Tuesday, March 28, 2017

पांढऱ्यावरती काळे ....सांगलीच्या काळ्या खाणीनजीक असणार्‍या सुंदरनगर वेश्या वस्तीत झडलेला संवाद...

"काय चंद्रा (चंद्रकला - आडनाव लिहित नाही, नाहींतर आपल्या अनेक पुण्यवान लोकांना तिचा जातधर्म हुंगावासा वाटतो ) कशी आहेस ? खूप दिवसांनी तुला भेटतोय म्हणून विचारतोय .... " पहिल्या प्रश्नापासून वातावरण रिलॅक्स करण्याचा माझा प्रयत्न.
"कशी असणार ?" तिचा अत्यंत तिरकस सवाल. "कशी असायला पाहिजे ? आणि कशी जरी असली तरी काय फरक पडणार ?"
साडीच्या निरया दोन्ही हाताने आवळत मधोमध त्याचा झोळणा करून ती वाकून खुर्चीत बसते....
"ते ही खरं आहे !" मी थोडासा सावध झालेलो.


इकडच्या तिकडच्या बऱ्याच गप्पा झाल्या. काही माहिती तिने पुरवली. तो दिवस गुढी पाडव्याचा होता, त्यामुळे एका क्षणासाठी डोक्यात एक प्रश्न घोंघावला.
आणि चुकून तो प्रश्न तोंडून बाहेर पडला.
"तू सणवार करत नाहीस का ?" आता प्रश्नाची खिंड लढवायचीच या हेतूने माझी तयारी सुरु झालेली..

"मला काय जातधर्म आहे का ?... हे बघ इथे येणारा जातधर्म बघत नाही. तो विचारत नाही की बाई तुझं नाव काय ? मग मी काय सणवार करू ?" कंबरेला लावलेले कानकोरणं बाजूला काढून तिनं साडीच्या एका चिमटीत खसकन पुसलं आणि दंडावरील ब्लाऊजला घासून त्यावर फुंकर मारून ते थेट दातांच्या फटीत घातलेलं.

"माझा प्रश्न वेगळा आहे... मी ते नाही विचारलं" माझी पोपटपंची सुरूच.
"मी त्येचंच तर उत्तर देत्यी ना !" गालांचा चंबू करून कानाची पाळी जोरात पिरगाळून तिनं तिचं घोडं पुढं दामटलं.

"हे बघ. ज्युगार, शराबखाना आणि रंडीखाना या तीन जागी लोक आपल्या बाजूला बसलेला आपल्या पेहचानचा नसावा याची फिकीर करतात. पण त्यांना कोणत्याही जातीचा धर्माचा पार्टनर चालतो. बस्स चीज पसंद आनी चाहिये, ये एकच तो उसूल है.." खुर्चीवरून तिचा भरभक्कम देह उठला. मागच्या बाजूने साडी झटकत ती पुढे गेली. तोंडात साठलेलं गबाळ थुंकून परत जागेवर आलेली.

चंद्रा घरात थुंकत नाही. गिऱ्हाईकाला पण थुकू देत नाही. कधी कधी थुकणाऱ्याला ठोकून काढते.
छद्मीपणे हसत हसत तिने विचारलं, "हां, तर तू इच्यारत होतास की, मी सणवार करते का नाही ? होय ना ?" मी खुश.

तिचा चेहरा इतका गोल गरगरीत होता की नाकावर कर्कटक ठेऊन वर्तुळ काढले असते तर ते तिच्या चेहऱ्याच्या आकाराचेच झाले असते. तिच्या गालावर जीवघेणी खळी पडायची. आताही तशी खळी पडली होती.


डोक्याच्या मागच्या बाजूला हात नेत तिने मोकळे लांबसडक केस जोरात झटकले आणि माझ्याकडे विजयी मुद्रेने पाहिले.
मी ओळखले, हिच्या डोक्यात काही तरी खतरनाक उत्तर पैदा झालेलं असावं.

एव्हढ्यात बऱ्याच वेळापासून तिच्याकडे छुप्या नजरेने पाहणारया एका पंचविशीतल्या पोराला तिने हाक मारून बोलावलं.
पुढचा सीन मला ठाऊक असल्याने मी तिच्या आतल्या खोलीतल्या फ्रीजमधील थंडगार पाणी प्यालो. हिरव्या काळ्या निसरडया टाईल्सने माखलेल्या बाथरूमपाशी जाऊन तोंडावर पाणी मारलं. तोंड पुसत बाहेर आलो.
त्या पोराला तिनं डाव्या बाजूच्या खोलीत पाठवलेलं.

"मी कशासाठी सण करू ? मी सणवार केले तर माझ्या गिऱ्हाईकला माझी नको असलेली जातधर्माची बात मालुमात होईल ना ! नस्ते वांदे कोणी करायला सांगितलेत ?"

निमुळत्या हनुवटीवरून सापाने अलगद सरकत जावे तसा तळहात फिरवत तिने थेट कानामागे नेला आणि बोलली, "आज समदीकडं गुढी आसंल ना ? माझ्या गावी मी ल्हान असताना हुबी करायचे... आता करतात की नाही माहिती नाही... पण इथं मी कधी केली नाही..."

ओठांचा धनुष्यबाण करत खालचा ओठ हलकेच पुसून घेत तिने पितळी तबकातलं पान बाहेर काढलं. माझ्याकडे हात केला. मी नाही असं खुणावताच पानविडा अलगद तोंडात घालत ती बोलती झाली.
"अरे रंडीला मजहब नसतो... तिला त्यौहार नसतो.... तिचा एकच धरम - बदन सेकने का !" अत्यंत खुनशी हसली ती.

"तिचा त्यौहार कपड्यात लपेटलेला... साडी निकाल दी तो त्यौहार खतम !" डोळ्यातलं नशीलंपण पुरतं एकत्र करून माझ्यावर डोळे रोखत तिचा रोकडा सवाल येतो.

"तू सांग माझी कोणची साडी गुढीत बांधू ? पहिल्या रात्रीची की आजच्या रात्रीची ?... नई साडी आणली तरी पुन्हा ती साडीदेखील कोणी तरी फेडणार ना ? मग कशाची रे गुढी हुबी करू ?" एखाद्या झुरळाकडे बघावं अशा तुच्छतेनं ती आता बघत होती.
माझे तोंड उतरलेले पाहून ती बोलली "जाऊ दे, तू दिल कशाला छोटा करतोस ? माझी राखी येते ना तुला ?"
"मी होळीला रंग खेळते... गांजा पिते... नशा करते आणि ऐश करून झोपी जाते... त्या दिवशी कोणाला हात लावू देत नाही... "

गळ्यातल्या सोन्याच्या सरीवरून हात फिरवत किंचित उतरलेल्या आवाजाने ती बोलते, "हे बघ, ज्या दिवशी कोणी अंगाला हात लावत नाही ना तोच आमचा सण... पण मी जर रोज रोज सण साजरा करू लागली तर पोटाला काय खाणार ? म्हणून रंडीने सण करायचा नसतो...."

"ये सब छोड दे... तुला एकदम पक्की इन्फर्मेशन देते ... तेव्हढाच मला आशीर्वाद... " मी निरुत्तर झालोय हे ओळखताच तिने कामाची गोष्ट काढली आणि माझ्या डोक्यातले एक मळभ दूर झाले. मात्र तिने सण साजरा करावा, न करावा किंवा त्याऐवजी तिला काय करता येईल या प्रश्नांचे भूत तसेच राहिले....

- समीर गायकवाड.

(सूचना - लेख वाचून कोणत्याही जातीधर्माचे किंवा सणांचे तत्वज्ञान शिकवण्याचा प्रयत्न करू नये. कोणत्याही समुदायाच्या भावना दुखावणे हा लेखाचा हेतू नाही. सभ्य पांढऱ्यावरती असणारे काही लसलसते काळे जगापुढे मांडणे हा लेखनहेतू आहे)