Saturday, March 25, 2017

वीज....काळ्या ढेकळातून रान तुडवून थोडं पुढं गेलं की ढासळत आलेल्या बांधाच्या कडंला रुख्माईची समाधी होती. म्हातारा अन्याबा तिथं दिसभर बसून ऱ्हायचा. रापलेला तांबूस चेहरा, अनेक दिवसापासून डोईला तेल ठाऊक नसलेले विस्कटलेले केस, डोळ्याच्या गारगोटया झालेल्या, कोरडे ठाक पडलेले करडे काळपट ओठ, पसरट नाकाच्या टोकावर पडलेले लाल तांबडे ठिपके, कपाळावर समांतर रेषेतल्या सात आठ आठ्या, खाली झुकलेल्या दाट पांढऱ्या मिशा, दाढीचं वाढलेलं पांढरं पिवळं खुंट, कानाच्या पाळ्या लोंबू लागलेल्या अशा तोंडवळयाच्या अन्याबाच्या अंगावर उसवलेल्या नशीबासारखं फाटलेलं धोतर अन भोकं पडलेली बंडी असायची. पायातल्या वाहाणेस रबरी टायरचे सोल खिळे ठोकून बसवलेलं. त्याच्या हातापायाची बोटे लांबसडक होती. पिंडऱ्याची उंडीव लाकडं झालेली, मनगट पिचून गेलेलं. त्याच्या हाताचा पंजा ताटलीएव्हढा. पण सगळा चिरा पडून गेलेला, झिजलेला. जागोजागी घट्टे पडलेले. नखं वेडी वाकडी झालेली. हातातलं तांब्याचं कडं काळं पडत आलेलं. गळ्यातला लालकाळा दोरा तुटून गेलेला, कंबरेचा करदोडा झिजलेला. त्याची बायको रुख्माई देवाघरी गेली त्याला धा वर्स झालेली. तवापासून अन्याबा सैरभैर झालेला. घरी असला की आढ्याकडं नजर रोखून बसायचा. पारावर असला की समाधी लावल्यागत बसून ऱ्हायचा...


देवळात गेला की त्याचे डोळे वले व्हायचे. धोतराच्या सोग्यानं डोळं पुसत बसायचा. सांज झाली की त्याला याड लागल्यागत करायचा. रात्र झाल्यावर बाजंवर पडून चान्न्या मोजत पडायचा. दिस उगवला की शेत गाठायचा. भर उन्हाळ्यात दिकून बांधावर बसून ऱ्हायचा. कधी काळी बांधावरून त्याची म्हतारी कारभारीण डोईवर उतळी घेऊन यायची, ती याद त्याच्या काळजात सुरा खुपसून बसावी तशी होती. पोरासोरांनी, नातवांनी मागं मागं येऊन त्याच्यासाठी भाकर आणावी मग त्याने ती बळेच खावी. खाता खाता कधी कधी तो हातानेच भाकरी बांधून आणलेलं फडकं हुंगत बसायचा. मधूनच हसायचा, डोळं विस्फारून बघायचा. हिवाळा असला की वडपिंपळाच्या बुंध्यापाशी जायचा. माती सावडावी तसा पालापाचोळा उचकत बसायचा. कधी कधी गावाबाहेरच्या ओढ्याच्या काठावर गुडघ्यात मान खुपसून बसायचा. लोक म्हणायचे अन्याबा भ्रमिष्ट झालाय. बायको गेली आणि अन्याबा माणसातनं उठला.

एके काळी अन्याबा पक्वाज वाजवायचा. भजन म्हणायचा. गोऱ्यापान तांबूस नीटनेटक्या चेहऱ्यावर गोपीचंद अष्टीगंध लावून फिरायचा. पांढरा शुभ्र फेटा स्वच्छ कपडे घालून काकड आरतीला सज्ज असायचा. अन्याबाला लिहिता वाचता यायचं. छान छान भजनं म्हणून दाखवायचा. गावातल्या कोणत्याही घरी काय सुखदुःखाची घटना घडली आहे आणि तिथे अन्याबा गेला नाही असं होत नसायचं. पण आता सगळं गाव हळहळत होतं. त्याचा दवाखाना करून झाला होता पण काही फरक पडला नव्हता. त्याच्या मुलांना गावातली जाणती माणसं म्हणायची, 'पोराहो, राहू द्यारे त्याला असाच. त्याच्या जीवाचं हाल करू नगासा. त्याचा जीव घुटमळलाय रुख्मावैनीच्या जीवात. त्याचं दिस ऱ्हायलेत तरी किती ? आधीच त्यो वंगाळ झालाय. तवा त्येचं अजून हाल करू नगासा.." त्याची पोरं, नातवंडं, पोरीबाळी, सुना सगळ्यांचं त्याच्यावर लक्ष असायचं.

पण पावसाळा सुरु झाला की सगळ्यांच्या जीवाचं पाणीपाणी व्हायचं. अन्याबा कुणाचंबी ऐकत नसायचा. भर पावसात "मला रानात हुभं ऱ्हाऊ द्या !" म्हणून अडून बसायचा. पाऊस लागला की झाडाझुडपांखाली किंवा वस्तीतल्या खोलीत तो थांबत नसे. गावातल्या घरी असताना रातीला पाऊस सुरु झाला की लगोलग त्याचा दोसरा सुरु व्हायचा. पावसात अर्ध्या रात्री शेताकडं जाऊं दया म्हणून तान्ह्या पोरागत हट्ट करायचा. लई कालवा केल्यावर पोरं एखाद्या टायमाला नेत देखील. मग मन तृप्त होईपर्यंत तो पावसात भिजायचा. मात्र पार ओलाचिंब होऊनही पावसात भिजल्याने तो आजारी पडलाय असं कधी झालं नव्हतं. असं धा वर्स चाललं. परवाच्या पावसात अन्याबा शेतातच गेला. त्याच्या बायकोच्या समाधीजवळच त्याच्या अंगावर वीज पडली. 

अन्याबा गेल्यानंतर त्याच्या तेराव्याला त्याच्या पोरांनी गाव गोळा केलं होतं. जेवणावळी झाल्यावर त्यांनी अन्याबाने लिहिलेला एक कागद जीर्ण फाटक्या अवस्थेतील बंद लिफाफ्यातून बाहेर काढला अन सांगितले. "आबानं सांगितलं होतं की त्याच्या तेराव्याला हा कागद वाचून दाखवायचा." सगळे जण कान टवकारून होते. कागद उघडला तर त्यात दोनच ओळी लिहिल्या होत्या.
"मी अन्याबा गायकवाड. रुख्माईवर माजा खरा जीव असंल तर माझा बी जीव ईज पडूनच जाईल. मी गेल्यावर कुणी लई रडारड कराची नाय. मी रुख्माईपशीच असणार हाय. माझ्या पोराबाळांचाबी माज्यावर खरा जीव असंल तर भांडणतंटा न करता ते गुण्यागोविंदानं एकत्र राहतील. तरच आम्हा दोघांच्या जीवाला शांती मिळंल."

अन्याबाच्या अंगावर जिथं वीज पडली होती तिथंच वाकडा तिकडा झालेला अर्धवट जळालेल्या अवस्थेतला विळा सापडला होता. त्याने रुख्माईच्या समाधीपासून काही अंतरावर एका खड्ड्यात खुरपं, कुदळ आणि फावडं लपवून ठेवलं होतं. तो एकटाच रानात असताना जर का पाऊस आला की तो यातलं काही तरी हातात घेऊन उभा ऱ्हायचा. परवाच्या अवकाळी पावसानं त्याचं गाऱ्हाणं ऐकलं. अन्याबाने आठ नऊ वर्षापूर्वी कागद लिहून ठेवला होता यावर गावाने नवल केलं होतं. बायाबापडया धाय मोकलून रडल्या होत्या. अस्मानातून कोसळणाऱ्या वीजेवर आणि रुखमाईवरच्या प्रेमावर अन्याबाचा खूप विश्वास होता...

- समीर गायकवाड.