जीवावर नावलौकिक कमवायचा. अगदी शांतारामबापूंच्या 'पिंजरा'त देखील अशीच दृश्ये दिसतात. तेंव्हा आजच्या सारखी प्रसिद्धीची साधने नव्हती की लोककलेबद्दल विशेष आपुलकी असणे वगैरेचा ट्रेंड कुणी कुठं जोपासत नव्हतं. कुठलं विशेष अनुदान किंवा सरकारी - निमसरकारी सहाय्य असले फंडे देखील नव्हते. ज्याच्या नसानसात कला भिनलेली आहे त्याची कीर्ती व्हायचीच. पण अनेक माणसं अशी असतात की अंगी कलागुण असूनही ते सादर करायला व्यासपीठ आणि संधी दोन्हीही मिळत नाही त्यामुळे त्यांना रसिकांसमोर येणं जमत नाही. अशा माणसाची आर्थिक अवस्था हलाखीची असली की त्याच्या सर्व इच्छा आकांक्षांवर पाणी पडतं. कोंडीबा टाकळीकर हा असाच कलासक्त माणूस. उमेदवारीच्या काळात हे पुणे स्टेशनला हमाली करायचे. पण त्यांना तमाशाचे भयानक वेड होते. हमालीतून आलेल्या पैशातून आणि घरातली सगळी साधनं वापरून ते एक छोटेखानी फड चालवत असत. हमाली करत करत हा उद्योग चालत असे. ह्या आगाऊ कामामुळे त्यांचं हमालीच्या नोकरीकडे लक्ष नसे. सगळं ध्यान तमाशात गुंतून पडलेलं. विशेष म्हणजे तमाशात ते नाच्या आणि सोंगाड्याचं काम करायचे. कधी कधी नटाचे कामही करायचे. कोंडीबांच्या दोन्ही चिमूरडया मुलीही त्यांच्या फडासोबत असायच्या. लता आणि सुरेखा ही त्यांची नावं. कोंडीबांचे सासू सासरे देखील कलावंतच होते. त्यामुळे हे कलागुण त्यांच्या मुलींमध्ये अनुवंशिकतेनेच आलेले होते.

कोंडीबा टाकळीकर महाराष्ट्रभर आपल्या बैलगाडीत फड घेऊन फिरत. ते एक दर्दी कलारसिक फडमालक होते. त्यामुळे त्यांचे कलासंस्कार त्यांच्या मुलींवर कधी झाले हे कुणाला कळलेच नाही. या जोडीतली सुरेखा अगदी बालवयातच वडीलांच्या तमाशात नृत्य करु लागली होती. तिचा धिटुकला परफॉरमन्स अन नृत्यगुण बघून प्रेक्षक कौतुकाने यात्रेतल्या 'शेव-रेवडी'च्या माळा तिच्या गळ्यात घालायचे. आधी कौतुक, अप्रूप आणि आवड म्हणून केलेलं नृत्य तिच्या रोमरोमात भिनत गेलं. अंगातील नृत्याची लय, त्यात असलेली गती आणि ऊर्मी तिला स्वस्थ बसून देत नव्हती. वडीलांच्या पश्चात पोटापाण्यासाठी आणि कलेच्या उर्मीसाठी या दोघी बहिणी त्याकाळी प्रचंड लोकप्रिय असलेल्या दत्तोबा तांबे यांच्या तमाशा फडात रुजू झाल्या. त्यांच्या समावेशाने तांबेंच्या तमाशाला आणखीनच झळाळी आली. आर्थिक सुबत्ता आली. यात कोंडींबांच्या मुलींचा वाटा मोठा होता. या फडात त्यांना आपल्या कर्तृत्वाची आणि कलेची किंमत लक्षात आली. त्यातून त्या दोघींनी स्वतःचा फड उभारण्याचे स्वप्न उराशी बाळगले. यासाठी दत्तोबा तांबेंचा फड त्यांनी सोडून दिला आणि पुढील नियोजन होईपर्यंत साहेबराव नांदवळकर व चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्या तमाशात काही दिवस केवळ 'शिध्यावर' त्यांनी नृत्यसेवा केली. ते साल १९८६ चे होते जेंव्हा या दोन बहिणींनी "लता-सुरेखा पुणेकर' नावाने स्वतःचा फड सुरू केला होता. पण ही झेप मोठी होती आणि वाटली तितकी सोपीही नव्हती. त्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. जिद्दीने उभं राहावं लागलं होतं. धाडसाचा हा जुगार खेळायची त्यांनी मनोमन तयारी केली होती.....

गावाकडून सहा हजार हातउसने घेऊन आणि घरातील दाग-दागिने विकून पंचवीस हजार रुपये एकत्रित करून त्यांनी फड उभा केला होता. या फडाचा पहिला मोठा प्रयोग सुरतच्या सीमेलगत असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील डांगसौंदाना या गावी ठरला होता. कर्मधर्मसंयोगाने त्याच दिवशी याच गावात त्याकाळी बऱ्यापैकी नावलौकिक असलेल्या शंकर कोचूरे यांच्या फडाचाही कार्यक्रम गावातील पलीकडच्या पेठेला होता. पुणेकर बहिणींनी आपल्या कलेच्या जोरावर अल्पावधीत लोकप्रियता कमावलेली होती आणि त्यांचा बोलबालाही भरपूर झाला होता. त्यामुळे त्यांच्या बारीतील गण-गौळण, रंगबाजी अन वगाची सुरवात होण्याच्या दरम्यानच शंकर कोचूरेंच्या काही कार्यकर्त्यांची आणि पुणेकरांच्या कर्मचाऱ्यांची त्यांच्याच तिकीट खिडकीवर हाणामारी झाली. या हाणामारीत दोन तरुण बिगारी कामगार आणि फडावरील ढोलकीवाल्याला बेदम मारहाण झाली. यातील एक बिगारी युवक गंभीर जास्त जखमी झाला. याची परिस्थिती एवढी गंभीर होती की, तो मेला आहे असाच सर्वांचा समज झाला. या घटनेने सुरेखा पुणेकर हवालदिल झाल्या. फडाच्या जाहिरातीसाठी गावात फिरणाऱ्या त्यांच्या जीपचालकाला त्यांनी तत्काळ बोलावले. जीप फडावर येताच दवाखान्यात नेण्यासाठी त्या गंभीर जखमी युवकाला जीपमध्ये ठेवले गेले. सोबत जखमी ढोलकीवाला आणि दुसरा जखमी कामगारही त्या गाडीत बसले. चालकाने रिव्हर्स गिअरने जीप हळू-हळू मागे घ्यायला सुरवात केली. काही क्षणातच अचानक जीप मागे कुठेतरी खोल खड्ड्यात जाऊन पडली. गाडीने चांगल्या पलट्या मारल्याचा मोठा आवाज सुरेखाबाईंच्या काळजाचा ठोका चुकवून गेला.

गाडीतल्या माणसांच्या किंकाळ्यांनी एकच गलका उडाला. सगळीकडे गोंधळ गोंगाटाची परस्थिती उद्भवली. एव्हाना गेटजवळ गोळा झालेले गावकरी आत आले आणि त्यांनी सुरेखाबाईंना सुनवले की,"अहो मालकीणबाई, मागं दोनशे फूट दरी आहे, ड्रायव्हरला तुम्ही काय झोपंत मागं गाडी घ्यायला सांगितली की काय..?'. हे ऐकून त्यांच्या डोळ्यापुढे काजवे चमकले. भर मध्यरात्र झालेली अन फडावरचा तमाशा बाजूला राहून या जिवंत 'तमाशा'मुळे आपल्या आयुष्याचा फड उध्वस्त होतो की काय अशी शंकेची पाल त्यांच्या मनात चुकचुकली. शेवटी गावातील स्थानिक तरुण मंडळीच त्यांच्या मदतीस आली आणि जखमींना त्या खड्डयातून वर काढण्याचे निकराचे प्रयत्न सुरु झाले. या वेळी कासावीस झालेल्या सुरेखाबाईंना धीर देण्याचे काम बहिण लताने केले.

काही वेळातच त्या खड्ड्यातून आधी जीपचा चालक चक्क व्यवस्थित चालत वर आला. या दुर्घटनेत कोणी दगावलं नाही मात्र दोघांची हाडे मोडून निघाली. काही वेळाच्या अंतराने ढोलकीवाला व बिगारी युवकही बाहेर निघाले. जो बिगारी कामगार गंभीर जखमी होता तो ही विच्छिन्न चेहऱ्याने वर आला. दिग्मूढ होऊन गेलेल्या पुणेकर भगिनींनी त्या सर्वांना किती मार लागला आहे याची वास्तपुस्त करून सटाण्यातील नजीकच्या दवाखान्याची चौकशी करून त्यांच्या उपचाराची तजवीज केली. तोवर पूर्वेला दिवस उजाडू लागला होता...

ती रात्र कशी गेली हे त्यांना कळलेदेखील नाही. गावकऱ्यांनी बैलगाडया जुंपून खड्ड्यात पडलेली जीपगाडीही वर काढली. हा प्रसंग सुरेखा पुणेकरांना खूप काही शिकवून गेला. किंबहुना त्यांच्या भविष्यातील उत्तुंग यशाचा भक्कम पाया या घटनेने घातला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या घटनेनंतर तमाशा करायचा नाही असे त्यांनी ठरवले होते. आपल्या विरोधी पार्ट्या आपल्याला त्रास देतात आणि त्या पातळीवर उतरून आपण त्यांचा प्रतिकार करू शकत नाही याची त्यांना जाणीव होती. म्हणून त्यांनी आधी काही काळ चक्क ऑर्केस्ट्रा, आणि नंतर 'कथा अकलेच्या कांद्याची' हे नाटकही करून पाहिले. राम नगरकर, मधु वांगीकर, जयमाला इनामदार यांच्यासोबत काम करण्याची त्यांना संधी मिळाली. पण या 'नाट्य'पूर्ण घडामोडी त्यांना अदाकारी शिकवून गेल्या. ढोलकीवाला, पेटीमास्तर आणि तब्बलजींना घेऊन त्यांनी गावोगावी 'फक्कड बाजीराव' सारखी नाटकं केली. हे करता करता त्यांच्या अंगातला 'तमाशा' उचल खायचा आणि जत्रांची सुगी असलेल्या चैत्रापुरतं त्यांनी तमाशाला पुन्हा आजमावून बघायला सुरुवात केली. पण वर्षाकाठी फक्त एकच महिना तमाशा होई. अंतःकरणातली तमाशाची उर्मी त्यांना इतर काळ स्वस्थ बसू देत नव्हती. आणि 'त्या' घटनेतून आपण पुन्हा ठामपणे उभं राहून काही तरी करून दाखवू शकतो हे त्यांना जगाला दाखवून द्यायचे होते म्हणून त्यांनी दृढनिश्चय करून पायाला कायमचीच घुंगरं बांधली. त्यांच्या 'नटरंगी नार'ने त्यांनाच नव्हे तर अख्ख्या तमाशाच्या लोककलेला संजीवनी मिळवून दिली. सुरेखा पुणेकरांनी अभूतपूर्व इतिहास घडवला.

'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा...' या बैठकीच्या बहारदार लावणीत 'नेम धरून बाण फेकते' असं म्हणत सुरेखाबाईंनी 'बाण आला का ?' असं का लडिवाळपणे विचारलं की तिकडे रसिकांचा कलेजा खलास झालेला असे. हा सिलसिला दोन दशकाहून अधिक काळ चालला. त्यांनी कपाळावरच्या बटा हवेच्या फुरक्या मारून उडवल्या की लोक शिट्ट्यांचा पाऊस पाडत. एके काळी तमाशाला कसनुशा नजरेने बघत नाके मुरडणारा तथाकथित उच्चवर्णीय वर्ग आता चित्रपटसृष्टीपासून ते मोक्याच्या प्रसंगीही तमाशाच्या प्रांतात आपलं वर्चस्व राहावं याकडे लक्ष देतोय, हा बदल कुणामुळे घडला ? आधी कृष्णधवल आणि नंतर इस्टमनकलर चित्रपटाच्या जमान्यानंतर तमाशा जवळपास हद्दपार झाल्यात जमा होता. पण त्याला खऱ्या अर्थाने उभारी मिळवून दिली सुरेखा पुणेकरांनी ! म्हणूनच सुरेखा पुणेकर साकल्याने लावणीसम्राज्ञी ठरल्या. त्यांच्या आयुष्यात 'ती' घटना घडली नसती तर त्या काय झाल्या असत्या याचे उत्तर त्याही देऊ शकत नाहीत. एखादी दुर्घटना माणसाची उमेद वाढवून जाते असं म्हणतात त्यात काही वावगं नाही ... 


- समीर गायकवाड