Sunday, August 28, 2016

'उंबरठा' आणि स्मिता पाटील ....एक सिंहावलोकन ...एखादी मध्यमवर्गीय मराठी गृहिणी घराचा ‘उंबरठा’ ओलांडून अनाथ महिलाश्रमाच्या सामाजिक कामात उतरते, तेथील गैरप्रकार चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला स्वत:च्या कुटुंबातून व समाजातून किती प्रकारचा विरोध होतो हा एका स्त्रीच्या बंडखोरीचा विषय डॉ. पटेल यांनी ‘उंबरठा’ चित्रपटातून मांडला होता. स्मिता पाटीलच्या अभिनयशक्तीचा कस या चित्रपटातून दिसून आला. या चित्रपटाची मूळ कल्पना शांता निसळ यांच्या 'बेघर' या कादंबरीवरून घेतली होती. याच कादंबरीवर वसंत कानेटकर यांनी ‘पंखाला ओढ पावलाची’ हे नाटक लिहिले होते. एकाच वर्षी 'अर्धसत्य' आणि 'उंबरठा' अशा दोन टोकाच्या सिनेमांना तितक्याच समर्थपणे पेलणारया स्मिताचा 'उंबरठा' हा मास्टरस्ट्रोक होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही...'सुलभा महाजन' (स्मिता पाटील) ही घराच्या चार भिंती बाहेर पडायचे स्वप्न पाहणारी एक स्वतःची वेगळी विचारसरणी असणारी मध्यमवयीन स्त्री आहे. तिचे स्वतःबद्दल, कुटुंबाप्रती आणि समाजाविषयी स्वतंत्र, वेगळे व आधुनिक दृष्टीकोन आहेत. एक नागरिक म्हणून वेगळी जबाबदारी घ्यायची तिची तयारी आहे. बाहेरच्या जगात पुरुष आपल्या स्त्रियांशी दुराचार करतात, त्यांच्यावर पुरुषी वर्चस्व दाखवतात, त्यांच्या विचाराची गळचेपी करतात. हे सगळं सुलभा तिच्या संवेदनशील मनाने बघत असते. त्यातूनच तिला समाजाविषयी आणि त्यातही अशा शोषित स्त्रियांविषयी काहीतरी करावे अस मनापासून वाटत असते. सुलभाचा पती 'सुभाष महाजन' (गिरीश कर्नाड) हा पेशाने वकील असणारा समजूतदार मध्यमवर्गीय,पांढरपेशी व्यक्ती आहे. सुलभाच्या आग्रहापुढे तो शेवटी नमते घेतो आणि सुलभा नोकरीसाठी बाहेर पडते. सुलभाच्या पुराणंमतवादी सासूची (कुसुम कुलकर्णी) देखील या गोष्टीला फारशी आडकाठी नसते, पण तिची जाऊ 'माया' (आशालता बाभगावकर) ही मात्र सुलभाला यासाठी पाठिंबा देते. इतकेच नव्हे तर ती सुलभाच्या एकुलत्या एक मुलीला म्हणजे 'राणी'ला मायेने सांभाळायचे आश्वासन देते.

संगमवाडी या दुर्गम गावात एक महिला सुधार गृहात सुलभा अधीक्षक म्हणून रुजू होते. महिलांचे पुनर्वसन करायचे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे हे दोन हेतू तिच्या डोक्यात असतात. त्यासाठी ती नवनवीन उपक्रम राबवते. बेशिस्त महिलांमध्ये शिस्त आणू पाहते पण यातूनच उलट सुलट घटना त्या सुधारगृहात घडत राहतात. सुधारगृहात चालणारे अनितिक धंदे ती उघडकीस आणते, तिथला अन्याय आणि महिलाना दिली जाणारी वागणूक याविषयी आवाज उठवते. तिला वाटते की आपण रास्त काम करतो आहोत. परंतु प्रत्यक्षात घडते वेगळेच, तिच्या या आदर्शवादी कारभारामुळे व्यवस्थापन समितीतले सर्व सदस्य तिच्या विरोधात जातात.

व्यवस्थापन समिती आपल्या विरोधात गेली असली तरी महिला सुधारगृहातील महिलांचा आपल्याला मनापासून पाठिंबा आहे हे सुलभाला ठाऊक असते त्यामुळे ती तिच्यावरील दबावाला भिक घालत नाही. उलट सुधारगृहातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी अनुदान थांबवण्याचा प्रस्ताव पाठवते. सुधारगृहातील एका मुलीचा विवाह लावून देते, महिलांसाठी शिक्षण वर्ग सुरु करते. त्यांचदरम्यान आमदार बने (रवी पटवर्धन) यांच्या वासनेचे शमन करण्यासाठी सुधारगृहातील महिलांचा होत असलेला वापर ती उजेडात आणते. यामुळे मात्र सगळे व्यवस्थापन समिती सदस्य तिच्यावर प्रचंड खार खाऊन असतात. याचकाळात सुधारगृहातून दोन महिला पळून जातात, खरे तर त्यांना या नरकयातनेतून बाहेर पडायचे असते. पण नियतीला ते मंजूर नसते. त्यांना शोधून काढून जाणीवपूर्वक आणि दबावतंत्र वापरून सुधारगृहात परत आणले जाते. तिथे परत आल्यावर इतर महिला त्या दोघींची खिल्ली उडवू लागतात आणि आपल्या अपमानाने व्यथित झालेल्या त्या दोघीही स्वतःला जाळून घेतात आणि आत्महत्या करतात. या घटनांमुळे एकच गदारोळ उडतो, व्यवस्थापन समितीला सुलभाच्या विरुद्ध आयते कोलीत हाती लागते. सुलभाच्या विरुद्ध वर्तमानपत्रातून बातम्या छापून येतात. प्रशासन तिच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उभे करते. या सर्वाची परिणती सुलाभाच्या प्रशासकीय चौकशीत होते. तिला राजीनामा द्यावा लागतो. ती संगमवाडीहून तिच्या घराकडे परत निघते....

ती घरी परत येते तेंव्हा तिच्या असं लक्षात येते की ती जातानाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात कमालीचे अंतर पडले आहे. तिची जाऊ माया तिचे आनंदाने स्वागत करते. पण तिच्या सासूच्या चेहरयावर मात्र फारसा आनंद दिसत नाही. घरी परतल्याच्या एक दोन दिवसातच तिला लक्षात येते की तिच्या अनुपस्थितीत सुभाष दुसऱ्या एका स्त्रीमध्ये मनाने आणि शरीराने गुंतला आहे. खरे तर घराबाहेरील जगाने तिच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित केले त्यांमुळे विमनस्क अवस्थेत घरी परतलेल्या सुलभाला घरी राहायचे असते. पण आपली मुलगी राणी जी आता मोठी झालीय ती आपल्या काकीलाच आई म्हणत्येय आणि खरया आईशी मात्र अंतर ठेवून वागत्येय याचा तिला धक्का बसतो. त्याहून मोठा धक्का सुभाषच्या प्रतारणेचा बसतो. आपल्या अनुपस्थितीत आई आणि बायको या दोन्ही नात्यांची अशी स्पेस भरून निघणे तिला अपेक्षित नसावे. मात्र या सर्व घडामोडीमुळे ती खचून जात नाही अन मनाशी ठाम निश्चय करून ती घराचा 'उंबरठा' परत एकदा ओलांडते. यावेळेस पुन्हा घरी न परतण्यासाठी ती बाहेर पडते. तिच्या आत्मशोधासाठी ती बाहेर पडलेली असते... ती रेल्वेत बसून विचार करते आहे आणि तिचा अनामिक दिशेने प्रवास सुरु आहे या दृश्यावर सिनेमा संपतो.....

काही वर्षांपूर्वी ‘उंबरठा’ चित्रपट पुन्हा एकदा पाहिला तेव्हा तो आणखी भावला, अजूनही तो मनात खोल रुतून बसला आहे. आजही त्यावर विचार करावासा वाटतो. स्मिता पाटीलसारख्या समर्थ अभिनेत्रीने आपल्या खांदयावर मुख्य भूमिकेची जबाबदारी सार्थ पेलली आहे. निराधार महिलांचा ज्वलंत प्रश्‍न यात प्रभावीपणे हाताळताना विजय तेंडुलकरांचे दमदार कथानक, जब्बार पटेलांचे प्रभावी दिग्दर्शन, हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेली मोजकीच पण अर्थपूर्ण आणि कर्णमधुर गाणी, जोडीला दिग्गज कलाकारांचा कसदार अभिनय अशा सर्व जमेच्या बाजू असल्याने हा चित्रपट अनेक पुरस्कार मिळवून गेला.

समाजकार्य करणारी प्रभावी व्यक्तिमत्त्वाची सासू, एकुलत्या एका मुलीवर स्वत:च्या मुलीप्रमाणे प्रेम करणारी मोठी निपुत्रिक जाऊ यांच्यामुळे मनाचा कोंडमारा झालेली नायिका आपल्या मनाची कोंडी सोडवू शकत नाही. निराधार महिलांचा प्रश्‍न ती तिथे आश्रमात राहूनही न सोडवू शकल्यानेपराभवाचे शल्य, नवरा आणि मुलगी यांच्या आठवणीने आलेली स्त्रीसुलभ अस्वस्थता, घरी परतल्यावर नवरा दुसर्‍या स्त्रीशी संबंध ठेवून आपले सुख शोधतो आहे यातून झालेली फसवणूक, मुलगी काकूलाच आई समजून रमली आहे त्यामुळे नात्यांची झालेली कुचंबणा, घरातील स्थान डळमळीत झाल्याने अचानक आलेले विस्थापिताचे भाव हे सगळे स्मिताने इतक्या प्रचंड ताकदीने उभे केले आहे की प्रेक्षक दिग्मूढ होऊन जातो. वसतिगृहातील महिलांची सेक्सविषयक भूक आणि शरीरसुखाविषयी त्यांच्या मनातील कल्पना याचीही ओझरती हाताळणी जब्बार पटेलांनी यात केली आहे. या महिलांची भाषा, त्यांची देहबोली, त्यांच्यातला हिंस्त्रपणा, त्यांचे ममत्व आणि सरतेशेवटी स्त्रीत्वाची त्यांना असलेली किळस ! या सर्व बाबींवर काहीही भाष्य न करता 'उंबरठा' मूकपणे प्रेक्षकांच्या डोक्यात घणाचे घाव घालत राहतो. सामाजिक संस्थांचे रुपांतर भ्रष्टाचाराच्या कुरणात कसे झाले आहे आणि राजकारण्यांचा गुन्हेगारीशी असणारा नेक्सस समाजसेवी यंत्रणांना कसा पोखरून काढतो आहे यावर अत्यंत टोकदार कटाक्ष हा सिनेमा टाकतो. स्मिताची 'सुलभा महाजन' प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडते.....'सुन्या सुन्या मैफलीत माझ्या....' या गाण्याचा शेवट होताना स्मिता पाटीलचे पाण्याने भरलेले डोळे काही केल्या पिच्छा सोडत नाहीत !! हे पाणी भरले डोळे पाहून प्रेक्षकाच्या डोळ्याच्या कडा पाणावतात. पुरुषी दबाव तंत्राच्या सामाजिक रचनेवर हा सिनेमा नकळत भाष्य करून जातो...

पुरुषसत्ताक व्यवस्थेतून स्त्रीचं प्रचंड दमन झालं आहे, हे आपण कुणीच नाकारू शकत नाही. स्त्रिया आज सर्व क्षेत्रांत पुढे आहेत हे खरं असलं; तरी तुलनेने त्या फक्त मोठ्या शहरातच पुढे आहेत, हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे स्त्री-चळवळ आज रिलेव्हंट आहे का याचे उत्तर शोधावे लागते. स्त्रीकडे कसं बघायचं यापाशी तर पुरुष अडतातच, पण स्त्रीला स्वायत्तता देताना तर त्यांची फारच गोची होते. पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये बहुतेक ठिकाणी संस्थात्मक व्यवहारात पुरुषच केंद्रस्थानी होते; आहेत. घरातही प्रमुख नवराच असतो. त्यामुळे दुर्दैवाने या पुरुषांनी मोकळीक दिल्याशिवाय स्त्रीला पुढची पावलं टाकता येत नाहीत. ही स्वायत्तता पुरुषाच्या मनाविरुद्ध मिळवायची असेल, तर मग लग्नावर घाला घालावा लागतो. उंबरठा या चित्रपटाची नायिका असा घाव घालते आणि म्हणूनच उंबरठाची नायिका ही क्रांतिकारी वाटू लागते. कुठेतरी लग्नव्यवस्थेला धक्का दिल्याशिवाय, लग्नांतर्गत बंधनांना प्रश्न विचारल्याशिवाय आपण नव्या व्यवस्थेत जाऊ शकणार नाही असं यातून सूचित होत राहतं...

स्मिता पाटीलबद्द्ल कितीही लिहिले तरी ते तिच्या अभिनयाच्या परिघापेक्षा तोकडे पडेल. वयाच्या विसाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणारी स्मिता जवळजवळ ८० सिनेमांची अनभिषिक्त महाराणी ठरली. १९८४ मध्ये ती आंतरराष्ट्रीय नायिका बनली. उण्यापुर्‍या १० वर्षांची कारकीर्द. सगळे मिळून ८० चित्रपट. २ राष्ट्रीय आणि १ फिल्मफेअर आणि पद्मश्री विजेती. ती एकमेव आशियाई चित्रपट कलाकार आहे जिचे चित्रपट पॅरिस आणि फ्रान्समध्ये ला रॉशेला शहरातील हाऊस ऑफ कल्चरमध्ये व्यक्तिविशेष म्हणून तिच्या चक्र, बाजार, मंथन, भूमिका ह्या चित्रपटांचा महोत्सव (रिट्रॉस्पेक्टिव्ह) भरविण्यात आला. सत्यजित रायनंतर हा बहुमान स्मिताला मिळाला होता. तत्पूर्वी तिला पद्मश्री हा सरकारी किताब आणि 'चक्र'मधील अम्मा ह्या भूमिकेबद्दल अभिनयासाठी ‘सुवर्णकमळ’ मिळाले होते. अभिनयाबद्दल राज्य व राष्ट्रीय पुरस्कार दोन वेळा प्राप्त झाले होते. कसलीही पार्श्‍वभूमी नसताना वा गॉडफादर नसताना तिला हे मानसन्मान मिळत गेले. स्मिताने चित्रपटांमध्ये पारंपरिक पद्धतीच्या भूमिका साकारल्या. मात्र खासगी आयुष्यात ती खूपच बिनधास्त होती. दुरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून कामाला असताना स्मिता जीन्स आणि टीशर्टमध्ये तिथे जायची. मात्र बातम्या देत असताना जीन्सवरच साडी परिधान करायची.

वृत्‍तनिवेदिका म्‍हणून काम करत असतांना श्‍याम बेनेगल यांनी स्मितामधील अभिनय क्षमता ओळखून तिला १९७५ मध्‍ये 'चरणदास चोर' या चित्रपटात घेतले. पहिल्‍याच चित्रपटातील तिच्‍या अभिनयाचे कौतुक झाले. त्‍यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. ७०-८० च्‍या दशकात समांतर चित्रपटांची लाट आली. समाजातील अनेक प्रश्‍नांना डोळ्यासमोर ठेवून चित्रपट बनू लागले. मुळात स्मिता एका सुशिक्षीत तसेच समाजवादी कुटुंबातून आल्‍यामुळे तिला सामाजिक प्रश्‍नांविषयी कळवळा होता. तिने स्‍त्रीप्रधान भूमिका करून वेगवेगळ्या विषयांकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले. त्‍यामुळे 'मिर्च मसाला'मधील सोनबाई, 'अर्थ'मधील कविता सान्‍याल महिलांना आपलीशी वाटली. मराठीतील 'उंबरठा' चित्रपटातील सुलभा महाजन म्‍हणजे जणूकाही आपल्‍या मनातली एक भावना आहे, असे त्‍याकाळी अनेक महिलांना वाटलं. स्मिताची "उंबरठा'मधली व्यक्तिरेखा प्रचंड शक्तीची होती, त्यावेळेसच्या काळाच्या खूप पुढे अशी ती भूमिका होती.

दूरदर्शनवर वृत्‍तनिवेदिका म्‍हणून सुरू झालेला स्मिता पाटीलचा प्रवास आजही प्रेक्षकांच्‍या आठवणीत आहे. मराठी व हिंदी दोन्‍ही चित्रपटसृष्‍टीवर दोन दशके अधिराज्‍य गाजवणा-या या अभिनेत्रीने हिंदी-मराठी रसिकांना रडवले, हासवले, विचार करायला भाग पाडले. स्मिता पाटीलला जाऊन २९ वर्षे झाली. परंतु, चित्रपटसृष्‍टीतील सर्वोत्‍तम अभिनेत्री कोण असा प्रश्‍न उपस्‍थित झाल्‍यास आजही स्मिता पाटीलचे नाव तोंडात येते.बॉलीवूडमध्ये सुंदर सुंदर डोळ्यांवर सगळं मिळून जेवढं लिहिलं असेल कदाचित तेवढंच एकट्या स्मिताच्या डोळ्यांवर लिहिलं गेलं असेल. तिच्याविषयीचा कोणताही संदर्भ तिच्या डोळ्यांच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होत नाही.तिची बंडखोर वृत्ती तिच्या कामातूनही व्यक्त झालीच पण दुर्दैव असं की तिच्या बोल्डपणाची चर्चा प्रमाणापेक्षा जास्त झाली. 'चक्र'मधलं तिचं अफाट काम त्या अंघोळीच्या प्रसंगाने झाकोळलं गेलं जणू. तसं तिच्या नितळ, मोहमयी सौदर्य आणि झळाळत्या कलागुणांची दखल अगदी हॉलीवूडकडूनही घेतली गेली.आपल्या पदार्पणातच शबानाला टक्कर दिली होती तिने आपसुकच. लोकांच्या मनात कायमच त्यांची स्पर्धा राहिली. पहिल्या दोन चित्रपटांनंतरच तिची तुलना शबानाशी होवु लागली होती. स्मिताला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मात्र शबानाच्या आधी मिळाला. आणि मग शबानाला तीन सलग ८३ (अर्थ), ८४ (खंडहर), ८५ (पार). आणि हे शेवटपर्यंत चालुच राहिलं.

१९६९ मध्ये ’भुवनशोम’ आणि १९७४ मध्ये ’अंकुर’ आला आणि समांतर चित्रपटांची सुरवात झाली. त्यात वास्तववादी स्त्रीचित्रण येऊ लागलं. या चित्रपटांना विशिष्ट प्रेक्षक मिळू लागला. १९८२ मधे जब्बार पटेल-स्मिता पाटील यांचा ’उंबरठा’ येईपर्यंत ही लाटही ओसरू लागली. पण आताच्या ग्लोबलायझेशन आणि मल्टिप्लेक्सच्या जमान्यात, व्यावसायिक आणि वास्तववादी धाटणीचं मिश्रण असणार्‍या हिंदी चित्रपटांतून पुरुष आणि स्त्री दिग्दर्शकही सशक्त स्त्री व्यक्तिरेखा देताहेत. उदाहरणार्थ ’चांदनी बार’, ’पेज थ्री’, ’लक्ष्य’, ’वेक अप सिड’, ’देव डी’, ’नो वन किल्ड जेसिका’ इत्यादी.मराठीतले जुन्या नव्या दिग्दर्शकांचे ‘ध्यासपर्व’, ‘थांग’, ‘दोघी’, ‘नितळ’, ‘जोगवा’, ‘गंध’, ‘रेस्टॉरंट’ हेही आहेत.कितीही सशक्त अभिनय वा व्यक्तिरेखा समोर आल्या तरी तिची तुलना स्मिताशी केली जाते यावरून तिचा अभिनय हा अभिनेत्रींच्यासाठीचा सर्वोच्च मापदंड ठरला आहे यातच सर्व येते. असं असलं तरी बहुसंख्य भारतीय प्रेक्षकांसाठी चित्रपट हे अजूनही एक फक्त करमणुकीचं माध्यम असल्यामुळे बहुतेकदा चित्रपटातील स्त्रियांच्या आकर्षक वेशभूषा-केशभूषा-देहबोलीचं अनुकरण होताना दिसतं. त्यातल्या व्यक्तिरेखांच्या क्षमतांचं, समाज परिवर्तनासाठी नवे मार्ग शोधण्याचं नाही. तसं ते होण्यासाठी सक्षम स्त्री व्यक्तिरेखा असलेले आणि तुलनेसाठी निवडक व्यावसायिक चित्रपट मुद्दाम मुला-मुलींना, स्त्री-पुरुषांना दाखवावे लागतील. बदलती स्त्री अधोरेखित करून त्याची चर्चा करावी लागेल. प्रेक्षक बदलले तरच यापुढच्या करमणूकप्रधान चित्रपटांत स्त्री फक्त नेत्रसुखासाठी असणार नाही.

'जैत रे जैत' मधली बाजिंदी-मनमानी नायिकेची भूमिका ती वास्तव आयुष्यात जगल्यामुळे की काय तिने राज बब्बरशी लग्न केले. स्मितावर राज बब्बर आणि नादिरा बब्बर यांचा संसार उद्धवस्त केल्याचा आरोप लावण्यात आला होता. अभिनेता राज बब्बर यांच्याशी जवळीक वाढल्यामुळे तिच्यावर बरीच टीका झाली. त्यावेळी राज बब्बर विवाहित होते. नादिरा बब्बर या त्यांच्या पहिल्या पत्नी होत्या. विवाहित असूनसुद्धा राज बब्बर यांचे स्मिता पाटीलशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे नादिराला लोकांची सहानूभुती मिळाली आणि स्मितावर टीकेचे झोड उठले. राज बब्बर नादिराशी विभक्त झाले आणि त्यांनी स्मिता पाटीलशी विवाह केला. राज बब्बर यांना एकुण तीन अपत्ये आहेत. आर्य बब्बर आणि जुही बब्बर ही नादिरा आणि राज यांची मुले आहेत. तर प्रतिक बब्बर स्मिता आणि राज यांचा मुलगा आहे. स्मिता पाटील यांना ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही तासांतच स्मिता कोमात गेली होती. १३ डिसेंबर १९८६ या दिवशी प्रतीकच्या जन्माच्या अवघ्या सहा तासांनी स्मिताने या जगाचा निरोप घेतला.

शेवटी स्मिताबद्दल तिच्याच गीताच्या शब्दात सांगता येईल ....
उगीच देऊ नकोस हाका, कुणी इथे थांबणार नाही,
गडे, पुन्हा दुरचा प्रवास कुठेतरी दूर जात आहे!
सख्या तुला भेटतील माझे, तुझ्या घरी सूर ओळखीचे,
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे!

स्मिताला कोणी अलविदा म्हणणार नाही, कारण तिला सर्वांच्या स्मृतींच्या हळव्या कुपीत मोठ्या प्रेमाने सदैव जतन करून ठेवले आहे...

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment