Saturday, August 6, 2016

मातीचे पाय....



नुकतेच गोरखभाऊ त्यांच्या पुण्यातल्या मुलाकडे काही दिवसांसाठी राहायला गेले होते. मुलाचा आणि सुनेचा त्यासाठी फार आग्रह होता, तो त्यांना मोडवला नाही. खास गोरखभाऊंच्या एका सवयीसाठी त्यांच्या पत्नी भामाकाकू सोबत गेल्या होत्या. हे दोघे लेकाकडे पुण्याला गेले खरे पण त्याना धास्तीच होती, की पुढे कसे होणार ?
त्याचे कारणही तसेच होते ते म्हणजे भाऊंचे तपकिरीचे अफाट व्यसन. ते कुठेही आणि कधीही सुरु होई. बोलता बोलता, बसल्या बसल्या हळूच तपकिरीची स्टीलची छोटीशी डबी उघडून उजव्या हाताच्या अंगठा आणि तर्जनी यांच्या चिमुटीत ते करड्या रंगाची तपकीर नजाकतीने घ्यायचे, आणि हळूच एका नाकपुडीला दुसरया हाताच्या तर्जनीने दाबून उजव्या नाकपुडीत तपकीर अलगद सरकवून द्यायचे. मग डाव्या नाकपुडीची पाळी येई. दोन्ही नाकपुड्यात तपकीर घालून झाली की एक मोठा दीर्घ श्वास घ्यायचे. तपकीर ओढून झाली की घसा खाकरणे ओघाने आलेच. 'घ्रघ्रख्रख्र' असा काहीसा खर्जातला पण जाडा भरडा आवाज असायचा. मग मोठ्याने खारखुर खाकरून होई. तोवर त्यांच्या गप्पाष्टकात सामील असणारी आजूबाजूची माणसे हा तपकीर सोहळा आ वासून पहात बसायची. तर असे हे तपकीर शौकीन गोरख भाऊ त्यांच्या मोठ्या मुलाकडे विश्वंभरकडे म्हणजे विशूकडे हौसेने आले होते...

'मोठ्या कंपनीत तालेवार पदावर आपला पोरगा आहे आणि त्याचे फार मोठे दिमाखदार घर आहे' हे आपण सारया गावाला मिशीवर पीळ देत नाकपुड्यात तपकीर भरत भरत सांगितले आहे, तेंव्हा त्याने अनेक वेळा आग्रह केल्यावर एकदा का होईना त्याच्याकडे जाऊन यायला पाहिजे ही त्यांची यामागची भावना होती. आपली तपकिरीची सवय कुठे आड येऊ नये यासाठी थोडी खबरदारी आणि थोडा त्याग करायची मनाची तयारी त्यांनी केली होती. अनुराधा ही देखणी आणि हुशार सुनबाईही विश्वंभरसोबत त्यांच ऑफिसमध्ये कामाला होती. दोघे मिळून बाहेर पडायचे आणि मिळून घरी यायचे. ते दोघे व त्यांचा दहा वर्षाचा मुलगा भानू अशी तीनच माणसे त्या फ्लॅटमध्ये रहायची. भव्य इमारतीत सातव्या मजल्यावर चक्क चार बीएचकेच्या प्रशस्त आरामदायी फ्लॅटमध्ये ते राहायचे. लिफ्ट दारालगतच होती, जिने चढण्या उतरण्याचा प्रश्न नव्हता. इतक्या मोठ्या घरात तीनच माणसे होती आता हे दोघे तिथे काही दिवसांसाठी मुक्कामी आले होते.

त्यांचे सुरुवातीचे एक दोन दिवस घरात बसून राहण्यात गेले. तिसरया चौथ्या दिवशी म्हणजे शनिवारी- रविवारी शनिवारवाडा, पर्वती एका दिवशी अन दुसरया दिवशी देहू आळंदीचे दर्शन घेऊन झाले. अजूनएक दिवस असाच उनाड गेला, त्यादिवशी गोरखभाऊना राहवले नाही. खाली जाऊन फिरून येतो म्हणून तासाभराने परत आले. खरे तर लिफ्ट म्हणजे त्याना एक गंमत झाली होती आणि सहजपणे खालीवर करत त्यानंतरच्या दिवशी पाचसहा वेळा त्यांनी खालीवर केले. त्या लक्झरीयस अपार्टमेंटच्या बागेमध्ये, लॉन मध्ये जाऊन आले. अपार्टमेंटच्या थेट बाहेर जायच्या दाराशी जाऊन आले. घाईने परत वर आले. सत्यभामेच्या कानात काहीतरी पुटपुटले त्यामुळे त्या जरा गोंधळल्या. संध्याकाळी विश्वंभर घरी आल्याआल्या तो भाऊना म्हणाला की ,स 'आईवर एकटीवर असं घर टाकून जाणे योग्य नाही.' ते बाहेर गेलेले त्याला कसे कळले , सीसीटीव्ही कसां असतो आणि वॉचमनचे काय काम असते हे सर्व त्याने भाऊना सांगितले. या प्रकारामुळे भाऊ थोडेसे हिरमुसले. आईवडिलांना खाली जायला अडचण नको म्हणून त्याने दुसऱ्याच दिवशी ऑफिसमधल्या एक मुलाला गोपीला अटेंडंट म्हणून घरी ठेवला. त्याला यांच्यापाठीशी रहायला सांगितले. घराकडे लक्ष द्यायला सांगितले.

मुलगा सून दिवसभर कामामुळे बाहेर राहत अन दहा वर्षांचा नातू भानू चार वाजेपर्यंत शाळेत. शाळेतुन आला की तो हातात डबडे घेऊन बसतो किंवा डबड्यात तोंड घालून बसतो. शेजारी पाजारी जावं म्हटलं तर त्यांची दारे सदानकदा बंद. म्हातारी कोतारी माणसे खाली भेटतात पण सारी तोंडावरुन इस्त्री फिरवल्यासारखी वाटायची. सोसायटीत मंदिर होते पण तिथे यांचा जीव लागत नव्हता. त्या दोघाना तिथे गुदमरून गेल्यासारखे होऊ लागले. पुढच्याच दिवशी लेक सून घराबाहेर पडल्यावर भाऊ आणि काकू गोपीसोबत खाली आले. थेट मेन गेटपाशी आले आणि गेटवरच्या सिक्युरिटी गार्डशी त्यांनी संवाद झाडला. इतक्या मोठ्या माणसाचे वडील पायी चालत जाऊन मेनगेटवरच्या वॉचमनशी बोलताहेत हे दृश्य तिथे प्रथमच घडत असावे, त्यामुळे तिथल्या उपस्थितांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. वॉचमनशी कुजबुज झाल्यावर ते तिघे गेट बाहेर आले. काही वेळाने गोपी एकटाच फ्लॅटवर परतला. भानू शाळेतुन यायच्याआधी भाऊ आणि काकू देखील फ्लॅटवर परतले. विश्वंभर घरी आल्याबरोबर गोपीने दिवसभरात झालेली घडामोड त्याच्या कानावर घातली आणि तो निघून गेला. गोपीच्या सांगण्याला त्याने फारसे मनावर घेतले नाही. त्याच्या दुसऱ्यादिवशीही परत हाच प्रकार घडला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत विश्वंभरने भाऊना सांगितले की आपल्या तळमजल्यावरच्या कॉमन हॉल मध्ये रात्री एका स्नेहमेळावा वजा छोट्याशा कार्यक्रमात जायचे आहे, तेंव्हा भाऊ आणि आई दोघांनीही आवरून तयार व्हावे. अंधार गच्च झाला तसे ते सगळेच छानपैकी आवरून खाली आले. हॉलमध्ये पोहोचले. समोरच्या मंचावर काही लोक होते आणि बाकीचे लोक मस्त ऐटदार खुर्च्यात बसले होते. तो त्या अपार्टमेंटच्या सोसायटीचा कार्यक्रम होता. विश्वंभरने अगदी अभिमानाने आणि आनंदाने आपल्या आईवडिलांना नंतर मंचावर नेले आणि सगळ्याशी ओळख करून दिली. ती गर्दी आणि दिमाखदार कपड्यातली माणसे बघून दोघेही कावरेबावरे झाले होते आणि त्यांचवेळेस मुलाबद्दलचा त्यांचा अभिमान द्विगुणीत झाला होता. बोलणं संपलं. जेवण सुरु झाले, उभ्या उभ्याने खाणे आपल्याला जमणार नाही हे त्यांनी ताडले व ते त्यांनी सुनबाईला बाजूला घेऊन सांगितले. तिनेही त्यांचे मन ओळखून फारसा आग्रह केला नाही. जवळच्याच मेजापाशी खुर्च्या टाकून त्यांची जेवणाची व्यवस्था तिने केली. पण एव्हढ्या सर्व माणसात ती दोघेच बसून जेवत असल्याने त्यांना अवघडून गेल्यासारखे झाले. नंतर भाऊ आणि भामा काकू आपल्या मुलाचे-सुनेचे जेवण होईपर्यंत त्याच कोपरयात बसून सगळ्यांना निरखीत राहिले. बसल्या बसल्या एक गोष्ट भाऊंच्या लक्षात आली ती म्हणजे त्यांच्या जवळून जाणारी माणसे नाक वेंगाडून किंवा नाकपुड्या बंद करून जात होती. मंचावर आधी रुबाबात बोलणारा एक तरुण सुटाबुटातला मुलगा त्यांना अगदी खेटून गेला तेंव्हा त्याने तर एरंडेल पिल्यासारखा चेहरा केला. तिथून तो तडक विश्वंभरकडे गेला आणि त्याने भाऊ- काकू कडे बघत बघत त्याच्या कानात काहीतरी कुजबुज केली तसं विशुचा चेहरा पडला. लांबून बघणारया गोरखभाऊंच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही....

सकाळ झाली,सर्व गप्पा टप्पा झाल्या. नाश्ता झाला. विशू ऑफिसला जाण्यापूर्वी भाऊंच्या जवळ आला आणि म्हणाला “एक विचारू का भाऊ ? रागावणार तर नाही ना ?”.भाऊ म्हणाले, ”अरे विचार की त्यात काय एव्हढे ?”
“भाऊ तपकीर खाणे का सोडत नाही तुम्ही ?”
तत्काळ भाऊंनी अंदाज लावत प्रतिप्रश्न केला, “रात्रीच्या त्या सुटाबुटातल्या पोराने तुला यावर काही तरी सुनावले वाटते, त्यामुळेच तु हे विचारतोस ना ?”
भाऊंच्या या सवालाने गांगरून गेलेल्या विशूने संध्याकाळी या विषयावर पुन्हा बोलू असे सांगत पाय काढता घेतला. ते ऑफिस मध्ये जाताच भाऊ, काकु दोघेही गोपी सोबत बाहेर निघाले, या वेळेस त्यांच्या हातात एक मोठी पिशवी होती. ती पिशवी भामाकाकूंनी आपल्या पोटाला गच्च लावून धरली होती. सलग दोन दिवस असंच घडत राहीलं. त्यानंतर शुक्रवारी विशू आणि सुनबाई भाऊ व काकुना ऑफिसमध्ये घेऊन गेले. ते चकचकीत ऑफिस बघून त्या मायबापांचा उर भरून आला. त्यांनी मायेने मुलाला आणि सुनेला सगळ्याच्या समोर कवटाळले. पण ऑफिसमध्ये शिरल्यापासून ते परत गाडीत बसेपर्यंत त्याना लोकांच्या नाके मुरडण्याचा अनुभव परत आला. आता भाऊ आणि काकू देखील थोडेसे कंटाळले होते.

त्यानंतरच्या रविवारच्या रात्री भीमाशंकरला जाऊन आल्यावर भाऊ विशूच्या खोलीत गेले आणि म्हणाले 'गावाकडे आपले मन ओढ घेतेय आणि इथे आता करमत नाही, तेंव्हा आम्हा म्हातारा-म्हातारीला गावाकडे पाठवायची सोय कर बाबा...'

सकाळी विशू आणि सुनबाई या दोघांजवळ बसून विनवत होते की आणखी काही दिवस तरी थांबले पाहिजे. तेंव्हा भाऊ म्हणाले, “अरे आपल्या गोठ्यातली गाय, चुलीवरच्या मातीने सारवण केलेल्या पातेल्यातली गरम दुधावरची साय, आपल्या गावाकडच्या देवळातले इठू-रुखमाई, शेतशिवारातली काळी आई, पारावरची पिंपळकळा आणि गावातला गोतावळा ही सगळी माझ्या स्वप्नात येत्येत. पोरा मला आडवू नगंस.. मला जायला पाहिजे.”

महिना दीड महिना राहतो म्हणून आलेले आई वडील असे अचानक निघाल्याचा हट्ट करू लागल्याने त्या दोघाना वाईट वाटले. पण विशूला भाऊंचा स्वभाव माहिती असल्याने त्याने फारसा आग्रह केला नाही आणि त्याच्या दुसरयाच दिवशी त्याच्या कारमधून त्याने आईवडीलांना गावी पाठवायचे नक्की केले. भाऊनी कारमध्ये बसण्यापूर्वी एक जाड लालसर नाणे आपल्या नातवाच्या हातावर ठेवले आणि त्याला सांगितले की, ‘हा माझ्या लहानपणीचा ढब्बू पैसा आहे, तुला देतोय आठवण म्हणून. जपून ठेव’. प्रवासात मदत व्हावी म्हणून विशूने आईवडिलांसोबत गोपीला दिमतीला दिले. संध्याकाळी ते सगळे गावी सुखरूप पोहोचले आणि त्यांचा निरोप घेऊन, पुढल्या खेपेस मुक्कामाला राहायचे वचन देऊन गोपी पुण्याला परतला..

महिनाभर मुलाकडे राहायला गेलेले भाऊ दहाबारा दिवसात परतल्यामुळे गावाकडच्या घरी थोडी कुजबूज झाली नंतर पुन्हा जे ते ज्याच्या त्याच्या कामात गुंतून गेले.
भाऊंना गावी परतून आता आठवडा उलटला होता. त्यातच एके दिवशी एसटीबसने हायवेवर उतरलेल्या दोन व्यक्ती गावात पायी चालत आल्या. पारापाशी येऊन त्यांनी भाऊंच्या घराचा पत्ता विचारला तसे तिथे बसलेल्या रिकामटेकड्या पोरांनी त्याना भाऊंच्या वाड्यापाशी नेऊन सोडले. ते दोघे कसल्या तरी अनामिक घाईत चालत होते, केंव्हा एकदा भाऊंचे घर येते असं त्यांना वाटत होते. अखेर ते भाऊंच्या घरी पोहोचले. तिथे पोहोचताच, दारात उभ्याउभ्या त्या दोघांच्या डोळ्यातून अश्रूंच्या तरळले. त्याना दारात उभे बघून लगबगीने भामाकाकू दारापाशी गेल्या. भामाकाकू दारापाशी येताच त्या दोघांनी त्यांच्या पायावर डोके ठेवले. दारातली कुजबुज ऐकून गोरखभाऊ देखील तिथे आले. भाऊना बघताच त्या दोघांचा संयम सुटला व त्यांनी भाऊंना मिठी मारली. त्या दोघांनाही भाऊनी कवेत घेतले. शांत केले आणि ढेलजेत बसवले. क्षेमकुशल विचारले. हातपाय धुऊन झाल्यावर त्यांची जेवणं आटोपली. भाऊंनी त्यांना शेत शिवार दाखवून आणले. सकाळी उठून देवळात नेऊन आणले. सगळा जामानिमा आटोपला. नंतर मला त्यांचा फोन आलेला, “बापू, गावाकडे ये, दोन पाहुणे आलेत त्याना इंद्रायणीने पुण्याला पाठवण्याची व्यवस्था करून ठेव." मग त्यांची नावे विचारून मी तिकिटे काढली आणि मी गावाकडे निघालो....

आधी भाऊंच्याच घरी गेलो. तिथे अगदी सामान्य कपडयातल्या दोन प्रौढ व्यक्ती माझी वाट बघत होत्या त्यांच्याशी आधी औपचारिक बोलणी झाली. नंतर त्याना घेऊन मी सोलापूर स्टेशनवर आलो. त्याना रेल्वेने पुण्याला पाठवले. भाऊना प्रश्न विचारलेले आणि फालतू चौकशा केलेल्या आवडत नसत. 'पाय धु म्हटले तर साखळ्या केव्हढयाच्या विचारू नये' असे ते नेहमी सुनावत. तसेच त्यांच्या फटकळ बोलण्याला सगळे दचकून असत. म्हणून मीही फारसे प्रश्न न विचारता हे पाहुणे कोण कुठले, कशासाठी आले, कधी आले असले सवाल केले नाहीत. पडत्या फळाची आज्ञा म्हणून सर्व काम चोख पार पाडले....

काही कालावधीनंतर एका प्रसन्न सकाळी विश्वंभर आईवडिलाना भेटण्यासाठी गावी आला. त्याने आणलेली मिठाई आणि फळे आल्याबरोबर वहिनीच्या हाती दिली व तो भाऊंच्या-आईच्या पाया पडला. न्याहरी झाली. औपचारिक क्षेमकुशल विचारून झाले आणि ढेलजेत बसल्या बसल्या त्याने पाठ टेकवली तोच त्याचे लक्ष भिंतीवर टांगलेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या नव्या कोरया फ्रेमकडे गेले. हा फोटो तर पूर्वी घरात नव्हता, मग इथे कधी आला ? आपण पुण्यात असताना भाऊना दगडूशेटच्या मंदिरात नेले होते पण तिथे हा फोटो घेतला नव्हता मग हा फोटो इथे कुठून आला ? त्याचे कुतूहल चाळवले आणि त्याने भाऊंना हाक दिली.घाबरत घाबरतच फोटोबद्दल विचारले....

भाऊ विश्वंभरच्याजवळ येऊन बसले. स्टीलची डबी काढून दोन्ही नाकपुढ्यात तपकीर भरली आणि बोलू लागले, “ त्याचे काय आहे विशू, की तु आणि सुनबाईनी आम्हावर अपार माया केलीत, प्रेम केलेत, आदर राखला, मान दिला पण तिथं आमचं दोघांचं मन रमलं नाही.पण सातव्या मजल्यावरच्या त्या घरात सोन्याच्या दोरखंडाच्या शिक्यात टांगलेल्या मटक्यासारखी आमच्या जीवाची अवस्था झाली होतं. चहूबाजूला बांधल्यागत होतं, कुठं हलायला सुद्धा जागा नव्हती. तिथं माणसंदेखील एकमेकाशी बोलत नव्हती. मग मी त्या पाळण्यातल्या – लिफ्टमधल्या माणसाशी दोस्ती केली. तो तुमच्या सगळ्याशी इंग्रजी- हिंदीतुन बोलतो पण माझ्याशी तो मराठीतूनच बोलतो. तो मराठी माणूस आहे, पोट भरायला पुण्यात आलेला आहे. तुमच्या गेट वरचा वॉचमन- सिक्युरिटी गार्ड असलेला माणूस तर आपल्या जिल्ह्यातला निघाला. मला गोपीने सांगितले की वॉचमन, लिफ्टवाला, गार्ड, ड्रायव्हर अशा लोकांशी मोठे साहेब लोक आणि त्यांच्या घरातली माणसे बोलत नसतात. कुणी त्यांच्याशी बोललंच तर त्याला गावंढळ समजतात. मी मात्र ते ऐकले नाही. गोपीला बरोबर घेऊन काळ्या पत्थरातलं शाळीग्राम दगडाचं विठू-रुखमाईचं जवळचं देऊळ हुडकून काढलं. तुमच्या इथल्या पांढरयाफेक मऊशार संगमरवरी दगडात मला कुठे देवच दिसेना यात माझा काय दोष ? आम्ही देऊळ शोधले खरे पण तिथेही मन लागेना. शेवटी ह्या साध्यासुध्यां गरीब माणसातला देव आम्ही जाणला. त्यांच्याशी स्नेह वाढवला. तुझ्या सोसायटीच्या गेटवरच्या माणसाची आई दोन महिन्यापूर्वी वारलीय. त्याची मुले आईजवळ गावाकडे होती. ती त्याने पुण्यात हवापालटासाठी आणली होती. पण आजीच्या मायेला आसुसलेली ती पोरे तिथे राहत नव्हती. मग एके दिवशी त्याने त्याच्या घरी आम्हाला न्हेले, तुझ्या आईला बघून आपल्या सत्यभामेला बघून ती नातवंडे अशी काही बिलगली की काही सांगू नको ! नंतर हिने तुम्हाला देण्यासाठी गावाकडनं आणलेला फराळाचा डबा त्यांना दिला. आजीच्या हातचे खाऊन ती पोरे शांत झाली आणि त्या माणसाने तुझ्या आईला आपली आई मानले. त्याचे मनावरचे ओझे हलके झाले. दुःख थोडे का होईना हलके झाले. तो लिफ्टमधला शांताराम तर अगदी भला माणूस आहे. त्याची फार घालमेल होत होती पण त्याने त्याची कथा सांगताच माझे मन पाझरले. त्याचे वडील गावाकडे आजारी होते, त्याचा भाऊ मोलमजुरी करतो. कशीतरी हातातोंडाची गाठ पडते. वडिलांच्या इलाजासाठी त्याला तातडीने पैशाची फार गरज होती. त्याला फायनान्सचे पैसे मिळणार होते पण त्याला बराच वेळ लागत होता. त्याची ही नड ऐकून तुझ्या आईने आणि मी जे पैसे पुण्याला जाताना वरखर्चासाठी म्हणून नेले होते ते सगळे त्याच्या हवाली केले आणि तुझ्या आईने तिची एक पाटली त्याच्या हातावर टेकवली. यावर तो काय रडला आणि किती रडला म्हणून सांगू विशू तुला ?”

इतक्या वेळ शांत ऐकत बसलेला विशू काहीशा रुक्षपणे म्हणाला, “काही लोक असेच असतात.भोळी माणसे बघून लगेच तोंड वासतात, शेवटी घातला ना गंडा त्यांनी तुम्हाला ?”
“गप बैस, एक अक्षर बोलू नकोस.” भाऊ गरजले. “ तुझी मोठी माणसे बघितली मी. त्याना माझा तपकिरीचा वास सुद्धा सहन झाला नाही. त्यांनी माझ्या कपड्याचा वास घेतला. आम्हाला जवळ केले नाही, घृणा केली आमचे फक्त बाह्यरूप बघितले. आणि ह्या दोघांनी आमच्या दोघांच्या अंतरंगाचा वास घेतला. आम्ही त्यांच्यात देव बघितला. मदतीचा हात पुढे केला, आणि आम्ही गावाकडे आल्यावर काही दिवसातच शांतारामला पैसे मिळताच त्याने गहाण टाकलेली तुझ्या आईची पाटली आणि त्याला दिलेले पैसे परत आणून दिले. आम्ही फक्त पाटली परत घेतली, पैसे त्याला गोड बोलून परत देऊन टाकले. त्याचे वडील आता बरे झालेत. दिवाळीला ते तुझ्या आईकडे येणार आहेत भाऊबीजेसाठी. वॉचमनला तुझ्या आईने फडताळावरचा मोठा पितळी डबा भरून वाळवण आणि लाडू दिलेत. त्या दोघानीच हा फोटो आपल्याला भेट दिलाय. दोघंही आल्या आल्या खूप रडले मात्र जाताना दोघेही समाधानी होऊन गेले. पैसा काय आज आहे उद्या नाही. माणसे जोडली पाहिजेत विशू !!”
"अजून एक सांगतो. राग येऊ देऊ नकोस. तुझ्या पोराला हातातल्या आणि डोळ्यापुढच्या डबड्यातुन बाहेर काढ. पोरगं बोलतच नाही. खेळतसुद्धा नाही. तु सुद्धा तो काय मागेल ते देत राहतो. त्याला मागेल त्या वस्तू देऊ नकोस. माया दे, प्रेम दे..वस्तूची किंमत शिकव. मी तिथून येताना अप्पांनी मला दिलेला ढब्बू पैसा त्याच्या हातावर ठेवला आहे, आठवण म्हणून जपून ठेवायला सांगितला आहे, त्याने जपला असेलच. त्या पैशात मायेची ऊब आहे. तु त्याला सांग पूर्वी ढब्बू पैशात काय येत होते आणि केव्हढयाला काय येते तेही सांग. त्याला भावमोल सांगत जा. पोरासाठी तू एव्हढं करंच !'

"शेवटी अजून एक तुझ्यासाठी सांगतो, तु लहानाचा मोठा गावात झालास. नेटाने शिकलास मोठा माणूस झालास. तु प्रामाणिक आहेस, आम्हा सर्वांवर माया करतोस. पण तुला इथून पुण्यात जाऊन आठ-नऊ वर्षे झाली पण गावातला कुठला माणूस ओढ लागून तुझ्या मागे आला आहे का ? पण मी पुण्यात दहा-बारा दिवसच होतो तर तिथली कोण कुठली दोन भली माणसे मला हुडकत हुडकत आपल्या आडवळणाच्या गावाला वाट वाकडी करून आली की नाही ? या गोष्टीचा तू जरा निवांत विचार कर ..... माझी आणि तुझ्या आईची तुम्हा दोघा नवराबायकोबद्दल काही तक्रार नाही. उलट तुम्ही शहरात जाऊनसुद्धा तुमचे आमच्यावरचे प्रेम कणभरही कमी झाले नाही याचा मनापासून आनंद आहे. पण मी सांगितलेल्या एव्हढया दोन गोष्टी ध्यानात ठेव. मग तुला आयुष्यात कुठे अडचण येणार नाही. तू आभाळाएव्हढा मोठा झालास तरी तुझे पाय मातीचे राहावेत हीच माझी धडपड..“

भाऊनी सांगितलेले शब्द न शब्द विश्वंभरच्या डोक्यात घुमत होते. हे आपल्याला कसे जमले नाही आणि कसे उमगले नाही याचे मात्र त्याला कोडे पडले होते. आता यावर कसं वागलं पाहिजे असा विचार करत करत त्याने गावातून जड मनाने आईवडिलांचा निरोप घेऊन पुण्याच्या दिशेने प्रवास सुरु केला .....

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment