Tuesday, August 23, 2016

हवीहवीशी फिल्मी बहिण - 'नंदा' ..........



हिंदी सिनेमातली अनेक मंडळी कधी कधी आपल्या नात्यातली वाटतात. त्यांच्यात कोणी भाऊ शोधतो तर कोणी मायबाप तर काहीजण मित्र शोधतात. या अशा इच्छित फिल्मी नात्यात एक नातं हव्याहव्याशा बहिणीचंही होतं. त्या काळी कुठल्याही चित्रपटरसिकास आपली बहिण कशी असावी असं जर विचारलं गेलं असतं तर नक्कीच सर्वांचं उत्तर एकच आलं असतं ते म्हणजे 'नंदा' !


नंदा म्हणजे जणू काही सर्वांचीच फिल्मी बहिण होती, हवीहवीशी वाटणारी, गोबरया गालाची अन डोळे मिचमिचे करून बोलणाऱ्या नंदासारखीच आपली बहिण असावी वा नंदा हीच आपली बहिण असावी असं वाटायचे. खरे तर त्या लोकांचा आणि आपला कधीच संबंध येत नाही पण ते नकळत आपल्या जीवनात डोकावत राहतात अन आपण त्यांच्यात गुंतत राहतो. नंदाच्या बाबतीत तसंच म्हणता येईल. नंदाचे सिनेमे पाहिलेत, तिला भेटायचा प्रश्नच नव्हता तरीही ती आपलीशी वाटायची. आता ती नाहीये पण परवाच झालेल्या रक्षाबंधनाच्या दिवशी सगळ्या बहिणी डोळ्यापुढे तरळून जाताना नंदादेखील तरळून गेली. अतिरंजित वाटेल पण तिचे काल्पनिक 'बहिण' म्हणून असणे मनात खूप घट्ट रूळलेय. कामिनी कौशल, सुलोचना आणि दुर्गा खोटे यांच्यात 'आपली आई' शोधणारे मी खूप बघितलेत अन बलराज साहनीमध्ये अनेक जण 'पित्या'ला बघणारेही खूप आढळलेत. काहींना एके हंगल कायम एखाद्या आजोबांसारखे वाटले तर अनेकांना फरीदा जलाल ही खऱ्या बहिणीची मैत्रीणच वाटायची ! असो....या सगळ्या फिल्मी गोतावळ्यात नंदा डोक्यात अशी फिट बसली की बाहेर निघालीच नाही.

या फिल्मी नात्यांना दृढ करण्यास काही 'भूमिकांनी' मोठा हातभार लावला होता. सुलोचनादीदींनी रुपेरी पडदयावर साकारलेल्या ‘मोलकरीण’, ‘एकटी’, ‘अन्नपूर्णा’मधील भूमिका पहिल्या की त्या आपल्याच कुटुंबातल्या एक वाटतात. ‘एकटी’मधील मुलाच्या भेटीसाठी तळमळणारी, नातवाचे तोंड पाहण्यासाठी आसुसलेली ही नायिका ऐन दिवाळी सणात मुलाच्या व नातवाच्या प्रतीक्षेतच प्राण सोडते. निष्प्राण झालेले त्यांचे ते डोळे पाहून मनात कालवाकालव निर्माण होते. ‘एकटी’मधील सुलोचनादीदींचा हा अभिनय बघताना प्रेक्षक अक्षरशः हुंदके देऊन रडत असतात. 'दिवार'मधली निरूपा रॉय आणि 'अग्नीपथ'मधली रोहिणी हट्टगडीदेखील याच वर्गात मोडतात. ‘दो बिघा जमीन’, ‘अनपढ’, ‘छोटी बहन’, ‘नीलकमल’, ‘वक्त’ या चित्रपटात बलराज साहनींबद्दल प्रचंड कणव मनात दाटून येते. 'दोस्ताना'मध्ये अमित शत्रुघ्न यांच्या मैत्रीत वैर येतं तेंव्हा आपलाच जीव कासावीस होतो. का बरे असे होत असावे ? खरे तर सिनेमा संपतो आणि आपण घरी येतो मग हे लोक का बरे आपल्या मागोमाग आपल्या घरी येत असावेत ?

एकदा गप्पा मारताना एक तांत्रिक उत्तर माझ्या मित्राने दिले होते की, 'ही सर्व मंडळी कॅमेरयात कधी बघत नव्हती अन या सर्वांचा अभिनय जितका खरा होता तितकेच महत्वाचे म्हणजे यांचे चेहरे !" नंदा एक टिपिकल बहिणीचा तोंडवळा घेऊन उतरली होती तर बलराज साहनी ठाशीव श्रमिक बाप अन सुलोचनाबाई - दुर्गा खोटे ह्या पक्क्या भारतीय आया वाटायच्या ! अशा तोंडवळयाच्या अभिनेत्र्या पुन्हा पडदयावर आल्या नाहीत. त्यामुळे हे लोक गेल्यावर त्यांचा स्पेस तसाच राहिला. नाझनीनने बहिणीच्या रोलमध्ये बरेच प्रयत्न केले पण नंदाची बात त्यात कधीच आली नाही तर रिमा लागूंची फिल्मी आई कायम उच्चभ्रू वाटली. अलोक नाथ पुस्तकी आणि नाटकी बाप भासले. या सर्वात नंदाच जास्त लक्षात राहते ते तिच्या आगळ्या वेगळ्या स्टारडममुळे आणि अविवाहित आयुष्यामुळे ....

"नंदा".... नाव उच्चारताच चित्रपट शौकिनांच्या नजरेसमोर तरळतो एक भोळाभाबडा, तजेलदार डोळ्यांचा आणि पाहाणार्‍याला क्षणात रडविणारा तर दुसर्‍या क्षणाला हसविणारा एक देखणा चेहरा. लौकिक अर्थाने ती अगदी ग्लॅमरस अथवा नंबर एकची अभिनेत्री नव्हती, पण केसांचा आंबाडा, तर कधी केसांना बांधलेली रिबिन, कपाळावर ठसठशीत कुंकू, उजव्या जीवणीजवळचा तीळ, गोरा रंग, बांधेसुद शरीरयष्टी, निरागस चेहरा आणि चमकदार डोळे आणि लोप्रोफाईल अभिनयाच्या बळावर तिने स्वत:ची प्रतिमा निर्माण केली होती. ही अभिनेत्री नेहमी चर्चेत राहिली ती एका अभिनेत्रीपेक्षाही "छोटी बहीण" या रुपात. आणि बेबी नंदा याच नावाने.. प्रत्यक्षात ती तशी दुर्दैवीच होती. दिसायला सुंदर, सुस्वरूप, मृदु आवाज असणार्‍या या बहिणीचे लग्न व्हावे, तिचा संसार फुलावा, मांडीवर नातवंडे खेळावीत असे सारखे वाटे. पण, तिच्या पत्रिकेत विवाहयोग नसावा. ईश्वर एकीकडे सुखाची बरसात करतो, तर दुसरीकडे काहीतरी उणीव ठेवतोच. नंदाजवळ रूप होतं, पैसा होता, ऐश्‍वर्य होतं, पण तिच्या नशिबात परमेश्‍वराने विवाहाचे योग लिहिले नव्हते.....

'नंदा'चे नावच कसे अस्सल मराठी वाटते होय ना ! अगदी मराठमोळ्या कुटुंबात पूर्वी नंदा, कुंदा, कलावती वगैरे नाव ठेवण्याची परंपरा होती. तसे तिचं नाव याच दोन अक्षरी परंपरेतले होते. या नावावर तिने हिंदी चित्रपट सृष्टीत साठच्या दशकात पाय रोवले. तिच्या नावासमोर आडनावाची गरज तिला कधी पडली नाही. ना तिला कोणाच्या आधाराची गरज वाटली नाही. अतिशय गोड, निरागस चेहरा, त्याला साजेशी देहयष्टी, गोरा रंग. असे खानदानी व्यक्तिमत्त्व असलेल्या बेबी नंदाचे नाव होते नंदा विनायक कर्नाटकी. तिचे वडील विनायक कर्नाटकी म्हणजेच मा.विनायक ! या दिग्गज कलाकाराच्या सात मुलांपैकी नंदा सर्वात लहान अपत्य. तिचा जन्म १९४१ सालचा कोल्हापुरातला. वयाच्या चौथ्या वर्षी कोल्हापुरात खेळत असताना पडल्यामुळे कपाळावर डाव्या बाजूला मोठी उभी खोक पडली तो व्रण आयुष्यभर वागवावा लागला. त्यामुळेच नंदाची कायम प्रतिमा केसांची एक मोठी, जाड बट कपाळावर डाव्या बाजूला पुढे अशी राहिली. कोल्हापूर नंतर मुंबईत वाढल्याने दादरच्या बालमोहन विदयामंदिरची ती विदयार्थिनी राहिली. जन्मापासूनच घरात सिनेमाचे वातावरण असल्याने बालपणीच सिनेमात लहान मुला-मुलींच्या भूमिका तिने करण्यास सुरुवात केली. ‘मंदिर’ नामक सिनेमा, ज्यात लता मंगेशकरांनी काम केले होते, त्यांच्या लहान बहिणीचे काम नंदाने केले होते. बेबी नंदाचा हा पहिला चित्रपट. (आणि लता मंगेशकरांचा अभिनेत्री म्हणून शेवटचा.) बालकलाकार म्हणून काम केल्यामुळे नंदाचे नाव पडले बेबी नंदा. ती लहान असतानाच पुढे तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. अन् कुटुंबावर आर्थिक आरिष्ट कोसळले.


लहानपणापासूनच नंदाला चित्रपटात काम करण्याची इच्छा नव्हती. वडिलांना तिने तसे स्पष्टपणे सांगितले देखील होते. पण परिस्थितीमुळे तिला वयाच्या अकराव्या वर्षी पुन्हा कॅमेऱ्यासमोर उभे राहावे लागले. वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर ती भावंडे सैरभैर झाली होती. व्ही. शांताराम हे नंदाच्या मावशीचे यजमान. यांनी तिला खऱ्या अर्थाने चित्रपटात ब्रेक दिला. त्यांनी नंदाला बालकलाकार म्हणून "तुफान और दिया" मध्ये संधी दिली आणि हा चित्रपट खूपच गाजल्यामुळे तिचे नाव सर्वतोमुखी झाले. सिल्व्हर ज्युबिलीचे यश याला लाभले पण ते पाहायला मा. विनायक हयात नव्हते याचे नंदाला दुःख होते. 'जग्गू', 'शंकराचार्य' अशा चित्रपटातून तिचा अभिनयाचा प्रवास सुरू झालेल्या नंदाचा ‘बेबी' या शब्दाने पिच्छा सोडला नाही. नंदाच्या सोज्वळ व्यक्तिमत्त्वामुळे तिच्या बालपणीही एक प्रकारचा त्रास झाला. राज कपूरला ‘बूट पॉलिश’ सिनेमासाठी लहान कलाकाराची आवश्यकता होती. बेबी नंदा रस्त्यावरच्या मुलांच्या भूमिकेसाठी राज कपूरकडे गेली, तेव्हा ते म्हणाले, ‘बेटी, तुला कितीही फाटके कपडे घातले तरी तू चांगलीच दिसणार, भिकारी वाटणार नाही.’ त्यामुळे नंदाचा तो चान्स गेला. पुढे मोठेपणी या सोज्वळ कल्पनेला छेद देत तिने काही ग्लॅमरस भूमिकाही केल्या होत्या. तिने मराठीतही काम केले होते. वयाच्या बाराव्या वर्षी दिनकर द. पाटील यांच्या "कुलदैवत' या चित्रपटात तिनं मुलाची भूमिका केली होती. 'शेवग्याच्या शेंगा', 'देव जागा आहे', 'देवघर', 'मातेविना बाळ', 'झाले गेले विसरून जा' या मराठी चित्रपटातही काम करून तिने आपली मराठीशी असलेली नाळ कायम ठेवली. 'शेवग्याच्या शेंगा' या चित्रपटातल्या सहिष्णू नायिकेच्या भूमिकेबद्दल तिचा पं. नेहरूंच्या हस्ते सत्कारही झाला होता. त्यानंतरच्या काळात 'काला बाजार', 'लक्ष्मी', 'बंदी', 'दुल्हन', 'धूल का फूल', 'ऑंचल', 'इत्तेफाक' असे एक ना अनेक हिट चित्रपट तिच्या नावावर जमा आहेत. जरी तिची कारकिर्द तशी आघाडीची अभिनेत्री म्हणून गाजली नसली तरी ती कधीही पिछाडीला पडली नव्हती.

१९५९ मधल्या एल.व्ही. प्रसाद निर्मित "छोटी बहन" मुळे तिचे नाव सार्‍या देशात झाले ते त्यातील प्रमुख भूमिकेमुळे. मात्र ती ह्या 'छोट्या बहिणी'चा शिक्का कधीच पुसून काढू शकली नाही. तरीही शशी कपूर आणि राजेश खन्ना यांच्या बरोबरीने केलेले तिचे चित्रपट तिच्या चतुरस्त्र अभिनयाची साक्ष देण्यास पुरेसे आहेत. तिने कधीही मधुबाला, मीनाकुमारी, वैजयंतीमाला, वहिदा रेहमान अशा अभिनेत्र्यांच्या पंगतीतील प्रथम स्थान मिळविले नसले तरीही.... देव आनंद, राज कपूर, शशीकपूर, राजेन्द्रकुमार मनोजकुमार, राजेश खन्ना अशा दोन पिढ्यांच्या आघाडीच्या अभिनेत्यांसमोर ती कधी नायिका म्हणून तर कधी सहनायिका या रुपात चमकली. देव आनंदसमवेत तिने केलेले "कालाबाजार....हम दोनो....तीन देवियां" गाजलेल्या फिल्मी यादीत आले. यातील ’हम दोनो’तल्या मेजर वर्माचा भांग दुरुस्त करणारी त्याची पत्नी आठवून नॉस्टॅल्जिक फिल येतो. याच चित्रपटातील ‘अल्ला तेरो नाम’ आणि ‘प्रभू तेरो नाम’ या दोन गाण्यांनी अजूनही रसिकांचे डोळे पाणावतात. यातील कॅप्टन आनंदची प्रेयसी असलेली साधना जशी सुंदर दिसते तशीच नंदासुद्धा सुंदर आणि लहान दिसते. पण साधना ’प्रेयसी’ दिसते, तर नंदा ’पत्नी’ वाटते ! यात नंदाच्या अभिनयाचा भाग आहेच. ’काला बाजार’मध्ये लीला चिटणीसबरोबर ’ना मै धन चाहूँ’ गातानाची तिची सोज्वळ मूर्ती आठवते आणि त्या सोज्वळपणाच्या पार्श्वभूमीवर अपराधी मन घेऊन पडलेल्या खांद्यांनी जिना चढणार्‍या देव आनंदचा कोंडमारा उठून दिसतो, हेही जाणवतं.

शशी कपूरची तर ती लकी हीरॉईन होती. शशीकपूरसोबत नंदाने आठ चित्रपटांमध्ये काम केले. शशी-नंदा जोडी अशी जमली होती की, आता दोघं लग्न करतील की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. त्याआधी म्हणजे शशीला विशेष नाव नसताना आणि नंदा जेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर असताना तिने शशीबरोबर काम करायला नकार दिला नव्हता. या जोडीचे ‘चार दिवारी’, ‘मेहंदी लगी मेरे हाथ’ असे चित्रपट प्रदर्शित झाले आणि गेले, मात्र ‘जब जब फूल खिले’ने रेकॉर्ड केला आणि शशी-नंदा जोडीला पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली. त्यानंतर ‘मुहब्बत इसको कहते है’, ‘निंद हमारी ख्वाब तुम्हारे’, ‘राजा साहब’, ‘रुठा ना करो’ या चित्रपटांनी ७० सालापर्यंत शशी-नंदा पर्व सुरू ठेवलं. त्यातील 'जब जब..' या चित्रपटातून मॉड अभिनेंत्री म्हणूनही तिची ओळख झाली. ‘जब जब..’ गोल्डन ज्युबिली हिट झाला. (मागे यावरच बेतलेला आमिर खान- करिश्मा कपूर यांचा ‘राजा हिंदुस्थानी’ आला होता). यातील "परदेसियोंसे ना अंखिया मिला ना" आजही प्रेमिकाचे आवडीचे गीत आहे. या चित्रपटात ती अतिशय सुंदर दिसली होती. त्यावेळी शशीकपूरने नंदा ही त्याची फेवरेट अभिनेत्री असल्याचे घोषित केले होते आणि नंदानेही शशीकपूरच्या संदर्भात फेवरेट हिरो असल्याचे सांगितले होते.

कधी नायिका, कधी बहीण, कधी पत्नी, कधी आई आणि प्रसंगी खलनायिका म्हणूनही वाट्याला आलेल्या भूमिकांना नंदाने समर्थपणे न्याय दिला आणि आपल्या अदाकारीने रसिकांना घायाळ केले. नंदामध्ये एक अपील होते. त्यामुळे त्या काळातही तिने स्लीवलेस गाऊनवर म्हणलेलं 'ये समां, समां है ये प्यार का, किसीके इंतजार का' हे याच चित्रपटातील गाणे कायमचे स्मृतीत रेखाटले गेलेय. 'एक था गुल और एक थी बुलबुल' असं पडदयावर शशीकपूर जेव्हा प्रेमाने साद घालत असतो तेव्हा अत्यंत निरागस चेहऱ्याची नंदा आपणं जणू त्या गावचीच नाही असे दाखवत प्रेमाचा अप्रत्यक्ष स्वीकार करते तेव्हा तिच्या अभिनयाची प्रचीती येते.

तिच्यासमवेत काम केले नाही असा बिनीचा एकही अभिनेता त्याकाळी नव्हता. अगदी दादामुनी अशोक कुमार सोबत तिने काम केलेला बी.आर.चोप्रांचा 'कानून' हा एक अनोखा चित्रपट होता. यामध्ये अशोक कुमार आणि राजेंद्र कुमार यांना मोठे रोल होते; पण बाकीच्या मेहमूद, पळशीकर, ओम प्रकाश, शशिकला, जीवन अशा किती तरी लोकांच्या लहानमोठ्या भूमिकांचा समर्थ हातभार चित्रपटाला लागला होता. त्यांच्यातलीच एक नंदा होती. तिचं कामही चित्रपटाच्या सफाईदारपणात भरच टाकतं. धनीरामचा खून केल्याची खोटी कबुली दयायला ती कालियाला पैसे देते; पण ती नंदा असल्यामुळे हे कृत्य भ्रष्टपणाचा आविष्कार असल्याचं प्रेक्षकाच्या मनात देखील येत नाही. ही नंदाची करामत होती. ’कानून’ हा इत्तेफाकप्रमाणेच बिनगाण्याचा सिनेमा होता. दोन दोन बिनगाण्याच्या हिंदी चित्रपटांमध्ये काम करणे, हा एक रेकॉर्डच असावा नंदाच्या नावावर. 'कानून' मध्ये असणाऱ्या राजेंद्रकुमारच्याच ’धूलका फूल’मधली त्याची बायको म्हणून नंदा आठवते. माला सिन्हाशी संबंध संपल्यावर तो नंदाशी लग्न करतो. ती थोडीशी जरी ’दिल अपना और प्रीत परायी’मधली राज कुमारची पत्नी नादिरा, हिच्यासारखी असती; तर ’धूल का फूल’चा तोल कलला असता. मात्र तो कलला नाही, हे श्रेय बी आर चोप्राचं. त्याने माला सिन्हाला केंद्रस्थानावरून हलवायला बरोब्बर पूर्ण पवित्र आणि निरागस दिसणारी नंदा पकडली!

दिलीप कुमार (मजदूर), राजकपूर (आशिक), मनोजकुमार (गुमनाम, शोर - यातील 'शोर'साठी आधी शर्मिलाने आणि नंतर चक्क स्मिताने नकार दिला होता, तेंव्हा मनोजकुमारनी आढेवेढे घेत नंदाला विचारणा केली तेंव्हा तिने भूमिका नुसती स्वीकारली असे नव्हे तर एक रुपयाही बिदागी न घेता केली. नंदा गेल्यावर तिची ही आठवण सांगताना मनोजकुमार फार गहिवरले होते), शम्मी कपूर (प्रेमरोग), गिरीश कार्नाड (आहिस्ता आहिस्ता), जॉय मुखर्जी (आज और कल), सुदेशकुमार (आंचल), सुनील दत्त (उसने कहा था), संजीव कुमार (पती-पत्नी), बलराज साहनी (छोटी बहन), विश्‍वजित (कैसे कहू), राजेश खन्नाच्या "इत्तेफाक" ने त्याच्या सुपरस्टार पदावर शिक्कामोर्तब केले पण त्याच चित्रपटाची नायिका नंदा एका वेगळ्याच रुपात पुढे आली. या चित्रपटात नवर्‍याचा खून करणारी नायिका नंदा असू शकते या गोष्टीवर शेवटी विश्वासच बसत नाही. हा अख्खा चित्रपट एका रात्रीत घडतो. जवळपास एका बंगल्यात घडतो. चित्रपटात गाणं नाही. दाढीचे खुंट वाढलेला राजेश खन्ना पहिल्यापासून शेवटपर्यंत वेडसर दिसत रहातो. नंदाला फारच कमी बोलणं आहे. आणि दोघांशिवाय आणखी पात्रं नाहीत. तिचा या चित्रपटातला रोल अत्यंत ठळक ध्यानात राहील असा होता आणि त्यामुळेच ती लक्षातही राहिली. 'काका'बरोबरच्याच 'दि ट्रेन'मध्ये तर ती फार लोभस दिसते. ‘दी ट्रेन’साठी तिनेच राजेश खन्नाच्या नावाची शिफारस केली होती. अशा अनेक दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम करताना तिच्या अभिनयाचा कस लागला. लाल साडी, कुंकवाचा भव्य टिळा, गळ्यात देखणे दागिने घातलेली नंदा परिवार चित्रपटात पडद्यावर जेव्हा जितेंद्र समवेत 'हमने जो देखे सपने' असे जेव्हा म्हणू लागते, तेव्हा आपण सौंदर्य सौंदर्य म्हणतो ते हेच का ? असे रसिकांना क्षणभर वाटून जाते. ‘आज और कल′ या चित्रपटात 'ये वादीया ये फिजा’ असे म्हणत व्हीलचेअरवर बसलेल्या नंदाला जेव्हा नायक निसर्गसौंदर्य दाखवत असतो, तेव्हा शारीरिक अपंगत्व आणि निसर्गाची ओढ यातून आपल्या मनाची चाललेली तडफड नंदाने अत्यंत बेमालूमपणे दाखवली आहे.

कुटुंबातूनच अभिनयाचा वारसा लाभल्यामुळे नंदाला कधी ओढून ताणून अभिनय करावा लागला नाही. तिने नायकांच्या जडण घडणीत बऱ्यापैकी वाटा उचलला होता. "भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना', "ये समा, समा है ये प्यार का', "किस लिए मैने प्यार किया', "इक प्यार का नगमा है', यासह तिच्या चित्रपटातली अनेक गाणी गाजली होती. काळ पुढे गेला आणी वयाने तिच्या चेहर्‍यावर आपली छाप पाडायला सुरुवात केली होती. यामुळेच की काय तिचे ‘छलिया’, ‘नया नशा’ चित्रपट चालले नाहीत. ‘नया नशा’ हा १९७४ मधील नंदाचा लीड रोल मधला शेवटचा चित्रपट. नंदाने यानंतर स्वखुषीने चित्रपटसृष्टीतून घरी जाणे पसंत केले. नंतर पुनरागमन करताना मात्र तिने काळाची पावले ओळखून बदलत्या भूमिकात स्वतःला झोकून दिले. १९८२ मध्ये तिने 'आहिस्ता आहिस्ता', 'मजदूर', आणि राज कपूरचा 'प्रेमरोग' या चित्रपटामधून चरित्र भूमिकांतून पुनरागमन केले. त्यानंतर मात्र तिने चित्रपटांना कायमचा रामराम ठोकला. 'भाभी', 'आहिस्ता आहिस्ता', 'प्रेमरोग','इत्तेफक' या चित्रपटांसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकन झाले होते, बहुधा लॉबींगमुळे ती या पुरस्कारापासून वंचित राहिली असावी; पण 'आँचल' या चित्रपटासाठी तिला सहअभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तिने भलेही चरित्र भूमिका साकारल्या असतील पण तिच्या बरोबरीच्या प्रेक्षकाचेही तिच्या बरोबरच वय वाढत गेले अन त्याच्या डोक्यात नंदा बहिण म्हणूनच रुतून बसली.विशेष बाब म्हणजे नंदाच्या नावावर असणाऱ्या ७० - ७२ चित्रपटापैकी जवळपास ६० सिनेमे नायिकेच्या भूमिकेचे होते तरीही ती सर्वाना बहिण म्हणूनच हवीहवीशी वाटायची !!

नंदा जशी सर्वच अभिनेत्यांना शोभून दिसली तशी तिची समकालीन अभिनेत्रींशी गट्टीही जमली. वहीदा रहेमानच्या सोबत ‘काला बजार’ या चित्रपटात काम केल्यानंतर त्यांच्यातील मैत्रीचे धागे अधिक घट्ट झाले. आशा पारेख, सायराबानो, हेलन, जबीन यांच्या समवेतही मैत्रीचे धागे जुळले. नंदा समवेत लग्नाचा प्रस्ताव नंदाच्या आईमार्फत सुरज प्रकाश यांनी ठेवला होता. या सर्वजणींशी असलेली तिची मैत्री हा तिच्या जीवनातला एक खास अध्याय होता. विशेषतः वहिदाशी तिची असलेली मैत्री तर एक मोठा ठेवा होता. मृत्यूपूर्वी काही दिवस आधी ती वहिदाच्या घरीच जेवणासाठी गेली होती. तेंव्हा बीबीसीशी बोलताना वहिदाने तीच आठवण सांगितली होती. आता त्या तिघींच्या (वहिदा, आशा आणि नंदा) मैत्रीच्या आठवणीबाबत वहिदाच कधी तरी लिहू शकेल.प्रेमावर बोलताना एका मुलाखतीत नंदाबद्दल वाहिदाने स्पष्ट केले होते की, 'ती स्वतःच्या जीवनातील काही आठवणींना शब्दात बांधू शकणार नाही, म्हणजेच त्यावर चर्चाही तिला नको होती. त्या क्षणांची आठवण तिला असह्य वाटत होती.' आजकाल गॉसिपशिवाय जगू न शकणाऱ्या बेगड्या फिल्मी दुनियेत ही मैत्री अन दुसऱ्याच्या खाजगी जीवनाबद्दलची अशी आस्था लोप पावली आहे.

नंदाला जितके चित्रपट मिळाले तितक्यात तिने मनःपूर्वक कामे केल्याचे आढळून येईल. नंदाच्या आठवणी म्हणजे अनेक आठवणींचा गोफ आहे, ज्यात जितके सुख तितके दु:खही. पण सार्वजनिक पातळीवर विचार करताना तिच्या कौटुंबिक आयुष्याविषयी खोलात जाऊन चर्चा करणेही योग्य नाही. कारण खुद्द तिने स्वतः त्या आपल्या खाजगी जीवनावरील पडदा कधी दूर केला नव्हता. नंदाच्या विवाहाची, थिल्लर प्रेमाची बातमी कधीच वाचण्यात येत नसे कारण तिने फालतू गॉसिपला कधी थारा दिला नव्हता. नंदाने लग्न का केले नाही, हा प्रश्न मात्र सारखा प्रश्‍न पडत असे. मनमोहन देसाईने तिला मागणी घातली होती तेव्हा विवाहास तयार होती. देसार्इंच्या प्रेमात ती उतारवयात पडली होती खरी, पण नियतीला तेही मान्य नव्हते. मनमोहन देसार्इंचा अपघाती मृत्यू झाला आणि नंदाचे स्वप्न भंगले. ईश्‍वराच्या दरबारात काय चालत आहे, याचा आपल्याला पत्ता लागत नाही. ती शेवटपर्यंत अविवाहित राहिली. त्यानंतरही प्रदिर्घ काळ चित्रपट सृष्टीशी संलग्न राहूनही नंदा अखेरपर्यंत एकाकी जीवन जगली. अत्यंत लाजाळू व्यक्तिमत्त्वाच्या नंदाने स्वत:ला प्रसिद्धीपासून कायम दूर ठेवले. 

एकेकाळी अत्यंत महागडी अभिनेत्री म्हणून ६० ते ७० दशकात ओळख होती आणि ती ज्या चित्रपटात असेल, तो चित्रपट नशीबवानच ठरणार, असेही जणू ठरूनच गेले होते. ज्या चित्रपटांच्या सेटवर ही अभिनेत्री वावरली, तिथे तिच्या अस्तित्वाचा सुगंधही दरवळला. कारण, उंची अत्तरे हाच तिचा शौक होता. नंदाचा एकूण सिनेमा स्पष्टपणे दोन भागांत विभागता येतो. एक भाग साध्यासुध्या ओळखीच्या, एक प्रकारे दुय्यम भूमिका असलेला; आणि दुसरा भाग कमी-जास्त ग्लॅमर असलेल्या नायिकेच्या भूमिका. या दुसर्‍या प्रकारच्या एकाही भूमिकेत ती कधी ’खरी’ – म्हणजे तिथली, हिंदी चित्रपटातल्या बेगडी, लुटुपुटूच्या जगातली वाटली नाही,अगदी ’जब जब...’ मध्येसुद्धा. निवृत्तीनंतर चित्रपटसृष्टीच्या झगमगाटापासून दूर राहूनही, ही अभिनेत्री झगमगाटातच वावरली. आपल्या युगावरच नव्हे, तर त्या काळात जन्मदेखील न झालेल्यांच्या युगावरही या अभिनेत्रीने आपली मोहोर उमटविली आहे. एकापेक्षा एक सरस चित्रपट देण्याऱ्या नंदाला अखेरपर्यंत एकाकी जीवन जगावे लागले. ही तिच्या जीवनाची खूप मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

नंदा सर्वांच्या विस्मृतीतून गेली. नंदा खरे आधीच गेली होती हृदयभंगानेच ! ती होती तेव्हा तिनेही अनेकांची हृदयं चिरली होती. काही काही नायिका राहतात अविवाहित, परंतु चाहत्यांच्या हृदयात घर करून राहतात. नंदा तशी होती. होतीच तशी ! हा एकाकी नंदादीप कालमानाने शांत झाला खरा, पण आपला ठसा कायम राखूनच. अजूनही एखादया दूरचित्रवाणी वाहिनीवर जुन्या हिंदी गीतांच्या लडी उलगडू लागतात, सफेद रेशमी सलवार कुर्ता परिधान केलेली, पापण्यांची अल्लड उघडझाप करणारी बेबी नंदा पडद्यावर दिसू लागते, तेव्हा जुन्याबरोबरच नवी पिढीदेखील तो क्षण पकडण्यासाठी तळमळते. नंदा हयात नसली तरीही 'ये समा, समा ऐतबार का, किसीके इंतजार का...'मधला तिचा इंतजार कधी न संपणारा असाच राहील यात शंका नाही ....

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment