Friday, October 28, 2016

'फिल्मी दिवाळी'ची रंजक गीतांजली ...१९६४मधल्या विजय आनंदच्या 'हकीकत'मध्ये सैनिकांच्या दिवाळीचे एक गाणं होतं. सीमेवर लढणारया सैनिकांच्या कुटुंबियांची दिवाळी कशी असते अन हे सैनिक दिवाळीत सुट्टीवर घरी परतले नाहीत तर त्यांच्या कुटुंबियांच्या मनात भावनांचा कल्लोळ कसा दाटून आलेला असतो याचे यथार्थ शब्दांकन कैफी आझमींनी या गीतात केलं होतं. विजय आनंदने याचे बोलके पिक्चरायझेशन केलं होतं. जे.पी.दत्ताच्या 'बॉर्डर'मधील 'संदेसे आते है..'च्या तोडीस तोड हे गाणं होतं. या गाण्याला सहा दशके उलटली, देशातील श्रीमंतांचीच नव्हे तर गोर गरिबांची दिवाळी देखील आता पूर्णतः बदलली आहे मात्र सैनिकांची दिवाळी 'जैसे थे' आहे. त्यात कसलाही बदल घडलेला नाही. सैनिकांच्या दिवाळीपेक्षा आपली दिवाळी कितीतरी आनंददायी असूनही सामान्य सिव्हिलियन माणूस आपल्याच दिवाळीबद्दल कण्हत कुथत असतो. असो... या गीतातील शब्दरचना अत्यंत भेदक होती. त्यातील दोन पंक्ती खाली देतोय..

"आयी अब की साल दिवाली मुँह पर अपने खून मले, आयी अब की साल दिवाली
चारों तरफ़ है घोर अन्धेरा घर में कैसे दीप जले, आयी अब की साल …"

हिंदी सिनेमाचा पडदा ब्लॅक अँड व्हाईट मधून फ्युजीकलर मध्ये गेला, तिथून तो इस्टमन कलर मध्ये आणि नंतर आताच्या डिजिटल युगात आला पण त्यातील दिवाळी तशीच आतषबाजीची अन सुखदुःखाची झालर असणारी अशीच राहिली. तिचे वेगवेगळ्या अँगलने कथेच्या गरजेनुसार सादरीकरण होत राहिले. रसिक प्रेक्षकांनी या फिल्मी दिवाळीचा आनंद दर पिढीला वेगळ्या स्वरुपात घेतलाय. अशाच काही फिल्मी दिवाळीचा हा रंजक आलेख तुमच्या स्मृतीना अवश्य उजाळा देईल. दिवाळीची गाणी हिंदी सिनेमात अगदी सुरुवातीपासूनच आढळतात. १९४१ च्या 'खजांची' मध्ये "दिवाली फिर आ गयी सजनी, मन का दीप जला ले' असा प्रबोधनपर संदेश शैलीचा बाज असणारं दिवाळीचं हे पाहिलं लोकप्रिय गाणं ठरावं. 'खजांची' हा १९४१ चा सर्वात मोठा हिट सिनेमा होता. याच १९४० च्या दशकात तिकीटबारीवर सिनेमांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली. या दशकातील काही सिनेमांनी अगदी अफाट लोकप्रियता मिळवली. 'किस्मत', 'अनमोल घडी' आणि 'रतन' ही या दशकातील अनमोल रत्ने होती. यातल्या बॉम्बे टॉकीजच्या 'किस्मत'मध्ये आमिरबाई कर्नाटकीच्या सुरेल आवाजातले अर्थपूर्ण गाणे आजही त्याच अर्थाने लागू होते. श्रीमंत लोकं दिवाळी करत असताना केवळ गरीब असल्यामुळे दिवाळी साजरी करू न शकणारया एका दीनवाण्या स्त्रीची आर्त कैफियत या गाण्यात होती. अनिल बिस्वास यांच्या संगीताची छाप या गाण्यावर स्पष्ट जाणवते. "ऐ दुनिया बता दे हमने बिगाडा है क्या तेरा, घर घर में है दिवाली मेरे घर में अंधेरा .." अशी उत्कट रचना या गाण्यात होती. पार्श्वसंगीतात ढोलांचा वापर अगदी खुबीने केल्याचे इथे जाणवते.

याच दशकातील १९४४च्या 'रतन'मध्ये दिवाळीची धूमधाम दाखवणारे गाणं त्याकाळी लोकप्रिय झालं होतं. अमीरबानू आणि करण दिवाण यांच्या भूमिका यात होत्या. जोहरबाईच्या आवाजातील हे गाणं यु ट्यूबवरही उपलब्ध आहे. नौशादजींनी या गीताला संगीत दिले होते. "आई दिवाली, आई दिवाली दीपक संग नाचे पतंगा, मैं किसके संग नाचूं बता जा आई दिवाली..." असे साधे सोपे बोल या गाण्यात होते.....यातील पुढच्या ओळी मात्र अप्रतिम होत्या-
"बचपन जवानी संग नाच के चला गया
अब नाचे जवानी बुढापे संग वो दिन आ गया
बिछड़े हुए साथी ज़रा आ मैं किसके संग नाचूं..."

१९५८ च्या बलराज साहनी, राजेंद्रकुमार आणि श्यामा अभिनित 'खजांची'मधले दिवाळीवरचे गाणे राजेंद्र कुमार आणि बलराज साहनी यांच्यातला फरक स्पष्ट करून देतं. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे याचे अजोड कॉम्बीनेशन. याचे गीतकार होते राजेंदर कृष्ण तर संगीतकार होते मदन मोहन आणि या लोभस गीताला स्वरसाज चढवला होता आशा भोसलेंनी !
"आयी दिवाली आयी, कैसे उजाले लायी, घर-घर खुशियों के दीप जले
सूरज को शरमाये ये, चरागों की क़तारें
रोज़ रोज़ कब आती हैं, उजाले की ये बहारें... " दिवाळीचं असं लाजवाब वर्णन इतर गाण्यात क्वचित पाहायला मिळते.

याशिवाय 'महाराणा प्रताप' (१९४६), 'रेणुका'(१९४७), 'अमर कहानी'(१९४९), 'वीर घटोत्कच'(१९४९), 'शिश महल'(१९५०), 'स्टेज'(१९५१), 'ताज'(१९५६), "वामन अवतार'(१९५६), 'पैसा'(१९५७), 'अंजली'(१९५७) या चित्रपटात देखील दिवाळीवर आधारित गाणी होती. १९५५ मधल्या 'सबसे बडा रुपैय्या' मध्ये "इस रात दिवाली ये कैसी, ये कैसा उजियाला छाया है !" असा विडंबनयुक्त मामला होता कारण यातली कास्टिंगच तशी होती. सुंदर, शशिकला, आगा यांच्या यात मुख्य भूमिका होत्या. पण दिवाळीच्या गीतांना खरी ओळख मिळवून देण्याचे काम १९५९ मधील दिलीपकुमारच्या 'पैगाम'ने केले होते. यातील जॉनी वॉकरवर चित्रित केलेल्या 'कैसे दीवाली मनाएं हम लाला, अपना तो बारह महीने दीवाला...' या उपहासात्मक गाण्याने ही कमाल केली होती. मोहम्मद रफींनी गायिलेल्या या गीतात महागाईपासून ते कर्जबाजारीपणावर अनेक चिमटे घेतले होते. उडत्या चालीतील या गाण्यावर जॉनीभाईने अशी कमाल केली होती की डोळ्यात आसू आणि ओठावर हसू यावे ! मनाला गुदगुल्या करणारं गाणं आजच्या काळाला देखील फिट बसते ही याची खासियत म्हणावी लागेल.

दिवाळीच्या प्रसंगाचा वापर करुणरसासाठी करून विषमता वा फरक दाखवण्याचे सर्वोत्तम उदाहारण म्हणून १९६१ मधील राजकपूर, वैजयंती माला अभिनित 'नजराना' कडे पाहता येईल. राजेंदरकृष्ण यांच्या गीतास रवींनी संगीतबद्ध केले होते. मुकेशनी आपल्या दर्दभरया आवाजात हे गीत गायले होते तर पडद्यावर शो मन राजकपूर वर चित्रित केले गेले होते. या गीताचे बोल फारच हळवे आहेत.
"एक वो भी दिवाली थी,एक ये भी दिवाली हैं
उजडा हुआ गुलशन हैं, रोता हुआ माली हैं ;
बाहर तो उजाला हैं मगर दिल में अंधेरा
ना इसे रात, ये हैं गम का सवेरा... "
या गाण्याने दिवाळीलाच उदास दाखवण्याची करामत करून दाखवली होती. या चित्रपटाची विशेष बाब म्हणजे दिवाळीवर आधारित आणखी एक गाणं यात होतं. हे गाणं मात्र आनंदी मूडमधले होते.
"मेले हैं चिरागों के रंगीन दिवाली है, महका हुआ गुलशन है, हँसता हुआ माली है
इस रात कोई देखे धरती के नज़ारों को शरमाते हैं,
ये दीपक आकाश के तारों को इस रात का क्या कहना..."
लता मंगेशकरांनी गायलेल्या या गाण्याने मन प्रसन्न होऊन जाते. एकाच सिनेमात दोन विरोधी मूडमधील एकाच सणावरची ही गाणी दिवाळीचे फिल्मी महात्म्य विशद करतात.

१९६२ मध्ये 'हरियाली और रास्ता'मध्ये "लाखों तारे आसमां में, एक मगर ढूँढे ना मिला देख के दुनिया की दिवाली, दिल मेरा चुपचाप जला किस्मत का है नाम मगर.." असं पडदयावर गाणारया मनोजकुमारने चांगलाच भाव खाल्ला होता. खरे तर शैलेन्द्र यांची ही एक आर्त कविता आहे, तिला स्वरसाज चढवला होता लता - मुकेशच्या जोडीने. अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे हे गाणे आजही ऐकले जाते..

तर याच्या नेमक्या उलट पद्धतीचे चित्रिकरण असणारं गाणं १९६४ च्या 'लीडर'मध्ये होतं. हातात पणत्या, दिवे घेऊन नाचणारया शेकडो लोकांचा कोरस नृत्यसमूह आणि पार्श्वभूमीवर आसमंतात डोळे दिपवणारी फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी या गाण्यात होती. "दिवाली आयी रे घर घर दिप जले...." असं गात गात नाचणारी दिलीपकुमार आणि वैजयंती माला यांची जोडी या गाण्यात चांगलाच भाव खाऊन गेली होती.

"दीप दिवाली के झूठे, रात जलें सुबह टूटें।
छोटे-छोटे नन्हे-मुन्ने, प्यारे-प्यारे रे। अच्छे बच्चे जग उजियारे रे।"
शाळकरी मुलांसोबत आपल्या जगावेगळ्या शैलीत या गाण्यावर नाचणारा ही मॅन धर्मेंद्र १९७३ च्या 'जुगनू'त जेंव्हा झळकला होता तेंव्हा त्याची बरीच टिंगल उडवली गेली होती. किशोरदा आणि सुषमा श्रेष्ठा यांनी या गाण्यात धमाल उडवली होती.

दिवाळीच्या सणाची वेगळी ओळख करून देणारे गाणं म्हणजे १९७७ मधील 'शिर्डी के साईबाबा' मधील "दीपावली मनाई सुहानी, मेरे साई के हाथोंमें जादू का पानी..." आशा भोसले यांनी गायलेल्या अवीट गोडीच्या या गाण्याला खऱ्या अर्थाने हिंदी सिनेमातील दिवाळीगीत म्हटले तरी चालेल इतकी लोकप्रियता यास मिळाली.साईंच्या कृपेने दिवे कसे प्रज्वलित होत जातात आणि दिवाळी कशी प्रकाशमय होते याचे वर्णन करणारे हे गाणे अजूनही दर दिवाळीला दूरदर्शनवर लागते. सुधीर दळवी या सिनेमात साईबाबांच्या रोल मध्ये होते.

१९९१ मध्ये राजेशखन्नाच्या पडत्या काळात आलेल्या 'बेगुनाह' मध्ये दिवाळीच्या दिवशी आईविना पोरक्या असणारया आपल्या चिमूरडया मुलीला दिवाळीची सर्व सुखे देणारया वडिलांचे गीत होते. "तेरे मेरे प्यार का ऐसा नाता है, देख के सुरत तेरी दिल को चैन आता है .." हे ते गाणं होतं. या गीतात दिवाळीचा कुठलाही उल्लेख नाहीये मात्र फुलबाजी पासून ते आकाशात उडणारया विविध मनोहर फटाक्यांचे पार्श्वभूमीवरचे चित्रिकरण यामुळे हे गाणं जितकं श्रवणीय आहे तितकंच प्रेक्षणीयही वाटते.

२००१ मध्ये आलेल्या 'आमदनी अठन्नी खर्चा रुपैय्या' मध्ये "आयी है दिवाली सुनो जी घरवाली..." हे अलका याज्ञिकच्या मधुर आवाजातील गाणं होतं. ढीगभर कलाकारांची जंत्री यात असूनही सिनेमा अगदी टुकार असल्याने यातील कोणतीच गाणी हिट झाली नाहीत. त्यामुळे यातील हे दिवाळी गीत दुर्लक्षित राहिले. मात्र याच २००१ साली आलेल्या करण जोहरच्या 'कभी ख़ुशी, कभी गम'चे टायटल सॉन्ग हे एक अस्सल दिवाळीगीत होते. यात जया बच्चन दीपावलीची पूजा करताना दाखवल्या होत्या. या गाण्यात राणी मुखर्जी, शाहरुख व अमिताभही दिसतात. दिमाखदार ट्रॅडीशनल ड्रेसेस, भव्य सेट आणि झगमगाट यात हे गाणं अधिक खुलून गेलं होतं. मल्टीस्टारर आणि बिगबजेट चित्रपट असल्याने यातली दिवाळी भपकेबाज अशीच होती.

या सर्व फिल्मी हिंदी दिवाळीगीतांचा आनंद एकीकडे आणि मराठी चित्रपटातील मोजक्या दिवाळीगीतांचा आनंद एकीकडे आहे. १९४१ मध्ये प्रभातच्या 'शेजारी'मध्ये असलेल्या "लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योती..." या गाण्याचा समावेश अजूनही काही ठिकाणी वाद्यवृंदात वा सांस्कृतिक कार्यक्रमात केला जातो ही या गीताची गोडवी सांगणारी बाब आहे. सचिनच्या 'अष्टविनायक'मधील "आली माझ्या घरी ही दिवाळी..." हे गाणं तर आता दिवाळीचं अविभाज्य अंग बनून गेलंय. दिवाळीच्या प्रसन्न पहाटे हे गाणं ऐकण्याची रंगत काही औरच आहे. १९८८ च्या 'आई पाहिजे' मधील आशा काळेने साकारलेल्या विधवा आईला तिचे सौभाग्य आणि तारुण्य असतानाची दिवाळी साद घालते. यातील 'आली दिवाळी..' ह्या गाण्यातून पारंपारिक मराठमोळया दिवाळीचे देखणं सादरीकरण केलं आहे. १९९५ मधील 'माझा मुलगा' ह्या अविनाश नारकर - सुनील शेंडे अभिनित चित्रपटातील यशवंत देव यांनी लिहिलेले "दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार घरोघरी....." हे देखील एक चांगले दिवाळीगीत आहे.

दिव्यांचा, ज्योतीचा, प्रकाशाचा खरा संदेश मात्र 'संत ज्ञानेश्वर'मधील 'ज्योतसे ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, राह में आये जो दिन दुःखी,सबको गले से लगाते चलो ..' या गाण्याने दिला होता. दिवाळीच्या मंगलमय प्रसन्न वातावरणात सर्वत्र लावलेल्या दिव्यांनी आगळी झळाळी येते. ही रोषणाई, हा उजेड, ही आभा वरवरची आहे, बाह्य जगातील आहे. अंतःकरणातील खरा अंधार दूर होऊन जोवर प्रकाशाचे नवे आयाम जोवर आपल्याला कळणार नाहीत तोवर जगातला अंधार कोणत्याच दिवाळीने वा दिव्यांनी दूर होणार नाही हे नक्की...

सर्व रसिक वाचकांना, मित्रांना माझ्याकडून दिवाळीच्या मनस्वी शुभेच्छा....

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment