Wednesday, December 14, 2016

स्मिता पाटील - एक डाव विस्कटलेला ....तीस वर्षापूर्वी कालच्या दिवशी स्मिता गेली..... पण ती अजूनही कोटयावधी रसिकांच्या ह्रदयात आपलं स्थान टिकवून आहे. स्मिताच्या आयुष्यातलं राज बब्बरचं येणं तिच्या पालकांना खटकलं होतं त्या मागचं कारण जातभेद, भाषाभेद वा प्रांतभेद नव्हतं. त्या मागचं कारण होती राज बब्बरची स्वार्थी वृत्ती. स्मिता गेल्यानंतर त्याने त्याच्या पहिल्या पत्नीला पुन्हा पहिलं स्थान दिलं. कालांतराने स्मिताच्या मुलाला प्रतिकला हलकेच बाजूला सारले. आता प्रतिक एकीकडे आणि नादिरा - राज एकीकडे राहतात. प्रतिकच्या बाळंतपणात स्मिता गेली. ते दिवस कसे होते यावर स्मिताच्या आई विद्या पाटील यांनी लिहिलंय. हे वाचून स्मिताच्या स्वभावाची आणि राज बब्बरच्या हेकट, स्वार्थी स्वभावाची कल्पना येईल......


"जायची चार वाजताची वेळ होत आली. ती हट्टानं अधिकच बेभान झाली. मी जाणार नाही हं ! तिचा पक्का निश्चय. तिच्या लक्षात आलं, बाळाला हे सोडून मला नेणार. तिला तिचा कुक व 'तो' दोघांनी दोन्ही बखोट धरून बेडरूमच्या दारापर्यंत खेचून आणलं. तिने दोन्ही पायाचे पंजे उंबरयाला घट्ट टेकवून दोन्ही हात दाराच्या चौकटीला दाबून धरले. "मला बाळाला टाकून नाही जायचं...मी नाही जाणार." दोघांनी सारी त्यांची ताकद पणाला लावली. तिला बाहेर काढली अन अक्षरशः फरफटत ओढीत बाहेरच्या दारापर्यंत आणली. ते सारं पाहून मी जमिनीवर कोसळलेच. तिची गाडी जसलोकच्या गेटपर्यत पोहोचली अन ती कोमात गेली ती अखेरपर्यंत. तिला कृत्रिम लंग्जवर ठेवून, १३ तारीख उलटली आणी बाळाच्या बारश्यापासूनची त्याची स्वप्नं पाहणारी एक बाळवेडी 'आई' त्याला सोडून कायमची निघून गेली. दुःखाचा डोंगर कोसळला, बाळाला क्षणभरही पापणीआड न करणारी. आईपणाला अखंड आसुसलेली ही थोर आई तिच्या बाळासाठी फक्त एक स्वप्न बनून राहिली.....

या परिच्छेदातील 'ती' म्हणजे स्मिता पाटील, 'तो' म्हणजे राज बब्बर, बाळ - प्रतिक बब्बर आणि लेखनकर्त्या 'मी' म्हणजे स्मिताच्या आई विद्या पाटील होत ....

खरे तर इस्पितळात जायला तिचा नकार तिच्या स्वतःवरचा सूड होता. कारण तिचे पोट वाढत गेलं आणि त्याचं तिच्याकडे येणं कमी होत गेलं. तिला बारीक कळा येऊन पोट दुखायचे. मळमळायचे. आपला त्रास इतरांना होऊ नये याचा हट्ट इतका की आईलाही जवळ राहू देत नसे. 'इन्साफ का तराजू'ने थोडेफार नाव कमावलेल्या राज बब्बरने 'आज की आवाज' मध्ये आपली नायिका झालेल्या स्मिताला बरोबर जाळ्यात अडकवले. स्मिताने देखील त्या काळात कुणाचे मत जुमानले नाही, ती होतीच तशी बंडखोर ! नायिका ते साथीदार असा तिचा राजसोबत प्रवास झाला. दोन अपत्यांचा बाप असलेला राज बब्बर आपल्या बायको मुलांना आपल्या पासून विलग करायला राजी नव्हता. त्याने त्यांच्यापासून फक्त अंतर राखलं.

१९८० च्या दशकात हे दोघे लिव्हइन मध्ये राहत होते यावरून त्यांच्या बेफिकीर आणि धाडसी वृत्तीची प्रचीती यावी. या नात्याला स्मिताच्या घरातून तीव्र विरोध झाला त्याला तिने जुमानले नाही. ती गरोदर राहिल्यावर राजच्या वागण्यात फरक पडत गेला. त्याचे येणेजाणे हळूहळू कमी होत गेले, याचा राग तिने स्वतःवर काढला. आईपणाच्या वेदना तिला नैसर्गिकरित्या हव्या होत्या. त्या साठीचे सुलभ उपचार तिला नको होते. तिच्या स्वभावाची कल्पना असणारया विद्याजींना शेवटी झुकावे लागले. त्या तिची काळजी घेण्याचा प्रयत्न करू लागल्या, पण स्मिताने आपला हट्ट सोडला नाही. याची परिणती जी व्हायची होती तीच झाली. प्रसूतीपश्चात तिचा रक्तदाब कमालीचा घटत गेला. ती कोमात गेली आणि आपल्या प्रेमाचे 'प्रतिक' मागे ठेवून गेली. आपल्या मृत्यूनंतर आपल्या मृतदेहाला विवाहित स्त्री प्रमाणे सजवावे अशी तिची इच्छा होती, हे काम अमिताभचे मेकअप आर्टीस्ट दीपक सावंत यांनी पार पाडले. तरीही मृत्यूपश्चात तिचे शव तीन दिवस अंत्यसंस्कारासाठी प्रतिक्षेत राहिले. तिच्या मृत्यूनंतर काही काळात 'मिर्चमसाला' रिलीज झाला ज्यातली सोनूबाई तिला साजेशी होती पण वास्तवातल्या स्मिताला सोनूबाई होता आलं नाही !

या नंतरच्या काळात राज बब्बरने मुलाचा सांभाळ केला पण एक वडील म्हणून नव्हे तर पालक म्हणून ! हे प्रतिकलाही नंतर उमगले. त्यामुळेच तो या विषयावर काही बोलत नाही. एका मनस्वी प्रतिभाशाली अभिनेत्रीची एका फुटकळ अभिनेत्यापायी फरफट होत गेली. नियतीने हे का केले हे कधी कुणाला कळले नाही. एखाद्याला माणसांची पारख नसली की काही काळापूर्वी देखणा वाटणारा संसाराचा डाव विस्कटून टाकणारा क्रूर धडा देण्यास आपण मागेपुढे पाहत नाही हे कदाचित नियतीला सुचवायचे असेल...

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment