Wednesday, October 5, 2016

केट विन्सलेटची यशोगाथा ..

१९ डिसेंबर १९९७. लॉस एंजिल्स मधे 'टायटॅनिक'चा प्रीमिअर सुरु होणार होता. हा भव्यदिव्य चित्रपट जगभरात चर्चेचा विषय ठरलेला असल्याने मिडियाची बेसुमार गर्दी होती. चित्रपटाच्या तंत्रज्ञापासून ते निर्मात्यापर्यंत आणि स्पॉटबॉयपासून ते नायकापर्यंत सगळे एकेक करून तिथे हजर झाले होते. प्रसिद्धी माध्यमे जिच्या एका फ्लॅशसाठी आतुरलेली होती ती मात्र प्रीमिअर संपून गेला तरी तिथे आली नाही. 'टायटॅनिक'ची देखणी नायिका होती ती. जेंव्हा हा उत्तुंग सोहळा सुरु होता तेंव्हा ती लंडनच्या एका दफनभूमीत तिच्या जिवलग मित्राच्या दफनविधीत उपस्थित होती.
तिची जगण्याची व्याख्या आणि इतरांबाबत असणाऱ्या प्रायोरीटीज याची ही चुणूक होती. तिच्या पूर्ण करिअरमध्ये ती अशीच राहिली. स्वतःशी आणि स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक ! हॉलीवूडच्या टॉपच्या रेस मध्ये ती कधी पडली नाही पण टॉपनंबर जवळ तिचं नाव आपसूक रेंगाळत राहीलं. नंबर्समध्ये तिने कधीही स्वारस्य दाखवलं नाही. भूमिका जबरदस्त असली की अत्यंत लो बजेटसिनेमातदेखील ती बेझिझक काम करायची ! न्यूडसीन्स असो वा एखाद्या महत्वाच्या विषयावर आधारित लघुपटाचे केवळ नॅरेशन असो तिने कधी माघार घेतली नाही. ती म्हणजे एक सोनपरी ! केट विन्स्लेट तिचे नाव !!      

केट विन्स्लेट सोनेरी केसांची पिंगट डोळ्यांची देखणं रुपडं असलेली मध्यम बांध्याची आणि गोड गळ्याची गुणी अभिनेत्री. जीवनाबद्दल केटची स्वतःची मते आहेत. प्लॅस्टिक सर्जरी व बोटोक्सच्या विरोधात खुलेपणाने बोलणारी केट नैसर्गिक वार्धक्याच्या मताची आहे. केटच्या मते, 'चेहरा - त्वचा लपवू नये जसजसे वार्धक्य येईल तसतसे स्वीकारत गेले की आपण अचानक वयस्क, थोराड वा एका वर्षात वृद्ध झाल्यासारखे वाटणार नाही.' 'टायटॅनिक' हिट झाल्यानंतर तिने भाराभर सिनेमे केले नाहीत, उलट तिच्या प्रतिमेला छेद देणारा 'होली स्मोक' हा न्यूड सीनने भरलेला कलात्मकतेकडे झुकणारा चित्रपट तिने केला होता. यामुळे तिची टवाळी करण्यात आली होती. तिने अनेक वेळा वजन वाढवले आणि घटवले होते त्यावरून तिच्यावर अनेकवेळा टीकाटिप्पणी केली गेली त्याला तिने भिक घातली नाही. जे काही असेल ती माझी मर्जी, मी सिनेमासाठी जगत नाही तर माझ्यासाठी जगते असे हॉलीवूडला ठणकावून सांगणारी केट मुळची इंग्लिश आहे आणि काही वर्षे हॉलीवूडमध्ये राहूनही आपलं घर आणि आपला मुक्काम तिने कायमस्वरूपासाठी इंग्लंडमध्येच ठेवला आहे. केट स्पष्टवक्ती आहे, तसेच चोखंदळही आहे. दोन दशकाहून अधिकची तिची कारकीर्द होऊन गेलीय पण तिच्यावर विशिष्ट पठडीचा शिक्का मारला गेला नाही. याला कारण तिच्या विविध प्रकारच्या भूमिका आणि तिची प्रतिभा. अस्खलीत इंग्लिशसाठी, कुठल्याही प्रकारच्या आव्हानात्मक भूमिकेसाठी सदैव तयार असणारी आणि विविध प्रयोग करणारी अभिनेत्री म्हणून केट हॉलीवूडमध्ये प्रसिद्ध आहे. केटचा आवाज देखील तिच्या सारखाच मधुर आहे, तिला गायनासाठीचे ग्रॅमी ऍवार्ड मिळाले आहे. केटची बोलण्याची ढब आणि तिचे उच्चारण यामुळे ती हॉलीवूडमधील एक प्रथितयश नॅरेटर आहे. तिने अनेक डॉक्युमेंटरी, लघुपट आणि ऍनिमेशनपटांना आवाज दिला आहे, त्यांचे नॅरेशन केले आहे. केट सांगते की, ती लहानपणी फेंगडया पायांची, जाडी आणि बेढब होती. केटने तिचा कुठलाही उणेपणा कधी लपवला नाही. तिच्या कोस्टारला कधी तिने छळले नाही. १९९४ मध्ये आलेला 'हेवनली क्रिएचर्स' हा केटचा पहिला सिनेमा होता. यात तिने किशोरवयीन ज्युलीएट होमची भूमिका साकारली होती. आज तिच्या कारकिर्दीस २२ वर्षे होऊन गेलीत. आज मागे वळून पाहताना ती याबाबत काही अंशी तरी समाधानी असेल यात शंका नाही.

२००९ मध्ये जेंव्हा केटला ऑस्कर मिळाले त्याचवर्षी ‘स्लमडॉग मिलिनेयरने ऑस्करची लयलूट केली होती. ‘ऑस्कर’ जरी ‘स्लमडॉग’च्या पदरात पडले असले तरी सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीच्या स्पर्धेतील इतर चित्रपटही तोलामोलाचे होते. विशेषत: ज्यांनी ‘द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन’ हा चित्रपट पाहिला आहे, त्यापैकी अनेकांना, त्याला ऑस्कर न मिळाल्याबद्दल खंत वाटली. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीच्या स्पर्धेतील इतर चित्रपट होते ‘फ्रॉस्ट’, ‘मिल्क’, आणि ‘द रीडर'. यातील 'द रिडर'मधील भुमिकेसाठी केटला पुरस्कार मिळाला होता. याच वर्षी तिचा ‘द रेव्होल्युशनरी रोड’ येऊन गेला होता. या दोन्ही चित्रपटांतल्या तिच्या भूमिका एकमेकींहून अगदी वेगळ्या आणि त्यामुळे तिच्या अभिनय कौशल्याची वेगळी परिमाणे, त्यातलं वैविध्य जणू अधोरेखित करणाऱ्या अशा आहेत.

केटच्या सच्चेपणाचे प्रतिक म्हणून तिच्या ऑस्करकडे पाहता येईल.  १९९६च्या ‘सेन्स अ‍ॅण्ड सेन्सिबिलिटी’साठी तिला उत्कृष्ट अभिनेत्रीचे ऑस्कर नामांकन मिळाले होते. १९९८ मध्ये आलेल्या 'टायटॅनिक'ने केट जगभरातल्या घराघरात पोहोचली.२००९ पर्यंत केटला पाचवेळा ऑस्कर नामांकन मिळाले मात्र त्या पुतळ्यावर तिची मोहोर उठली नाही. २००९मध्ये आलेल्या ‘द रीडर’साठी तिला ऑस्कर नामांकन मिळाले आणि पुन्हा तिच्या कमनशिबीपणाची चर्चा होऊ लागली. कारण पेनलोप क्रुझच्या चतुरस्त्र अभिनयाने सजलेल्या 'विक्की क्रिस्टिना बार्सिलोना'ला ऑस्कर मिळणार अशी सर्वत्र चर्चा होती. त्यातला तिचा अभिनय होताही तसाच ! मात्र हा चित्रपट ऑस्करसाठी नामांकित होऊ शकला नाही आणि त्यावर्षीची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून केटच्या गळ्यात ऑस्करची माळ पडली. मात्र हा पुरस्कार स्वीकारताना पेनलोप क्रुझचा चित्रपट नामांकन यादीत नसल्याबाद्द्ल केटने ऑस्करच्या निवड समितीचे धन्यवाद मानले ! असं कुणी करत नाही मात्र केटने पेनलोपचा अभिनय तिच्यापेक्षा चांगला असल्याची एक पावतीच त्यादिवशी दिली होती. केटला ऑस्कर मिळायला पाच नामांकने मिळूनही १५ वर्षे वाट बघावी लागली तर तिचा उत्कृष्ट मित्र असणारा व .'टायटॅनिक'चा नायक असणारया लिओनार्डो डिकेप्रिओला मात्र पंचवीस वर्षे वाट बघावी लागली. यंदा लिओला ऑस्कर मिळाले तेंव्हा केटच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. केटचा तो बेस्ट फ्रेंड आहे हे जगाला त्या निमित्ताने पुन्हा कळाले.

‘सेन्स अ‍ॅण्ड सेन्सिबिलिटी’साठी १९९६ साली पहिलं ऑस्कर नामांकन मिळविणाऱ्या केट विन्स्लेटला प्रत्यक्ष पुरस्कारासाठी एक तप वाट पाहावी लागली होती. 'टायटॅनिक' (१९९८), 'आयरिस' (२००१), 'इटर्नल सनशाईन ऑफ स्पॉटलेस माइंड' (२००४) आणि 'लिट्ल चिल्ड्रन' (२००७) या चित्रपटांबाबतची ऑस्करची हुलकावणी २००९ मध्येही कायम राहते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ‘मेरिल स्ट्रीप’सारख्या दिग्गज प्रतिस्पर्धीस मागे टाकत ऑस्करने केट विन्स्लेटची कामना पूर्ण केली होती. केमरून डियाझ, निकोल किडमन, अंजेलिना ज्योली, मेरील स्ट्रीप या तिच्या मैत्रिणीही आणि प्रतिस्पर्धी देखील होत्या. 'हिडीयस किंकी' हा तिचा सिनेम हिप्पी प्रेमकथेवर होता, तर इनिग्मा हा उत्कृष्ट युद्धपट होता, 'क्विल्स' हा पिरियड मुव्ही होता, 'द लाईफ ऑफ डेविड गेल' मध्ये ती पत्रकार झाली होती. 'इटर्नल सनशाईन ऑफ स्पॉटलेस माइंड' मधली तिची भूमिका विक्षिप्त तरुणीची होती.आयरिस मुर्डोकच्या जीवनावर आधारित चित्रपट 'आयरिस'मध्ये ती भावनिक गुंतागुंतीच्या लीड रोलमध्ये होती. 'फाइंडिंग नेव्हरलँड'मधली तिची भूमिका निस्सीम प्रेमिकेची होती. तिने छोट्या पडद्यासाठीही काम केले आहे. 'एक्स्ट्रा'या बीबीसी च्या सिरीयलमध्ये काम करताना तिच्यावरच बेतलेल्या हेटाळणीखोर भूमिकेत काम करताना तिने आढेवेढे न घेता काम केले होते. रोमान्स अँड सिगारेटस मध्ये तिने डार्क शेडची विनोदी भूमिका केली होती. 'द हॉलिडे'मधील तिची दिलखेचक रोमँटिक कॉमेडी दाद घेऊन गेली. ग्रेमी, ऑस्कर, गोल्डन ग्लोब, टोनी, बाफ्टा या सर्व पुरस्कारांची जंत्री तिच्याकडे आहे. सर्वात कमी वयात अधिक ऑस्कर नॉमिनेशन असण्याचा अभूतपूर्व विक्रम तिच्या नावावर आहे. तिचा गायकीचा सफरही चित्रपटासारखा विविधांगी आहे. ऍनिमेशनपटांना आवाज देताना ती त्या भूमिकात समरस होऊन आपला आवाज देई. पूर्वी मांसाहारी असणारी केट २०१० पासून 'पेटा'साठी शाकाहार प्रसाराचे काम करते. ऑटीझमसाठी ती पूर्ण वेळ देण्यास तयार असते. केटचे तीन विवाह झाले, तिची मुले तिच्यापाशीच असतात. तिने हॉलीवूडमध्ये राहून तिची लाईफ पारदर्शी ठेवली अफेअर करून सोडून देण्याऐवजी विवाहबंधनात ती अडकत गेली. मात्र अलग होताना तिने आपसातील संबंधात कुठेही कटुता येऊ दिली नाही.  हॉलीवूडमधील स्त्री -पुरुष मानधनाबाबत सडेतोड टीका करणारी केट स्वतःच्या मतांशी ठाम असणारी व स्वतःची वेगळी ओळख जपणारी एक परिपूर्ण स्त्री आणि बहुआयामी समर्थ अभिनेत्री आहे, जिचे पाय अजूनही मायभूमीच्या मातीत रुजलेले आहेत. म्हणूनच हॉलीवूड तिला 'ए कम्प्लीट लेडी' म्हणतं. 'टायटॅनिक'मधील 'रोझ'च्या भूमिकेतून जगभरातील  रसिकांच्या हृदयात विराजमान झालेली केट विन्स्लेट ही सोनपरी आजही अनेकांच्या स्वप्नात येऊन भुरळ पाडत असेल यात शंका नाही. या सोनपरीचा आज वाढदिवस आहे. तिची कारकीर्द आणखी बहरत जावो हीच तिच्यासाठी शुभेच्छा ..

 - समीर गायकवाड.