Sunday, October 9, 2016

'पांडू हवालदार'च्या काही आठवणी.....साल होते १९७५ ! एकीकडे एकसष्ट बासष्ट बिल्ला नंबर असणारा एक मराठमोळा हवालदार होता आणि त्याच्या समोर होता सिक्रेट एजंट जेम्स बॉण्ड ! या दोघात जंगी मुकाबला होणार असं वाटत असताना हवालदाराने जेम्स बॉण्डला चारी मुंड्या चीत केले. गोष्ट 'पांडू हवालदार'ची आहे, मुंबई पोलिसांचा हा हवालदार तिकीट्बारीवर MI6 च्या एजंटला भारी पडला होता. 'पांडू हवालदार'मुळे मुंबईत एमजीएमला 'दि मॅन विथ द गोल्डन गन' लावायला सिनेमागृहे मिळत नव्हती. कधी नव्हे ते जेम्स बाँडचा सिनेमा महाराष्ट्रात फ्लॉप गेला.
त्याचबरोबर दादांचा आलेख मात्र चढत गेला. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण १९७५ च्या राज्य चित्रपट महोत्सवात 'सामना'वर मात करीत 'पांडू हवालदार'ने राज्य पुरस्कारात पहिला क्रमांक पटकावल्याने प्रचंड खळबळ उडाली होती . दादा कोंडकेंच्या विनोदाच्या दर्जाबाबत शंका असणारे गडबडले, तर जब्बार पटेलचे समर्थक कातावले. दोघांचेही हे पहिले दिग्दर्शन होते. इथपासूनच जब्बार पटेल आणि दादांचे कधीच सख्य जमले नाही हे विशेष म्हणावे लागेल.

दादांच्या 'सोंगाड्या' व 'एकटा जीव सदाशिव'चे दिग्दर्शन गोविंद कुलकर्णी यांचे होते, तर 'आंधळा मारतो डोळा' दिनेश यांनी दिग्दर्शित केला. दादा स्वतः 'विच्छा माझी पुरी करा' या वगनाट्याचे दिग्दर्शक होते, त्यांना चित्रपटाचे दिग्दर्शन ते काय जमणार असा सूर 'पांडू हवालदार'च्या वेळी होता. मात्र 'पांडू ..'च्या यशाने तो दूर झाला. त्यावर्षी दत्ताराम कुलकर्णी दिग्दर्शित व उदय चित्रचा 'बायानो नवरे सांभाळा' तिसऱ्या क्रमांकावर होता. 'सामना'ने मराठीत वेगळ्या प्रवाहाचे वारे आणले, पण शासकीय पातळीवर मात्र ' पांडू हवालदार'ने बाजी मारली, तेही महत्वाचे असते.

१९७५ मध्ये पांडू हवालदारच्या रुपात दादा पडद्यावर आले होते. पांडू हवालदार मध्ये दादांनी अशोक सराफला संधी दिली होती, १९७७ मध्ये हे दोघे 'राम राम गंगाराम'मध्ये पुन्हा एकत्र दिसले. पण त्यानंतर त्यांचे बिनसले, दादांच्या सिनेमात अशोकमामा पुन्हा कधी दिसले नाहीत. दादांनी 'राम राम ..' ची हिंदी आवृत्ती १९८४ मध्ये 'तेरे मेरे बीच में' या नावाने अमजदखानला घेऊन काढली पण ती सपशेल फेल गेली होती. 'पांडू हवालदार'मधील दादा आणि अशोक सराफ पोलीस चौकीत ओली मटणपार्टी करतात तो सीन असो वा 'हप्त्याने' मासा घरी आणण्याचा सीन असो या दोघांची केमिस्ट्री भारी जमली होती.

शाहीर दादा कोंडके यांच्या काही जमलेल्या कलाकृतींमध्ये "पांडू हवालदार' चित्रपटाचा आवर्जून समावेश करावा लागेल. उत्कृष्ट विनोद, द्वयार्थी संवाद, ठसकेबाज गाणी, उत्तम अभिनय अशा सगळ्यांचं मिश्रण या चित्रपटात पाहायला मिळालं होतं. दादा कोंडकेंची अफलातून स्टाइल, त्यांना अशोक सराफ यांनी अभिनयात दिलेली टक्कर यामुळे हा चित्रपट लक्षात राहतो. या चित्रपटाचं वेगळेपण लक्षात येतं ते त्याच्या शीर्षकापासून. श्रेयनामावलीत पहिल्यांदा "दार हलवा पांडू' अशी अक्षरं पाहायला मिळतात. त्यांची अदलाबदल होऊन मग त्याचं "पांडू हवालदार' असं शीर्षक होतं. इथून हा चित्रपट प्रेक्षकांना जे हसवायला सुरवात करतो, ते शेवटपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कायम ठेवतो.

