Thursday, February 2, 2017

निसर्गाची अभिनव अपत्ये - गुराखी मुले !

\
अलीकडील काळात शेती करणारे आणि स्वतःच्या शेतात राबणारे कष्टकरी कमी होत चाललेत. उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ बसत नसल्याने कैक लोकांनी शेती खंडाने दिलीय तर काहींनी वाट्याने देऊन टाकली आहे. ज्यांच्या शेतात पीक पाणी चांगलं आहे आणि राबणारे हात घरातलेच आहेत त्यांनी मात्र काळ्या आईवरचा जीव तीळमात्र कमी होऊ दिलेला नाही. असं असूनही बळीराजा पहिल्यासारखं गुरं ढोरं सांभाळत नाही. त्याच्या गरजेइतकी एखाद दुसरी म्हैस वा गाय सांभाळतो.

गावातली तालेवार माणसंच दोन चार बैलजोड्या सांभाळताना दिसतात. इतर सामान्य शेतकरी मात्र एखाद दुसरा बैल वा खोंड सांभाळताना दिसतो. गरज पडली की दुसऱ्याच्या बैलांना वर्दी द्यायची आणि आपले काम भागवायचे याकडे कल असतो. त्याच वेळी शेतीतली अनेक कामे यांत्रिक पद्धतीने होत असल्याने बैल सांभाळायची जोखीम फारशी कुणी घेत नाही. वारंवार पडणारे दुष्काळ, पाण्याचे वाढते दुर्भिक्ष आणि चाऱ्याची टंचाई यामुळे गुरे संभाळण्याकडचा लोकांचा कल कमी होत चालला आहे. त्याच वेळी आणखी एक समस्या ग्रामीण भागात उग्र रूप धारण करते आहे, ती म्हणजे किरकोळ कामासाठी मनुष्य बळ उपलब्ध होत नाही. रानातलं गवत काढायचं काम असो की गुरं वळायचं काम असो अशा लहान सहान कामांना माणसं मिळत नाहीत. आणि चुकून माकून कुणी राजी झालंच तर त्याची पगाराची अपेक्षा फार असते जी बळीराजाला परवडत नाही. यामुळे गुरं संभाळण्याऐवजी खुद्द शेतकरीही आता दुध विकत घेताना आढळतो. त्याच वेळी काही मोठे शेतकरी मात्र खंडीभर जनावरं सांभाळून यशस्वी रित्या गोपालक होताना दिसतात. तर काहींना यातही अपयश आल्याचे दिसते. या अडचणी आणि गरजा यांचे हे चक्र सुरूच राहणार आहे, त्यात खंड असा पडणार नाही. पण त्याच वेळीही हे ही निश्चित आहे की जोवर शेतीवाडी केली जाईल तोवर गुरं आणि त्यांचे गुराखीही अस्तित्वात असतील. या गुराख्यांची गाथा खूप गोड आणि रसाळ आहे.

गायी बैलांच्या मागेपुढे चालत जाणारी अन त्यांची काळजी घेणारी ही गुराखी मुले म्हणजे निसर्गाशी तादात्म्य पावलेली चालती बोलती अर्धोन्मिलित रानफुलेच असतात. भूतकाळाचे ओझे वर्तमानात न वागविता अन भविष्याची व्यर्थ चिंता न करता आपल्या इवल्याशा सृष्टीत रममाण झालेली ही मुले जगाच्या खिजगणतीतही नसतात. तसेच त्यांनाही जगाचे फारसे सोयरसुतक नसते. झाडेझुडपे, गवत चारा अन आपली प्राणाहून प्रिय गुरे हेच त्यांचे विश्व असते. बालपणातील रम्यता, खेळ आणि शाळा या सर्वांपासून मैलोगणती दूर असणारी मुले सकाळपासून ते दिवस मावळे पर्यंत निसर्गाच्या सान्निध्यात असतात..ऊन, वारा, पाऊस यांच्याशी गट्टी करून आपला रोजचा दिवस मजेत घालवत असतात. म्हशीच्या अंगवार बसल्यावर तिचे राठ केस यांना टोचत नाहीत, गायीच्या काटेरी जिभेचा स्पर्श यांना मखमली वाटतो अन बैलांची शिंगे यांच्या हातांना रुतत नाहीत !

घरून निघतानाच आपली भाजीभाकरी घेऊन निघतील मग ती ताजी का शिळी याचा उलगडा भाकरी ज्या मळकट कापडात गुंडाळलेली असते ते उघडल्याशिवाय कळत नाही, अन कळले तरी यांना त्याचा काही फरक पडत नाही. गोठ्यात बांधलेल्या दुभत्या जनावरांच्या धारा काढून झाल्या की त्यांना आपल्या लाडीक शैलीत ढंगदार हाकारे देत एकेक करून सगळी जनावरे शेताबाहेर न्यायची. मग सुरु होते रोजची पायाखालची सरावाची झालेली पाऊलवाट वा मातीत रंगून गेलेली माळाकडे जाणारी जाडीभरडी बरड वाट. क्वचित कधीतरी ठिय्या बदलतो आणि चरायला जायचा रस्ताही बदलतो. गुरे दुसऱ्या कुणाच्या बांधातून शेतात न उतरू देता गायरान जमिनीवर वा माळरानी न्यावी लागतात. गावानजीक एखादी टेकडी वा तलाव असेल तर तिकडे घेऊन जाणे जास्त सोपे जाते कारण तिथे बारमाही मुबलक गावात उपलब्ध असते.

रोजरोज एकाच जागी अनेक गुराखी येऊन तिथला चारा, गवत अन हिरवाई लवकर संपून जाते. मग नव्या जागेचा शोध चालू होतो पण जाऊन जाऊन जाणार तरी कुठे ? गावाची शीव ओलांडून कोसो दूर जाता नाही, गुरांच्या विश्रांतीचा वेळ अन शेताकडचा परतीच्या प्रवासाचा वेळ यांचा मेळ नव्या ठिकाणी जाताना घालावा लागतो. नाहीतर परतीच्या वाटेवर असतानाच अंधारून येतं अन त्यातून काहीतरी नवं सोंग उद्भवतं. भरपूर चालून झालं की गुरे थकून जातात. थकलेली गुरे पोटात काही गेलेलं असलं की एखादा आडोसा टेकतात अन पुढचे पाय वाकवतात, पुढच्या गुडघ्यावर शरीराचं सगळं टाकून मागचे पाय पोटाशी आखडते घेऊन हळूच खाली बसतात. मग सुरु होते त्यांची रवंथ !

एव्हढा मोठा जबडा गटागटा हलवत त्यांची एका लयीत एका सुरात रवंथ सुरु झाली की गुराखी एखादी सावली शोधून तिथे आपले भाकरीचे गाठोडे उघडून बसतो. पूर्वी बहुतांश ठिकाणी पाणी उपलब्ध असायचे आता घरून निघतानाच पाण्याची बाटलीही सोबत न्यावी लागते. आपल्या माय बहिणीने मोठ्या प्रेमाने दिलेल्या अन स्वतःच्या चवदार हातांनी तयार केलेल्या त्या भाजीभाकरीने तोंडाला पाणी न सुटले तर नवलच ! गुरे रवंथ करत असतानाच एखादी छोटीशी डुलकी देखील घेऊन होते पण या डुलकीच्या वेळेस इतर इंद्रिय जागी ठेवावी लागतात. एखादे अचपळ वासरू उठून कधी कधी चालू लागते तर पोट न भरलेली गाय गवताच्या शोधात हळूच उठून निघून जाऊ पाहते, तर कधी कधी एखादी म्हैस आजूबाजूला एखादा कुत्रा वा तत्सम कुणी प्राणी आला तर बिथरून उठते अन आपला ठिय्या बदलू पाहते. एक जनावर अशा रीतीने उठून दुसरीकडे गेले की त्याच्या पाठी इतर जनावरेदेखील जाऊ लागतात. कधी कधी ही सगळीच जत्रा दुसऱ्याच्या शेतात जर नजर चुकवून गेली तर मग मात्र मोठे रामायण महाभारत घडते !

गुराखी आणि गुरांची विश्रांती आटोपली की सगळ्यांची एकच चुळबुळ सुरु होते. हातपाय झटकून तोंडावर पाणी शिंपडून ताजेतवाने झाले की परतीचा प्रवास सुरु होतो. पूर्वी खूप ठिकाणी पाण्यांची डबकी वा डोबी असत. परतीच्या वाटेवर जरी अशा डोबी नसल्या तरी वाट वाकडी करून अशा ठिकाणी जावं लागे. तिथल्या पाण्यात ती जनावरे एकेक करून उतरतात, जमेल तितके वेळ मनसोक्त डुंबतात. डोळे मिटून शांतपणे समाधिस्त होऊन जातात. मग पुन्हा त्यांना हाकारे देऊन बाहेर काढावे लागते. एकेक जित्राब पाण्याबाहेर येते तसे इतका वेळ झाडाझुडपांवर बसून असलेले पक्षी अन बगळे त्यांच्या पाठीवर आपला तंबू टाकतात. त्यांच्या अंगावर असलेले, चिखलातले, डोबीच्या पाण्यातून अंगावर येऊन बसलेले किडे हे पक्षी खात बसतात. गुरांना देखील त्यांच्या चोचीने आराम मिळत जातो. दिवसभर आग ओकणारा सूर्य आता शीतल झालेला असतो त्याची तिरपी झालेली किरणे झाडांच्या फांद्याआडून गुरांच्या ओल्या अंगावर पडून हळुवार चमकू लागतात.एकेका जनावराच्या पाठीवर हात लावीत. एखाद्याच्या गळ्याशी चाळा करत तर कुणाच्या वशिंडावरून हात फिरवत फिरवत आपल्या गुरांबरोबर ही गुराखी मुले मार्गक्रमण करू लागतात...

गोठ्याकडे परतणाऱ्या लेकुरवाळ्या गायी म्हशींच्या गळ्यातील घंटांचा आवाज ऐकून गोठ्यात दावणीला बांधून ठेवलेली त्यांची वासरे ताडकन उठून उभी राहतात. कान ताठ करून आवाजाकडे कानोसा देऊ लागतात, आनंदाने आपले सर्वांग थरथरवू लागतात, घंटांचा आवाज जसजसा जवळ येईल तशी वासरे हंबरू लागतात अन आपल्या वासरांच्या आवाजाने त्या गोमाता अवखळपणे धावू लागतात. धावणाऱ्या जनावरांच्या खुरांनी धुळीचे मंद लोट हवेत उडतात अन गायी गोठ्यात आल्या की त्यांचे तटतटलेले पान्हे वाहू लागतात.वासरांचे तोंड त्यांच्या कासेला जाऊन भिडले की गायी आपल्या वासरांना मायेने चाटू लागतात. हे मनोरम दृश्य बघून गुराखी मुलांचा चालून आलेला थकवा कुठच्या कुठे पळून जातो अन एक निरागस हसू त्यांच्या प्रसन्न चेहऱ्यावर उमटते. त्यांनाही आपल्या आईची आठवण येते अन नकळत त्यांचे पाय आपापल्या घराकडे वेगाने पडू लागतात. म्हणून लिहावे वाटते की पानाफुलांप्रमाणेच ही देखील निसर्गाची एक अनोखी अपत्ये आहेत ज्यांना तो आपल्या अभिनव पद्धतीने जतन करतो अन मायेने जोपासतो. एका अर्थाने ही खरी रानफुले आहेत जी गावोगावच्या शिवारात नैसर्गिकरित्या फुलत राहतात. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न करता वर्षातले सर्व मौसम, सर्व ऋतू आणि बारोमास या रानफुलांचं फुलणं अव्याहत सुरु असतं. ही रानफुले फुलली नाहीत एक निसर्गचक्र खंडित होऊ शकतं, तरीही कुणी यांची कदर करत नाही की कुणी यांचे कोडकौतुक करत नाही. ही कुणाच्या खिजगणतीत नसतात हेच खरं. एके काळी बाळकृष्णाचे सगळे सवंगडी हे गुराखी असत, कृष्णाच्या अनेक लीला त्यांच्या साक्षीने झाल्यात. त्यांना पुरातन काळात मान होता, त्यांचे योग्य मेहनताने दिले जात. आता गुरांचा मालकच घायकुतीला आल्याने यांना कोण वाली उरला नाही. तरीही रोजची सकाळ उगवली की निवांत चालत जाणारी गुरं आणि त्यांच्या मागं पुढं चालत जाणारे गुराखी ही गावाकडची एक शान आहे जिला आपण वेळात वेळ काढून कधी तरी नक्कीच गौरवायला पाहिजे. या रानफुलांना सुखाच्या धाग्यात ओवलेच पाहिजे नाही तर ही फुले सुकतील आणि एक आनंद अध्याय अपुरा राहील..

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment