Friday, January 6, 2017

ओम पुरी - बॉलीवूडमधला सच्चा अभिनेता ...रिचर्ड अटेनबरो 'गांधी'च्या निर्मितीत दंग होते. विविध इपिक रोलसाठी अभिनेत्यांची भली मोठी जंत्री तयार झाली होती. सर्व पात्रांची निश्चिती झाली, विविध अभिनेत्यांना साईन केलं गेलं. चेहरयातील साधर्म्य ध्यानात ठेवून या निवडी झाल्या होत्या. कान्सच्या चित्रपट महोत्सवात दरवर्षी भारतीय समांतर सिनेमे भुरळ घालत होते तेंव्हाचा हा काळ होता. जवळपास सर्व लहानमोठ्या भूमिकांसाठी अटेनबरोंनी ढीगभर लोक निवडले. निवडलेली यादी त्यांनी डोळ्याखालून घातली पण त्यांना हवे असलेले एक नाव त्या यादीत नव्हते. त्यांनी अखेर एका चार सेकंदाच्या भुमिकेसाठी त्या अभिनेत्याला फोन लावून विचारले. 'तुझ्यासाठी हा रोल पुरेसा नाही पण तू ही भूमिका करशील का ? माझी इच्छा आहे की तू या सिनेमाचा भाग असावास.'


'गांधी' रिलीज होण्यापूर्वी अनेक पुरस्कार मिळवलेल्या त्या अभिनेत्याने क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला आणि हिंदू मुस्लिम दंग्यामुळे व्यथित झालेले गांधीजी कोलकत्यात उपोषण करत देहाला आत्मक्लेश देत पडून असतात त्या सीनमध्ये एक कसाईकाम करणारा,डोक्यावर खून स्वार झालेला इसम अकस्मात तिथं येतो आणि आपल्या हातातील ब्रेडचे तुकडे अक्षरशः त्यांच्या अंगावर फेकतो, वखवखल्या नजरेने गांधीजींकडे पाहत राहतो. असे ते दृश्य होते. या निमिषार्धाच्या भुमिकेतदेखील त्या अभिनेत्याने जीव ओतून काम केले. त्याचे नाव होते ओमपुरी ! रिचर्ड अटेनबरो सारख्या विख्यात दिग्दर्शकाने दिलेली ही दाद ओमपुरींचा आत्मविश्वास वाढवण्यात पुरेशी ठरली. ओम पुरींनी पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही ....

खरे तर ओम पुरींच्याजवळ चित्रपटसृष्टी पडद्यावर चमकण्यासाठी लागणारे कुठलेच भांडवल नव्हते. छातीच्या पिंजरयातील बरगडया मोजता यावी अशी अत्यंत किरकोळ देहयष्टी. डोक्यावर केसांचा भला मोठा झाप. भरीस भर चेहरयावर देवीचे व्रण. खवले पडल्यासारखा चेहरा. खोल गेलेले भेदक डोळे. मोठाले राठ ओठ. सगळे वर्णन भेसूरतेकडे वळणारे ! खरे तर ही सर्व चित्रपटासाठीची पूर्णतः नकारात्मक बाह्य लक्षणे होती. पण केवळ अभिजात प्रतिभाशाली अभिनय आणि अद्भुत असा खर्जातला आवाज या भांडवलावरच ते चित्रपटसृष्टीत टिकून राहिले. नुसता टिकले नाही तर ते एक ट्रेंडसेटर ठरले ! समांतर सिनेमाचा अनभिषिक्त सम्राट झाले. आपल्या आगळ्या वेगळ्या देहबोलीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलेल्या या चतुरस्त्र अभिनेत्याने शुक्रवारी सकाळी एक्झिट घेतली. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी त्यांचे निधन झाले. निधनसमयी ओम पुरी ६६ वर्षांचे होते. .

१९७४मध्ये पुण्यातील फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतलेल्या ओम पुरीच्या डोक्यात काहीही करून रुपेरी पडद्यावर बाजी मारण्याचे स्वप्न होतं. आपल्याकडे कोणतेही प्लसपॉईंट नाहीत हे माहिती असूनही केवळ तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर ओम पुरी तिथं टिच्चून शिकले. १८ ऑक्टोबर १९५० ला हरियाणातील अंबाला येथे एका गरीब पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या ओम पुरी यांचे प्राथमिक शिक्षण आजोळी पंजाबच्याच पतियाळामधून पूर्ण झाले होते. बालपणापासूनच ओम पुरींना जगण्‍यासाठी संघर्ष करावा लागला. पाच वर्षाचे असताना रेल्‍वे रुळावरील कोळसा गोळा करण्‍याचे काम ते करीत असत. सात वर्षाचे झाल्‍यावर त्‍यांनी हॉटेलमध्‍ये ग्लास धुण्‍याचे काम केले होते. त्‍यांनी आपले शालेय शिक्षण सरकारी शाळेतून पूर्ण केले होते. यादरम्‍यानही त्‍यांना मिळेल ते काम करावे लागत असे. महाविदयालयात गेल्‍यावर त्‍यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. एनएसडीमध्‍ये अभिनयाचे प्राथमिक शिक्षण घेतल्‍यानंतर त्‍यांनी कसेबसे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याचे प्रयत्न केले. मायानगरीच्या स्वप्नाने झपाटलेले तरुण ओमपुरी अभिनयाचे धडे गिरवण्यासाठी एफटीआयमध्ये दाखल झाले. आपल्या अनोख्या रूपडयाने सुरुवातीला तिथे कुचेष्टेचा विषय झालेल्या पुरींनी नंतर आपली चुणूक दाखवण्यास सुरुवात केली. पण अभिनयाचे शिक्षण पूर्ण होऊनही काही काम मिळेनासे झाले. गप्प बसणे त्याच्या स्वभावातच नव्हते रिकामे बसण्यापेक्षा कामाला लागलेले बरे या हेतूने त्यांनी आपल्या स्वत:चा थिएटर ग्रुप ‘मजमा’ची स्थापना केली. या काळात त्यांच्यातील वेगळेपण गोविंद निहलानींच्या पारख्या नजरेतून सुटले नाही आणि लवकरच ओम पुरींचा रुपेरी पडद्यावरील मुहूर्त ठरला. त्याला कारणीभूत ठरले घाशीराम कोतवाल !

मराठी रंगभूमीवर ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक अजरामर ठरले होते. या ऐतिहासिक परंतु वादग्रस्त ठरलेल्या नाटकावर चित्रपट काढावा असे निहलानींना वाटत होते. पण फायनान्ससह असंख्य अडचणी समोर होत्या. ओम पुरींनी एफटीआयच्या काही माजी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन १९७६ मध्ये ‘युक्त को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ स्थापन केली. या संस्थेद्वारे एका राष्ट्रीय बँकेकडून कर्ज घेऊन ‘घाशीराम कोतवाल’ नाटकावर एक अत्यंत अनाकलनीय असंगत असा पूर्ण वेळेचा चित्रपट तयार झाला. मात्र चित्रपटाची तेवढी चर्चा झाली नाही. पटकथा तेंडुलकरांचीच होती. त्यात मोहन आगाशे नाना आणि घाशीरामच्या भूमिकेत ओम पुरी होते. या चित्रपटाला कुणी एक असा दिग्दर्शक नव्हता. पण नंतर चित्रपटातून गाजलेले मणी कौल, सैद मिर्झा, के. हरिहरन, कमल स्वरूप असे तिघे चौघे जण दिग्दर्शकीय भूमिकेत होते. कलाकृती कुणा एकाची नाही तर सर्जनात्मक सहकाराने चित्रपट निर्माण करायचा अशी या ‘युक्त’ चमूची संकल्पना होती. हा चित्रपट बर्लिनला १९७६ साली यूथ फोरममध्येही दाखवला गेला होता. पण त्याची फारशी कोणी तिकडे दाखल नाही घेतली. पण या चित्रपटाने एक अनुभव वजा जाता ओम पुरींच्याही पदरी फारसं काही पडलं नाही. एक फायदा मात्र झाला, गोविंद निहलानींच्या डोक्यात ओम पुरी पक्का रुतून बसले !

१९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आक्रोश'मध्ये गोविंदजींनी ओम पुरीला लीड रोल दिला. ही भूमिका प्रेक्षकांच्या दिर्घकाळ स्मरणात राहील अशी होती. यात ओम पुरीला अमरिश पुरी आणि नसरुद्दीन शाह यांच्यासारख्या दिग्गजांसोबत अभिनय करावा लागला. मानवी मनांचे कंगोरे रेखाटणारा हा चित्रपट इंडस्ट्रीला आकार देणाऱ्या पहिल्या ६० चित्रपटांपैकी एक गणला जातो. यातील भूमिकेने ओम पुरींना पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारदेखील मिळाला होता. यानंतरचा 'आरोहण' हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट १९८२ मध्ये प्रदर्शित झाला. यात ओमपुरीबरोबर पंकज कपूरची महत्त्वाची भूमिका होती. सावकाराच्या जाचात अडकलेल्या हरी या गरिब शेतकऱ्याची भूमिका या चित्रपटात ओम पुरींनी ताकदीने साकारली. या चित्रपटाला समीक्षकांनी गौरवले होते. याच भूमिकेने ओम पुरी यांना पहिलावहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला.

१९८३ मध्ये आलेल्या गोविंद निहलानींच्याच 'अर्धसत्य'ने ओम पुरीची इंडस्ट्रीला खरी ओळख झाली. आपले कर्तव्य बजावताना संभ्रमित झालेला प्रामाणिक पोलीस इन्स्पेक्टर वेलणकर ओम पुरींनी साकारला होता. ही भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट भूमिका ठरली. या भूमिकेने ओम पुरींना पुनश्च राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. याच वर्षी आलेल्या 'जाने भी दो यारो' या विनोदी प्रहसनात्मक चित्रपटातून प्रशासन, राजकारण, व्यवसाय यांतील नेक्ससवर बोचरे भाष्य करण्यात आले होते. यात ओम पुरींनी आहुजा नावाच्या एका भ्रष्ट व्यक्तीची भूमिका साकारली होती. ब्लॅक कॉमेडी प्रकारातील हा चित्रपट तिकीटबारीवर आश्चर्यकारक रित्या तगला. समीक्षकांनीदेखील याची मुक्त कंठाने प्रशंसा केली होती. 'गांधी'सोबतच 'ईस्‍ट इज ईस्‍ट', 'सिटी ऑफ जॉय' आणि 'जिया-उल-हक' सारख्‍या प्रसिध्‍द हॉलिवुड चित्रपटात त्यांनी महत्‍वाच्‍या भुमिका साकारल्‍या होत्या.

समांतर चित्रपटात स्वतःला सिद्ध केल्यानंतर व्यावसायिक चित्रपटातदेखील ओमपुरींनी आपल्यातला कस पणाला लावला. 'चायना गेट'मधील रिटायर्ड फौजी, 'घायल'मधील एसीपी डिसुझा, 'हेराफेरी'मधला खडकसिंग, 'सिंग इज किंग'मधला सर्किटछाप हळवा रंगीला, चुपचुपकेमधील प्रभातसिंह चौहान, 'मालामाल विकली'मधला बलवंत, 'चाची ४२०' मधला बनवारीलाल पांडे, 'आस्था'मधला प्रोफेसर अमर, 'गुप्त'मधला इन्स्पेक्टर उधमसिंह, 'मिर्च मसाला'मधला थकलेला चौकीदार अबूमियां, 'अलबर्ट पिन्टो को गुस्सा क्यों आता है'मधला स्ट्रेट फॉरवर्ड मधू, 'स्पर्श'मधला देहबोलीतून बोलणारा दुबे अशा अनेक भूमिकांतून ओमपुरींनी आपल्यातला सशक्त अभिनेता जागवला. मिडीयाबरोबरच प्रेक्षकांनीही त्यांना डोक्यावर घेतलं. छोट्या पडद्यावर देखील त्यांनी काम केलं. १९८६मध्ये आलेल्या 'तमस'मधील फाळणीच्या दुःखाला त्यांनी जिवंत केलं. त्यातला त्यांचा नत्थू लोकांना इतका भावला की यातील गेटअप त्यांच्या अनेक भूमिकांना चिकटला. 'भारत एक खोज'च्या अनेक भागात त्यांनी छोट्यामोठ्या ऐतिहासिक किरदारांना सचेत केले. 'यात्रा'मध्येही त्यांनी काम केलंहोतं. 'माचिस'मधील त्यांचा 'आधों को सैंतालीस ने लील लिया और आधों को चौरांसीने' हा डायलॉग खूप लोकप्रिय झाला होता.

ओम पुरींच्या वाट्यास बहुतांश करून डार्क शेडेड व्यक्तिरेखा वा पोलीस - वकील पेशातील व्यक्तींचे रोल आले. विनोदी ढंगाच्या भूमिकादेखील त्यांनी तितक्याच समरसून साकारल्या. आपल्या वयापेक्षा थोराड, वृद्ध भूमिका साकारताना त्यांनी अचूक बेअरिंग सांभाळलं होतं. 'पार', 'नासूर', 'मंडी', 'भूमिका' आणि 'अरविंद देसाई की अजीब दास्तान','डिस्को डान्सर', 'भवानी भवई' मधली विविध शेडची पात्रं त्यांनी जीव ओतून रंगवली. आजपावेतो त्यांनी तब्बल १२४ सिनेमांमध्ये काम केले. सिनेसृष्टीतील भरीव कामगिरीसाठी त्यांना १९९० मध्ये‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याचबरोबर २००४मध्ये 'ऑनरेरी ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश अॅम्पायर' या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. सध्या ते सलमानखानच्या बहुचर्चित 'ट्यूबलाईट' व जूनमध्ये 'ईद'ला रिलीज होणार्‍या कबीर खानच्या चित्रपटातील गांधीवादी नेत्याच्या भूमिकेसह खालिद किदवई यांच्या आगामी 'रामभजन जिंदाबाद'मध्ये काम करत होते. त्यांच्या अकस्मात एक्झिटने बॉलीवूडला मोठाच धक्का बसला आहे. नसिरुद्दीन शहा, शबाना आझमी, गोविंद निहलानी, प्रियदर्शन यांच्याशी त्यांची खाशी मैत्री होती.अनुपम खेर यांच्याशी अलीकडील काळात राजकीय मतभेद असले तरी त्यांच्यातली मैत्री टिकून होती. एफटीआयमध्ये असताना डेव्हिड धवन त्यांचे रूममेट होते.

अनेक विपरीत घटनांना तोंड देत विपरीत परिस्थितीतही स्वतःला पडद्यावर सिद्ध करणारया ओम पुरींना खाजगी आयुष्यात अस्थैर्य आणि बदनामीचा सामना करावा लागला. १९९१ मध्ये ओम पुरींचे लग्न अभिनेता अनू कपूर यांची बहीण सीमा कपूरसोबत झाले होते. मात्र लग्नाच्या आठ महिन्यांतच दोघे विभक्त झाले. १९९३ मध्ये त्यांनी नंदिता पुरी यांच्याशी दुसरे लग्न केले होते. पण दहा वर्षानी ते विभक्त झाले होते. ओम पुरींना इशान नावाचा एक मुलगाही आहे. मृत्यूपूर्वी एक दिवस आधी त्यांनी मुलाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांचे कौटुंबिक आयुष्य विस्कटलेले होते. त्यांच्या पत्नीने त्यांच्यावर बेछूट आरोप केले होते. त्यात त्यांना अनेक दिवस बदनामी आणि पोलिस प्रशासनास सामोरे जावे लागले होते. त्यांच्यावर न्यायालयात जाण्याची वेळ आली. मागील काही वर्षात त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यातील ताजे वक्तव्य सैनिकांच्या संदर्भात अवमानजनक होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या होत्या, अखेरीस माफी मागून त्यांनी त्यावर पडदा टाकला. आपला अखेरचा वाढदिवस त्यांनी शहीद नरेंद्रच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन व्यतित केला होता. या वेळेस ते खूप भावूक झाले होते. मागील काही वर्षात ते व्यसनाधीन झाल्याचेही ऐकिवात होते.

बॉलीवूडच्या भपकेबाज दुनियेत राहूनही आपलं खडतर पूर्वायुष्य न विसरलेले ओमपुरी साधी राहणी पसंत करत असत. आपल्या सहकलाकारांशी प्रेमाने वागणारे निगर्वी व्यक्तिमत्व म्हणून ते इंडस्ट्रीत विख्यात होते. केवळ अभिनयाच्या जोरावर स्वतःचा ठसा उमटवून अचानक एक्झिट केलेल्या ओमपुरींचे जाणे चूटपुट लावणारे ठरले कारण त्यांनी दोन पिढ्यांना समांतर सिनेमाचे वेड लावले. समांतर सिनेमा आणि व्यावसायिक चित्रपटातील सीमारेषा त्यांनी धूसर केल्या. माध्यम कुठलेही असो आपलं काम चोख पार पाडलं की त्यात आपण यशस्वी होतो हा त्यांचा फंडा होता. अनेक फडतूस भूमिकांचे सोने करून गेलेल्या ह्या असामान्य माणसाला स्वतःच्या जीवनाची वीण घट्ट ठेवता आली नाही आणि त्यातील ताणानेच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. खरे तर बॉलीवूडच्या रुपेरी चेहऱ्यास असलेल्या काळ्या बाजूचीच ही एक झलक आहे असे म्हणावे वाटते. काहीही असो ओम पुरींच्या जाण्याने बॉलीवूडने हरहुन्नरी भूमिका साकारणारा एक सच्चा अभिनेता गमावला आहे हे नक्की ! ज्याची स्पेस भरून निघणे कठीण आहे. अलविदा ओम पुरी !!

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment