Saturday, February 4, 2017

सिंधू ....
रखरखीत उन्हाळ्यातल्या करकरीत अमावस्येची ती काळीकभिन्न रात्र होती. जाधवांच्या वस्तीपासून पाच पन्नास फर्लांग अंतरावर आवाज न करता हळूच तीन मोटारसायकली अलगद येऊन थांबल्या. त्यावर ट्रिपल सीट बसून आलेले नऊजण चोरपावलाने उतरून बाजूला येऊन थांबले. मोटार सायकली कडेच्या झाडात उभ्या करून दबक्या पावलाने ते जाधवांच्या वस्तीकडे जाऊं लागले. बनियन, अर्धी चड्डी आणि तोंडाला बांधलेलं काळं कापड अशा वेशातले ते सर्वजण अनवाणी पायाने आले होते. अंधारातसुद्धा त्यांचे तांबारलेले लालभडक डोळे स्पष्ट दिसत होते.


सगळेजण वीस ते पस्तीसच्या वयोगटातले असावेत. त्यातला एकच जण पोरजिन्नस वाटत होता, अगदी कोवळ्या मिसरुडाचा पोर असावा तो. चालताना फुफुटादिकून उडू नये याची काळजी घेत ते चोरटयागत जाधवाच्या वस्तीकडे जात होते. चोरंच होती ती. त्यांची चाहूल लागल्यावर जाधवांच्या वस्तीवरचं कुत्रं तिथंच भुकत उभं राहिलं. त्या सरशी हे सगळे जागेवर थांबले. मग हळूच कुत्रंही गप झालं. त्यांनी एकमेकात खुणवाखुणवी केली. त्यातलाच एकजण फुलावर पाखरू बसावं इतक्या अल्गद चालत निघाला. तरीही कुत्रं पुन्हा भुंकू लागलं. मात्र एकटाच पुढे गेलेला त्यांचा साथीदार काही थांबला नाही. शेवटी कुत्रं जाधवाच्या बांधापर्यंत पुढं पळत आलं, त्या सरशी चौघेजण मागच्या बाजूने तिकडे निघाले. इकडे समोरच्या दिशेने एकटा निघालेला साथीदार नियोजनानुसार माघारी फिरला. मुद्दाम पावलांचा आवाज करत माघारी पळायला लागला. बांधावर आलेल्या कुत्र्यासंगट बांधावरची कुत्रीही लगोलग त्याच्या दिशेने पळत सुटली. त्यांना वाटले की कुणी तरी आपल्या हद्दीत येऊन अर्ध्यातनं परत गेले. त्यांना ठाऊक नव्हतं की धूर्त, कपटी माणसांची ही एक चाल होती. कुत्री आपल्या टप्प्यात येताच सपासप गुप्त्या फिरवून त्यांचे काही क्षणात मुडदे पाडून ते सगळेच जण आता झपाझप पावले टाकत जाधववस्तीकडे निघाले....

त्या रात्री जाधवांची वस्ती नेहमीपेक्षा लवकर झोपी गेली होती. विष्णू जाधवाची वस्ती आधीपासूनच गावाबाहेरील शेतातच होती. त्याच्या भावकीची वस्ती त्याच्यापासून कोसभर अंतरावर होती. बांधावरल्या भांडणातून त्याची हत्या झाली होती तेन्व्हा त्याच्या बायकोची, सिंधूची हळद देखील पुरी उतरलेली नव्हती. लग्नानंतर दोन वर्षात दोन पोरे त्याने तिच्या पदरात घातली होती. त्याच्या चिंचोळ्या शेताची एक हद्द त्याच्या भावकीच्या रानाला लागून होती. कधी सरी सोडण्यावारून तर कधी बांध कोरल्यावरून तर कधी शेतात गुरं सोडल्यावरून त्यांची सतत भांडणं होत. विष्णूने शेतात विहीर बांधल्यापासून तर द्वेष मत्सराने त्याची भावकी चुलाण धगधगावी तशी धडाडून पेटली होती. एका सकाळी बांधावरचा आंबा तोडल्याचे निमित्त झाले आणि सात आठ जणांनी मिळून दांडग्या दुंडग्या विष्णूचा कुऱ्हाडीच्या वारांनी तुकडा पाडला. त्याच्या सर्वांगावर जखमा झाल्या. पाटातलं पाणी लालबुंद होऊन गेलं. त्याचा आवाज ऐकून सिंधू ढेकळातून धावत तिकडं पळत सुटली. जवळ जाईपर्यंत सगळं संपलं होतं. तरी तिच्या एका दिराने तिला हाणायचा प्रयत्न केला पण दुसऱ्याने अडीवलं. तरी त्याने तिच्या दिशेने विळा फेकून हाणलाच. तिच्या कपाळाला खोक पडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला नवरा बघून जखमी सिंधूची शोध हरपली. पुढे यथावकाश पोलिस आले. सर्व सोपस्कार झाले. न्यायालयात खटला उभा राहिला. पण माहेरचा आधार नसलेल्या सिंधूने भावकीच्या विरुद्ध साक्ष दिली नाही. त्या बदल्यात तिने तिच्या मुलांच्या जीवाची हमी घेतली. तिच्या हिश्शाचे रान दगडी बांधाने रचून घेतले. तिने त्यांच्याविरुद्ध जबानी दिली नाही पण त्यांच्याशी संबंधही ठेवले नाहीत. तिचं सगळं सासर निर्दोष सुटलं....

वावटळीवर पाचोळा उडत जावा तसं काळ उडून गेला. सिंधूने रक्ताचे पाणी करून पोरं वाढवली. पोरांच्या मनात विष न पेरता त्यांना जग शिकवलं. चांगल्या वाईटाची जाण करून दिली. काळ्या आईवरची माया शाबूत ठेवली. गुराढोरावर जीव लावायला शिकवलं. तिनं स्वतः दारं धरण्यापासून ते बेडगं मारण्यापर्यंत आणि बैलं हाकण्यापासून ते कुदळ मारण्यापर्यंतची सगळी कामं तिनं बिनदिक्कत केली. नाकासमोर बघून चालणाऱ्या सिंधूकडे बघायची कुणाची हिंमत होत नव्हती कारण तिच्या अंगात असलेला सच्चेपणा आणि निर्भीडपणा ! तिच्या भावकीची सगळ्या गावकीत छी थू झालेली असल्याने ते तर तिच्या वाटेला कधीच जात नसत. त्यांच्यात आणि तिच्यात एक अबोल दुरावा निर्माण झाला होता. मध्ये दुष्काळ पडल्यावर सिंधूला दिवस वाईट आले, उपासमार होऊ लागली तशी पोरांना तांदळाचं पाणी पाजलं पण ती माऊली कुणाच्या दारापुढे 'दे दान सुटे गिराण' करत फिरली नाही. तिचं ग्रहण तिनेच सोडवलं. स्वतःच्या कर्तुत्वावर आणि हिकमतीवर. आयुष्यात स्थैर्य तिने आणलं पण सुख कसले म्हणून लाभले नाही. तिच्या माहेरचा सगळा पांगुळगाडा असल्याने तिला तेही सुख कधी लाभले नाही. आणि सासर असून नसल्यासारखे. तिने मातीतला कसही जपला आणि काळजातली मायाही जपली. आपल्या पतीच्या मारेकऱ्यांना तिने माफही केले नाही अन मुलांच्या मनात दुष्मनीचे विषही पेरले नाही. तिची दोन्ही मुलं थोडीफार शिकली सवरली होती पण नोकरीउद्योगाऐवजी शेतीतच ते राबत होते. थोरल्या मुलाचे नुकतेच लग्न झाले होते तर धाकटा बिनलग्नाचा होता. सून आली तशी सिंधूला वाटत होते की, आता आपले कष्ट आणि चिंता दोन्हीही थोडेफार कमी होतील. तिची सूनही देखणी, मनमिळाऊ, कष्टाळू आणि तिच्यासारखीच अशिलाची पोर होती. दोन्ही पोरांच्या बरोबरीने ह्या सासू सुना रानात राबत होत्या, पानांच्या हिरव्या कळयांनी माती लगडली होती. सुखाचे दिवस जवळ आल्याच्या आनंदात सिंधू त्या दिवशी वस्तीवरल्या घरात शांतचित्ताने झोपी गेली होती....

चोरपावलाने ती टोळी जाधवांच्या वस्तीजवळ आली. त्यांच्यातला एक जणमात्र जिथं गाड्या उभ्या केल्या होत्या, तिथंच अंधारात दबा धरून बसला होता. एकजण बांधावरल्या झाडाखाली उभं राहून चौफेर लक्ष ठेवून होता. तर दोघंजण जाधववस्तीतनं सिंधूच्या भावकीच्या घराकडं जाणाऱ्या पायवाटेपाशी दोन बाजूला तोंड करून उभे राहिले होते. उरलेल्या पाचांपैकी एक सिंधूच्या घराच्या मागं जाऊन घराकडं पाठ करून उभा राहीला. बाकीचे चौघे आता सिंधूच्या घराच्या अंगणात आले होते. एकमेकांना खाणाखुणा करत त्यांनी इशारे केले. घराचे दार लोटून बाजंवर येदू, सिंधूचा धाकटा पोरगा झोपला होता. त्याला किंचित पावलांची चाहूल लागली. त्याने झोपेतच चुळबूळ केली. त्यांच्या वस्तीवर, आसपासच्या इलाख्यात कधी चोरीचपाटी झालेली नव्हती त्यामुळे तसलं काही त्याच्या मनी येणंही शक्य नव्हतं. तो आपला कूस बदलून पुन्हा झोपेच्या अधीन झाला. दोघेजण हळूच त्याच्याजवळ पोहोचले. क्षणाचा विलंब न त्याच्या तोंडावर कांबळ टाकली आणि दोघांनी त्याचे पाय धरून ठेवले, एक जण लगतच्या खोलीत बाहेरनंच डोकावू शिरला. दोनेक मिनीटं येदूने हातपाय मारले. बाजेला हिसके दिले पण त्याचा श्वास गुदमरला. त्याची हालचाल थांबली. आता सगळेजण घराच्या दिशेने जाऊ लागले. तोवर दाराजवळ उभ्या असलेल्याने आत सावज नसल्याची खुण केली. सगळे गोंधळले. माहिती तर बिनचूक होती, मग फरक कसा पडला या विचाराचा भुंगा त्यांच्या डोक्याला पोखरू लागला. त्यांची माहिती अचूकच होती, सिंधूची हळदओल्या अंगाची देखणी सून माहेराहून हौसेनं डागडागीनं घेऊन आली होती. पण दुपारीच तिच्या वडीलांची तब्येत बिघडल्याचा निरोप आला तेंव्हा तिचा थोरला पोरगा दिना तिला माहेरी सोडायला गेला होता. हे जोडपं अचानक गेल्याने माल आणि सावज या टोळीच्या हातून निसटलं होतं. आता काय करावं याचा त्यांना प्रश्न पडला होता, आतल्या खोलीत म्हातारी एकटी आहे. तिच्याकडे काय निघेल तेव्हढे घेऊन आणि तिने किरकिर केली तर तिचे हातपाय मोडून जावं या विचाराने ते दाराकडे वळले आणि त्यांचीच बोबडी वळायची पाळी आली. कारण त्यांच्या चाहुलीने सिंधू हळूच नुकतीच उठून दारापाशी उभी राहिली होती. त्यांनी झेप घेत एका दमात तिला खाली पाडली. ती जीवाच्या आकांताने प्रतिकार करू लागली. लाथा झाडू लागली. त्या सरशी त्यांनी तिला मारायला सुरुवात केली. तरीही तिचा प्रतिकार सुरु होता. मग मात्र त्यांच्या म्होरक्याचे मस्तक बिथरले, तो पुढे झाला. 'थेरडीच्या अंगात लई रग दिसतीया, जिरवाया पाहिजे' असं पुटपुटत त्याने सरासरा कासरा ओढावा तसं तिचं लुगडं ओढून काढलं. टराटरा चोळी फाडली. कंबरेचा कडदुरा सुद्धा एका हिस्क्यात तोडला. दोन ठोसे लगावून दिले. त्याबरोबर जीव कंठात आणून सिंधूने 'येदू, येदू' अशी हाकारे देण्याचा प्रयत्न केला, तिच्या ओठातून शब्द बाहेर येऊ शकले नाहीत. पाचही जणांनी तिला आळीपाळीने भोगले. या आवाजाने गोठ्यात उभी असलेली गाय हंबरली. त्याबरोबर एकाने गोठ्यात जाऊन दोन्ही गायींचे काम तमाम केलं. रक्ताचे पाट तिथं वाहू लागले. दावणीला बांधलेलं वासरू जागेवर टकाटक शांत उभं राहिलं. एकीकडे सिंधूचे लचके तोडत असताना तिचे सर्व घर पालथे उताणे करून बघितले पण त्यांच्या हाती विशेष काही लागले नाही. त्या सर्वांना मोहीम बिघडल्याचा तडफडाट झाला होता. त्यांनी पिंगळयाच्या आवाजाची नक्कल करत त्यांचे साथीदार तिथे बोलावले. आपसात कुजबुज केली आणि उरलेल्यांनीही आपली आग शमवून घेतली. आपल्या पोराच्या, नातवाच्या वयाची पोरे आपल्या देहाची लक्तरे करत आहेत याची पुसटशी जाणीव सिंधूला झाली होती. पण तिच्या अंगातले त्राण केंव्हाच गळून गेले होते. नकळत ती बेशुद्ध झाली. तिच्या कानातली कर्णफुले त्यांनी ओरबाडून काढली, गळयातलं डोरलं ओढलं. तिला बेशुद्धावस्थेत तसंच निर्वस्त्र टाकून ते सगळेजण आल्या वाटेने निघून गेले. त्यांच्या मोटरसायकलच्या आवाजाने जाधवांच्या पुढल्या अंगाला लागून असलेल्या एकरुक्यांच्या वस्तीतल्या कुत्र्यांनी मात्र आकाश कोसळल्यागत एकसाथ भुंकायला सुरुवात केली. कुत्र्यांच्या आणि मोटरसायकलच्या आवाजाने त्यांच्या घराला जाग आली. घरातली पुरुष मंडळी वस्तीबाहेर पळत आली. सगळ्यांनी एकच गलका उठवला, "चोर, चोर, चोर....."

अंगावर एकही कपडा नसलेली साठीपार वयाची सिंधू निपचित पडून होती. डोक्यावरचे केस विस्कटलेले. छातीवर, पोटावर नखांचे ओरखडे उमटलेले. नाकातून, कानशीलातून बारीक रक्ताची धार लागलेली, गळ्याभोवती वळ उमटलेले, डोळे अर्धे मिटलेले अशा अवस्थेत ती पडून होती. तिचे श्वास संथ झाले होते. तर बाहेर पडवीत बाजंवर पडलेल्या तिच्या पोराचं अंग आता वेगानं थंड होऊ लागलं होतं. त्याचे श्वास केंव्हाच थांबलेले होते. आसपासच्या रातकिडयांनी रान पार किर्र करून टाकले होते. केळीच्या बागंतून येणारा कराकरा आवाज जाधवांच्या वस्तीत वावटळ घुमावी तसा घुमत होता. खाल्ल्या अंगानं रोरावाणारं वारं डोक्यात राख भरल्यागत बांधावरच्या झाडांना धडका देत होतं. टिटव्यांची टिवटिव वाढत गेली, टीटीविटीटीव चा एकच आवाज आसमंतात उमटू लागला. वावदान यावं तसं पाचोळा हवेत उडू लागला, सगळ्या झाडांच्या पानातून सळसळ होऊ लागली, झाडं हेलकावे खाऊ लागली. विहिरीतल्या पाण्याच्या तरंगाला सरसरून काटा आला. विहिरीजवळ आंब्याच्या झाडाखाली बांधलेले बैंलं, खुरांनी माती उकरू लागले. होल्यांनी एकच गलका केला आणि इतका वेळ गोठ्यात थिजून उभं असलेलं शिंगरं वासरू अंगातली ताकद एकवटून दावणीचं दावं तोडून गोठयाबाहेर आलं. मोठ्याने हंबरू लागलं. उडया मारू लागलं. सिंधूच्या लालनिळ्या गालांना मायेने चाटू लागलं. त्या वासराची माय आत पाय झाडून मरून पडली होती आणि ते इथे सिंधूचे गाल चाटत होते. तिच्या पोटावरून आपली काटेरी जीभ फिरवत होते. वासराच्या डोळ्यातले अश्रू टपाटपा सिंधूच्या चेहऱ्यावर पडत होते. वासराचे अश्रू आणि सिंधूचे रक्त एक होऊन गेले .....

सिंधूच्या वस्तीवर वासरू ओरडतंय पण कुत्री ओरडत नाहीत याचा एकरुक्यांच्या लोकांना अचंबा वाटला. तिच्या घराकडे ते धावत निघाले. जाधवांच्या वस्तीवरची मेलेली कुत्री वाटेत बघून त्यांच्या काळजात धस्स झाले. एव्हाना सिंधूची भावकी देखील जागी झाली होती. ते ही धावत सिंधूच्या वस्तीकडे निघाले, पण बांधापर्यंत येऊन थबकले. पुढे जावं की न जावं हा प्रश्न त्यांच्या डोक्यात पिंगा घालू लागला. एकुरक्यांची माणसं सिंधूच्या घरासमोर आली आणि त्यांनी जे पाहिलं त्याने त्यांचे काळीज फाटून गेलं. त्यांची आरोळी आकाशातील बधीर देवाच्या कानात शिसं ओतावी तशी आसमंत भेदून दूरवर विरून गेली. मग मात्र सिंधूचे दीर, पुतणे तिच्या वस्तीकडे बांध ओलांडून आले. त्यांचे डोळे विस्फारले. सिंधूच्या वस्तीवर त्या रात्री हुंदके आणि आरोळ्यांचा एकच कल्लोळ उडून गेला.....

त्या रात्री काही तासात अख्खं गाव तिथं वस्तीवर गोळा झालं, लोकांनी कुजबुज केली. मोटरसायकलीं गेलेल्या रस्त्यावरून माग काढण्याचा प्रयत्न केला. त्या नादात लोकांनीही मोटर सायकली चालवल्या, आधीचे चाकांचे ठसे त्यात बुजून गेले. सिंधूला इस्पितळात दाखल केले गेले. तिचा पोरगा दिना आणि सून दिस उजडेपर्यंत बेगीने परत आले. सकाळ झाल्यावर पोलीस आले. पंचनामे झाले. कागद पांढरयाचे काळे झाले. साक्षी झाल्या. शवविच्छेदन झाले. दिगंताला सूर्य मावळताना दिनाने आपल्या लहान भावाच्या चितेला अग्नी दिला. चिता धडाडून पेटली आणि पश्चिमेला रक्तिमा पसरत गेला....

त्या घटनेनंतर आठदहा दिवस सिंधू इस्पितळातच दाखल होती. तिच्यावरचे उपचार झाल्यावर तिला घरी जाण्याची परवानगी मिळाली. ज्या दिवशी सिंधू आपल्या वस्तीवरच्या घरात परत आली तेंव्हा तिचे डोळे गारगोटीसारखे झाले होते, गोठलेले ! त्या रात्री ज्या दुनियेने एकच काहूर माजवले होते ती आता भूल दिल्यासारखी गुमान गपगार झाली होती. जणू सगळं चराचर तिच्या मूक वेदनेत सहभागी झालं होतं. सिंधू कुणाशी काही न बोलता आपल्या खोलीत जाऊन बसली. त्या दिवशी पाहुणे रावळे येऊन तिला भेटून गेले. सुनेने आग्रह केल्यावर दिस उतरायच्या वक्ताला तिनं दोन घास बळेच घशाखाली ढकलले. भेदरलेलं जनावर गुमान गोठ्यात यावं तसं चित्त हरवलेली सांज सिंधूच्या दारापाशी घुटमळून पुढे निघून गेली. बघता बघता अंधार पडला. रात्र किर्र तिच्या अंगावर आली. त्या दिवशीचा सर्व प्रसंग तिच्या डोळ्यापुढे तरळू लागला. भिंतीतनं साप अंगावर रेंगत आल्याचा भास तिला होऊ लागला, आपल्या देहाला हळद लागल्याचे, छातीला कुणी तरी चावत असल्याचे, पाठपोट तुडवत असल्याचे, मारहाण होत असल्याचे आणि लुगडयाला हात घातल्याचे भास तिला होऊ लागले. तिने दोन्ही हाताने लुगडं गच्च धरलं. तिचे सर्वांग घामाने थबथबले, घशाला कोरड पडली, ओठ सुकून गेले, डोळ्यांच्या पापण्या तिने घट्ट आवळून धरल्या. इतक्यात एक हलकी झुळूक आली आणि तिने दाराच्या दिशेने पाहिले. दारापाशी येदू उभा होता, डोक्यावर कांबळ पांघरलेला ! घामाघूम झालेला, गुडघे फुटलेला आपला तरणाताठा पोर ! सिंधूने आपल्या पोटावर असलेला सुनेचा हात हलकेच बाजूला सारला, ती अगदी सावकाश दाराच्या दिशेने पुढे गेली. तसा येदूची सावली मागं सरकू लागली. ती बाहेर आली. अंगणात दिना झोपला होता. येदू कुठेच नव्हता. आभाळातलं चांदणं मायलेकरांची घुसमट बघताना चांगलंच कासावीस झालं होतं. चंद्राला मोठंलठ खळं पडलं होतं, त्याच्या आड त्याने आपलं तोंड लपवून घेतलं होतं. सैरभैर नजरेने सिंधू इकडं तिकडं बघत उभी राहिली. तिची नजर भिंतीला टेकवून ठेवलेल्या बाजेकडे गेली, ती सावकाश बाजंचं जवळ गेली. त्या लाकडी दांडयावरून, चुरगळलेल्या दोरयांवरून सरासरा बोटं फिरवू लागली आणि त्या रात्री तिच्या कंठात अडकलेला आवाज आता बाहेर पडला, "येदू, येदू माझ्या वासरा ! असा कसा मला सोडून गेलास रे माझ्या लेकरा !" म्हणत तिने आर्त टाहो फोडला. तिच्या आवजाने दिना आणि त्याची बायको जागे झाले. ते तिच्याजवळ गेले. ते तिघेजण त्या रात्री मन भरून रडले. त्यांना रडताना पाहून झाडंझुडपं हरखून गेली. गोठयात मोकळं सोडलेलं वासरूही त्यांच्यात सामील झालं.....

त्या दिवसानंतर अनेक रात्री हा सिलसिला चालू राहीला. नंतर नंतर तर सिंधू कोणाशी बोलेनाशी झाली. शून्यात नजर ठेवून बसू लागली. तिनं खाणं कमी केलं. अंगावरच्या कपड्यांची तिला शुध्द राहिनाशी झाली. आरसाकंगवा तर तिने केंव्हाच सोडला होता, आता भान सोडून दिलं. कुठ्ल्याही गडीमाणसासमोर यायचे ती टाळू लागली. एका जागी बसून राहू लागली. बसल्या बालस्य ती हातानं माती उकरायची आणि त्या बारक्या खड्ड्यात दगड पुरून ठेवायची. त्यावर एखाद दुसरं फुल आणून ठेवायची. तिची हाडेकाडे एक झाली. पुढे जाऊन तर रात्र झाली की कधी कधी बांधावर बसून कुत्र्याचा आवाज काढू लागली. कुठं जरी खुट्ट आवाज झाला तरी येदूचे नाव काढू लागली. लोक म्हणू लागले सिंधूबाईच्या डोक्यावर परिणाम झाला. ती भ्रमिष्ट झाली. दिना मात्र कोणाच्या तोंडाला लागत नव्हता. तो आणि त्याची बायको डोळ्यात तेल घालून सिंधूवर लक्ष ठेवून असायचे. तिला जपायचे. तिला कुठल्या गोष्टीला अडवत नसत पण तिच्या मागावर राहत. काही जाणत्या लोकांनी सिंधूला दवाखान्यात दाखवून आणायचा सल्ला दिनाला दिला. दिनालाही ते पटले. त्याने गोड बोलून आपल्या मनातली गोष्ट आईच्या कानावर घातली. तिनं बळेच मान हलवली. त्याला जरा बरे वाटले. त्या रात्री त्याला जरा बरी झोप लागली. सिंधूही आपल्या सुनेच्या शेजारी लहान लेकरू झोपावं तशी झोपी गेली...

कोंबडा आरवायच्या आधी दिनाला जाग आली त्याच्या बायकोच्या कालव्याने. ती ओरडत होती. "आत्याबाई, आत्याबाई !" रात्री कव्हानिशी सिंधू निघून गेली होती. त्या दोघांनी सगळीकडे शोधून पाहिलं पण ती कुठं गाव्हली नाही. बघता बघता सगळीकडे बातमी पसरली. सगळं गाव पुन्हा जाधववस्तीला आलं. लोकं कुजबुजू लागले. कुणी तरी म्हणालं, विहिरीत बघा. सिंधूला पोहोता येत होतं. तरीही पोरं विहिरीत उतरली. एक पोरगं पार तळाला जाऊन पुन्हा वर आलं. त्याच्या हातात सिंधूच्या विटलेल्या धडूत्याचा एक तुकडा होता. तो बघून दिनाची बायको भोवळ येऊन कोसळली. दिना ओरडू लागला. थोड्याच वेळात सिंधूचे शव विहिरीबाहेर काढले गेले. तिने कंबरेला मोठा धोंडा बांधून विहिरीत जीव दिला होता. तिचा अविरत संघर्ष कसाबसा तिनेच संपवला होता.....


सिंधूच्या मृत्यूनंतर आता दिना आणि त्याची बायको दोघेच जण वस्तीवर असतात. तिथून जाण्याइतकी हिंमत माझ्या पायात अजून आलेली नाही. परवाच्या खेपेस दिना भेटला होता. तो काकुळतीला येऊन सांगत होता, "तेव्हढं पोलिसांना सांगून बघा बापू, त्यांनी ल्हीलंय येडाच्या भरात आईनं जीव दिला म्हणून ! माझी आई येडी बी नव्हती अन खुळी बी नव्हती ! जिच्या कडं कुणी डोळं उचलून बगत नव्हतं,, तिची तिच्या आब्रूची पार राखरांगोळी झाली ओ ! तिच्या मनाला ह्येचा सल लागून हुता, येदू तिच्या मनाचा खेळ हुता. तिनंच तो गुताडा इणला हुता. तिनं डाव साधून जीव दिला बगा....ती लई मानी हुती, सच्ची हुती, अशीलाघरची लेक हुती, आभाळाएव्हढया काळजाची होती बगा माझी आई ! ती कष्टाची हुती, इमानी हुती पर येडी कधीच नव्हती.. तेव्हढं सांगा हों.... " असं म्हणत धाय मोकलून तो गळ्यात पडला. माझा सदरा ओला झाला तरी माझ्या तोंडून एक शब्द फुटला नाही. मी ही गोठून गेलो होतो ईश्वराच्या थिजलेल्या काळजागत .....

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment