Tuesday, August 9, 2016

मुक्या 'जीवा'च्या अपेक्षा ....

ज्याचा जीव जातो त्यालाच कळतो. जिच्या पोटचा गोळा रस्त्यात दम तोडतो, तिला काय वाटते हे इतरांना काय कळणार ?जिथे बेदरकारपणे वाहन चालवून वाहनचालक हाडामासाची माणसे रस्त्यात चिरडतात. त्यांचा लोळागोळा करतात तिथे मुक्या जीवांची काय कथा ?
जीव कुणाचाही असो त्याला किंमत नसते असं आजकाल पाहायला मिळते.

अपघात झाल्यावर आपल्या वाहनाखाली आलेला जखमी आहे की मृत्युमुखी पडलाय हे पाहण्याचे कष्ट देखील आजकाल लोक घेत नाहीत.
त्यातही नव्या पिढीचे नव्या वाहनावरचे नव्या नशेतले बेफाम नवस्वार हे पूर्णतः अनावर झालेत !
दुपारी घराजवळच्या वळणावर हे कुत्र्याचे हे छोटेसे पिलू कुणाच्या तरी गाडीखाली येऊन गतप्राण होऊन रस्त्यावर पडले होते.
पिलाच्या अंगातून बराच रक्तस्त्राव झालेला असावा. मात्र रस्त्यावरचे रक्त सुकून गेले होते.
तिथून काही फुटांच्या अंतरावर त्याची करडया रंगाची आई चेहरा बारीक करून बसली होती.
तिचे सारे लक्ष त्या पिलाकडे होते. मधूनच ती येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे शोधक नजरेने पाही.
तिचे मलूल तोंड बघवत नव्हते, ती मध्येच उठून येई पिलाभोवती घिरट्या घातल्यासारखे गोल फिरे अन पुन्हा तिथे जाऊन बसे.
अपघाताची घटना घडून साधारण चारेक तास झाले असावेत.
वाहनचालक त्याच्या धुंदीत पुढे निघून गेला असावा, जिथे माणसाची कदर नाही तिथे एका कुत्र्याच्या पिलासाठी कुणाला वेळ असणार आहे ? त्या बिचाऱ्याचा काय दोष बरे यात ? कदाचित हे पिलू आडवे आले असावे असे देखील घडले असावे. मात्र मेलेल्या जीवाप्रती आपले काही उत्तरदायित्व कधीच असणार नाही का ?
मी घरी जाऊन थोडीशी चपाती आणून त्या कुत्रीला खाऊ घालण्याचा प्रयत्न केला कारण तिचे पोट एकदम खपाटीला गेले होते. शिवाय आज सकाळपासून आमच्याकडे चिक्कार ऊन पडले आहे अन ती त्या उन्हात बसून होती.
तिला खायला देऊनही ती त्याला तोंड लावायला तयार नव्हती.
त्या आईची वेडी आशा असावी की ते पिलू आता उठेल अन तिच्या जवळ येऊन बसेल, नेहमीप्रमाणे दंगामस्ती करेल, शेपूट हलवत दुध पिऊन तिच्या कुशीत झोपी जाईल !
मात्र तिला हे कोण आणि कसे समजावणार की आता त्या पिलाचे प्राण निघून गेलेत. ते कधीच उठणार नाही.
रस्त्यावरून जाणारी वाहने मध्येच थांबल्यासारखी करत आणि पुढे जात तेन्व्हा ती कुत्री अधिक कासावीस होत होती.
तिच्या मनात काय चालले आहे याचा मला थोडासा अंदाज आला आणि एव्हाना माझ्या वेड्या चाळ्यांना बघून काही लहान मुले तिथे गोळा झाली होती. त्यातल्या एकाला एक जुने फडके घरातून आणायला सांगितले.
त्या फडक्यात त्या पिलाचा तो इवलासा देह उचलून रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या गवताच्या बेचक्यात ठेवला त्यासरशी इतक्या वेळ कडेला बसून असणारी त्याची आई तिथे येऊन त्याचा रक्तबंबाळ झालेला चेहरा चाटू लागली. त्याला मनसोक्त चाटून झाल्यावर मी पुन्हा तिला खाऊ घालण्याचा प्रयत्न केला.
यावेळी मात्र तिने चपातीचा घास तोंडात घातला. मग मलाही जरा हायसे वाटले.
दोनेक घास खाऊन ती पुन्हा गवतापाशी जाऊन बसली.
तिच्या पाशी थोडी चपाती व पाणी ठेवून मी निघून आलो.
आपल्या मेलेल्या पिलाच्या अंगावरून आणखी कुठले वाहन जाऊ नये इतकी साधी अन स्वाभाविक अपेक्षा होती तिची.
एक छोटीशीच आणि रास्त अपेक्षा होती तिची !
रस्त्यात जखमी वा मृत होऊन पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांच्या अशाच भावना असतील नाही का ?
अपघातात जखमी वा मृत लोकांप्रती असणारे आपले कर्तव्य किती लोक पार पाडत असतील हे छातीठोक कुणीच सांगू शकणार नाही.
या मुक्या प्राण्यांच्या जीवाची काहीच किंमत नाही का ?
त्यांच्याही काही भावना असतात निदान त्याची तरी कधी आपल्याला जाणीव होणार की नाही ?

- समीर गायकवाड.