Wednesday, January 11, 2017

स्त्रीशोषणाचा दैवी 'देखावा'....

आज पौष पौर्णिमा. सौंदत्तीतले देवदासी आणि जोगते तिला 'आहेव पौर्णिमा' म्हणतात. मार्गशीर्ष पौर्णिमेला इथे 'रांडाव पुनव' म्हटले जाते. यांच्या नावावरूनच अर्थ ध्यानात येतो. यल्लम्माचे वैधव्य सूचित करण्यासाठी तिची मानवी प्रतिनिधी असलेल्या जोगतिणीला रांडाव पुनवेला गावाबाहेर जाऊन हातातल्या बांगडय़ा फोडायच्या व आहेव पुनवेला पुन्हा भरायच्या असा हा 'विधी' असतो. या काळात यल्लम्माला सोडलेल्या जोगतिणी आणि जोगते (पुरुष) विशिष्ट कर्मकांड पार पाडत असतात.

रेणुका ही द. भारतातील एक प्रमुख मातृदेवता आहे. कर्नाटकातील सौंदत्ती (जि. बेळगाव) हे महाराष्ट्र

कर्नाटक सीमेवरचं यलम्माचं ठिकाण. दर माघी पौर्णिमेला इथे यात्रा भरते. कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांतील हजारो भाविक मार्गशीर्ष पौर्णिमा ते पौष पौर्णिमा या काळात देवीच्या दर्शनाला यल्लम्माच्या डोंगरावर येतात.
फार पूर्वी नाही पण वीसेक वर्षांपूर्वी दर वर्षी अक्षरशः शेकडो मुलींना या यात्रेत देवीला सोडलं जायचं. कोवळ्या मुलींना नग्न करून त्यांना लिंबाचा पाला नेसवायचा आणि भल्या पहाटे डोक्यावर घागर घेवून तिने देवीचा डोंगर चढायचा. तिथ तिचं विधीपूर्वक लग्न लागायचं. गळ्यात देवीच्या नावाने लाल-पांढऱ्या मण्यांचं मंगळसूत्र बांधलं जायचं. एकदा का लग्न झालं की ती अन्य पुरुषाशी तिनं लग्न करायचं नाही, जोगवा मागून खायचं, देवीची सेवा करायची...हे एवढ्यावरच थांबत नसे या मुलींच्या कौमार्याचा लिलाव व्हायचा! जो जास्तीत जास्त बोली लावेल त्याला तिचा कौमार्यभंग करायचा अधिकार मिळायचा. नंतर हेच तिचं प्राक्तन व्हायचं...कधी गावात राहून तर कधी मुंबईच्या कुंटणखान्यात तिची रवानगी व्हायची. महिला संघटना आणि अंधश्रद्धा निर्मुलनाच्या न्यायालयीन लढ्यातून ही प्रथा थांबली. 
  
रेणुकामाता ही  कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्र याप्रांतांतील असंख्य लोकांची उपास्य देवता व अनेक कुटुंबांची
कुलदेवता आहे. तिच्या भक्तांमध्ये तथाकथित खालच्या थरातील लोकांची संख्या अधिकआहे. ‘यल्लम्मा’ या कानडी शब्दाचे ‘सर्वांची माता’ आणि ‘सप्तमातृका’ हे दोन्ही अर्थ तिचे सर्जनशील मातृस्वरूप दर्शवितात.

यल्लम्मा व रेणुका यांचे ऐक्य मानले जाते. गंधर्वांची जलक्रीडा पाहताना विचलित झालेल्या रेणुकेचा जमदग्नीच्या आज्ञेवरून परशुरामाने वध केला आणि तिला पुन्हा जिवंत करताना मातंगीचे (मांगिणीचे) मस्तक तिच्या धडाला व तिचे मस्तक मांगिणीच्या धडाला जोडले गेले, अशी पुराणकथा आहे. जिवंत
झालेल्या दोघींपैकी एक यल्लम्मा व दुसरी मरिअम्मा बनली. काळाच्या ओघात स्थानिक मातृदेवतेचे पुराणातील रेणुकेशी ऐक्य झाले, हे या कथेवरून सूचित होते. तिला पार्वतीचा अवतार मानण्यात आले असून लज्जागौरी, एकवीरा, जोगुळांबा, भूदेवी, मातंगी, यमाई व सांतेरी ही तिचीच रूपेहोत, असे अभ्यासकांना वाटते.

रेणुका या शब्दाचा रेणुमयी पृथ्वी हा अर्थ, भूदेवीचे योनिप्रतिक असलेल्या वारुळाच्या स्वरूपात होणारी रेणुका व यल्लम्मा यांची पूजा, योनिप्रतीक असलेल्या कवड्यांचे यल्लम्माच्या पूजेतील महत्त्वाचे स्थान, अपत्यप्राप्तीसाठी वांझ स्त्रियांकडून तिला केले जाणारे नवस, ती आईबापाविना पृथ्वीतून निर्माण झाल्याची आणि तिने कोंबडी बनून घातलेल्या तीन अंड्यांतून ब्रह्मा-विष्णू-महेश यांचा जन्म झाल्याची लोककथा इ. गोष्टींवरून यल्लम्मा ही सर्जनशील आदिशक्ती
असल्याचे सूचित होते. यल्लम्माच्या उपासनेत जोगतिणींना व पुरुषत्वहीन जोगत्यांना असलेले महत्त्व, पुरुष जोगत्यांनीही स्त्रीवेष धारण करण्याची प्रथा, निर्मिती केल्यानंतरही देवीचे कौमार्य भंगत नाही या श्रद्धेमुळे तिला ‘कोरी भूमिका’ (कुमारी भूमी) मानण्याची पद्धत, परशुरामाला बिनबापाचा मुलगा म्हणून हिणवले जाण्याची कथा इत्यादींवरूनही यल्लम्माच्या उपासनेत मातृतत्त्वाचे प्राधान्य व पितृतत्त्वाचे गौणत्व असल्याचे स्पष्ट होते.

सौंदत्ती येथील देवीचे मंदिर तेराव्या शतकातील आहे. आंध्रमधील आलमपूर या शक्तिपीठाचे मूळचे नाव एल्लाम्मापूरच असले पाहिजे, असे रा.चिं. ढेरे मानतात. देवी कडक परंतु भावभोळी असल्याचे मानले जाते.
तिची मूर्ती चतुर्भुज व बसलेल्या स्थितीतील असते. तिच्या डोक्यावर मुकुट वहाती डमरू, त्रिशूळ, पाश व ब्रह्मकपाल ही आयुधे असतात. सौंदत्तीला प्रचंड यात्रा भरते. देवीला चांदीचा पाळणा वाहणे, बगाड घेणे, लिंब नेसणे इ.प्रकारे नवस  फेडले जातात. चंद्रगुत्ती (जि. शिमोगा) येथे रेणुकाम्बेची नग्न होऊन पूजा केली जायची. सौंदत्ती येथेही ब्रिटिश अमदानीत तसे घडत असल्याचा उल्लेख मिळतो. नवसाने झालेल्या मुलामुलींना वा केसात जट झालेल्या मुलींना देवीला वाहतात. वाहिलेला मुलगा जोगती व मुलगीजोगतीण बनते. मुली देवदासी  बनून गणिकावृत्तीने जगतात. कवड्यांची माळ घालणे, देवीची मूर्ती असलेली परडी म्हणजेच ‘जग’ डोक्यावर घेणेआणि कपाळाला भंडार लावणे, ही जोगती बनण्याचा विधी असतो.

ब्रिटिशांनी देवीला मुली सोडणे, तिला देवदासी बनवणे हा गुन्हा आहे, असा कायदा १९३४ साली केला होता. त्यानंतर अलीकडे महाराष्ट्र व कर्नाटक सरकारनेही कायदा केला आहे. त्यामुळे उघडपणे डोंगरावर किंवा सार्वजनिक ठिकाणी मुली किंवा मुलगे सोडले जात
नाहीत, परंतु अजूनही चोरून पुजारयाच्या घरी किंवा इतर ठिकाणी मुली सोडल्या जातात. हे प्रमाण आता खूप कमी झालं आहे. पूर्वी मुलगी सोडतानाचा विधी हा लग्नासारखा असे. या विधीत नव-यामुलाऐवजी बाजूला तांब्या पूजतात. त्यावर ठेवलेला नारळ हे शंकराचं प्रतीक मानलं जातं. यावेळी पाच जोगतिणींची ओटी भरली जाते. हा सर्व खर्च मुलीच्या आई-वडिलांना करावा लागतो. या लहान मुलीला नवं कोरं लुगडं नेसवलं जातं व लाल-पांढ-या मण्यांचं ‘दर्शन’ तिच्या गळ्यात बांधलं जातं. लग्न लागल्यावर ती नवजोगतीण तिथल्याच पाच जोगतिणींसह आजूबाजूच्या पाच घरी जाऊन जोगवा मागते. त्या रात्री या जोगतिणी यल्लम्माची भक्तीपर गाणी म्हणतात.

हा विधी आटोपल्यावर ही मंडळी आपल्या गावी परत येतात. इथे आल्यावर ज्याच्या घरातील मुलगी सोडली असेल, त्यांना आपल्या जातभाईंना जेवण द्यावं लागतं. नंतर इतर जोगतिणींबरोबर हातात परडी घेऊन त्या लहान मुलीला जवळच्या पाच गावांतून जोगवा
मागायला फिरवतात. कारण त्या गावांतील त्यांच्या भाऊबंधांना कळावं की, त्या मुलीला देवीला सोडली आहे व लग्नासाठी तिला त्यांच्याकडून मागणे येऊ नये. लहान वय असल्यामुळे ती मुलगी कशीबशी साडी सावरत हे सगळं करत असते. आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय, याची तिला कल्पनाही नसते. साधारणपणे लहान वयातच या मुलींना सोडलं जातं. कधी कधी तर पाळण्यात असतानाही सोडलं जातं.

चैत्र पौर्णिमेला वर्षातली सर्वात मोठी यात्रा सौंदत्तीत असते. ती पंधरा दिवस चालते. यल्लम्माला सोडल्या जाणा-या मुली, बहुतांश करून मागासवर्गातील
जातींतल्या असतात. या जातीत आधीच मागासलेपण असते, त्यात अंधश्रद्धा, गरिबी ही कारणं मुली व मुले सोडायला कारणीभूत होतात. या मंडळीचा देवीवरचा अंधविश्वास इतका पराकोटीचा आहे की साध्या-साध्या गोष्टी जरी आयुष्यात घडल्या तरी त्या देवीच्या कोपामुळे घडल्या, अशी त्यांची समजूत कुणातरी म्हाता-या जोगतिणीने करून दिली तरी ते मुली सोडायला तयार होतात.

काही गोष्टी तर पूर्वापार चालतच आहेत. डोक्यात जट आली की, देवीचं बोलावणं आलं. मग त्यावर काही उपाय नाही, अशी समजूत मग आयुष्यभर ती जट
सांभाळत जगणं, हे त्यांच्या नशिबी येतं. काही जणी लांब जट ठेवण्यासाठी पिशवी शिवून त्यात ती ठेवतात. अलीकडे निपाणी, गडहिंग्लज इत्यादी भागांत काही डॉक्टर व स्त्री संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या स्त्रियांच्या जटा सोडवून त्यांचे केस पूर्ववत केले आहेत.

देवीला मुलं-मुली सोडण्याची अनेक कारणं असतात. घरात कुणी आजारी असलं, गोठय़ात बैल मेला, अंगावर खरूज उठली व ती लवकर बरी झाली नाही, तरीही त्या मुलीला किंवा मुलाला देवीला सोडल्याची अनेक
उदाहरणं आहेत. एक तर गरिबीमुळे या लोकांना डॉक्टर करणं परवडत नाही किंवा डॉक्टरपेक्षा यांचा भक्तावर जास्त विश्वास असतो. केवळ भंडारा लावून रोग बरा होतो, ही समजूत. वंशाला कुलदीपक असावा, ही पूर्वापार चालत आलेली कल्पना अनेक सुशिक्षितांमध्येही आढळून येते. मग या अशिक्षित मागासवर्गीयांमध्ये तर विचारूच नका. अनेक मुली झाल्यावरही मुलगा व्हावा, ही इच्छा. त्यासाठी पहिल्या मुलीला यल्लम्माला सोडली जाते. एवढं करूनही कधी कधी मुलगा होत नाही. पण एकदा सोडलेली मुलगी लग्नसंसार करू शकत नाही. तिला देवदासी म्हणूनच जगावं लागतं.

केवळ अंधश्रद्धेतून हे आलेलं नाही तर यामागे आर्थिक कारणंही जबाबदार आहेत. एखाद्या जोगतिणीला जर तिला कुणापासून मुल झालं नाही तर ती आपल्या नात्यातली किंवा कुणाची तरी मुलगी दत्तक घेते व लहानपणीच तिला देवीला सोडून आपल्या म्हातारपणाच्या उदरनिर्वाहाची तजवीज करते. असेही प्रकार घडतात !

आपल्या गळ्यात बांधलेलं यल्लम्माचं ‘दर्शन’ दुस-या कुणाच्यातरी गळ्यात आपण मरण्याआधी बांधले नाही तर देवीचा कोप होतो. सुखाने मरण येत नाही. आपल्या मुलीच्या, नातीच्या वा नात्यातल्या कुणाच्याही मुलीच्या गळ्यात एकदा हे बांधलं की, आपण यातून सुटलो अशी काहींची धारणा असते.  वरवर ही अंधश्रद्धा असली तरी तिची खरी कारणे आर्थिकही आहेत. ही मुलगी मोठी झाल्यावर जोगवा मागून किंवा वेश्याव्यवसाय करून म्हातारपणी तिला बघेल, याची सोय ती करून ठेवत असते.

वयात आलेल्या अशा या तरुण मुली गावागावातून जोगवा मागत इतर जोगतिणींबरोबर फिरत असतात, तेव्हा त्यांच्यावर गावातील श्रीमंत जमीनदार किंवा
दुकानदारांची नजर असते. ताफ्यातल्या प्रमुख बाईला पैशाची लालूच दाखवून ती बाई त्या मुलीला फूस लावून त्याच्याबरोबर तिचा ‘झुलवा’ किंवा त्याची ‘रखेली’ म्हणून ठेवण्यात यशस्वी होते. झुलवा लावणे म्हणजे एकाच माणसासोबत लग्नाच्या बाईसारखं राहणं. हा विधीही थोडाफार लग्नासारखा असतो. झुलवा लावलेला पुरुष तिला शेतात घर करून देतो किंवा तिच्या घरी येत असतो.

त्याच्यापासून तिला मुलं झाली तर त्यांनाही पोसतो. हा उच्चवर्गीय असल्यामुळे अशा बाईला (जोगतिणीला) सहसा आपल्या घरी ठेवत नाही. बहुधा त्याचं पहिलं लग्न झालेलं असतं. हा झुलवाही फार दिवस टिकतो, असं नाही. तो पुरुष जर मरण पावला किंवा काही काळाने त्याने मदत द्यायची थांबवली, तर त्या बाईला वेश्याव्यवसायाशिवाय पर्याय उरत नाही. झुलवा न लावताही काही वेळा अशा मुलीला एखाद्या प्रतिष्ठित माणसाकडून दिवस गेले तर तो सरळ हात झटकून मोकळा होतो व ‘‘हे मूल माझं कशावरून?,’’ असा सवाल निराधार मुलीला विचारतो. काही वेळा केवळ भंडा-याची शपथ घेऊन, ‘‘मी तुला आयुष्यभर, काही कमी पडून देणार नाही,’’ असं सांगून काम झाल्यावर तिला वा-यावर सोडून दिलं जातं.


या अशिक्षित मुलींचा यल्लम्मा व तिच्या भंडा-यावर विश्वास असतो, याचा गैरफायदा असे लोक घेतात.या जोगतिणी दरवर्षी सौंदत्तीला यल्लम्माच्या जत्रेला जात असतात. जत्रेच्या वेळी देवीला नवस केलेल्या भक्तांना लिंब नेसवतात. लिंब नेसणं म्हणजे संपूर्ण अंगाला कडुनिंबाच्या डहाळ्या बांधणं. सौंदत्ती डोंगराच्या पायथ्याशी जोगल गावी सत्यम्माचं देऊळ आहे व तिथे एक पाण्याचं कुंड आहे. या अस्वच्छ कुंडात भाविक अंघोळ करतात. काही नवस बोललेले (यात स्त्रियाही असतात) संपूर्ण अंगभर लिंब नेसून दोन-तीन किलोमीटर अनवाणी पायाने उन्हातून चालत डोंगरावर जातात. काही लोळण घेत नमस्कार घालत जाताना दिसतात. हे पाहिल्यावर अंधश्रद्धा कुठल्या थरापर्यंत जाऊन पोहोचली आहे, हे प्रकर्षानं जाणवतं.

लग्नप्रसंगी खेडय़ापाडय़ातून जोगतिणींना पहिला मान असतो. आपल्या ताफ्यासह तोरण घेऊन वाजतगाजत जोगतीण येते. (एकीच्या हातात चौंडकं, दुसरीच्या हातात तुणतुणं, तिसरीकडे मंजिरी अशी वाद्यं असतात. वयस्कर जोगतिणीच्या हातात भंडा-याची पिशवी 

असते.) लग्नघराच्या चौकटीला तोरण बांधते. या जोगतिणीला साडी-चोळी व बिदागी घरमालक देतो.
यल्लम्माला मुलगेही सोडली जातात. मुलगे सोडण्याचे प्रमाण फार कमी आहे. कारण ‘धंद्या’च्या दृष्टीने मुलींचा जास्त उपयोग केला जातो. या मुलींना शहरात जाऊन धंदा करावा, असं वाटतं. काही जणी पळूनही शहराकडे येतात. शिवाय दलालांची नजर अशा मुलींवर असतेच. गावात जोगवा मागून किंवा वेश्याव्यवसाय करूनही पोट भरणं अशक्य असतं. त्यामुळे त्यांचा ओढा शहराकडे असणं स्वाभाविक आहे. काही दलाल हे जत्रेच्या वेळी येऊन मुलगी हेरून ठेवतात. तिच्या पालकांना अनेक प्रलोभनं दाखवून तिला आपल्या ताब्यात घेतात. मुलीचे आई-वडील हे गरीब व मागासलेले असल्यामुळे नाईलाजानं व हिच्यामुळे दोन घास आपल्याला खाता येतील, या विचाराने हा सौदा करायला तयार होतात. अशा मुली मुंबई, मद्रास, पुणे, कोलकाता, बंगलोर अशा शहरातून वेश्याव्यवसायात ढकलल्या जातात. अंधश्रद्धा व गरिबीमुळे देवीच्या नावावर मुलींचा असा बळी दिला जातो.

ही अनिष्ट प्रथा आता बरीच कमी झाली असली तरी पूर्णपणे बंद झाली आहे, असं म्हणता येणार नाही. निपाणी, गडहिंग्लज या भागात सामाजिक कार्य करणारे प्रा. सुभाष जोशी व देवदासी प्रथेचे निर्मूलन आणि देवदासींच्या पुनर्वसनासाठी त्यांच्या पत्नीने स्थापन केलेली ‘सावली’ ही स्वयंसेवी संस्था, प्रा. विठ्ठल बन्ने आदी मंडळी गेली अनेक वर्षे अभ्यासपूर्ण आंदोलन करून ही प्रथा बंद व्हावी यासाठी
आजतागायत प्रयत्न करत आहेत. ही समाधानाची बाब म्हणावी लागेल. आजही महाराष्ट्राच्या सर्व भागात देवदासी आणि जोगते आढळतात. या सर्व प्रथा बंद होतील तो दिवस सुदिन म्हणावा लागेल.

- समीर गायकवाड.

संदर्भ : १. मराठी लोकसंस्कृतीचे उपासक - रा. चिं. ढेरे
२. लज्जागौरी - रा. चिं. ढेरे
३. देवदासी - सुरेश चव्हाण
४. केतकर ज्ञानकोश
( सर्व छायाचित्रे जालावरून साभार)