पांडू (दादा कोंडके) हा एक पापभीरू हवालदार असतो. राधाबाई (रत्नमाला) ही त्याची आई. आईच्या धाकानं व संस्कारामुळं पांडू बिघडलेला नसतो. त्याच्या भोळ्याभाबड्या स्वभावाचं दर्शन सुरवातीच्या काही दृश्‍यांमध्ये पाहायला मिळतं. हवालदारांची परेड सुरू असताना पांडू गांधी टोपी घालून जातो. या वेळी सगळे जण त्याची खिल्ली उडवतात. या वेळी आपल्याला हसणाऱ्यांना दटावत पांडू म्हणतो, "या टोपीमुळं स्वराज्य मिळालं, ही सरकारीच टोपी आहे ना?' पांडूचं हे उत्तर ऐकून त्याचे वरिष्ठ जमादारसाहेबही निरुत्तर होतात. एकदा पांडू गस्तीवर असताना तो काही जणांना हटकतो. पांडूला पाहून ही मंडळी पळून जातात आणि त्यांच्याकडील स्मगलिंगची घड्याळं तिथंच राहतात. तेव्हा पांडूच्या वरिष्ठांना त्यानंच ही घड्याळं शौर्यानं मिळवली असं वाटतं. ते पांडूचा गौरव करतात. प्रत्यक्षात पांडूला आपला गौरव कशामुळे झाला याचा कसलाही पत्ता नसतो.

पांडू जितका सज्जन, पापभीरू असतो त्याउलट असतो त्याचा मित्र सखाराम (अशोक सराफ) हवालदार. हफ्ते-लाच घेण्याची सवय जडलेल्या सख्याचं आपल्या संसारातही लक्ष नसतं. पांडू त्याला समजावून पाहतो, परंतु त्याचा काहीही उपयोग होत नाही. कालांतरानं स्मगलिंगच्या घड्याळांचा छडा लावल्यामुळे पांडूचा हुरूप वाढतो. तो पुढे मटक्‍याच्या अड्ड्यावर धाड टाकतो. पांडूच्या या करामती गुंडांच्या टोळीला मानवत नाहीत. ते त्याचा काटा काढण्याचं ठरवतात. या कामी ते पारूची (उषा चव्हाण) मदत घेतात. आई-वडिलांविना वाढलेली पारू हे काम सुरवातीला नाकारते; परंतु बंदुकीच्या धाकामुळे तिला या कामाला होकार देण्यावाचून दुसरा पर्याय उरत नाही. ती केळेवालीचे सोंग घेऊन पांडूच्या पोलिस लाईनीत प्रवेश करते. या प्रसंगी 'मुंबईची केळीवाली' पडद्यावर धमाल उडवते.

उषा चव्हाणांची भन्नाट अदा आणि उषाताईंचा ठसकेबाज आवाज यामुळे हे गाणं आजही रसिकांच्या स्मरणात आहे.
"...वसईच्या गाडीनं बिगीबिगी चालीनं
दारात तुमच्या आली आली मुंबईची केळेवाली..."

इकडे सखारामचं लाच घेणं सुरूच असतं. आपलं काम होण्यासाठी समोरील व्यक्ती त्याला लगेचच लालूच दाखवीत असते. ते पाहून सखाराम एकदा म्हणतो देखील, "हवालदार को देख के तुम्हारा हात गयाच खिशे में' पांडूला एकदा गस्तीवर असताना एक मुकी आणि बहिरी तरुणी भेटते. बरीच चौकशी करूनही तिचा ठावठिकाणा काही लागत नाही. तेव्हा माणुसकी दाखवीत पांडू तिला घरी आणतो. पांडूची आई गावी गेल्यामुळे तो हे धाडस करू शकतो. पांडूला धडा शिकवण्यासाठी पारूचे प्रयत्न सुरू असतात. एकदा समुद्र किनाऱ्यावर पारू आणि पांडूची भेट होते. तिच्याकडे एक पेटी सापडते. तिची तपासणी पांडूनं करू नये म्हणून पारू त्याला लाच देण्याचा प्रयत्न करते. तेव्हा एक लाख रुपये मिळाले असते तरी पेटीतला माल आपण सोडला नसता अशी भूमिका पांडू घेतो. काही दिवसांनी पांडू आणि सखाराम गस्तीवर जातात. या वेळी पारू तिचा गॅंगस्टर बॉस यांची झडती घेतली जाते. या वेळी पारूकडे २४ लाखांचे हिरे दडवलेला एक लायटर असतो. तो झडतीपासून वाचविण्यासाठी पारू हा लायटर पांडूच्या खिशात टाकते. त्याला याची कल्पना नसते. पांडूकडून हा लायटर पुन्हा परत मिळवण्यासाठी पारू आणि तिच्या बॉसचे साथीदार त्याच्या मागं लागतात. एकदा पारू नारळ पाण्यात गुंगीचे औषध टाकून त्याच्याकडचा लायटर मिळवण्याचा प्रयत्न करते, परंतु तो काही तिला मिळत नाही. याच वेळी पांडूचे वरिष्ठ पोलिस अधिकारी पोलिस ठाण्यावर येतात आणि गुंगीत असलेल्या पांडूची असंबद्ध उत्तरे ऐकून ते त्याची ट्रॅफिक हवालदार म्हणून बदली करतात, परंतु इथंही पांडू घोळ घालतो. पारू त्याच्या स्वप्नात येते आणि एका स्वप्नगीतामध्ये तो हरवून जातो. या वेळी सिग्नलवर ड्यूटी असतानाही तो हातवारे करायला विसरतो आणि सगळ्या वाहतुकीचा बोजवारा उडतो. या वेळी पांडूची वरिष्ठांकडून पुन्हा खरडपट्टी काढली जाते; परंतु या वेळी पांडूचं उत्तर तयार असतं. नाक्‍यावर जागोजागी लागलेल्या सिनेमांच्या पोस्टर्समुळे आपलं ड्यूटीवर लक्ष लागत नसल्याचं कारण तो पुढं करतो.

पांडूच्या खिशात असलेला लायटर त्याच्या घरी राहात असलेल्या मुक्‍या तरुणीला सापडतो. एकदा सखारामची मुलगी काडेपेटी मागायला पांडूच्या घरी येते. या वेळी ती काडेपेटीऐवजी लायटरच या मुलीच्या हातात ठेवते. हा "इम्पोर्टेड' लायटर पाहून सखारामला आश्‍चर्य वाटतं. "पांडबा हळूहळू माझ्या लाईनीवर यायला लागला वाटतं !' या शब्दांमध्ये तो आपलं आश्‍चर्य बोलूनही दाखवतो. पुढं अपघातानं त्याच्या हातामधून लायटर खाली पडतो आणि त्यातल्या हिऱ्यांचा त्याला पत्ता लागतो. हे हिरे तो आपल्याकडे दडवून ठेवतो. गावी गेलेली पांडूची आई काही दिवसांनी घरी येते. घरात पाऊल टाकण्यापूर्वीच शेजारणी त्यांना घरात आलेल्या मुक्‍या तरुणीबद्दल काहीबाही सांगतात. त्यामुळे चिडलेल्या राधाबाई तिला मारझोड करून घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात; मात्र ही तरुणी मारझोड सहन करत या घरातून बाहेर पडण्यास नकार देते. याच वेळी राधाबाई आणि पारूची भेट होते. राधाबाईंच्या रूपातून पारूला आपली आई भेटल्याचा आनंद होते. राधाबाई पारूच्या रूपात आपल्या सुनेची स्वप्नं पाहायला लागतात; मात्र आपल्या पदरी पडलेल्या तिघांचं त्या "एक गांजलेलं (पारू), एक मुकं (मुकी तरुणी) आणि एक खुळं '(पांडू) असं त्या वर्णन करतात.

पांडू आणि पारूचं प्रेम अगदी भरात आलेलं असतं. या प्रसंगात दादांनी गाण्याची चपखल सिच्युएशन तयार केली आहे.
'मी तर भोळी अडाणी ठकू, तुमच्या नावानं लावते कुकू
बाई गं केळेवाली मी सांगा, तुम्हाला शोभंल का ?...'
गाणं संपतं आणि पारूचा बॉस आणि त्याच्या साथीदारांबरोबर पांडूची हाणामारी सुरू होते. पुढं पोलिसांना त्याचा सुगावा लागून ते या बॉसला अटक करतात. इकडे सखाराम आपल्याकडचे हिरे घेऊन एका जवाहिराकडे जातो; परंतु त्याला संशय आल्यामुळे तो पोलिसांना बोलावून घेतो. या वेळी एक महत्त्वाचा रहस्यभेद होतो. पांडूच्या घरात असलेली मुकी तरुणी ही मुकी नसते. ती जवाहिराची मुलगी असते; मात्र आपल्या स्वार्थासाठी हा नराधम तिला गुंडांच्या हवाली करण्यास तयार झालेला असतो; मात्र ती त्याच्या तावडीतून सुटते आणि जीव द्यायला समुद्रावर जाते. त्याच वेळी गस्तीवर असलेल्या पांडूला ती सापडते. पांडूनं आपला एखाद्या बहिणीप्रमाणे सांभाळ केल्याचं ती सांगते. अशा रीतीनं पांडूला बहीण आणि पत्नी मिळते. सखाराम आपल्याकडून चूक झाल्याची कबुली देतो.

पांडू हवालदार हा जितका उस्फुर्त पंचेसनी व उत्कट समयसूचक विनोदांनी भरला होता तितकाच गाण्यांच्या अचूक स्पॉटसनी ठाशीव झाला होता. 'अंगात डगला कंमरला पट्टा, डोईवर निळी टोपी घातली,
हवालदारीण तुम्हा कशी वाटली ?...पांडुरंगाला रुक्माई भेटली.......'
हे गाणं असो वा 'माझ्या कुलुपाची किल्ली हरवली,कोतवाल तुमी डायरीत हि केस नाही लिवली..' हे गाणं असो, 'पांडू..' मधील सर्व गाणी सुपरडुपर हिट झाली. मराठी सिनेमातील गाण्यांनी हिंदी चित्रपटगीताच्या बरोबरीने रेकॉर्डब्रेक कमाई करण्याचे दिवस 'पांडू..'ने अधिक दृढ केले.

दादांचे आणि व्ही. शांतारामांसह अनेकांशी बऱ्यापैकी वाकडे होते. संधी मिळाली की दादा अशा लोकांचा वचपा आपल्या सिनेमात काढत असत. त्याच हिशोबाने दादांनी ‘पांडू हवालदार’मधला पांडू जेंव्हा मॅनहोलमधून गटारात जातो आणि माहीमच्या गटारातून तो जेंव्हा बाहेर पडतो तेंव्हाच्या दृष्यात दादांनी त्या पांडूच्या हाती 'पिंजरा' व 'चोळी' देऊन शांतारामांची कळ काढली होती व हे दृष्य ‘हिट’ करून चर्चेत देखील ठेवले होते. 'पांडू हवालदार'चा विषय सामाजिक आहे. चित्रपटातील पोलिस हा कायमच हास्याचा विषय आहे. दादांनी त्यालाच "टार्गेट' करून एकीकडे हशा मिळवलाय आणि दुसरीकडे सामाजिक भाष्यही ते करून गेलेत; मात्र त्यातला आशय तळागाळातल्या समाजापर्यंत पोचावा या दृष्टीनं दादा कोंडकेंनी सर्व प्रसंगांची रचना केलीय. त्यामुळे चित्रपटात अनेक द्वयार्थी संवादांचा भरणा आहे. अभिनयाच्या पातळीवर दादा कोंडकेंना तुल्यबळ लढत दिलीय ती अशोक सराफ यांनी. राम-लक्ष्मण यांचं या चित्रपटातलं संगीत कायम लक्षात राहणारं आहे. मुख्य कलाकारांबरोबर रुही, मोहन कोठीवान, गुलाब मोकाशी यांच्या छोट्या भूमिका यात होत्या. ठराविक टीम घेऊन काम करणारया कामाक्षी पिक्चर्सच्या बॅनरखालीच हा सिनेमा दादांनी काढला होता. अभिनेत्री उषा चव्हाण, पटकथा लेखक राजेश मुजुमदार, संगीतकार द्वयी राम-लक्ष्मण, पहिले जयवंत कुलकर्णी मग महेंद्र कपूर मुख्य गायक आणि उषा मंगेशकर मुख्य गायिका असा त्यांचा हमखास यशाचा फॉर्म्युला जोरात चालला आणि याच सिनेमापासून सेन्सॉरबरोबरची त्यांची भांडणे प्रसारमाध्यमात चवीने चघळली जाऊ लागली. काही दिवसांपूर्वी काही भुक्कड हिंदी सिनेमांना पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याचे कार्यक्रम मुंबईत झाले होते पण 'पांडू हवालदार'ची एक्केचाळीशी पूर्ण झाली तरी कुठे एक शब्द छापून आल्याचे माझ्या वाचनात आले नाही. असो, दादा आणि त्यांचे सिनेमे सदैव रसिकांच्या स्मरणात राहतील, त्यासाठी कुणा पेड मिडीयाची कधीच गरज पडणार नाही...

- समीर गायकवाड.