Wednesday, December 28, 2016

'हिमालय की गोद में' - चांद सी मेहबूबा .....आपण जिच्यावर प्रेम करतो किंवा जिला आपण आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडतो ती देखणी वा सौंदर्यवती असावी असाच विचार केला पाहिजे का ?
की, त्या ऐवजी असा विचार असावा ज्यात आपल्या मनाच्या अपेक्षेनुरूप, आपल्या विचारांशी साधर्म्य राखणारया सखीला आपण जीवनसाथी म्हणून निवडलं पाहिजे ?
'चांद सी मेहबूबा हो मेरी, कब ऐसा मैने सोचा था ?' असाच प्रश्न आपण आपल्या मनाला करतो का ? जर तिच्याबद्दलचा आपला विचार केवळ तिच्या बाह्यसौंदर्यापुरताच सीमित असेल तर आपण कुठे तरी चुकतो आहोत याची मनाशी खूणगाठ बांधायला हरकत नाही...


या भावनांचे खूप छान विश्लेषण करणारं एक गाणं १९६५ च्या 'हिमालय की गोद में' मध्ये होतं.
सिनेमाचं नावच किती बोलकं आहे ना !

हिमालयाच्या कुशीतल्या प्रेमाची कथा यात होती. मनोजकुमार - मालासिन्हा ही हिट जोडी लीड रोलमध्ये होती. १९६५ च्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे फिल्मफेअर या चित्रपटाने पटकावले होते. अपघाताने हिमालयात आलेल्या एका डॉक्टरची आणि तिथल्या पहाडी मुलीची ही कथा वीरेंद्र सिन्हांनी रंजक पद्धतीने लिहिली आहे. निर्माता शंकर भट्ट आणि त्यांचे बंधू विजय भट्ट अशी चलनात नसणारी नाणी या सिनेमाच्या निर्मितीमागे होती. आपलं शहर सोडून हिमालयात रुग्णसेवेसाठी आलेल्या डॉक्टरच्या मनात आयुष्याच्या सहचारिणी बद्दल काय विचार असतील याचं अनोखं शब्दांकन 'चांद सी मेहबूबा हो मेरी....' या गाण्यात आनंद बक्षींनी केलं होतं. मुकेशने याला आर्त टोन न देता डाऊन टोनमध्ये गायलं आहे. कल्याणजी आनंदजींनी एक अप्रतिम चाल लावून हे गाणं अजरामर केलं आहे ...

आपल्या जीवनाची साथीदार कशी असावी हे सांगताना तो म्हणतो - "माझ्या मनाचे तार जिच्याशी जुळतील तिच्याशी फार आणाभाका वा शपथा घेत बसण्याची आवश्यकता नाही. बस्स तिच्याशी थेट ट्युनिंग झालं पाहिजे. तिनं देखणं असलं नसलं तरी त्यात फरक असू नये. हे काळजातूनच आलं पाहिजे... तिच्या बद्दल फार काय सांगू ? तिचा चेहरा म्हणजे एक भोळा भाबडा मुखडा असावा, ज्यात दोन सीधे साधे सच्चे नयन असतील ! कुठलेही विकार त्यात नसतील ! माझ्या मनात तिच्या बद्दल अशा साध्या अपेक्षा आहेत...."

तिच्याबद्दल पुढे तो सांगतो - "तिने केवळ माझा आनंदच वाटून घेतला पाहिजे असे नव्हे तर तिने माझे दुःखही वाटून घेतले पाहिजे. माझ्या सर्व भावभावनांत सामील झालं पाहिजे... "
यापुढं जाऊन तो एक अप्रतिम मनोगत सांगतो - "तिने उंची महालात राहण्याचीच स्वप्ने बघून चालणार नाही तर तिला माझ्या हृदयमंदिरात राहावं लागेल. त्यालाच महाल समजावं लागेल. तिच्या मनाची तशी तयारी असली पाहिजे. "
शेवटी तो विचारतो की असं सर्व जसंच्या तसं स्वीकारणारं कोणी आहे का ? असेल तर माझे तिच्याशी सौख्य जमेल ....

चित्रपटात डॉक्टर सुनील (मनोजकुमार) हे गाणं गात असतो तेंव्हा फुलवा (मालासिन्हा) त्याच्या भोवताली फुलपाखरासारखी रुंजी घालत असते. त्याचे बोल मन लावून ऐकत असते तर सुनीलच्या मातापित्यांनी ज्या नीताला (शशिकला) त्याची वाग्दत्त वधू म्हणून निवडलेले असते ती नाक मुरडत हे गाणे ऐकत असते.


या गाण्यात बर्फाच्छादित सुंदर भव्य धवल हिमशिखरे आहेत, हिरवी कुरणे आहेत, खळखळ वाहणारे निर्झर आहेत, स्फटिकासारखे स्वच्छ निर्मळ जल आहे, झुळझुळ वाहणारे वारे आहेत, विस्तीर्ण देखणी नदीपात्रे आहेत, उंच मेघात शिरणारी कुसुंबी झाडे आहेत, मनाला स्पर्श करणारी साधी पण प्रवाही ओघवती शब्दरचना आहे, ठेका धरायला लावणारं कर्णमधुर संगीत आहे, गोड चेहऱ्याची फुलवा आहे, आदर्शवादी सुनिल आहे बॅकग्राउंडला निसर्गाचा भलामोठा देखणा नयनरम्य कॅनव्हास आहे !

या गाण्यात धांगडधिंगा करत अंगावर वीतभर कपडे घालून नाचणारी नायिका नाही, अंगाला अकारण चित्र विचित्र आळोखे पिळोखे देत नाचणारा तथाकथित बलदंड नायक नाही, आचकट विचकट हावभाव नाहीत, नायक नायिके मागे नाचणारे शेकडो बाजारबुणगे नाहीत, धाड धाड वाजणारे संगीत नाही, अंगावर येणारे डोळे दिपावणारे करोडोचे पण कृत्रिम यांत्रिक सेटस नाहीत, भडक वस्त्रे नाहीत, वेडे वाकडे शब्द नाहीत !

आदर्शवादाची फिल्मी कथा असलेल्या या चित्रपटाच्या शेवटी नीता आपल्या घरी परत जाते, तिला हिमालयातला साधेपणा - सच्चेपणा रुचत नाही. शिवाय सुनील सारखा सेवाभाव तिच्या अंगी नसतो .. क्लायमॅक्सला डॉक्टर सुनीलला त्याच्या मनासारखी संगिनी मिळते - फुलवा !

आपल्या जीवनात हिमालयात जाऊन सेवाभाव दाखवून देण्याची संधी आली नसली तरी आपण जिथं राहतो तिथं तसं काही करून दाखवू शकतो. आपल्याला जीवनसाथी म्हणून निवड करायची आहे तिच्याबद्दल आपले विचार आपण जगाच्या पाठीवर कुठंही असलो तरी असे असले की जीवनात काहीच अडचण येत नाही. बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरंग सुंदर असलं की जीवन सुसह्य होतं....

अवीट गोडीच्या गाण्यांचा मनोरम्य अविष्कार असणारा हिंदी सिनेमाचा तो सुवर्णकाळ विलक्षण देखणा होता. तो इतका आकर्षक होता की आजही रसिक प्रेक्षक त्याच्याकडे आपसूक खेचला जातोच ....

या चित्रपटाला आता ५१ वर्षे पूर्ण झालीत. माझ्या जन्माआधी कितीतरी वर्षापूर्वी येऊन गेलेल्या या चित्रपटातील गाण्यावर मी लिहितो आणि तुम्ही मनापसून वाचता यावरून याची थोरवी कळावी...


- समीर गायकवाड.

'हिमालय की गोद में' मधले हेच ते गीत -

"चाँद सी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था
हाँ तुम बिलकुल वैसी हो जैसा मैंने सोचा था...

ना रस्में हैं ना कसमें हैं
ना शिकवे हैं ना वादे हैं
इक सूरत भोली भाली है
दो नैना सीधे सादे हैं ...
ऐसा ही रूप खयालों में था
जैसा मैंने सोचा था, हाँ ...

मेरी खुशियाँ ही ना बाँटे
मेरे ग़म भी सहना चाहे
देखे ना ख्वाब वो महलों के
मेरे दिल में रहना चाहे
इस दुनिया में कौन था ऐसा
जैसा मैंने सोचा था, हाँ ... "

No comments:

Post a Comment