Monday, March 13, 2017

८९व्या ऑस्कर सोहळ्यातील चित्रपटांचा आस्वाद - 'ऑस्करायण'...

जगभरातील चित्रपटसृष्टीशी निगडीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे उत्तुंग स्वप्न असणारा 'ऑस्कर' वितरण सोहळा २७ फेब्रुवारीस पार पडला आणि शिगेला पोहोचलेल्या उत्सुकतेची सांगता झाली. लॉस एँजिलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये हा भव्यदिव्य सोहळा रंगला होता. कोणाला किती नामांकने मिळाली, कोण बाजी मारणार आणि 'अॅण्ड दी ऑस्कर गोज टू ...' या प्रश्नांना पूर्णविराम देण्याचे काम ८९ व्या ऑस्कर सोहळ्याने चोख पार पाडले.


'ऑस्कर'च्या रेड कार्पेटवर हॉलिवूड स्टार्ससह जगभरातील फिल्मी हस्तींची मांदियाळी पाहायला मिळाली. आजवरच्या निवेदकांपैकी सर्वात कमी मानधन घेतलेला ऑस्कर निवेदक म्हणून गाजलेल्या जिमी केमिलने 'ऑस्कर'मध्ये रंग भरण्याची जीवतोड मेहनत केली पण कभी ख़ुशी कभी गम असेच या सोहळ्याचे एकंदर स्वरूप राहिले. जिमी केमिल आणि मॅट डेमन यांच्यातली रस्सीखेच सभागृहातही अनुभवास आली.
सभागृहात होणा-या कँडी आणि डोनटच्या वर्षावाने वेगळीच रंगत आणली होती.  आजवरचे 'ऑस्कर'चे भव्य अप्रतिम सोहळे जगभराने पाहिलेत, अनुभवलेत. पण यंदाच्या ऑस्करला ती अचूकता आणि तो ताळमेळ गाठता आला नाही, अनेक 'उप्स' आणि 'मिस्टेक्स'नी याला एक तडा गेलाच. भरीस भर म्हणून अनेकदा आवाजाचा व्यत्यय येत गेला, मंचावरील नियोजनातही गोंधळ उडाला. शेवट तर फार गोंधळाचा ठरला. केमिलचे प्रयत्न आणि नाविन्यपूर्ण आकर्षणं आणूनही 
आजवरच्या सोहळ्यांच्या तुलनेत यंदाचा सोहळा खूपच फिका ठरला. पर्यटकांना थेट ऑस्कर सोहळ्यात आणण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रमही यावेळी केला गेला. 

मागच्या दशकापर्यंत ऑस्करच्या नामांकन समितीवर वंशभेदाचे आरोप होत होते आणि त्यात बऱ्यापैकी तथ्य असावे असं वाटण्याजोगी परस्थिती होती. पण काही गत वर्षापासून कृष्णवर्णीय कलाकार 'ऑस्कर'वर आपली मोहर उमटवताना दिसत आहेत. यंदाच्या सोहळ्यात आखीव रेखीवपणा नसला तरी 'ला ला लॅण्ड' आणि 'ट्यूबलाईट'च्या  निमित्ताने श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीयांच्या अख्ख्या टीमने एकच मंच शेअर केल्याची ऐतिहासिक घटना यावेळी जगाने पाहिली.


या सोहळ्यात आपल्या  खुमासदार शेरेबाजीने उपस्थितांना पोटभरून हसवणा-या केमिलने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरवरून डिवचले. नेहमी ट्विटरवर नको तेवढे सक्रिय असणारे ट्रम्प आज कुठे आहेत, असा टोमणा सोहळ्यात मारताना 'अध्यक्ष महोदय जागे आहात का?', असा
सवाल करणारे ट्विट जिमीने केले. याला कारणही तसेच होते, ट्रम्प यांनी काही इस्लामी देशातील नागरिकांना अमेरिकेत येण्यास मज्जाव केल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपट तारे तारकांनी व हॉलीवूडमधील दिग्गजांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली होती. काहींची नाराजी 'बॉक्स ऑफिस'शी रिलेटेड होती तर काहींची नाराजी सच्ची होती.
ऑस्कर सोहळ्यापूर्वी खुद्द ट्रम्प यांनी नामांकनापासून ते निमत्रंकापर्यंत अनेकांना आपल्या शैलीत फैलावर घेतले होते. वीस वेळा ऑस्कर नामांकन मिळवणाऱ्या मेरिल स्ट्रीपवर त्यांनी ती 'ओव्हररेटेड अभिनेत्री' असल्याचा शिक्का मारला
होता. 'गोल्डन ग्लोब' पुरस्कार सोहळ्यात मेरिल स्ट्रीपने धडाकेबाज पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खरपूस टीका केली होती याचा राग मनात धरून ट्रम्प यांनी ही शेरेबाजी केली होती हे उघड होते. पण 'ऑस्कर'मधून ट्रम्प यांच्या शेरयाची आगळी परतफेड केली गेली. मेरिल स्ट्रीपचा जेंव्हा जेंव्हा उल्लेख केला गेला तेंव्हा तेंव्हा ट्रम्प यांच्या शेऱ्याची आठवण केली गेली. त्याचबरोबर तिच्यावर नेहमीप्रमाणे कॉमेंटसही झाल्या. 'विसावं ऑस्कर नामांकन आता मेरिलला मिळाले आहे त्यामुळे तिचा चित्रपट येवो न येवो तिचे नाव मानांकनात नोंद केलं जातंच असा शेरा विनोद जिमी केमिलने मारला. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटाचा ('द सेल्समन') पुरस्कार जिंकणारे इराणचे दिग्दर्शक असगर फरहादी या सोहळ्याला अनुपस्थित राहिले आणि त्यांनी ट्रम्प यांच्या धोरणांचा आपल्या परीने निषेध नोंदवला.


 भारतासाठी यावेळी काही खास आशा नव्हत्या. चित्रपट जगताशी निगडीत असणाऱ्या दिवंगत प्रतिभावंताना 'ऑस्कर'च्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात येते. यंदा  कॅरी फिशर, प्रिंस, जेने वाईल्डर, मायकल किमिनो, पॅटी ड्यूक, गॅरी मार्शल, अँटन येल्चिन, मॅरी टेलर मूर, कर्टिस हॅन्सन आणि जॉन हर्ट
यांच्यासोबत बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांनाही  श्रद्धांजली वाहण्यात आली. सारा बरेइलिसने दिवंगत कलाकारांच्या स्मरणार्थ गीत सादर केलं. ऑस्कर विजेत्या 'गांधी'मधून ओमपुरींनी आंतरराष्ट्रीय सिनेमात पाऊल ठेवले होते हे विशेष ! लायनमधून भारतीय वंशाच्या देव पटेलचे सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्यासाठी नामांकन झाले होते पण त्याच्या पदरीही निराशा पडली. लायनमधल्या देव पटेलच्या एनआरआयच्या पात्राची बालपणातली भूमिका रंगवणारा मराठमोळा सनी पवार हा भारतीयांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. त्याच्या भूमिकेला सर्वांनी भरभरून दाद दिली.
सूत्र संचालन करत करत त्याच्याजवळ जात जिमी केमिलने जेंव्हा सनी पवारला उचलून घेतले तेव्हा प्रेक्षागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. 'क्वांटीको' आणि 'बे वॉच'मुळे हॉलीवूडच्या चांगल्या परिचयाच्या झालेल्या देसी गर्ल प्रियांका चोप्राने पांढ-या रंगाच्या गाऊनमध्ये रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. भारताचे अस्तित्व इतकेच सीमित राहिले.   
   
जस्टीन टिंबरलेकच्या धमाकेदार परफॉर्मन्सने ८९ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची सुरुवात दमदार झाली. 'ट्रोल'मधील 'कान्ट स्टॉप दॅट फिलिंग' या धमाकेदार गाण्याची सुरुवात त्याने थेट प्रेक्षागृहातून केली आणि तिथं उतरलेल्या 'तारांगणा'ने त्याला लगेच साथ दिली. सगळ्यांनी या गाण्यावर ठेका धरला
होता. ऑस्करचा पहिला पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचाच जाहीर झाला. 'मूनलाईट' या चित्रपटातील भूमिकेसाठी मेहर्शला अली याला हा ऑस्कर जाहीर झाला. ऑस्कर जिंकणारा तो पहिला मुस्लिम अभिनेता ठरला. हा पुरस्कार मेहर्शलाला मिळाल्याने देव पटेलचे ऑस्कर मिळविण्याचे स्वप्न भंगले. त्यामुळे एकमेव भारतीय आशेचा किरण अगदी पहिल्या झटक्यात विझला गेला. या नंतर एका मागून एक पुरस्कार जाहीर होत गेले आणि टाळ्यांच्या कडकडाटात प्रेक्षागृह दंग होऊन गेले.


'ला ला लॅण्ड', 'मूनलाइट', 'फेन्स', 'लायन', 'अरायव्हल', 'मँचेस्टर बाय द सी', 'हेल ऑर हाय वॉटर', 'हिडन फिगर्स', 'हॅकसॉ रिज' या चित्रपटांमध्ये ऑस्करसाठी चुरस होती. यात 'मूनलाईट'ने बाजी मारली आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे ऑस्कर पटकावले. तर 'ला ला लँड' चे डॅनियन चॅझेल हा ऑस्कर पुरस्कार मिळविणारे सर्वांत तरुण दिग्दर्शक ठरले. यंदाचे 'ऑस्कर' पुरस्कार
एका महत्वाच्या ऐतिहासिक नोंदीचे साक्षीदार ठरले. 'ऑस्कर'च्या इतिहासात पहिल्यांदाच अभिनयाच्या सर्व श्रेणीत कृष्णवर्णीयांची नावे होती. सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याच्या श्रेणीत आणि बेस्ट एडाप्टेड स्क्रीनप्लेच्या श्रेणीत प्रत्येकी तीन कृष्णवर्णीयांना नामांकने होती. याशिवाय सात मुस्लीम अभिनेत्यांना यंदा नामांकन मिळाले होते. संपूर्ण स्टारकास्ट कृष्णवर्णीयांनी व्यापलेल्या चित्रपटास ('मूनलाईट')  सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळण्याची 'ऑस्कर'च्या इतिहासातली ही पहिली घटना. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नामांकित झालेल्या चित्रपटापैकी ' हिडन फिगर्स'ला एकही 'ऑस्कर' मिळाले नाही पण इतर सर्व चित्रपटांना मोठ्या फरकाने धोबीपछाड देत त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. तर या श्रेणीत विजेता ठरलेला 'मूनलाईट', नामांकित चित्रपटांच्या कमाईच्या यादीत सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. दुरचित्रवाहिन्यांवर आजवरच्या ऑस्कर सोहळ्यांच्या तुलनेत यंदाच्या सोहळ्यास सर्वात कमी व्ह्यूअरशिप मिळाली. असे अनेक चढउतार या सोहळ्याचे साक्षीदार ठरले.


'ला ला लॅण्ड'ने 'टायटॅनिक' आणि 'ऑल अबाऊट ईव्ह'ची बरोबरी करत तब्बल चौदा नामांकने मिळवली होती. 'गोल्डन ग्लोब'पासून ब्रिटिश अकॅडमी अवार्ड पर्यंत आपला दबदबा कायम राखला होता. क्रिटीक्सनेही आपले माप 'ला ला..' च्या पदरात टाकले होते पण सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ताज त्याला
काबीज करता आला नाही. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक( डेमियन चेझेल), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री(एमा स्टोन), सर्वोत्कृष्ट छायाचित्रण (लिनस स्टनग्रेन), सर्वोत्कृष्ट संगीत(जस्टीन हर्वित्झ), सर्वोत्कृष्ट गीत( सिटी ऑफ स्टार्स - बेंज पासेक, जस्टीन पॉल), सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक( लिनस स्टनग्रेन) असे सहा पुरस्कार 'ला..ला..' ने जिंकले. 'लाला लॅण्ड' चा एक अर्थ 'चालू'गिरी न जमणा-या लोकांचा अनामिक प्रदेश असाही होतो आणि दुसरं म्हणजे लॉस एंजेलिसला उद्देशून 'ला ला...' हा शब्द वापरला जातो. हा एक टिपिकल अमेरीकन म्युझिकल, रोमँटिक कॉमेडी ड्रामा मुव्ही आहे. महत्वाकांक्षी नवशिकी अभिनेत्री मिया(एमा स्टोन)  आणि संगीतातील यशासाठी धडपडत असलेला जॅझ पियानिस्ट सॅबॅस्टियन (रायन गोलींग) यांची ही कथा आहे. झगमगत्या दुनियेत हरवलेल्या दोन स्वप्नाळू जीवांभोवती ही कथा फिरते. अनेक अडथळे आणि संघर्ष पार करत ते आपले ध्येय कसे गाठतात याचा  रुखरुख लावणारा प्रवास यात आहे. रोड रेजमध्ये गाठ पडल्यापासून ते फ्युजन बँड मधे एकत्र काम करेपर्यंत त्यांच्यात  निर्माण होत गेलेली जवळीक अगदी तरलपणे टिपली गेलीय. प्रेमात रंगून गेल्यावरही एकमेकांच्या करीयरचे इप्सित साध्य व्हावे म्हणून ते झटत राहतात.
मियाची स्वप्नपूर्ती होते तो क्षण आणि सिनेमाचा शेवटचा सीन कलेजा खल्लास करून जातात. सेबने स्वतःचा जॅझ बार सुरु केलेला असतो आणि मिया तिथे तिच्या पतीसोबत आलेली असते, बारबाहेरील डिझाईन बघूनच ती ओळखते की हा तिच्या जीवलगाचा बार आहे. सेब तिला पाहतो. गर्दीतही ते दोघे एकमेकाला पाहतात तो प्रसंग आणि निघताना पतीपासून काही क्षणांसाठी ती बाजूला होते, सेबजवळ जाते, त्याला डोळे भरून पाहते. दोघे एकमेकाकडे पाहून तृप्ततेचे स्मित करतात. आपली स्वप्नं पूर्ण करणारा, दोन तास खिळवून ठेवणारा हा चित्रपट अमेरिकेतच नव्हे तर युरोपातही ट्रेंडसेटर ठरेल. कारण मागील दशकात कथा आणि अभिनय यांच्यावर प्रगत डिजिटल तंत्रज्ञान आणि टेक्नो सायफायने मात दिली होती. गाणी, संगीत, अभिनय आणि उत्कृष्ट कथानक याच्या जोरावर तिकीटबारीपासून ऑस्करपर्यंत ठसा उमटवणे अजूनही शक्य असल्याचे या चित्रपटाने दाखवून दिले आहे. लॉसएंजिल्समधील रस्त्यांचा खुबीने केलेला वापर ही या चित्रपटाची अनोखी भेट म्हणावी लागेल. एमा स्टोनचा अभिनय आणि तिचं दिसणं दोन्हीही भाव खाऊन जातं. 'ला ला..' च्या टीमला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं ऑस्कर हुकल्याची खंत मात्र नक्की राहील.                         
   
'मूनलाईट'ची कथा तीन कालखंडात घडते. आपल्याकडे जसा एक 'छोट्या' असतो तशाच एका 'लिटल' उर्फ शिरॉनची ही कथा. तो बालवयात असतानाच त्याचे भावविश्व विदीर्ण झालेलं. किरकोळ तब्येतीचा, भित्र्या स्वभावाचा लिटल इतर टारगट मुलांची आवडती शिकार असतो. त्याची नशेखोर आई पाउला 
त्याच्याकडे लक्ष देत नाही, मात्र त्याला सहारा देणारा ड्रगतस्कर ज्युआन व त्याची मैत्रीण टेरेसाच्या मनात कणव असते. एके दिवशी आपलं सर्व फ्रस्ट्रेशन शिरॉनवर काढताना पाउला त्याचा उल्लेख फ़ॅगॉट या शब्दात करते. फ़ॅगॉट म्हणजे अंगात दम नसलेला समलिंगी ! ज्युआनकडे गेल्यावर या शब्दाचा त्याला कळतो. बालवयातील शिरॉन दाखवताना दिग्दर्शकाने बालमनाचे अनेक कंगोरे हळुवारपणे उलगडले आहेत. त्याची घुसमट, त्याच्या आईचं बेपर्वा असणं, आईबद्दल त्याच्या मनात तिरस्कार असणं, बाप नसल्यामुळे ज्युआनकडे खेचलं जाणं, ज्युआन आणि टेरेसाच्या फिजिकल रिलेशनबद्दलचं अप्रूप या सर्व बाबी नितळतेने समोर येत राहतात. पुढे  पौगंडावस्थेतील  शिरॉनच्या आयुष्यात अनेक वळणं येतात. ज्युआनच्या मृत्यूनंतर शिरॉनचं टेरेसाकडे येणं जाणं वाढत जातं तसतसे त्याला छळणा-या टेरेल या धटिंगणाचेही तिच्याशी संबंध जुळून येतात. ड्रग्जच्या आहारी गेलेली पाउला वेश्याव्यवसाय करू लागते, टेरेसाने दिलेले पैसे द्यावेत म्हणून शिरॉनला मारहाण करू लागते. या पडत्या क्षणी शिरॉनच्या आयुष्यात त्याचा वर्गमित्र
केविन येतो. अंधाऱ्या रात्री समुद्र किनारी पौगंडावस्थेतील केविन आणि शिरॉन यांच्यात समलिंगी संबंध कसे सुरु होतात हा प्रसंग अगदी हळुवारपणे चितारला आहे. शिरॉनला पडणारी स्वप्नं अगदी तरलतेने दाखवली आहेत. शिरॉनला केविन नवं नाव देतो, 'ब्लॅक' ! एकदा शिरॉन आणि टेरेलमध्ये हाणामारी होते, ज्यात टेरेल केविनला आपलं हत्यार म्हणून वापरतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी टेरेलला मारून शिरॉन आपला बदला घेतो. पोलीस त्याला अटक करतात. कालांतराने तुरुंगातून बाहेर आलेला तरणाबांड शिरॉन आता  ब्लॅकच्या नावानेच ओळखला जातो. तो नशेचा तस्कर झालेला असतो. एका अर्थाने तो ज्युआनची लाईफ जगत असतो. त्याची आई पाउला मरणासन्न झालेली असते. तो तिला जाऊन भेटते, हा प्रसंग अप्रतिम आहे. पुढे काही वर्षांनी त्याची केविनशी गाठ पडते. तेंव्हा ते दोघे एकरूप होण्याच्या दृश्याला लागून फ्लॅशबॅक येतो. ज्यात पौगंडावस्थेतला शिरॉन रात्रीच्या नितळ चंद्रप्रकाशात समुद्र किनारी उभा राहून 'त्या' प्रसंगाकडे स्थितप्रज्ञतेने पाहत असतो. हे दृश्य दाखवताना दिग्दर्शक बेरी जेकीन्सने अनेक विरामचिन्हे प्रेक्षकाच्या मनात उमटतील याची पुरेपूर दक्षता बाळगलीय. 'मूनलाईट'ची पूर्ण टीम कृष्णवर्णीय आहे. नात्यामधील हळुवारपणा ही 'मूनलाईट'ची ताकद आहे. भक्कम बंदिस्त पटकथा हा याचा प्राण आहे. मनाचा ठाव घेणारा अभिनय ही मुख्य जमेची बाजू ठरावी. मेहर्शला अली या अभिनेत्यास यातील ज्युआनच्या भुमिकेसाठीचे 'ऑस्कर' मिळाले. कथेची व्याप्ती, कालखंड, भूमिकांचे पदर, नात्यातील गहिरेपणा, सेक्सुअल रिलेशनशिप मधील गुंतागुंत आणि विविध शारीरिक अवस्थात होत जाणारे मानसशास्त्रीय बदल असा मोठा परीघ असणाऱ्या 'मूनलाईट'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे ऑस्कर देऊन योग्य न्याय दिला असेच म्हणावे लागेल...      
                                     .
'हॅकसॉ रिज' हा चित्रपट देखील 'मूनलाईट'च्या बरोबरीने 'ऑस्कर'च्या रेसमध्ये होता. दुसऱ्या महायुद्धातील ओकिनावाच्या (जपान) युद्धातील एका वॉर
मेडिकोची ही बायोग्राफीक कथा आहे. मेल गिब्सनने याचे दिग्दर्शन केले आहे यावरून यातली दृश्यपरिणामकारकता प्रेक्षकांच्या ध्यानी यावी. तरुणपणी आपल्या हातून लहान भावाची हत्या झाल्याने आयुष्यात पुन्हा शस्त्र न घेण्याचा दृढनिश्चय केलेल्या देवभोळ्या डेसमंड डॉसची ही कथा. पेशाने परिचारिका असलेल्या डोरोथीचं त्याच्या आयुष्यातील आगमन, युद्धातलं त्याचं सामील होणं आणि सार्जंट हॉवेलच्या नेतृत्वाखाली युद्धपथकासाठी त्याची निवड या गोष्टी छान चितारल्या आहेत. डॉसचे हॉवेलशी पटत नाही. हॉवेल त्याला हाकलून लावण्यासाठी अनेक क्लृप्त्या करतो. त्याच्या हातात हत्यार देऊन बघतो, त्याच्यावर हल्ला करवतो. अवमान प्रकरणी त्याला जेलमध्ये अडकवतो. त्याच्यावर आरोप होतात. पण तो त्यातून सहीसलामत बाहेर पडतो. पुढे डोरोथीबरोबर त्याचा विवाह होतो. दुसऱ्या महायुद्धात हॅकसॉ रिजचा बचाव करत ओकिनावामधील शहाण्णवव्या इन्फंट्रीमधील सैनिकांची सुटका करण्याचे काम डॉस ज्या इन्फंट्रीत असतो तिच्या शिरावर येऊन पडते. इथले युद्धभूमीवरचे प्रसंग अंगावर रोमांच आणणारे आहेत. हल्ले प्रतिहल्ले, त्यातील डावपेच श्वास रोखून धरायला लावतात. ज्यांनी भेकड म्हणून हिणवलेले असते अशांचे प्राणही डॉस वाचवतो. 'दारूच्या नशेत आपल्या पित्याने अत्यंत जवळून आपल्या आईच्या अंगावर गोळ्या झाडल्याने आपण बंदूकीचा
तिरस्कार करतो' हे डॉस जेंव्हा सांगतो तेंव्हा नकळत आपले डोळे पाणवतात. डॉस जवळपास ७५ सैनिकांची सुटका करतो. रिअल लाईफमधील डॉसला अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रूमन यांच्या हस्ते 'मेडल ऑफ हॉनर'चा किताब देऊन गौरवण्यात आले होते. स्फूर्तीदायक वीररसाने भारलेल्या या चित्रपटाच्या कथेत इतर चित्रपटांच्या तुलनेत साकल्य नसल्याने याला तांत्रिक श्रेणीतीलच 'ऑस्कर' ( सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण आणि सर्वोत्कृष्ट संकलन) पटकावता आले.


'हिडन फिगर्स'ने कमाई सर्वात जास्त केलीय, त्याला तीन मानांकने मिळाली होती पण एकही 'ऑस्कर' मिळाले नाही. तीन वेगवेगळ्या स्वभावाच्या गणितज्ञ तरुणींची कथा यात आहे. नासाच्या सुरुवातीच्या अंतराळ मोहिमांच्या काळात त्यांनी केलेली मदत हा कथाविषय आहे. संगणकाचा राक्षसी वापर
होण्याआधीचा हा कालखंड आहे. या गणितज्ञांची धडपड आणि त्यांचे अनमोल कार्य यावर कुठेही भाष्य न करता सरलतेने चित्रपट पुढे सरकत जातो पण प्रेक्षक खिळून राहतो ! आयबीएम 7090चा वापराची सुरुवात आणि अपोलो 11, 13 साठी त्यांनी केलेली सांख्यिकी आकडेमोड व त्यांच्याशी स्पर्धा करत हळूहळू दाखल होत गेलेले संगणकविज्ञान. केथरीन, डोरोथी आणि मेरी या तिघी शेवटी रिप्लेस केल्या जातात हा प्रसंग बोलका आहे. 'हिडन फिगर्स'ला 'ऑस्करची एकही छबी मिळाली नाही हा सायफायची सद्दी संपल्याचा संकेत तर नव्हे ना अशी शंका वाटते.                       

'मँचेस्टर बाय सी'ला (सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता, सहायक अभिनेता, सहायक अभिनेत्री आणि पटकथा) सहा मानांकने मिळाली होती. मात्र सर्वोत्कृष्ट अभिनेता (केसी अॅफ्लेक) आणि पटकथा (केनेथ लॉनेरगन) हे दोन पुरस्कार त्यांच्या पदरी पडले. ली, त्याचा भाऊ जोए, पुतण्या पॅट्रीक , जोएची व्यसनाधीन बायको एलीस, ली ची पत्नी रेंडी, पॅट्रीकच्या गर्लफ्रेंड्ज
यांची भावनिक कथा आणि तिच्या जोडीला घराची ओढ या चित्रपटात गुंफली आहे. जोएच्या मृत्यूनंतर त्याचं आयुष्य सावरू पाहणारा ली स्वतःच्याच आयुष्यात कोलमडलेला आहे, त्याने पत्नीशी घटस्फोट घेतलेला असतो. त्याच्या निष्काळजीपणामुळेच त्याची तीन मुले घरातल्या आगीत होरपळून मृत्यूमुखी पडलेली असतात. वडीलांच्या मृत्यूपश्चात आणि बेफिकीर आईच्या वर्तनामुळे आतल्या आत खंगत चाललेल्या पॅट्रीकला सावरताना ली ला त्याचा भूतकाळ साद घालत राहतो. तो पॅट्रीकला तिथून बाहेर काढू पाहतो पण त्याला आपली जन्मभूमी मँचेस्टर सोडवत नाही, तर लीस आपल्या कर्मभूमीची ओढ लागून राहते. तो पॅट्रीकच्या आयुष्यातील वादळे शांत करतो, गर्लफ्रेंड जेफ्रीशी त्याचा स्मूथनेस परतल्यावर ली परतीच्या मूडवर येतो. मधल्या काळात त्याचे आणि रेंडीचे गैरसमज दूर होतात. तिच्या तान्हुल्या बाळासहित तो तिला स्वीकारतो. तिच्याशी पुन्हा विवाह करतो. पॅट्रीकच्या पित्याचा म्हणजे जोएचा दफनविधी झाल्यावर ली पॅट्रीकला सांगतो की तो आता मोठया घराच्या शोधात आहे जिथे पॅट्रीक कधीही येऊन राहू शकतो. सिनेमाच्या अखेरच्या सीनमध्ये ली आणि पॅट्रीक जोएच्या फिशिंगबोटमधून नीरव पाण्यातून जाताना दिसतात तेंव्हा का कुणास ठाऊक प्रेक्षकाला खूप हायसे वाटते. हे या चित्रपटाच्या अप्रतिम
पटकथेचे यश आहे. जेफ्री पॅट्रीकच्या घरी डिनरसाठी आलेली असते आणि तिथे त्याचे आईशी, एलीसशी खटके उडतात. ती अचानक उठून निघून जाते हा सीन कुठल्याही संवादाविना डोक्यात रुततो. कथा-पटकथालेखन आणि दिग्दर्शन एकाच व्यक्तीने केलेले असले की कोणत्या सीन मधून काय दाखवयाचे आहे याचे ठोकताळे फार पक्के असतात याचा देखणा प्रत्यय या चित्रपटात येतो. ली शैन्डलरच्या भूमिकेत अभिनेता केसी अॅफ्लेकने जीव ओतला आहे. याच भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे गोल्डन ग्लोबदेखील मिळाले आहे. यातली प्रत्येक फ्रेम देखणी आहे. निसर्गाचा कॅनव्हास वापरून नात्यातल्या संवेदना त्यात रंगवल्या आहेत.


'फेन्सेस'मध्ये डेन्झेल वॉशिंग्टनने निर्माता, दिग्दर्शक आणि कथानायक या तीनही जबाबदाऱ्या यशस्वी रित्या पार पाडल्या आहेत. 'फेन्सेस'ला 'ऑस्कर'ची चार नामांकने होती. पैकी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा (व्हायोला डेव्हीस) पुरस्कार 'फेन्सेस'ला जिंकता आला. भंगार गोळा करत फिरणाऱ्या ट्रॉय मॅक्सनच्या कुटुंबाची ही कथा. पन्नासच्या दशकात आपली पत्नी रोझ, मुलगा कोरी आणि मित्र जिम यांच्या समवेत पीटझबर्ग इथे राहणारया ट्रॉयच्या जीवनात येणारी वादळे मन सुन्न करून जातात. त्याचे वाममार्गाला लागणे, त्याच्या पूर्वायुष्यातील पात्रे त्याच्या समोर उभी ठाकणे, त्याची अफेअर्स, त्याची अनौरस मुलगी आणि दुसऱ्या महायुद्धात जायबंदी झाल्यामुळे मानसिक संतुलन
बिघडलेला धाकटा भाऊ यांचं कथेतलं सामावणं बेमालूम आहे. रोझ आपल्या घराभोवती फेन्सिंग करायचे काम ट्रॉयला सांगते तो प्रसंग आणि  ट्रॉयच्या मृत्यूनंतर त्याच्याकडे येण्यास नकार देणा-या कोरीला कुटुंबाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रसंग खूप छान रंगले आहेत. बंदिस्त कथा आणि नेटकी मांडणी असल्यामुळे अनेक पात्रे असूनही चित्रपट सुसह्य होतो, चित्रपटाचा शेवट खूप छान दाखवला आहे. व्हायोला डेव्हीसला पुरस्कार देऊन ऍकॅडमीच्या निवड समितीने तिला न्याय दिला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. नात्यांचे गुन्हेगारीकरण आणि नात्यातील गुप्तता, अनेकपदरी नाते संबंध, दुरावा, रुसवे, त्याग आणि समेट या सर्व भावनांना हा चित्रपट योग्य न्याय देतो. 


पूर्व मेक्सिकोत चित्रित झालेला 'हेल ऑर हाय वॉटर' हा निओवेस्टर्न गुन्हेगारीपट आहे. याला चार मानांकने मिळाली होती पण एकही पुरस्कार मिळाला नाही. पात्रांची भाऊगर्दी आणि सत्तर - ऐंशीच्या दशकातील
गुन्हेगारीपटांचा ठसा हे याचे निगेटिव्ह पॉइंटस ठरले. काही टीकाकारांनी मात्र याला वेस्टर्न देमार पटांचे पुनरुजीवन मानले आहे. यातल्या कथेत वडीलोपार्जित जमीनजुमला टिकवून ठेवण्यासाठी दोन भाऊ बँकांवर दरोडयांची शृंखलाच आखतात आणि तिला अंमलात आणतात. पाठलागाची दृश्ये अप्रतिम टिपली आहेत. टेक्सासमध्ये हे कथानक घडते असे दाखवण्यात आले पण चित्रीकरण मेक्सिकोत केल्याने काहींनी याला नाके मुरडलीत. ऑस्कर नामांकनात 'काऊबॉय हॅट'चे पुनरागमन हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य होय.  


तब्बल सहा मानांकने मिळवलेला 'लायन' एकही पुरस्कार मिळवू शकला नाही. बॉलीवूड चित्रपटात शोभावी अशी याची सत्यकथा. सरू आणि गुड्डू ही
एमपीच्या खांडव्यानजीकच्या एका खेड्यातली भावंडं. कोळसा चोरीच्या नादात त्यांची चुकामूक होते. सरू कुटुंबापासून दूर हरवतो. आधी अनाथाश्रम आणि नंतर थेट ऑस्ट्रेलियन कुटुंबात दत्तक असा त्याचा प्रवास होतो. तारुण्यात प्रवेश केलेल्या सरुची दत्तक आई आजारी पडल्यावर अपघाताने त्याला त्याच्या मातृभूमीचा ठावठिकाणा लागतो. तो आपल्या गावी परततो आणि कुटुंब एक होते अशी साधी सरळ कथा आहे. नाट्याचा अभाव हा यातील पटकथेचा दोष आहे. निकोल किडमनसारख्या दिग्गज अभिनेत्रीचा सहज वावर आणि रिअल लाईफ स्टोरी या चित्रपटाच्या जमेच्या बाजू. देव पटेल आणि सनी पवार यांच्या भूमिकांमुळे भारतीयांचे या चित्रपटाकडे लक्ष लागले होते.


उकृष्ट रंगभूषा- केशभूषा या श्रेणीत ऑस्कर पटकावणाऱ्या 'स्यूसाईड स्क्वाड'
मध्ये अमेरिकन सुपर हिरो आणि त्याचा अँटीहिरो यांची टक्कर आहे. नेहमीच्या पठडीतील सुपरहिरोप्रमाणे नायक रंगवण्याऐवजी सामान्य माणसातील सुपरहिरो शोधण्याचे मर्म यात दडले आहे. या चित्रपटाचे नामांकन ऑस्करसाठी होणं हे अमेरिकन जनतेचे सुपरहिरोप्रती असणारया सुप्त आकर्षणाचे दार्शनिक आहे.                                    
'फँटॅस्टिक बिस्टस अँड व्हेअर टू फाईंड देम' हा चित्रपट जे.के.रोलिंगच्या हॅरी
पॉटर शृंखलेचा भाग आहे असे समजण्यास हरकत नाही. रोलिंगच्या जादुई दुनियेतील सर्व अजब गजब आश्चर्ये, धक्कादायक खलपात्रे, अंधारलेल्या गुहा आणि उत्कंठावर्धक प्रसंगांची रेलचेल यात आहे. हॅरी पॉटर पटांना ऑस्करचे भाग्य लाभले नाही पण सर्वोत्कुष्ट वेशभूषेचे ऑस्कर या चित्रपटास लाभले आहे. या साखळीतला हा पहिला चित्रपट आहे त्यामुळे भविष्यात रोलिंगच्या या सिरीजला किती लोकाश्रय लाभतो आणि आणखी ऑस्कर जिंकले जातात का ही उत्सुकता असेल. 


'अरायव्हल'ला आठ मानांकने होती पण केवळ एकच जेतेपद (सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन) त्यांना मिळाले. ज्यांना सायन्स फिक्शन मुव्हीज आवडतात
त्यांच्यासाठी हा चित्रपट मेजवानी ठरावा. 'इन्सेप्शन', 'ग्रॅव्हिटी' आणि 'प्रॉमिथिअस'च्या तोडीस तोड सीन्स यात आहेत. व्हिएफएक्सचा अप्रतिम वापर हा सायन्स फिक्शनचा प्राण असतो हे इथे पुन्हा सिद्ध होते. यातील एलियन्सचे पृथ्वीवरील संकट कसे टोलवले जाते हे पडद्यावर बघणे इष्ट. कथा आणि अभिनय यांना अशा चित्रपटात कमी वाव राहतो याची प्रचीती पुन्हा येते. ४७ मिलियन डॉलर खर्चून बनवलेल्या या चित्रपटास एकच ऑस्कर मिळते आणि केवळ दीड मिलियन डॉलरमध्ये बनलेल्या 'मूनलाईट'ला कथा - अभिनय यांच्या जोरावर ऑस्कर मिळते हा बदल खूप काही सांगून जातो. 
 
' सेल्समन' हा इराणी चित्रपट स्त्री विश्वातील नात्यांची उकल सोडवताना युद्धजन्य देशातील जनजीवनावर जळजळीत कटाक्ष टाकतो. अत्यंत भावस्पर्शी कथा आणि त्यामागची अस्थिर पार्श्वभूमी यामुळे बेस्ट फॉरेन लँग्वेज मुव्हीजच्या श्रेणीत या चित्रपटाने ऑस्कर पटकावले. 

ओ.जे.सिम्पसनच्या रूपाने अमेरिकेने वर्णवाद आणि सेलिब्रिटींच्या परस्परअवगुंठीत घटकांचे विविध पैलू अनुभवले. त्याचा थरार 'ओ.जे.मेड इन अमेरीका' या डॉक्युमेंट्रीत चित्रित झालाय. फुटबॉल सुपरस्टार ते दरोडेखोरीपर्यंतचे त्याचे जीवन अमेरीकेतील वर्णभेदाचे काटेरी सत्य नकळत पुढे आणते. तसेच अचानक सेलिब्रिटी झाल्यावर अधःपतन कसे दाराशी उभे ठाकते याचे विवेचन यात आहे. सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्रीचे ऑस्कर या चित्रपटाने जिंकले.  याच श्रेणीत नामांकित झालेल्या 'आय एम नॉट युअर निग्रो'मध्येही हाच विषय हाताळण्यात आलाय. 


शॉर्ट सब्जेक्ट डॉक्युमेंट्री गटातल्या ऑस्करविजेत्या 'द व्हाईट हेल्मेटस'मध्ये 
सिरीयन गृहयुद्धात स्वयंसेवकाचे काम करणाऱ्या तरुणांच्या एका गटाची  दिनचर्या चित्रित करण्यात आली आहे. या डॉक्युमेंट्रीचा विषय पाहू जाता या श्रेणीतील इतर चित्रपटांवर मात करणे तिला सहज शक्य झाले.  याच गटात असलेल्या 'फोर पॉइंट वन माईल्स' या डॉक्युमेंट्रीत युद्धग्रस्त आखाती देशातून युरोपीय देशात येणाऱ्या निर्वासितांच्या लोंढ्यांची कथा आहे. एका कोस्टगार्ड कप्तानाने हजारो निर्वासितांचे प्राण कसे वाचवले याचे मनोवेधक चित्रण यात आहे. पण 'द व्हाईट हेल्मेटस'मध्ये प्रत्यक्ष युद्धभूमी हाच केंद्रबिंदू असल्याने ऑस्करवर नाव कोरण्यात हा चित्रपट मागे पडला.
 
बेस्ट ऍनिमेटेड फिल्मसाठी 'पायपर', बॉरोड टाईम', 'पर्ल',पिअर साईडर अँड सिगारेटस' यांच्यात रस्सीखेच होती. पण 'पायपर'ने बाजी मारली. पिटुकल्या सॅण्डरलींग पक्षांची रंजक कथा आणि बहारदार चित्रे यामुळे हा चित्रपट खूपच प्रेक्षणीय झालाय. अबालवृद्धांनी याचा आनंद घेतल्यास त्यात नवल वाटणार नाही.  


यंदाच्या ऑस्करविजेत्या चित्रपटांवर आणि कलाकारांवर नजर टाकली की एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे सायफाय टेक्नोमुव्हीजना टाळून दमदार कथा, अभिनयावर आधारित चित्रपटांना झुकते माप देतानाच वर्णवाद पुष्कळ कमी
करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय.  मुस्लीम अभिनेत्याचे पहिले ऑस्कर आणि विषय वैविध्य असणा-या चित्रपटांना प्राधान्य या बाबीही अधोरेखित करता येतील. हे सर्व सकारात्मक बदल घडत असताना अमेरिकन प्रेक्षकांनी या सोहळ्याचे प्रक्षेपण पाहण्याकडे काहीशी पाठ फिरवली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती सूत्रे देऊन अमेरिकन जनतेने आपल्यातील जो बदल जगाला दाखवून दिलाय त्यातलाच हा ही एक बिंदू असावा असे वाटते...


- समीर गायकवाड.